रोजच्या जगण्यातील ताण- तणाव आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस चर्चिला गेलेला ‘युती की तुटी’ हा प्रश्न हे सारे बाजूला सारत बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समस्त भारतवासीयांनी एकच जल्लोष केला.. कारण साहजिक होते, पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचलेला भारत हा पहिला आणि एकमेव देश ठरला आहे! अमेरिका, युरोपिअन अंतराळ संस्था किंवा रशियालाही जे जमले नाही ते इस्रोच्या भारतीय वैज्ञानिकांनी करून दाखवले! त्यासाठी ‘लोकप्रभा’ परिवारातर्फे इस्रोमधील वैज्ञानिकांचे विशेष अभिनंदन!
या प्रसंगी आठवण होते ती, चांद्रयान- एक या पहिल्या भारतीय यशस्वी चांद्रमोहिमेची! पहिल्याच प्रयत्नांत तिथेही चंद्रावर पोहोचण्याची किमया इस्रोनेच करून दाखविली होती. त्यावेळेस तर भारताचे चांद्रयान भरकटल्याची आवई चीनने उठवली होती आणि नंतर चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चीनला मोठा धक्का बसला होता, शिवाय अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नंतर त्यांच्या वाटय़ाला नामुष्की आली ती गोष्टही वेगळीच! पण म्हणूनच या खेपेस मंगळयानाच्या प्रक्षेपणाच्या समयी चीनने अतिशय सावध भूमिका घेतली आणि यान मंगळावर पोहोचेपर्यंत गप्प बसणेच पसंत केले! इस्रोमधील वैज्ञानिकांचा हा दबदबा उत्तरोत्तर असाच वाढत जावा, हीच सदिच्छा!
मात्र चांद्रयानाचे यश त्यावेळेस मनसेने उत्तर भारतीयांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाने झाकोळले गेले होते. चांद्रयानाच्या यशापेक्षा चॅनल्स आणि वर्तमानपत्रांनीही त्यावेळेस मनसेच्या आंदोलनाला महत्त्व दिले होते. तेव्हा केलेली चूक सुधारण्याची संधी आता सर्वानाच परत लाभली आहे. या वेळेस आपण मंगळयानावर असा अन्याय करणार नाही, अशी अपेक्षा आहे! साजरे काय करायचे हेही आपल्याला कळायला हवे, त्याचा धडा आपण यातून घेतला असेलच! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी इस्रोमधील वैज्ञानिकांसमोर केलेल्या भाषणात क्रिकेट मालिकाजिंकून परत आलेल्या संघाला भारतीय कसे डोक्यावर घेतात, त्याचा उल्लेख केला आणि इस्रोचे यश त्यापेक्षा अनेक पटींनी खूप मोठे आहे, हेही भारतीयांना सांगितले.. सोनारानेच कान टोचले, हे योग्यच झाले!
चीनचे चँगे-वन चांद्रभूमीवर पोहोचल्यानंतर त्या यानाने पाठवलेली चांद्रभूमीची प्रतिमा चीन मधील घराघरांत अभिमानाने झळकताना दिसेल. आपल्या चांद्रयानाने त्याहीपेक्षा अनेक चांगल्या प्रतिमा पाठवल्या पण त्या काही भारतीय घरांत झळकल्या नाहीत. आता मंगळयानाने पाठवलेली प्रतिमा घराच्या भिंतीवर अभिमानाने झळकवून मंगळयानाचे यश साजरे करूया!
मंगल मंगळ हो!