विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

डोकलाममध्ये भारत-चीन खडे सैन्य आमनेसामने आले आणि महिन्यांच्या चर्चेनंतर चीनने माघार घेतली, त्या वेळेस तो आपला खूप मोठा विजय आहे, असे मानले गेले. त्याच वेळेस ‘मथितार्थ’मध्ये असे म्हटले होते की, भविष्यात असे प्रसंग वारंवार येणार असून त्यासाठी आपण मनाची तयारी तर ठेवायलाच हवी, पण त्याचबरोबर मोर्चेबांधणीही सज्जता राजनयाच्या पातळीवर असायला हवी. डोकलाम घटनेनंतरचा आजवरचा आढावा घेतला तर हेही लक्षात येईल की, वारंवार लडाखमध्ये घुसखोरी करून चीनने कुरापती काढल्या आहेत. मात्र या वेळेस पूर्व लडाखमध्ये त्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी घुसखोरी केली आहे, तीही अशा वेळी की, जेव्हा संपूर्ण जग करोनाविरोधातील लढाईत पूर्णाशाने उतरले आहे. हीच नेमकी वेळ चीनने का साधावी? चीन एखादी कृती करते तेव्हा एकच उद्देश त्यामागे कधीच नसतो. अनेक उद्देशांची यशस्वी गुंतवळ त्यांनी समोर ठेवलेली असते आणि समोरच्याच्या प्रतिक्रियांतून अनंत संधींचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो.

लडाख ते अरुणाचल ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ३४८८ कि.मी.ची आहे. चीनच्या बाजूस सीमेपर्यंत रस्तेबांधणी झाली असून आता रेल्वेमार्गही तयार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना सैनिक व शस्त्रसामग्री सीमेवर आणणे सोपे आहे. मात्र आपल्या बाजूची भौगोलिक रचना रस्तेबांधणीसाठी कठीण आहे. रेल्वेचा तर प्रश्नच येत नाही, अशी अवस्था आहे. गेल्या काही वर्षांत चीनसोबतचा संघर्ष वाढतो आहे, त्यामुळे आता स्वस्थ बसून चालणार नाही, हे डोकलामच्या आधीच भारत सरकारच्या लक्षात आले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. आता लडाखमधील दार्बुक- स्योक- दौलत बेग ओल्डी या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा २२५ कि.मी.चा मार्ग तयार झाला आहे. ३७ पूल असलेला हा मार्ग नियंत्रण रेषेला समांतर जातो. डेप्सांग आणि गाल्वान खोऱ्याला जोडण्याचे महत्त्वाचे काम तो करतो. सध्या चीन-पाकिस्तानच्या कारवाया एकवटलेल्या काराकोरमपर्यंत आजवर आपल्याकडे मार्ग नव्हता. यानिमित्ताने आपण आता काराकोरमच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ७३ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यातील ३५ आता रस्तामार्गे जोडली गेली आहेत. रस्ता शक्यच नाही, अशा ठिकाणी अतिउंचावर धावपट्टय़ा नव्याने केल्या किंवा वापरात नसलेल्या खुल्या केल्या. तिथे हवाई दलाची विमाने आता सर्व धोका पत्करून उतरतात. पूर्व लडाखमध्ये न्योमा, डीबीओ, फुक्चे; तर अरुणाचलमध्ये पासीघाट मेचुका, वालाँग, तुितग, झिरो या धावपट्टय़ांवर हवाई दल कार्यरत आहे. दौलत बेग ओल्डीची धावपट्टी जगातील सर्वाधिक १६,६१४ फूट उंचीवर आहे. अक्साई चीनजवळ आहे व कारोकोरमवरही लक्ष ठेवता येते. याच सर्व घटना चीनच्या भुवया उंचावण्यामागे आहेत. आता त्यांनी एकाच वेळेस अनेक ठिकाणी घुसखोरी करून भारताला उचकावण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पलीकडच्या बाजूला कोविडमुळे झालेल्या जागतिक नाचक्कीकडून त्यांना लक्ष वेगळीकडेच वेधायचे आहे. म्हणून त्यांनी घुसखोरीच्या एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची तयारी केली खरी. पण भारताने अद्यापपर्यंत तरी आवश्यक तिथे नाजूक म्हणजे अरेरावी न करता चर्चेने आणि आवश्यक तिथे कणखर म्हणजे चीनने माघार घेतल्याशिवाय आपलीही माघार नाही, असा थेट संदेश कृतीतून दिल्याने परिस्थिती नियंत्रित आहे. खरे तर गेल्या खेपेस डोकलामच्या वेळेस सातत्याने भारताने जगासमोर आपली बाजू मांडली तसेच होईल, असे चीनला अपेक्षित होते. त्यातून विषय वाढवत नेता येईल. पण भारताने शांतता राखून प्रश्न हाताळल्याने या पहिल्या फेरीत तरी चीनहाती काहीही लागलेले नाही. भविष्यातही यश राखायचे असेल तर ‘सावधपण सर्वविषयी..’ अशीच वाटचाल राजनयाच्या पातळीवर सुरू ठेवावी लागेल!