विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गेले काही महिने लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर सुरू असलेला संघर्ष आणि तणाव हा सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. या आठवडय़ातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची रशियात झालेली भेट आणि तणाव निवळण्यासाठी मान्य करण्यात आलेली पंचसूत्री ही महत्त्वाची घटना होती. मात्र त्यानंतर गेल्या दोन दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी केलेले निवेदन हे मात्र फारसे उत्साहवर्धक तर नाहीच; किंबहुना चिंता वाढवणारे आहे. शिवाय काही प्रश्नांचे उत्तर देणेही सरकार टाळत आहे, असा संशय निर्माण करणारे आहे. यापूर्वी एकूणच माध्यमांमधून आलेली माहिती पुन्हा एकदा सरकारच्या वतीने देण्यात आली. त्याच वेळेस राजनाथ सिंह यांनी हा तणाव ऐतिहासिक दृष्टिकोन आणि घटनांचा मागोवा घेत मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच यापूर्वी आपण किती वेळा आणि कसे प्रयत्न केले आणि चीनने त्याला कसा प्रतिसाद दिला नाही. आपण मान्य करत असलेली सीमारेखा चीनला अमान्य आहे. त्यामुळे दोघांनीही एकाच प्रतलावर येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पण ते म्हणतात त्याप्रमाणे हा काही केवळ ‘दृष्टिकोनांतील फरक’ नाही किंवा सीमारेखांमधील केवळ सापेक्षताही नाही. एकूणच भारत-चीन संघर्षांकडे अनेक कोनांतून पाहावे लागते. त्याला अमेरिकेचा एक वेगळा कोन तर आहेच आहे, त्याशिवाय एकविसावे शतक आशिया खंडाचे असेल तर त्यावर प्राबल्य कोणाचे हाही आहे. त्याला मानसशास्त्रीय युद्धाचेही एक वेगळे परिमाण लाभलेले आहे. कुणी त्याला बुद्धिबळातील चाली म्हणतात तर कुणी ‘माइंड गेम’. प्रश्न असा आहे की, सीमेवरील सारे काही हाताळण्यास आपण सक्षम आहोत हे गलवान संघर्षांच्या वेळेस मागे न हटता सैन्यदलाने दाखवून दिले. पण सरकारचा कणखरपणा यात नेमका कुठे आहे आणि भावी काळातील संघर्षांसाठी आपण खरोखरच तयार आहोत का? कारण देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडत्वासाठी प्राणांची बाजी लावू, अशी घोषणा करणे सोपे असते. पण प्रत्यक्षात राजनयाच्या पातळीवर गोष्टी हाताळता येत असतील तर प्राणांची बाजी लावण्याची गरजही नसते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने शोधवृत्तमालिकेतून केलेला ‘चिनी पाळतीचा’ गौप्यस्फोट हा छुप्या युद्धातील मानसशास्त्रीय परिमाण दाखविणारा भाग आहे. चीनच्या संदर्भातील आजवरच्या आपल्या सर्व कृती या प्रामुख्याने प्रतिक्रिया राहिल्या आहेत. आताही सरकारने झेनुआ डेटाचोरी प्रकरणात तपासासाठी शोध समिती जाहीर करणे हाही प्रतिक्रियेचाच भाग आहे. घुसखोरी ही फक्त प्रत्यक्ष सीमेवर नाही तर थेट सायबरमार्गे आपल्या घरांत पोहोचली आहे, हा यातील सर्वाधिक धोकादायक भाग आहे. हा भाग यापूर्वीच आपल्याला लक्षात यायला हवा होता. ‘केंब्रिज अ‍ॅनालेटिका’ घडल्यानंतरही हे आपल्याला कुणी तरी सांगावे लागत असेल तर ते निश्चितच शहाणपणा आणि सज्जतेचे लक्षण नाही. सज्जता केवळ सीमेवर नाही तर क्षणाक्षणाला सर्वच पातळ्यांवर असावी लागणार आहे.

चीनला तर भारतासमोर प्रश्नांची गुंतवळच असलेली हवी आहे. कारण बराच काळ काय आणि नेमके कुठे गुंतलेय हे शोधण्यात जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवावे लागेल की, ही चिनी गुंतवळ नको असेल तर आपल्यालाच वेगवेगळे कंगोरे सातत्याने वापरावे लागतील. केस नियमित विंचरणे हाच गुंतवळ न होण्यामागचा महत्त्वाचा उपाय असतो, हे सामान्य तत्त्व सातत्याने वापरावे लागेल. फक्त त्याआधी आपल्या कंगव्याचे कंगोरेही तपासून घ्यावे लागतील. कारण दात तुटलेला कंगावा फारसा कामाचा नसतो! आणि हे करायचे असेल तर त्यासाठी विरोधी पक्षांनाही विश्वासात घेऊन काम करावे लागेल. सर्वच जाहीर बोलणे शक्य नाही, पण अनौपचारिक चर्चा प्रमुख नेत्यांशी होईल असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले आहे, ते सरकार पाळेल अशी अपेक्षा आहे!