विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
भाजपावर कुणीही कितीही टीका केली तरी एक मात्र निश्चित की २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस फक्त आणि फक्त राजकारणच करणारा, सातत्याने केवळ निवडणुका जिंकायच्याच आहेत या आवेशात लढणारा दुसरा पक्ष सध्या तरी दिसत नाही. निवडणुका जवळ आल्या की, सर्वच पक्ष कमी-अधिक फरकाने राजकारणाला धार काढतात. मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सत्तेत आल्यानंतर गेली सातवर्षे निवडणुकांशिवाय-देखील ध्येय-धोरणांपासून सर्वत्र केवळ राजकारणाचाच विचार यशस्वीपणे करताना दिसतो आहे. यशस्वी यासाठी की त्यांनी सातत्याने निवडणुका जिंकत देशभरातील प्रभाव वाढवत नेला आहे. पलीकडे सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला तर अद्याप त्यांच्या नेतृत्वाचा अधिकृत अध्यक्षपदाचा प्रश्नही सोडवता आलेला नाही. या पाश्र्वभूमीवर कुणासही पटेल, न पटेल पण भाजपा हा काळाची पावले वेळीच ओळखून मार्गक्रमण करतो आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी केलेला बदल हे त्याचेच द्योतक आहे. गुजरातच्या इशाराघंटा भाजपाने वेळीच ओळखल्या आहेत. आता अर्थात त्यांनी केलेला बदल कितपत पथ्यावर पडतो हे मात्र १५ महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकांच्या निकालांमध्येच लक्षात येईल.

पटेल म्हणजेच गुजरातेतील पाटीदार समाज. १५-१६ टक्के म्हणजे अगदी फार मोठी टक्केवारी नसली तरी हा समाज गुजरातच्या राजकारणावर स्वतचा खास प्रभाव टाकून आहे. त्यामुळेच या समाजातील असंतोषाची खदखद वेळीच ओळखणे हे भाजपासाठी अतिशय महत्त्वाचे होते. त्यातही गुजरात म्हणजे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शहा यांचे घरचे मैदान. इथे पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यासारखी दुसरी नामुष्की नाही. शिवाय पराभव झालाच तर सातत्याने विरोधकांना नामोहरम करणाऱ्या भाजपाने विरोधकांहाती कोलीतच दिल्यासारखी स्थिती होईल आणि सध्या जवळपास कमजोर ठरलेल्या विरोधकांच्या अंगात प्राण फुंकल्यासारखे होईल. म्हणूनच भाजपाने गुजरातेत विशेष काळजी घेतली आहे. भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी अलीकडच्या काळात चार राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. सर्वत्र स्थानिक जातींचे राजकारण लक्षात घेऊन चाली केल्या आहेत. त्यातही पटेल, न पटेल पण गुजरातला अनेक कारणांनी सर्वाधिक महत्त्व आहे.

वर्षांनुवर्षे काँग्रेसच्या छत्रछायेखाली राहिलेले गुजरात भाजपाच्या आधिपत्याखाली १९९५ साली आले, ते पाटीदार म्हणजेच पटेल समाज काँग्रेसकडून भाजपाकडे वळल्यानंतर! आजवर सत्तेत राहण्यासाठी भाजपाला पाटीदारांनी मदतच केली आहे. गेल्या खेपेस विधानसभा निवडणुकांमध्ये याच पाटीदार नेत्यांनी एकत्र येऊन भाजपाच्या नाकात दम आणला आणि जिंकलेल्या जागांची शंभरीही पार करू दिली नाही, हे भाजपा विसरलेला नाही. भाजपा सत्तेत राहिला मात्र तो विजयही वर्मी बसलेल्या घावासारखाच होता. पाटीदारांचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्रामध्ये भाजपाला तब्बल १३ जागा गमवाव्या लागल्या. शिवाय सत्तासमीकरणे जुळवतानाही अडचणी आल्या त्या वेगळ्याच.

त्यात आता भाजपासमोर ‘आप’चे नवे आव्हान उभे राहिले आहे. ‘आप’ने असंतुष्ट असलेल्या पाटीदार समाजाकडे आपला मोहरा वळवला आणि अलीकडे पार पडलेल्या सुरत महापालिका निवडणुकीमध्ये पाटीदारांचे वर्चस्व असलेल्या तब्बल २७ जागा जिंकल्या, भाजपासाठी ही इशाराघंटा होती! त्यामुळे पटेल, न पटेल, पण पाटीदारांकडे दुर्लक्ष करणे भाजपाला परवडणारे नाही, हाच धडा होता. आता मुख्यमंत्रीपदी पटेल आणल्याची खेळी गुजरातचा डाव सुरक्षित राखेल अशी भाजपाला अपेक्षा आहे. त्याचा प्रत्यय येण्यासाठी मात्र १५ महिने वाट पाहावी लागेल!