डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती होण्यापूर्वीची गोष्ट. नवी मुंबईच्या एसआयईएस संकुलामध्ये एक कार्यक्रम होता. त्यावेळेस ते भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहात होते. विज्ञान विषयक वार्तांकन करणारा पत्रकार म्हणून अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना जाण्याचा व गप्पा मारण्याचाही योग आला होता. गेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये मात्र ते सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करत होते. जगातील सर्वाधिक बलशाली राष्ट्र व्हायचे किंवा जागतिक महासत्ता व्हायचे तर आपल्याकडे म्हणजेच भारताकडे व्हिजन असायला हवी.

सर्वसाधारणपणे व्हिजन या शब्दाचा मराठी अनुवाद करताना आपण दूरदर्शीपणा असा ढोबळ अर्थ लावतो. पण डॉ, कलाम यांना जी व्हिजन अपेक्षित होती, ती या दूरदर्शीपणाहूनही वेगळी अशी गोष्ट असावी, असे त्यांच्या भाषणांतून सातत्याने जाणवायचे. म्हणून इ-मेलवरून संपर्क साधत त्या दिवशी कार्यक्रमाआधीची पाच मिनिटे त्यांच्याकडून मागून घेतली. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या 10 मिनिटे आधीच त्यांची भेट झाली. थेट प्रश्न केला, तुम्हाला अपेक्षित व्हिजन म्हणजे नेमके काय?  त्यावर ते म्हणाले, एखादी गोष्ट अस्तित्वात नसतानाही वैज्ञानिकदृष्टिकोनाचा वापर करून विज्ञानातील तत्त्वे आणि वैज्ञानिक तर्कशास्त्राच्या आधारे भविष्याची आखणी किंवा बांधणी करणे म्हणजे मला अपेक्षित व्हिजन होय. त्यावर मी म्हटले, ही व्याख्या झाली, पण अद्याप मनात नेमके स्पष्ट होत नाहीए… असे सांगितल्यावर मात्र मग ते शिक्षकाच्या भूमिकेत शिरले आणि म्हणाले, दोन उदाहरणे सांगतो मग मला नेमके काय म्हणायचे, ते तुला कळेल.

expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

ते म्हणाले, मी एकदा प्रयोगशाळेत रात्री उशिरापर्यंत काम करत होतो, त्यावेळेस भारतीय अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ. विक्रम साराभाई प्रयोगशाळेत चक्कर मारण्यासाठी आले. रात्री उशिरापर्यंत काम करताना पाहून त्यांनी विचारणा केली, काय करतोयस. मी त्यांना म्हटले, सर मला उपग्रह तंत्रज्ञानामध्ये रस आहे. त्यावर ते म्हणाले, एक काम कर… तू कामाला लाग आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या तिसऱ्या टप्प्याचे डिझाईन करायला घे. खरे तर माझ्यासाठी ते तसे अनपेक्षित होते. जगातील पहिल्या टप्प्याचे डिझाईन अमेरिका आणि रशियाने यशस्वी केले होते. दुसऱ्या प्रगत टप्प्यावर त्यांचे काम सुरू होते आणि जगातील तिसरा टप्पा अस्तित्त्वात यायचा होता. अशा वेळेस माझ्यासारखा मुलगा तिसऱ्या टप्प्याचे काम कसे करणार, असा प्रश्न मला पडला होता. तो मी डॉ. साराभाई यांना विचारलाही. त्यावर ते उत्तरले, अऱे सोपे आहे. व्हिजन ठेवले की, काम होते. तुला विज्ञान व वैज्ञानिक तत्त्व माहीत आहे, आता वैज्ञानिक तर्कशास्त्राचा वापर कर आणि कल्पकता व सृजनशीलतेचा वापर कर, यालाच व्हिजन म्हणतात.. डिझाईन चुकणार नाही… असे म्हणत डॉ. साराभाई निघूनही गेले. मी मात्र गडबडलो होतो. पण त्यांनी दिलेला व्हिजनचा कानमंत्र घोकून काम करायला सुरुवात केली.

सुमारे दोन वर्षांनंतर डॉ. साराभाई एकदा माझ्याकडे आले आणि म्हणाले, अरे, ते तिसऱ्या टप्प्याच्या डिझाईनचे काम कुठपर्यंत आले. मी त्यांना म्हटले, सर केवळ डिझाईन तयार आहे. त्यावर ते म्हणाले, उद्या कॅनडाचे शिष्टमंडळ येणार आहे, त्यांच्यासमोर त्याचे सादरीकरण कर. त्यांच्याकडे दुसरा टप्पा विकसित झाला आहे. तिसऱ्या टप्प्याचे डिझाईन त्यांना आवडले तर आपण ते त्यांना विकू आणि त्यातून आपल्या देशाला परकीय चलन मिळेल. त्यातून अधिक चांगले संशोधन करता येईल. माझ्यापेक्षा त्यांनाच माझ्यावर जास्त विश्वास होता. दुसऱ्या दिवशी मी सादरीकरण केले आणि कॅनडाने तिसरा टप्पा भारताकडून विकत घेतला.

त्यानंतर माझा रोल बदलला होता. मी चेन्नई आयआयटीमध्ये शिकवत होतो. आणि रात्रीच्या वेळेस प्रयोगशाळेत चक्कर मारत होतो. त्यावेळेस तीन- चार तरुण काही काम मन लावून करत असल्याचे दिसले. मी त्यांना विचारले काय करताय. त्यांना सुपर कॉम्प्युटर अर्थात महासंगणकामध्ये रस होता. मग मी त्यांना म्हटले की, केवळ वाचन काय करताय. प्रत्यक्षात तयार करा, महासंगणक. ते म्हणाले, सर, कसा करणार? मी त्यांना म्हटले व्हिजन ठेवा, काहीच अशक्य नाही. मग मी त्यांना तेच वैज्ञानिक तत्त्व, वैज्ञानिक तर्कशास्त्राचे गणित समजावून सांगितले.

या दोन्ही घटनांचा फायदा असा झाला की, अमेरिकेने भारताला उपग्रह तंत्रज्ञान प्रथम नाकारले तेव्हा माझे गुरू डॉ. साराभाई यांच्या प्रेरणेने, त्यांनी दिलेल्या व्हिजनने तयार केलेला तिसरा टप्पा आपल्याकडे तयार होता. त्यामुळे आपल्याला अमेरिकेच्या तंत्रज्ञान नाकारण्याचा फारसा फरक पडला नाही. आणि नंतर अमेरिकेने महासंगणकाचे तंत्रज्ञान नाकारले तेव्हाही फरक पडला नाही. कारण चेन्नई आयआयटीमध्ये त्या तरुणांनी महासंगणक तयार केलेला होता. तरुणांमध्ये तुफान शक्ती असले त्याला व्हिजनची जोड दिली की, काम भागते. हेच व्हिजन मला देशाच्या संदर्भात अपेक्षित आहे. कारण ते असेल तर अमेरिकाच काय जगातील कोणत्याही देशाची फिकीर करण्याची गरज आपल्याला भासणार नाही. मला स्वबळावर उभा राहिलेला भारत पाहायचाय. व्हिजन ठेवा. व्हिजन हाच आपला गुरू. हे व्हिजन प्रत्येक भारतीयाला असेल तर आपल्याला महासत्ता होण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही… पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, आता तुला कळले असेल मला काय म्हणायचेय ते!

असा हा एक शिक्षक, सामान्यांचा असामान्य गुरू एक महत्त्वाचा धडा सहज देऊन गेला. समस्त भारतीयांनी आणि सर्व धर्मियांनी जीवापाड प्रेम केलेले डॉ. अब्दूल कलाम गेले त्यावेळेस ही आठवण पुन्हा ताजी झाली. त्यांना अपेक्षित असे ते व्हिजन प्रत्येक देशवासीयाने राखणे आणि महासत्ता होण्याच्या दिशेने देशाने मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल !
01vinayak-signature1

विनायक परब