scorecardresearch

क्रीडा : एकीचे बळ!

कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघच एकमेकांच्या तोडीस तोड वाटतात.

क्रीडा : एकीचे बळ!
प्रतिकूल परिस्थितीत आणि सामन्यात बहुतांश वेळा पिछाडीवर असतानाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय शिलेदारांनी फक्त सांघिक कामगिरीच्या बळावर अशक्यप्राय विजय मिळवला

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com
उन्हे था गुमान,
हमारी उडान में कहा दम है,
और हमे था ये भरोसा,
की आगे आसमां भी थोडा कम है…
भारत-इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीतील अखेरच्या दिवशी मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवताच समालोचक विवेक राजदान यांनी म्हटलेल्या या कवितेच्या ओळी संपूर्ण सामन्याचा सारांश सांगून जातात. प्रतिकूल परिस्थितीत आणि सामन्यात बहुतांश वेळा पिछाडीवर असतानाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय शिलेदारांनी फक्त सांघिक कामगिरीच्या बळावर अशक्यप्राय विजय मिळवला. तर दुसरीकडे एकटय़ा-दुकटय़ा खेळाडूंवर विसंबून राहिल्यामुळे यजमान इंग्लंडला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघच एकमेकांच्या तोडीस तोड वाटतात. त्यामुळे ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेविषयी सर्वाना उत्सुकता असते, तशीच भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत फार आधीपासूनच चर्चा रंगण्यास सुरुवात होते. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार असेल आणि हवामानामुळे त्याचा खेळखंडोबा झाला नाही, असे क्वचितच घडते. भारत-इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीतील अखेरच्या दिवशी आपल्याला विजयासाठी अवघ्या १५७ धावांची गरज होती. चौथ्या दिवसअखेर भारताचा एकच फलंदाज बाद झाला होता. त्यामुळे पाचव्या दिवशी १५७ धावा सहज करून भारत मालिकेत १-० अशी आघाडी घेणार, असे तमाम चाहत्यांना वाटले; परंतु अपेक्षेप्रमाणे पावसाने भारताचे मनसुबे उधळून लावले आणि पहिला सामना अनिर्णित राहिला.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर जायबंदी झाल्याने त्याच्याऐवजी अनुभवी इशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले. नॉटिंगहॅमच्या तुलनेत लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक पोषक करण्यात आली. त्याशिवाय येथे पावसामुळे जास्त खेळ वाया जाणार नाही, असेदेखील सांगण्यात आले. प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये कर्णधार कोहलीने आणखी एक नाणेफेक गमावली. परंतु या वेळी जो रूटने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करत, स्वत:च्या पायावर एक प्रकारे दगड मारून घेतला.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी पहिल्या गडय़ासाठी शतकी भागीदारी रचून दमदार प्रारंभ केला. रोहितला परदेशातील पहिले कसोटी शतक झळकावण्याची नामी संधी होती; परंतु जेम्स अँडरसनने ८३ धावांवर त्याचा त्रिफळा उडवला. राहुलने मात्र इंग्लंडच्या सुमार गोलंदाजीचा पुरेपूर लाभ घेऊन शतकाला गवसणी घातली. कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना पहिल्या डावात फारशी छाप पाडता आली नाही. यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी बहुमूल्य योगदान दिल्यामुळे भारताने ३६४ धावांपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरात सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे सलामीवीर आणि हसीब हमीद त्वरित माघारी परतले. मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी भारताला कडवी झुंज दिली. बेअरस्टो ५७ धावा करून बाद झाल्यानंतर रूटने मालिकेतील दुसऱ्या शतकावर मोहोर उमटवली. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ३९१ धावा करून २७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला तब्बल ३३ अतिरिक्त धावा दिल्या. मोहम्मद शमीने तिसऱ्या दिवसातील अखेरच्या चेंडूवर अँडरसनचा त्रिफळा उडवला. तर रूटने नाबाद १८० धावा फटकावून त्याची विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये का गणना केली जाते, हे सिद्ध केले. भारतासाठी सिराजने या डावात सर्वाधिक चार, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळती झाली. शतकवीर राहुल आणि रोहित २७ धावांतच माघारी परतले. तर कोहलीसुद्धा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यामुळे भारताचा डाव चौथ्या दिवशीच संपणार की काय, अशी भीती निर्माण झाली; परंतु पुजारा आणि रहाणे यांनी या वेळी जबाबदारी घेऊन चौथ्या गडय़ासाठी शतकी भागीदारी रचली. दिवसाच्या अखेरीस रहाणे (६१), पुजारा (४५) यांच्यासह रवींद्र जडेजासुद्धा बाद झाला तेव्हा भारताकडे १५४ धावांची आघाडी होती. मात्र इतकी आघाडी पुरेशी नसल्याने अखेरच्या दिवशी पंत आणि तळाचे फलंदाज काय कमाल करणार, याकडे सर्वाचे लक्ष होते.

पाचव्या दिवसाला प्रारंभ झाल्यावर पंत आणि इशांत लगेचच बाद झाले. मात्र त्यानंतर जे घडले त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अनुक्रमे नवव्या आणि १०व्या क्रमांकावर फलंदाजीस येणाऱ्या शमी आणि बुमराने नवव्या गडय़ासाठी तब्बल ८९ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताची आघाडी थेट २५० धावांपलीकडे नेली. शमीने ५६ तर बुमराने ३४ धावा केल्यामुळे भारताने डाव घोषित करून इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी आणि बुमरा फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना अनेकदा डिवचले; परंतु दोघांनी याचा वचपा गोलंदाजीदरम्यान काढला.

अखेरच्या दोन सत्रांत सिराज, शमी, बुमरा आणि इशांत या भारताच्या वेगवान चौकडीपुढे इंग्लंडची त्रेधातिरपीट उडाली. भरवशाचा रूट आणि जोस बटलर यांनी इंग्लंडचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या पदरी अखेर निराशा पडली. मुळात कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच संघातील प्रत्येक खेळाडूसह स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांमधील उत्साह वाढवला. त्याची देहबोली आणि प्रत्येक बळी घेतल्यानंतर केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. यामुळे भारताच्या ११ शिलेदारांपुढे इंग्लंडचे खेळाडू हतबल झाले. अखेरीस सिराजने एकाच षटकात बटलर आणि मग अँडरसनला तंबूत पाठवून भारताच्या अविस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केले आणि समाजमाध्यमांपासून ते संपूर्ण भारतात या विजयाचे पडसाद उमटले.

भारतीय खेळाडूंची जिद्द कौतुकास्पद!

दुसऱ्या कसोटीतील पहिले चारही दिवस दोलायमान अवस्थेत गेले, किंबहुना इंग्लंडचे भारतावर वर्चस्व होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे भारताला अखेरच्या दिवशी कमाल करण्याशिवाय पर्याय नव्हता. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा फटकेबाजी करू शकतात हे ठाऊक होते; परंतु ते इतकी मोठी भागीदारी रचतील, असा विचार इंग्लंडच्या खेळाडूंनीदेखील केला नसेल. त्यानंतर इंग्लंडला ६० षटकांत २७२ धावांचे लक्ष्य दिल्यावर दोन सत्रांमध्ये आपले गोलंदाज त्यांना गुंडाळू शकतील का, याविषयी थोडी साशंकता होती. मात्र या वेळी कोहलीने संपूर्ण संघामध्ये वेगळाच जोश निर्माण केला. मोहम्मद सिराजचेही विशेष कौतुक. त्याच्यासह अन्य गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच इंग्लंडला धक्के दिल्याने आपण अखेरच्या सत्रात विजयी झालो. झुंजार वृत्ती, एकजूट आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर आपण लॉर्ड्सवर तिरंगा फडकावला.
– लालचंद राजपूत, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या