30 March 2020

News Flash

कौटिल्य आणि शिवराय : राजनीतीची भारतीय संकल्पना

कौटिल्याने सांगितलेली राजनीती आजच्या काळात जशीच्या तशी लागू पडते आणि शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार आजही आदर्श मानला जातो.

| January 9, 2015 01:28 am

कौटिल्याने सांगितलेली राजनीती आजच्या काळात जशीच्या तशी लागू पडते आणि शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार आजही आदर्श मानला जातो. कौटिल्याच्या राजनीतीचा शिवरायांनी अभ्यास केला असेल का याची चर्चा करणारं नवं पाक्षिक सदर-

कौटिल्य नावातच कुटिलता, व्यक्तिगत चरित्राबद्दल केवळ लोकांमध्ये रुजलेल्या कथा आणि १९०९ पर्यंत त्यांनी रचलेले अर्थशास्त्रही उपलब्ध नसल्याने राजनीतीच्या ह्य आचार्याभोवती एक प्रकारचे गूढतेचे वलय होते. पण १९०९मध्ये शामाशास्त्रींना ग्रंथ लिपीतील हस्तलिखित प्राप्त झाले आणि कौटिल्य आणि त्याच्या अर्थशास्त्राची ओळख जगाला झाली. मधल्या काळात कौटिल्याच्या राजनीतीचा अभ्यास होत होता का, असा प्रश्न मनात येतो. पण संस्कृत साहित्यातच नव्हे तर मराठी रियासतीच्या चौथ्या खंडात चाणक्याच्या राजनीतीचा उल्लेख सापडतो. आणि शिवचरित्राचा अभ्यास करताना सातत्याने शिवाजी महाराजांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला असावा असे जाणवत राहते. शिवाजी महाराजांची राजनीती आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यातील साधम्र्य शोधण्याचा प्रयत्न या लेखमालेतून केला जाणार आहे.
त्यासाठी आपण आधी राज्यशास्त्राचा थोडा विचार करू. नीतिशास्त्र, दंडनीती, राजनीती, राजनीतिशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे शब्द प्राचीन काळापासून भारतात समानार्थी वापरले गेले आहेत. दंड या शब्दाला दोन अर्थ आहेत- १. दंड या शब्दाचा साधा सरळ अर्थ घेतल्यास जरा जाडजूड काठी; २. पण विशिष्ट अर्थाने वापरल्यास शासनाचा अधिकार असा अर्थ होतो. मनुस्मृतीत या दंडाचे किंवा शासनाच्या अधिकाराचे कौतुक गाताना मनू म्हणतो,
दण्डा: शास्ति प्रजा: सवा दण्ड एवाभिरक्षति।
दण्ड: सुप्तेषु जागर्ति दण्डं र्धम विदुर्बुधा:।।
हा दंड साऱ्या प्रजेचे शासन व रक्षण करतो, सर्व निद्रिस्त लोकांमधे दंडच जागा असतो, म्हणून विद्वान दंडालाच धर्म मानतात.
म्हणजेच दंड, शासन किंवा गुन्ह्य़ाला शिक्षा असेल तरच लोक धर्माचरण म्हणजे योग्य आचरण करतात. नाहीतर दंडाच्या अभावाने बलिष्ठ कनिष्ठांचं शोषण करतात. समाजातील स्वास्थ्य, स्थैर्य नष्ट होते. अशा या दंड किंवा शासनाच्या अधिकाराने लोकांना नीतीच्या मार्गाने घेऊन जाण्याचा अधिकार शासनकर्त्यांला म्हणजे प्राचीन काळी राजाला दिला गेला होता, म्हणून ते राज्यशास्त्र.
राजा किंवा शासनकर्ता ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती. शासनकर्ता जसा असेल तशी प्रजा होत असल्याने ‘यथा राजा तथा प्रजा’ ही उक्ती प्रसिद्ध झाली. राजा हा शककर्ता असतो याची स्पष्ट जाणीव युधिष्ठिराला करून देताना भीष्म म्हणतात,
कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
इति संशयो मा भूद्राजा कालस्य कारणम्।।
धर्मराजाला प्रश्न पडला, राजा आणि काल यात श्रेष्ठ कोण? त्याला उत्तर देताना भीष्म म्हणतात, ‘तू संशय घेऊ नकोस, राजा हाच कालाचे कारण आहे. राजा हा भूत किंवा प्राणिमात्रांचा कर्ताकरविता असतो. तोच त्यांचा विनाशही करतो, ‘राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशका:’ एकीकडे महाभारत राजाला कालाचे कारण मानते, तर शुक्रनीतिसार त्याच कारणाने प्रजेच्या दोषाला राजाला कारण धरते.
युगप्रवर्तको राजा धर्माधर्म प्रशिक्षणात्।
युगानां न प्रजानां न दोष: किन्तु नृपस्य तु।।
यथा राजा तथा प्रजा असल्यामुळे राजाचे आचरण अयोग्य असेल तर प्रजाही राजाचेच अनुकरण करणार. त्यामुळे प्रजा चुकीची वागल्यास तो प्रजेचा दोष असण्यापेक्षा राजाचा दोष असतो, म्हणून राजाचे आचरण हे अतिशय महत्त्वाचे असे. आणि दंडाचा अधिकार असूनसुद्धा राजा शासन करत नसेल तर प्रजा योग्य आचरण करणार नाही. याचा अर्थ चांगले किंवा वाईट युग राजावर अवलंबून असते.
राजा हा शककर्ता, युगप्रवर्तक असतो. या धारणेमुळे प्राचीन काळापासून भारतात राजनीतीचा अभ्यास होत होता. मात्र हातात दंड आहे म्हणून राजाने कसेही आचरण करावे हेही मान्य नव्हते. दंडाला किंवा शस्त्राला शास्त्राची जोड महत्त्वाची मानली होती. राजनीतिशास्त्र अनेकांकडून अभ्यासले जाऊन तावूनसुलाखून निघाले होते. हे राजनीतिशास्त्र कसे निर्माण झाले त्याविषयी महाभारत शांतिपर्वात एक कथा येते-
कृतयुगात राजा नव्हता, दंड नव्हता, जो तो आपल्या मार्गाने नियमाने वागत होता. पण पुढे कुठेतरी काम, क्रोधादी विकारांनी माणसाला ग्रासले. देवांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी ब्रह्मदेवाला मार्ग शोधण्यास सांगितले. ब्रह्मदेवाने एक लाख अध्यायाचे नीतिशास्त्र रचले. ते शंकराला वाचायला दिले. शंकराने मानवाच्या आयुर्मर्यादेचा व बौद्धिक क्षमतेचा विचार करून ते सरळ दहा हजार अध्यायांवर आणून ठेवले, पण अजूनही ते मोठेच होते. मग इंद्राने ते पाच हजार अध्यायांपर्यंत कमी केले. यानंतर बृहस्पतीने तीन हजार व शुक्राचार्यानी एक हजार अध्यायांपर्यंत या शास्त्राचा संकोच केला. अशा रीतीने अनेक देवतांकडून अभ्यासलेले शास्त्र मानवाच्या हाती दिले. भारतीय साहित्याची एक मोठीच गंमत आहे. आर्यावर्त किंवा भारतात उद्भवलेल्या समस्यांची जाणीव आणि काळजी थेट देवलोकाला होती व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वर्गस्थ देव काही उपाय तरी योजत किंवा सरळ पृथ्वीवर अवतरण करत असत. आणि देवांवर संकट आले की आर्यावर्तातील राजांना साहाय्यासाठी स्वर्गातून बोलावणे येते असे. भारत ते स्वर्ग ही अशी सतत ये-जा असल्याने भारतातील मार्ग ‘आनाकरथवर्त्मनाम’ म्हणजे थेट स्वर्गापर्यंत जाऊन भिडणारे होते.
संस्कृत साहित्यात वेदकाळापासून राजनीतीची पाळंमुळं रुजलेली दिसतात. धर्मशास्त्र ही समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी असल्याने सगळ्याच धर्मग्रंथांत राजनीतीवर फार मोठी चर्चा आढळते. भारतीयांची धर्म संकल्पना कर्तव्याशी जोडलेली गेली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत असताना भौतिक आणि पारलौकिक असा दोन्ही प्रकारचा उत्कर्ष माणसाने साधला पाहिजे यावर भर दिला आहे. त्यामुळेच धर्माच्या अनेक व्याख्यांमध्ये ‘यतोभ्युदयनि:श्रेयससिद्धि स एव धर्म:’ अशी एक व्याख्या केली जाते. ज्याच्यामुळे ऐहिक आणि पारलौकिक असा दोन्ही प्रकारचा उत्कर्ष साधला जातो तो धर्म असा याचा अर्थ आहे. म्हणूनच पारलौकिक सुख मिळवण्यासाठीच्या आचार-विचारांचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेला आहे. तुमच्या चांगल्या आचरणाने तुम्ही जिवंतपणी जो पुण्यसंचय कराल जो तुम्हाला पारलौकिक सुख देईल. त्याच वेळी पापाचरणाने तुम्हाला मृत्यूनंतर योग्य गती मिळणार नाही ही भीती सामान्य माणसाला पापाचरणापासून परावृत्त करत होती. ही अशी पाप-पुण्याची भीती असूनसुद्धा समाजात काटे हे असतात. अशा खलनिग्रहणासाठी असलेली राजनीती केवळ धर्मग्रंथापुरती मर्यादित न राहता कथा, कादंबरी, काव्य, नाटक साहित्याच्या सर्व प्रकारात प्रतिबिंबित होत होती. असे जरी असले तरी खऱ्या अर्थाने केवळ राजनीतीला वाहिलेला प्राचीन ग्रंथ म्हणून कौटिल्य ऊर्फ चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्तरचित कौटिलीय अर्थशास्त्राचाच विचार केला जातो.
ग्रंथाच्या नामात दोन शब्द आहेत ‘कौटिल्य’ व ‘अर्थशास्त्र’. कौटिल्यांनी रचलेले म्हणून कौटिलीय हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. आता अर्थ हा शब्द समजून घेणे गरजेचे आहे कारण कौटिल्य काही शब्द विशिष्ट अर्थाने ग्रंथात वापरताना दिसतो. कौटिल्याच्या अर्थ या शब्दाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी अर्थ या शब्दाचे संस्कृतमधील विविध अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.
अर्थ या शब्दाचे अर्थ
१. एखादा शब्द समजून घेणे म्हणजे अर्थ
२. अर्थ म्हणजे पैसा, संपत्ती
३. अर्थ म्हणजे हितपर्यवसायी थोडक्यात ज्यात आपले हित सामावले आहे अशी कोणतीही गोष्ट म्हणजे अर्थ.
४. कामसूत्रानुसार ‘विद्याभूमिहिरण्यपशुधान्य-भाण्डोपस्करमित्रादीनामर्जनमर्जितस्य विवर्धनमर्थ:’ (१.२.९) थोडक्यात विद्या, भूमी, हिरण्य, पशुसंपत्ती, शेती, गृहोपयोगी वस्तू, अप्राप्ताची प्राप्ती, विनय म्हणजे शिक्षण व सुहृद म्हणजे मित्र या आठ गोष्टी प्राप्त करणे व नंतर त्यांची वृद्धी करणे म्हणजे अर्थ होय.
५. कौटिल्य मात्र ‘अर्थ’ या शब्दाची वेगळी व्याख्या देतो. त्याच्या मते मनुष्याणां, वृत्तिर्थ: मनुष्यवती भूमिरित्यर्थ:। तस्या: पृथिव्या लाभपालनोपाय: शास्त्रमर्थशास्त्रमिति।
कौटिल्याच्या मते इहलोकीचे जीवन ज्याच्यामुळे समृद्ध होते, माणसाला ज्यातून उपजीविका प्राप्त होते तो अर्थ. हा अर्थ किंवा उपजीविका प्राप्त करून देणारे मुख्य साधन ती भूमी. त्या भूमीच्या लाभाचे आणि पालनाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.
या भूमीतूनच आमची शेती पिकते, तिच्यातूनच वैभव प्राप्त करून देणारी खनिजं उपलब्ध होतात, आमच्या अन्न, वस्त्र, निवारा या साऱ्या प्राथमिक गरजा ही भूमीच भागवते. थोडक्यात मनुष्य व भूमी यांचा अन्योन्य व अपरिहार्य संबंध आहे. यामुळेच ‘मनुष्यवती भूमि’ हे शब्द महत्त्वाचे ठरतात. पण त्याच वेळी मनुष्यवती भूमि या शब्दांनी विषयाची मर्यादा स्पष्ट होत नाही. कारण हे मनुष्य व भूमीचे शास्त्र धरले तर माणसाच्या व पृथ्वीच्या उत्त्पत्तीपासून अनेक विषयांचा यात समावेश होतो. यासाठी या विषयाची मर्यादा किंवा नेमका विषय आकलन व्हावा यासाठी कौटिल्याने लगेच ‘पृथिव्या लाभपालनोपाय:’ म्हणजे पृथ्वीचा लाभ आणि तिचे पालन असे सांगून विषयाची व्याप्ती स्पष्ट केली आहे. अर्थशास्त्रात ऐहिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या पृथ्वीचा लाभ हे पहिले ध्येय मानले आहे. कामसूत्रसुद्धा विद्या, भूमी इत्यादी आठ गोष्टी मिळवणे व त्यांची वाढ करणे म्हणजे अर्थ असे मानते. म्हणून पृथ्वीचा केवळ लाभ पुरेसा नाही तर तिचे सुयोग्य पालन हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा या भूमीचा लाभ झाल्यावर तिचे पालन करावयाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. या दोन्ही गोष्टी राज्यशास्त्रांतर्गत येतात कारण राष्ट्र हे भूप्रदेशाशिवाय अस्तित्वात येऊ च शकत नाही. या सगळ्या पाश्र्वभूमीवर अर्थशास्त्राचा प्रधान हेतू या पृथ्वीचा लाभ व प्राप्त झालेल्या पृथ्वीचे रक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करणे हा आहे.
१९०९ पर्यंत कौटिल्याच्या अर्थशास्त्राविषयी संदर्भ इतर ग्रंथातून सापडत होते पण मूळ ग्रंथ उपलब्ध नव्हता. पण डॉ. शामाशास्त्री यांना सापडलेल्या ग्रंथ लिपीतील हस्तलिखिताच्या आधारे त्यांनी हा ग्रंथ सर्वप्रथम प्रकाशित केला. ‘अर्थशास्त्र’ची प्रसिद्धी ही भारतीय संस्कृत साहित्यातील फार मोठी गोष्ट होती. ‘अर्थशास्त्र’च्या प्रकाशनाचे महत्त्व सांगताना डॉ. जोली म्हणतात, कदाचित संपूर्ण संस्कृत साहित्यातील ही सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे.
अशा या अर्थशास्त्राचा अभ्यास प्राचीन भारतात होत होता का आणि त्याचा शिवाजीच्या राजनीतीवर काही प्रभाव आहे का ते आपण पुढल्या लेखांतून समजून घेणार आहोत.
आसावरी बापट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 1:28 am

Web Title: indian concept of politics
टॅग Politics
Next Stories
1 आता आणि तेव्हा : असाही परदेश प्रवास
2 औषधाविना उपचार : पाणी कसे व किती प्यावे?
3 मकरसंक्रांत : दागिने घाला हलव्याचे!
Just Now!
X