भारतीय समाज उत्सवप्रिय आहे, या विधानाचा वापर चांगल्या-वाईट दोन्ही अर्थानी केला जातो. अलीकडे तर हे विधान करत टीका करण्याची एक नवी फॅशनही रूढ झाली आहे. भारतीय समाजाच्या बाबतीत ही केवळ उत्सवप्रियता नाही म्हणून अशा स्वरूपाचे विधान करताना थोडी सावधगिरी बाळगावी, असे मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. कारण त्यामागे प्रथा-परंपरा नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा; पर्यायाने भारतीय मानववंशाचा इतिहास जोडलेला आहे, असे अभ्यासान्ती लक्षात आले आहे. आजपर्यंत या प्रथा-परंपरांकडे आपण अभ्यासदृष्टीने कधीच पाहिले नाही. रूढी-परंपरांचे जोखड नाकारतानाही विचारवंतांनी त्यांची हेटाळणीच अधिक केली. मात्र आता मानववंशशास्त्राने हा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास किती समाजहितैषी आहे हे सांगत समाजशास्त्राचे एक नवे दालन खुले केले आहे. त्याचा अंतिमत: मानवालाच फायदा होणार आहे व समाजाबद्दल दीर्घकाळ अनुत्तरित राहिलेली कोडी सुटण्यास त्या अभ्यासाची मदतच होणार आहे. गरज आहे ती धार्मिकादी भावना दूर ठेवून त्याकडे डोळसपणे पाहण्याची. हा अभ्यास करणे म्हणजे रूढी-परंपरा पाळणे नव्हे, हे अधोरेखित होणे इथे आवश्यक आहे.

आज एकविसाव्या शतकामध्ये केवळ भारतीय समाजातच नव्हे तर जगभरच्या समाजात रूढी- परंपरांबाबत एक आंतर्विरोध पाहायला मिळतो. आणि मग असे का? हा प्रश्न समाजशास्त्रज्ञांना भेडसावतो. भारतीय समाजात तर हा आंतर्विरोध खूप मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो. मग त्याचा संबंध आपण समाजाच्या मागासलेपणाशी जोडून सहज मोकळे होतो. त्याने मूळ प्रश्न सुटत नाही. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करायची असेल तर मानववंशशास्त्राच्या पद्धतीने प्रथा-परंपरांचाही शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. या महत्त्वपूर्ण मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्यासाठीच यंदा दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘लोकप्रभा’ने ‘दत्त विशेष’ अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील वारकरी आणि दत्त हे दोन महत्त्वाचे संप्रदाय असून या दोन्हींच्या अभ्यासात असे लक्षात येते की, हे दोन्ही महासमन्वयवादी संप्रदाय आहेत. महाराष्ट्रीय समाजाची एकात्मता राखण्यात या दोन्ही संप्रदायांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र त्यांचे शास्त्रीय मूल्यमापन आजवर यथायोग्य झालेले नाही. प्रसिद्ध संशोधक रा. चिं. ढेरे यांनी विठ्ठलाचा केलेला ‘महासमन्वयक’ अभ्यास हा मात्र सन्मान्य अपवाद आहे. ढेरे सरांचा हा अभ्यास आता नव्या पिढीने पुढे नेण्याची गरज आहे.

दत्त संकल्पनेचा उदय पहिल्या शतकाच्या सुमारास झालेला दिसतो. त्याच्या अस्तित्वाची पाळेमुळे उपनिषदांतील दत्तसदृश वर्णनांपर्यंत नेली जातात. मात्र आठव्या, नवव्या आणि दहाव्या शतकात क्रमाक्रमाने हा संप्रदाय समाजात प्रस्थापित झालेला दिसतो. आजवरच्या अभ्यासानुसार, याच तीन शतकांमध्ये क्षीण होत चाललेल्या बौद्ध धर्मातील तांत्रिक, तंत्रविद्येतील पारंगत शैव यांच्याशी याची पाळेमुळे जोडलेली आहेत. त्यामुळे या संप्रदायाने या दोन्हीतील अनेक गोष्टी उचलून एक वेगळी समन्वय परंपरा ‘दत्त संप्रदाय’ या नावाखाली स्वीकारली, असे ऐतिहासिक दाखल्यांतून दिसते. नंतर आलेला नाथ संप्रदाय हा दत्त संप्रदायाला सर्वाधिक जवळचा. याच परंपरेतून गोरखनाथ आणि ज्ञानेश्वरांपर्यंत परंपरा पुढे आली. संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात दत्ताचा उल्लेख नसला तरी मोठे बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांकडून आलेल्या पंरपरेचा ते गौरवपूर्ण उल्लेख करतात. शिवाय ज्ञानेश्वरांनी एका दत्तकाव्याची रचनाही स्वतंत्रपणे केली आहे. मात्र ते लोकांना फारसे परिचित नाही.

नाथ संप्रदायाकडे तंत्रमार्गातील वामाचाराविरोधात उभा राहिलेला संप्रदाय म्हणून पाहायला हवे. बौद्धमतात आलेल्या तंत्र संप्रदायाला विरोध करत त्यातील वामाचार नाथ संप्रदायाने नाकारला. बौद्ध धर्माच्या उतरत्या काळात त्यातील तांत्रिक भिक्खू नंतर नाथ संप्रदायामध्ये सम्मीलित झाले. त्याचे पुरावे पुरातत्त्व संशोधकांना महाराष्ट्रातील पन्हाळेकाजीच्या लेणींमध्ये सापडले, त्यातून हे पुरते सिद्ध झाले.

नाथ संप्रदायानंतर आलेला महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे महानुभाव. मराठी भाषेतील पहिले साहित्य हे महानुभावांचे आहे. या संप्रदायाचे तर दत्त हेच प्रधान दैवत आहे. मात्र त्यांनी हे स्वीकारताना दत्तत्रयी नाकारली. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकात्म रूप म्हणजे दत्त हे नाकारले. पण ते करताना त्यांनी दत्त हा अनुसया आणि अत्रींचा पुत्र हे मात्र स्वीकारले. १० व्या शतकापर्यंतच्या दत्तप्रतिमेमध्ये दत्त केवळ एकमुखी आहे. नंतर मात्र तो त्रमूर्ती झाला, त्यात अनेक परंपरांचा समन्वय आहे, असे संशोधकांना वाटते. महानुभावातील एक परंपरा ही नागनाथांची असून त्यात मुस्लीम भाविकांचा भरणा अधिक आहे. दत्त संप्रदायामध्ये मुस्लीम प्रथांचाही प्रभाव दिसतो. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, त्या वेळेस मुस्लीम धर्म अधिक आक्रमक होता आणि ब्राह्मण्याचा प्रभाव नाकारणाऱ्या समाजाने मुस्लीम धर्माला काहीसे जवळ केले होते.. नेमकी हीच वेळ होती की, त्या वेळेस त्रमुखी दत्त जन्माला आले म्हणजेच या संकल्पनेचा उदय झाला आणि त्यात समन्वय साधला गेला. दत्ताच्या बाजूला असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक मानले जातात. त्या प्रतीकात्मकतेने ब्राह्मण समाजाला दूर जाण्यापासून रोखले आणि त्याचवेळेस दत्ताच्या कृपाकटाक्षाच्या कथा पाहिल्या तर लक्षात येईल की, त्या बहुजनांशी संबंधित असून त्या माध्यमातून संप्रदायाने त्या वर्गालाही सामावून घेतले. म्हणूनच नंतर येऊनही दत्त संप्रदायाशी जोडल्या गेलेल्या इतर संप्रदायांमध्येसुद्धा जातीपातींना विरोध करणारे आणि मानणारे असे दोन भेद झालेले पाहायला मिळतात. असे भेद होऊनही संप्रदाय कायम राहिला, टिकला ही वस्तुस्थिती आहे.

भक्ती संप्रदायात श्रेष्ठ अशा वारकरी संप्रदायाने भक्तीचे दार सर्व जातीजमातींसाठी खुले केले. त्यांनीही समन्वयाचे प्रतीक म्हणून विठ्ठलाबरोबरच दत्ताचाही स्वीकार केला. संत एकनाथ हे दत्तोपासनेसाठीही प्रसिद्ध होते. त्यांनीच रचलेली ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती’ ही आरती आज एकविसाव्या शतकातही म्हटली जाते. त्यानंतर आलेल्या समर्थ संप्रदायानेही प्रधान दैवत म्हणून रामाचा स्वीकार केलेला असला तरी आपल्या परंपरेची नाळ दत्ताशी जोडलेली आहे हे स्वीकारले.

समर्थ संप्रदायाच्या संदर्भातही दत्ताशी असलेला त्यांचा संबंध तेवढाच महत्त्वाचा ठरतो. समर्थ संप्रदायातील कथा-दंतकथांमध्येही आपल्याला दत्तदर्शनाचा उल्लेख आढळतो. समर्थ आणि त्यांचे पट्टशिष्य असलेले कल्याणस्वामी हे एका मंदिरामध्ये बसलेले असतात. मंदिरात प्रवचन सुरू असते त्या वेळेस बाहेर एक खाटीक त्याच्या पत्नीसह येतो. मोठय़ा रांजणामध्ये ते अन्न शिजवण्यासाठी ठेवतात आणि सोबत आणलेले बकऱ्या, कोंबडय़ा कापून त्यात टाकण्यास सुरुवात करतात. रांजण भरत नाही हे पाहून खाटीक पत्नीला म्हणतो, या देवदर्शनाला बसलेल्या एकेकाला कापूया. हे ऐकून बाकी सारे पळून जातात आणि समर्थ व कल्याणस्वामीच तेवढे मागे राहतात. खाटीक कोयता घेऊन त्यांच्याजवळ येतो, त्या वेळेस समर्थ म्हणतात, माझा बळी घेतला तरी चालेल शिष्याचा नको आणि कल्याणस्वामी म्हणतात की, शिष्य असताना त्याच्यासमोर गुरूचा बळी गेला तर ती शिष्यासाठीची नामुष्की असेल त्यामुळे गुरूंचा नव्हे तर माझा बळी द्यायला मी तयार आहे. त्यांचे भांडण सुरू असतानाच खाटीक रूप बदलतो आणि गुरू-शिष्य दोघांनाही दत्तदर्शन होते, अशी ही दंतकथा आहे. यात समर्थ-कल्याण या आदर्श गुरुशिष्य जोडीची जशी ही कथा आहे तशीच ती दत्त संप्रदायाशी जोडलेली नाळ स्पष्ट करणारीही कथा आहे. यातील खाटीक हा मुस्लीम दाखविलेला आहे. दत्त येतात ते मुस्लीम असलेल्या खाटकाच्या रूपात; यातील प्रतीकात्मकता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

या साऱ्या संप्रदायांचे प्रभावक्षेत्र हे मराठवाडा, मावळ, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र असे आहे. महत्त्वाचे म्हणजे विविध जातीपाती आणि धर्माच्याही इथल्या प्रथा- परंपरा पाहिल्या तर त्यात बरेचसे साम्य दिसते. त्याची पाळेमुळे वारकरी आणि दत्त संप्रदायाशी जोडलेली आहेत. त्याचा यथायोग्य अभ्यास झालेला नाही. अगदी मुस्लीम समाजानेही दत्त परंपरा, नाथ परंपरा स्वीकारली. म्हणूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘श्री पीर प्रसन्न’ असे फलक सर्रास पाहायला मिळतात. राज्यातील समाज समजून घ्यायचा तर या साऱ्याचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. त्यामुळे आपल्यालाच आपली मुळे समजून घेता येतील, मानवी मन कशा प्रकारे काम करते तेही कळेल आणि समाज कोणत्या गोष्टी कशा स्वीकारतो अथवा नाकारतो किंवा तत्संबंधी निर्णय घेताना समाजाला आवडलेल्या बाबींचे सम्मीलन कसे करून घेतो हेही लक्षात येईल. आणि अखेरीस समाजाचा भविष्यातील प्रवास सुखकर होईल!
01vinayak-signature