विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गेल्या काही महिन्यांतील महत्त्वाच्या राजकीय घटनांमध्ये मध्य प्रदेशातील सत्ता काँग्रेसने गमावणे, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणे, अलीकडेच राजस्थानात सचिन पायलट यांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारणे या महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येतील. या आठवडय़ातील आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीची दखल घ्यायलाच हवी, ती म्हणजे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा. या सर्व घटनांशी संबंधित दोन महत्त्वाचे असलेले घटक म्हणजे भाजपा आणि काँग्रेस. त्यातही यानिमित्ताने जे काही समोर आले आहे, त्यातून काँग्रेसची झालेली गोचीच अधिक नजरेत भरते आहे.

काँग्रेसने निधर्मीवादाच्या नावाखाली केलेले अल्पसंख्याकांचे लांगूलचालन याला राम मंदिराचा मुद्दा हे भाजपाने दिलेले उत्तर होते. त्यानिमित्ताने भाजपा व हिंदूुत्ववादी संघटनांनी राम मंदिराच्या निमित्ताने राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे केला. ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेनंतर त्याच महिन्यात आणि नंतर १९९३ च्या जानेवारीत उसळलेल्या जातीय दंगली आणि १२ मार्चचे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट ही मालिका नंतर सुरूच झाली. आज २८ वर्षांनंतरची स्थिती म्हणजे त्या वेळेस केंद्रात प्रभावी असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था अस्तित्वहीन होत चाललेल्या पक्षासारखी झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील १० वर्षांच्या काळानंतर आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दोन पराभवांच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. हेही नसे थोडके म्हणून की काय राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यालाही आता वर्षांचा कालावधी लोटला; तरीही काँग्रेस नेतृत्वाच्या अंधारातच चाचपडते आहे.

अलीकडे मध्य प्रदेशातील घडामोड असो किंवा मग आता राजस्थानातील, यातील राज्य कोणते हा मुद्दा महत्त्वाचा नाहीच. ते निमित्तमात्र आहे, त्यानिमित्ताने समोर आलेला मुद्दा हा सपाटून झालेल्या दुसऱ्या पराभवाला वर्ष झाल्यानंतरही अंधारातच चाचपडण्याचा आहे. पक्षाला ठोस व ठाम नेतृत्वाची गरज आहे. सोनिया गांधी हंगामी पक्षाध्यक्ष आहेत. कोणतीही महत्त्वाची घटना घडली की प्रामुख्याने प्रियंका किंवा राहुल गांधीच व्यक्त होतात. राहुल गांधी यांनी नेतृत्व नाकारले आहे आणि काँग्रेसकडे चेहरा नाही, अशी ही गोची आहे.

काँग्रेसला सातत्याने वाटते आहे की, केंद्रात असलेले विद्यमान भाजपा सरकार सर्वच दिशांनी त्यांची कोंडी करते आहे. कधी सीबीआय तर कधी सक्तवसुली संचालनालयाची चौकशी किंवा गुन्हे. सत्ता व पैसे यांचा मुक्त वापर होतो आहे. पण या आरोपाबाबत काँग्रेसने तक्रार करण्याचे काही फारसे कारण नाही. कारण या सर्व बाबी त्यांनी यापूर्वी वापरून झाल्या आहेत.

वैचारिक बाबतीत बोलायचे तर काँग्रेस सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. हे गुजरातेतील निवडणुकांपासून अगदी काल-परवा पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यापर्यंत सर्वत्र लक्षात आले आहे. काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी तर भूमिपूजन सोहळ्याचे स्वागतच केल्यासारखी प्रतिक्रिया दिली. तर काँग्रेस नेतृत्वालाही रामाचे गोडवे गावे लागले. कारण काँग्रेसच्या विरोधात भाजपाने केलेल्या बहुसंख्याकांच्या राजकारणाने आता गणिते पार बदलली आहेत. अन्यथा राम मंदिराला पराकोटीचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने त्यांची निधर्मीवादाची भूमिका अशी सौम्य नसती केली.

१९९२ सालापासून हे सारे देशात घडत असताना नवमतदारांच्या दोन-तीन पिढय़ा या देशात अस्तित्वात आल्या. दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या पातळीवर खूप मोठे बदल झाले. हे बदल चटकन आत्मसात करण्यात भाजपा आघाडीवर होती. तंत्रज्ञानासोबत नाही राहता आले तर आधुनिक युगात ऱ्हास वेगात होतो, हेही याच काळात अधोरेखित झाले. बहुसंख्य असलेल्या या नवमतदारांना आपले मुद्दे पटवून देण्यात आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे लक्ष वेधेल असे ठळक नेतृत्व देण्यात भाजपाला यश आले. त्यांचे नेतृत्व योग्य की कसे, याबाबत वाद असू शकतात. पण त्यांची दिशा आणि नेतृत्व यात गोंधळ तर नाहीच, उलट स्पष्टता आहे. म्हणजे अगदी अलीकडे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या जे. पी. नड्डा यांच्याकडे सुरुवातीस नामधारी म्हणून पाहिले गेले. मात्र तेही दिशा स्पष्ट असल्याने भूमिका घेत काँग्रेसवर थेट वार करताना दिसतात. याउलट भूमिका म्हटले की आजही काँग्रेसमध्ये सर्वाचेच लक्ष सोनिया, राहुल किंवा प्रियंका यांच्याकडे लागून राहिलेले दिसते. गेल्या वर्षभरात नेतृत्वाबाबत बोलण्यात काही काँग्रेसी नेत्यांनी धाडस दाखविलेदेखील. काहींनी थेट इतर नेतृत्व लवकरात लवकर निवडावे असे सुचवले तर काहींनी राहुल यांनीच पुन्हा पदभार स्वीकारण्यासाठी गळ घातली. पण वर्ष असेच निघून गेले. आजही राहुल गांधीच प्रामुख्याने बोलताना दिसतात, मात्र ते अध्यक्ष नाहीत आणि अध्यक्षपदाची खुर्ची तशी रिकामीच आहे.

नेतृत्वाला काही गोष्टी नेमक्या कळाव्या लागतात. त्यात पोकळी हा खूप महत्त्वाचा घटक असतो. नेतृत्वाची पोकळी जो भरून काढतो तो पुढे जाण्याची क्षमता राखतो. यूपीए- दोनच्या काळात झालेल्या गैरव्यवहार मालिकेनंतर ‘सक्षम नेतृत्व नसलेला देश खाईत लोटला जातोय’, असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. असलेले वातावरण गडद करून नेतृत्वाची संधी ओळखणारे ते होते. पण केवळ तुम्ही नेतृत्वाची पोकळी भरून उपयोग नसतो तर तसा विश्वास किंवा आशा-अपेक्षा लोकमनात असाव्या लागतात, तरच त्याचे परिवर्तन मतपेटीतून दिसते. मोदी यांनी त्यांचे नेतृत्व मग ते कुणाला पटणारे असो व नसो, तब्बल दोनदा मतपेटीतून सिद्ध केले आहे. पलीकडे काँग्रेसमध्ये मात्र आजही नेतृत्वाची वानवाच आहे.

कदाचित यामुळेच मध्य प्रदेश, राजस्थानपाठोपाठ इतरत्रही काँग्रेसमध्ये काही वाद निर्माण झाले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण नेतृत्वाच्या दोऱ्या कुणाच्याच हाती नाहीत. आज तर काँग्रेस अनेकदा अशी हतबल झालेली दिसते की, भाजपाला विरोध करणे अशक्यच आहे अशी त्यांची मनोमन खात्री झालेली आहे की काय, अशी शंका यावी. एक काळ असा होता की, संपूर्ण देशात केवळ अडवाणी आणि वाजपेयी हे दोनच भाजपाचे खासदार होते. पण त्या दोघांनी देश पिंजून काढला होता आणि त्यांच्या बोलण्यात अनुभवाचे वजन आणि परिपक्वता होती. तिथून सुरू झालेला भाजपाचा प्रवास आज इथवर येऊन पोहोचला आहे, तो सोपा खचितच नव्हता. भाजपाला आपण विरोध करू शकत नाही, अशी मानसिकता असेल तर काँग्रेसचे काही खरे नाही. नेतृत्व हेच पक्षाला दिशा देते. नेतृत्वहीन पक्ष काहीच धड करू शकत नाही. सध्या तरी काँग्रेस नेतृत्वहीन भरकटत आहे, लोकमनाचा विश्वास आणि स्वतचा आत्मविश्वास हे दोन्ही गमावल्यासारखी त्यांची स्थिती आहे.

पोकळी कधीच दीर्घकाळ राहत नाही, ती नैसर्गिकरीत्या भरली जाते. देशाच्या राजकारणात विरोधी पक्षाची असलेली ही पोकळी आता अनेक राज्यांमध्ये स्थानिक नेतृत्व भरून काढताना दिसते आहे, ते साहजिकच आहे. नवी दिल्लीत अरिवद केजरीवाल यांचा आप, महाराष्ट्रात शिवसेना, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची तृणमूल भाजपाविरोधाचा भार उचलताना दिसतात. आणि त्या त्या ठिकाणी असलेले हे सर्वच पक्ष काँग्रेसपेक्षाही आक्रमक आणि प्रसंगी भाजपाविरोधात कडवे झालेले दिसतात.

भाजपाचे लक्ष्य स्पष्ट आहे ‘२०२४ लोकसभा’. मात्र दीर्घकाळच्या सत्तेनंतर सरकारविरोधातील असंतोष वाढतो, याची त्यांनाही कल्पना आहे. त्यामुळे ते आतापासून कंबर कसून कामाला लागले आहेत, त्याचा स्पष्ट उल्लेख अमित शहा आणि नड्डा यांच्या भाषणांमधून येऊ लागला आहे. काँग्रेसला मात्र नेतृत्वाचे गणितही अद्याप सोडवता आलेले नाही. याला खूपच विलंब लागला तर कदाचित २०२४ मध्ये भाजपा निवडणूक हरला तरी काँग्रेस मात्रजिंकण्याच्या जवळपासही नसेल, असेच आता तरी दिसते आहे. खरे तर काँग्रेससाठी ही मोठी संधी असणार आहे. नोटाबंदीचे वास्तव अद्याप चटके देते आहे आणि कोविडकाळातील अचानक टाळेबंदीने केलेली स्थलांतरितांची फरफटही दीर्घकाळ लक्षात राहील, अशीच आहे. या काळातील सकारात्मक बाब एकच की, राहुल गांधी यांनी विविध विद्वान आणि तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यातून त्यांचे वाचन चांगले आहे, नेतृत्व ‘पप्पू’ नाही तर विचारी आहे, असा संदेश समाजात गेला. त्याने फार तर भाजपाने केलेली त्यांची व्यंगचित्रात्मक प्रतिमा पुसली जाईल. त्याने त्यांना वैयक्तिक फायदा नक्कीच होईल, पण पक्षनेतृत्वाचे काय? तिथे अंधारपोकळी कायम आहे. पद नसलेले नेतृत्व राहुल किंवा इंदिराजींची नात म्हणून प्रियंका किती काळ बोलत राहणार? अशाने पक्ष पुढे सरकत नाही. जे वापरले जात नाही ते अडगळीत जाते किंवा नष्ट होते हा डार्विनचा उत्क्रांती सिद्धांताचा भाग राजकारणालाही तेवढाच लागू आहे. तेच नेते, तेच मुद्दे घेऊन आगामी लढाईजिंकता येणार नाही. त्यासाठी सक्षम नेतृत्व ही पहिली निकड तर कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकणारा विश्वास आणि मुद्दे ही दुसरी निकड आहे. पक्ष हा व्यावसायिक पद्धतीने (म्हणजे व्यापार नव्हे) चालवावा लागेल आणि त्याची बांधणी संस्थात्मक असावी लागेल. आधुनिक व व्यावसायिक राजकारण करणारा पक्ष या दिशेने प्रवास सुरू करावा लागेल. तरच पक्षाला भविष्य आणि भवितव्य असेल. अन्यथा भविष्य नसलेल्या ठिकाणी का राहायचे, असा प्रश्न पडून अनेक पायलट आणि शिंदे काढता पाय घेतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेतृत्वाबाबत लोकांच्या मनात ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी एक प्रतिमा असते. ते लोकांच्या कल्पनेतील नेतृत्व असते. तसे व्हावे तरी लागते किंवा तशी प्रतिमा तरी घडवावी लागते, याचे किमान भान तरी मोदी यांच्याकडून काँग्रेसने घ्यायला हवे! अन्यथा अंधारपोकळी कायम राहील!