दीप्ती शिंदे – response.lokprabha@expressindia.com

समाजमाध्यमं आज आपल्याला नवीन नाहीत. स्टॅटिस्टा डॉट कॉम या संकेतस्थळावर १८ मे २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार सोशल मीडियावर सक्रिय असणारी लोकसंख्या ही तब्बल ३८१ कोटी इतकी आहे. तर याच संकेतस्थळावर २६ मे २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार २०१८ मध्ये तब्बल ३२.६१ कोटी  भारतीय जनता सोशल मीडियाचा वापर करत होती. २०२० मध्ये ही संख्या आणखी वाढली असेल, यात शंकाच नाही.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

ही इतकी मोठी संख्या पाहिली की मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे इतके लोक सोशल मीडिया मुळात का वापरतात. सोशल मीडियावर आकर्षक शीर्षक असणारे अनेक फोटो, लहान-मोठे मजकूर, आपल्या आवडत्या ब्रँड्सच्या वस्तू, कपडे, दागिने, इत्यादी गोष्टींचा मारा अहोरात्र होत असतो. त्यामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण होते. या मानसिकतेमुळे मानवी मेंदूतील डोपामाईन स्रवते. ते आनंदी भावना निर्माण करते. तसेच सोशल मीडियाच्या केवळ १० मिनिटांच्या वापराने मानवी मेंदूतील ऑक्सीटोसिनची पातळी जवळजवळ १३ टक्क्यांनी वाढते. या रसायनामुळे माणसात सुखाच्या, विश्वासाच्या, प्रेमाच्या व अनुकंपेच्या भावना उद्दिपित होतात.

माणसाला मुळातच स्वत:बद्दल बोलायला खूप आवडतं आणि आजकाल सोशल मीडियावर स्वत:बद्दल न बोलणारा माणूस दुर्मीळच. सोशल मीडियावरील कोठल्याही किमान १० प्रोफाईल नजरेखालून घातल्या तर आपल्याला हे नक्की पटेल. आपण सजवलेलं प्रोफाईल; अपलोड के लेले फोटो; स्टेटस, शेअर के लेला मजकूर यातून आपण एक प्रकारे आपली प्रतिमा तयार करत असतो. बऱ्याचदा ही प्रतिमा वास्तवाशी सुसंगत असते तर कधी बऱ्यापैकी विसंगतही असू शकते. तो मुद्दा वेगळा. पण आपल्या पोस्ट्समधून आपण एक स्वप्रतिमा जगाला दाखवत असतो. आपल्या फोटोंमधून, स्टेटसमधून आपण स्वत:ची कथा जगाला ऐकवत असतो. आणि कथा सांगणं आणि ऐकणं हे माणसाला किती प्रिय असतं ते वेगळं सांगण्याची गरज नाही.

आपल्या फोटोला कोणी लाइक केलं किंवा आपल्या एखाद्या फोटोवर किंवा पोस्टवर कोणी कॉमेंट केली की आपण लगेच त्याचे आभार मानतो आणि ही प्रक्रिया तिथेच थांबत नाही. तर जेव्हा आपल्या पोस्टला लाइक करणारी व्यक्ती एखादा फोटो अथवा पोस्ट शेअर करते तेव्हा आपण त्यावर काही कॉमेंट करून (बऱ्याचदा सकारात्मक) किंवा लाइक करून त्या व्यक्तीचे ऋण व्यक्त करतो. आणि मग हे चक्र सुरूच राहतं. याला मानसशास्त्रात ‘रेसिप्रोसिटी इफेक्ट’ म्हणतात. यातूनच सोशल मीडियावर ओळखी वाढतात; मैत्री फुलते आणि व्यावसायिक संधीही निर्माण होतात.

मानसशास्त्राच्या दृष्टीने, सोशल मीडियाच्या या सकारात्मक बाजू असल्या तरी काही नकारात्मक बाजूही आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला स्वत:ची कथा सांगायला आवडते. आणि ही कथा सांगताना बरेच जण त्यांच्या कथेला सुखांतिकेचं स्वरूप देतात; त्यांचं सुयश, त्यांच्या आयुष्यातील सकारात्मक बाजू रेखाटतात. सोशल मीडियाच्या कोऱ्या कागदावरसुद्धा जवळजवळ प्रत्येक जण स्वत:चं सुयश, प्रगतीचे वाढते आलेख, त्यांच्या आयुष्यातील आनंद- सुख अशा अनेक सकारात्मक गोष्टींची चित्रं चितारत असतो. पण अशा वेळी इतर अनेक व्यक्ती या सुखी चित्राशी स्वत:च्या आयुष्याची तुलना करून, स्वत:ला कमी लेखून दु:खी होतात. त्यांना अधिकाधिक निराश वाटू लागते आणि ही निराशा कधी कधी सुखी चित्र रंगवणाऱ्या व्यक्तीविषयी हेवा किंवा मत्सरही निर्माण करते. हे विदारक असलं तरी सत्य आहे.

ज्या व्यक्ती मुळातच आयुष्यात कुटुंबाच्या प्रेमापासून, निरोगी मैत्रीपासून वंचित असतात त्या आपला एकाकीपणा घालवण्यासाठी या आभासी दुनियेत अधिकाधिक सामाजिक नाती निर्माण व्हावीत म्हणून प्रयत्न करू लागतात. आणि इतर व्यक्ती, ज्यांच्या आयुष्यात कुटुंबाचं प्रेम, निरोगी मैत्री आहे पण ज्यांना हे वर्तुळ अधिक विस्तारावं असं वाटतं, त्या ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिक काळ, अनेकदा अहोरात्रही या माध्यमांवर सक्रिय असतात.

अधिकाधिक ऑनलाइन सक्रिय राहताना वास्तवात माणसांशी समोरासमोर संवाद जर कमी होत गेला तर अशा वेळी माणसांमध्ये ‘समाजभय’ (सोशल फोबिया) निर्माण होऊ शकतो. तसेच सोशल मीडिया हा माणसांमध्ये ‘फोमो’ म्हणजेच ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’ निर्माण करू शकतो. याला सोप्या भाषेत ‘असुरक्षितता’ असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या समूहातील काही व्यक्ती सहलीला किंवा एखाद्या समारंभाला एकत्र गेल्या आणि त्यांच्या गटातील एका व्यक्तीला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नसेल, तर एकत्र भेटलेल्या या सर्व मित्र-मैत्रिणींचे फोटो पाहून, त्याखाली लिहिलेला ‘अतूट दोस्तीचा’ मजकूर पाहून निमंत्रण न मिळालेल्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. यातून त्या व्यक्तीत न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. असं जर वरचेवर होत राहिलं तर व्यक्तीच्या मनात बहिष्काराची भावनाही निर्माण होऊ शकते. परिणामी नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. ऑनलाइन अधिकाधिक वेळ घालवल्यामुळे नात्यात दुरावा आलेली अनेक जोडपी आपण नक्कीच पाहिली असतील.

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपण जास्तीत जास्त आत्मकेंद्री होण्याची शक्यता असते आणि ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. स्वत:चे असंख्य फोटो अपलोड करण्याची मुभा देणारा सोशल मीडिया अनेकांमध्ये आत्मकेंद्रीपणा निर्माण करून त्यांना त्यांच्या वास्तविक आयुष्यापासून कैक मैल दूर नेत आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.

याशिवाय सोशल मीडियामुळे आपल्यातील कार्यक्षमता, मनाची एकाग्रता इत्यादी बाबींवरही परिणाम होतो. अशाप्रकारे सोशल मीडियात खरं तर आपल्याला समाजाच्या अधिकाधिक जवळ नेण्याची क्षमता आहे, पण त्याचा योग्य प्रकारे आणि एका मर्यादेपर्यंत वापर केला गेला नाही तर तो अनेक दुष्परिणामही दाखवतो यात शंकाच नाही. त्याचा वापर आपण फक्त ओळखी वाढविण्यासाठी करावा, त्याच्या पूर्णपणे अधीन होण्यासाठी नाही. अन्यथा या आभासी दुनियेत आपण स्वत:चं अस्तित्व, वास्तव गमावू शकतो.