News Flash

मुलाखत : आयएनएस विराट आमच्यासाठी ती फक्त युद्धनौका नव्हती..

कमोडर श्रीकांत केसनूर यांनी एकेकाळी आपल्या नौदलाचं सामथ्र्य असलेल्या ‘आयएनएस विराट’च्या आठवणींना दिलेला हा उजाळा..

आयएनएस विराट या युद्धनौकेला निरोप दिल्यानंतर अलीकडेच ती गुजरातमधील अलंगला पोहोचली.

मयूरा जानवलकर – response.lokprabha@expressindia.com

आयएनएस विराट या युद्धनौकेला निरोप दिल्यानंतर अलीकडेच ती गुजरातमधील अलंगला पोहोचली. जगातली ही सगळ्यात जुनी विमानवाहू युद्धनौका. तिथं तिथल्या नौदलाच्या दुरुस्ती विभागात तिचे सगळे भाग विलग केले जातील. तिच्यावरचे धातू काढून घेऊन त्यांचा इतरत्र वापर केला जाईल. मुंबईमधल्या ‘मेरिटाइम वॉरफेअर सेंटर’चे संचालक आणि ‘नेव्हल हिस्ट्री प्रोजेक्ट’चे प्रमुख कमोडर श्रीकांत केसनूर यांनी एकेकाळी आपल्या नौदलाचं सामथ्र्य असलेल्या ‘आयएनएस विराट’च्या आठवणींना दिलेला हा उजाळा..

आयएनएस विराटबद्दल लोकांना फारशा माहीत नसलेल्या गोष्टींविषयी, विराटच्या इतिहासाविषयी काय सांगाल?

– सगळ्यात आधी विराटच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीबद्दल थोडक्यात सांगतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच्या, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात आपले नौदल बळकट करण्यासाठी आपल्याकडे विमानवाहू युद्धनौका हव्यात याचा विचार सुरू होता. त्यातूनच आपण १९६१ मध्ये विक्रांत या युद्धनौकेची खरेदी केली. तिने १९७१च्या युद्धात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली.

१९८० मध्ये नौदलाने नव्या विमानवाहू युद्धनौकेचा विचार करायला सुरुवात केली. त्या काळात आपल्या नौदलाचे मोठय़ा प्रमाणात नूतनीकरण, पुर्नरचना सुरू होती. आयएनएस विराटची खरेदी हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे. तिचा युद्धासाठी वापर झालेला होता. हॅरियर जातीची लढाऊ विमाने तिच्यावरून वाहून नेली जात. आपणही आपल्या नौदलात हॅरियर जातीची लढाऊ विमाने समाविष्ट केलेली असल्यामुळे आयएनएस विराटची खरेदी ही आपल्यासाठी महत्त्वाची ठरली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आयएनएस विराटची (तेव्हा ती ब्रिटनची युद्धनौका होती आणि तिचं नाव हर्मेस असं होतं.) निर्मिती करण्यात आली, पण तिचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला तो शीतयुद्धाच्या काळात. तिने २५ वर्षे ब्रिटनची सेवा केली आणि त्यानंतरही ती सुस्थितीत होती. त्यामुळे १९८७ मध्ये आपण तिची खरेदी केली.

आता विमानवाहू युद्धनौकांच्या लोकांना फारशा माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल. सर्वसामान्य माणसाला सहसा हे माहीत नसते की युद्धनौकेवरून विमानाने समुद्रात विमानोड्डाण करणे, विमान उतरवणे हे अत्युच्च दर्जाचे कौशल्य आहे. एका सतत हलणाऱ्या पृष्ठभागावर विमान उतरवण्यासाठी लढाऊ विमान आणि युद्धनौकेवरील संबंधित चमूकडे अतिशय धाडस आणि अचूकता असण्याची गरज असते. त्याबरोबरच तेवढेच महत्त्वाचे असतात ते युद्धनौकेशी संबंधित लोक. युद्धनौकेवरील लढाऊ विमानांना ग्लॅमर आहे, ती लोकांना दिसतात. पणत्याचबरोबर युद्धनौकेवर इतरही लहान विमानांचा ताफा असतो आणि त्यांचीही सर्व प्रकारच्या सागरी कारवायांमध्ये, समुद्रावरील शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. त्याशिवाय युद्धनौकेवर छोटी हेलिकॉप्टर असतात. शोध घेणं, सुटका करणं यासाठी त्यांचा वापर होतो.

विराटवर व्हाइट टायगर्स ही समुद्री लढाऊ विमानं होती. त्याशिवाय युद्धनौकेवर या लढाऊ विमानांसाठीची हाताळणी, व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी संबंधित अधिकाऱ्यांचा चमू असतो. युद्धनौकेवरचा नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असतो. या विमानांचं उड्डाण आणि लॅण्डिंग यांच्या व्यवस्थापनासाठीची फ्लाइट डेक आणि फ्लाइट कंट्रोलर्सची टीम असते. युद्धनौकेवर प्रोप्युलेशन आणि स्टीम ही प्रक्रिया करण्यासाठीची टीम महत्त्वाची असते. डेकवर वाऱ्याचा दाब वाढवण्यासाठी युद्धनौकेचा वेग वाढवायचा असतो. त्यासाठी वाफेचा दाब (स्टीम) गरजेचा असतो. अशा पद्धतीने युद्धनौकेला वेग देणाऱ्या इंजिनीअर्सना ब्लॅक गँग म्हणतात. ते युद्धनौकेच्या खालच्या डेकवर असतात. नेहमीच घामाने थबथबलेले आणि काजळीने माखलेले हे लोक कायमच उत्साहाने काम करत असतात. थोडक्यात सांगायचं तर युद्धनौका ही एक जटिल, गुंतागुंतीची व्यवस्था असते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारी असंख्य माणसं असतात.

१९८२ मध्ये ब्रिटन आणि अर्जेटिना यांच्यामध्ये दहा आठवडय़ांचं फॉकलॅण्ड युद्ध छेडलं गेलं होतं तेव्हा आयएनएस विराट म्हणजे तेव्हाच्या हर्मेसने कोणती कामगिरी बजावली होती?

– फॉकलंड युद्धापूर्वी एसटीओव्हीएल (STOVL- Short take-off and vertical landing) मध्ये रूपांतर होण्यापूर्वी किंवा ती १९८० मध्ये हॅरिअर कॅरिअर म्हणजे लढाऊ विमानं वाहून नेणारी युद्धनौका होण्यापूर्वी हर्मेसने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. फॉकलॅण्ड युद्धाची घटना १९८२ची. फॉकलॅण्ड हे इंग्लंडपासून नऊ हजार मैलांवर म्हणजे भरपूर अंतरावर होतं. हर्मेसवर सी हॅरियर्सचा दोन आणि सीकिंग्जचा एक ताफा होता. सी हॅरियर्सने अजेंटिनाच्या २० लढाऊ विमानांचा पाडाव केला. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीची ती प्रमुख युद्धनौका होती, शान होती. तिच्यामुळे ब्रिटनच्या नौदलाचं सागरी सामथ्र्य वाढलं होतं. तिच्यामुळे ब्रिटनचं आरमार, लष्कर सुरक्षितपणे ये-जा करू शकत होतं.

आयएनएस विराट भंगारात जाण्यामुळे नाविक वारशाची कशी अपरिमित हानी होणार आहे?

– अनेकांना असं वाटतं की गेल्या ३० वर्षांत कोणतंही युद्ध झालेलं नाही त्यामुळे या काळात आयएनएस विराटने अशी काय देशसेवा केली असणार? तिच्याबद्दल अशा काय आठवणी असणार? पण हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे. युद्ध रोखणं आणि शांतता प्रस्थापित करणं हेच नौदलाचं काम असतं. आपल्या शेजारी देशाबरोबरचे आपले संबंध नाजूक असतानाच्या गेल्या ३० वर्षांच्या काळात आयएनएस विराटने शांतता राखण्यात मदत केली. ऑपरेशन पराक्रम, कारगिल या संघर्षांत गरजेनुसार आयएनएस विराटला तैनात केले गेले. त्याआधीच्या श्रीलंकेबरोबरच्या प्रश्नातदेखील विराटने आपलं सामथ्र्य दाखवून दिलं होतं. तुमच्या शस्त्रागारात तब्बल ३० र्वष विराटसारखी युद्धनौका असते तेव्हा तुमच्याकडे खूप मोठं सामथ्र्य असतं. तुमच्या क्षमता प्रचंड वाढलेल्या असतात. आयएनएस विराट दिवसाला ५०० मैल अंतर कापू शकते. म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमचा सुसज्ज असा आख्खा एक लष्करी तळच कमीत कमी वेळात हलवू, फिरवू शकत असता. तुमच्याकडे अशी युद्धनौका असते तेव्हा तुमच्या सगळ्या आरमारालाच मोठं बळ मिळतं. तुम्हाला त्यामुळे दहा हत्तींचं बळ मिळालेलं असतं किंवा तुमच्याकडे सिंहांची ताकद आलेली असते. विमानवाहू युद्धनौका हे तुमचं सामथ्र्य असतं. त्याच्यावर हजार ते दीड हजार लोक असतात.

आयएनएस विराट भंगारात जाणं यामुळे भारतीय नौदलाचं किती आणि कसं नुकसान होतं आहे ते कसं सांगणार? ज्यांना युद्धनौकेचा काहीच अनुभव नाही त्यांना ते कसं समजावणार? आयएनएस विराटने आपल्याला संघर्षांत कायमच मदतीचा हात दिला आहे. आपला संघर्ष सोपा केला आहे. नौदलाच्या आधीच्या पिढीसाठी आयएनएस विक्रांत आईसारखी होती. तेच स्थान आमच्या बाबतीत विराटचं आहे. ती आमची आकांक्षा होती, शान होती. तिच्या नसण्यामुळे होणारी हानी कशामुळेच भरून येणार नाही.

आयएनएस विराटचं काम थांबवण्यात आलं तो दिवस आणि विराटला गुजरातमध्ये अलंग इथं वाहून नेण्यात आलं तो दिवस हे दोन्ही तुमच्या दृष्टीने काय, कसे होते?

– २०१७ मध्ये आयएनएस विराटचं काम थांबवण्यात आलं तेव्हा तिची कारकीर्द संपली याचं दु:ख होतं, पण तिने आपल्याकडे ३० वर्षांत केलेल्या कामाचा अभिमान होता. तिने दोन नौदलांमध्ये मिळून ५५ वर्षे सेवा दिली आहे. जगातल्या युद्धनौकांमधली ही सगळ्यात मोठी कारकीर्द आहे. आम्ही तिला साश्रू नयनांनी पण भावपूर्ण निरोप दिला. पण तिला अलंग इथं नेऊन तिचे सगळे भाग विलग करण्याचा निर्णय होईपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की काही तरी होईल आणि विराट भंगारात जाणार नाही. तिचं संग्रहालय होईल, कदाचित प्रशिक्षणासाठी तिचा वापर केला जाईल. कदाचित तिचं पर्यटन केंद्र केलं जाईल. कदाचित पाण्याखालील अ‍ॅक्टिव्हिटी, डायव्हिंग यासाठी थांबा म्हणून तिचा वापर होईल. तिचा शेवट सन्मानपूर्वक होईल अशी एक आशा होती. पण भंगारात काढण्यासाठी गुजरातमधल्या अलंग इथल्या यार्डात तिला वाहून नेण्यात आलं. तिथे तिचे सुटे भाग काढून तिच्यावरचे धातू काढून घेतले जातील आणि त्यांचा तुमच्या बाईक किंवा अगदी दाढीच्या ब्लेडमध्येदेखील पुनर्वापर होईल. हा विचार येतो तेव्हा असं वाटतं की विराटचा शेवट असा व्हायला नको होता. विराटला आम्ही व्हायब्रंट विराट असं म्हणायचो. आम्हा नौदलातल्या लोकांचा जहाज, नौकांमध्ये जीव अतिशय गुंतलेला असतो. आमच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या असतात. तुम्ही त्यातल्या ज्या केबिनमध्ये राहिलेले असता त्यातल्या प्रत्येक नट आणि बोल्टमध्येही तुम्ही गुंतलेले असता. तुमची कारकीर्द घडवणाऱ्या त्या जहाजांवर तुमच्या लहानमोठय़ा आठवणी असतात.

आयएनएस विराटचं संग्रहालयात रूपांतर होऊ शकलं असतं का?

– नौदलाने स्वत:च्या खर्चाने आयएनएस विक्रांतचं संग्रहालय करण्याचा काही काळ प्रयत्न केला, पण काही काळाने ते अशक्य होत गेलं. अशा पद्धतीने संग्रहालय करण्यासाठी खूप जागा, भरपूर मनुष्यबळ लागत असल्यामुळे नौदलासाठी तरी ते अव्यवहार्य होतं. अशा युद्धनौकेचं संग्रहालय करणं, नाविक वारशाचं जतन करणं या गोष्टींसाठी आम्ही मदत, सहकार्य करू शकतो, पण त्यात पुढाकार घेणं आणि पूर्णपणे नौदलानेच सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही. ते प्रयत्न राष्ट्रीय स्तरावरून व्हायला हवेत. सरकार, नौदल यांनी प्रयत्न केले, पण ते काही जुळून आलं नाही. आपल्या वारशाच्या बाबतीत काय करायचं हा फक्त नौदलाचा नाही तर देशाचा प्रश्न आहे. अँतोनी दी सेंट इक्सुपेरी हा फ्रेंच लेखक म्हणाला होता की, तुम्हाला जहाज बांधायचं असेल तर त्यासाठी लोकांना लाकूड गोळा करायला जंगलात पाठवू नका. त्याऐवजी त्यांच्यामध्ये समुद्रावर स्वार होण्याची आकांक्षा निर्माण करा. विराटसारख्या युद्धनौकेचं संग्रहालय करण्याबाबतही हेच म्हणता येईल.

आपल्या नाविक वारशाकडे लक्ष द्यायला हवं, त्याचं जतन करायला हवं अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत?

– आपल्याला पाच हजार वर्षांचा वैभवशाली सागरी वारसा आहे. युरोपियन लोकांनी जमिनीच्या शोधात आपली जहाजे समुद्रात घालण्याच्या किती तरी आधी आपला पश्चिमेत रोम तसंच ग्रीसबरोबर आणि पूर्वेला जपानबरोबर समुद्रमार्गे व्यापार सुरू होता. आपण समुद्रमार्गे दूरदूरचा प्रवास करण्याची आपली क्षमता घालवली आणि मग वसाहतींचे गुलाम झालो. पहिल्या हजार वर्षांत आपण जगातला श्रीमंत देश होतो. पण १९४७ पर्यंत आपण सगळ्यात गरीब देश झालो. आरमारी संग्रहालयात या सगळ्या गोष्टी मांडता आल्या असत्या. असं संग्रहालय उभं करण्यासाठी एकापेक्षा अधिक यंत्रणांची गरज होती. नॅशनल मेरिटाइम फाऊंडेशन, मेरीटाइम हिस्ट्री सोसायटी अशा संस्थांबरोबर नौदल बऱ्याच गोष्टी करत आहे. पण आणखीही बऱ्याच गोष्टी होण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या सागरी वारशाच्या एक शतांश भागालाही आपण अजून स्पर्श केलेला नाही.

‘संडे एक्स्प्रेस’मधून

अनुवाद- वैशाली चिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 7:22 am

Web Title: ins virat mulakhat dd70
Next Stories
1 संवाद : ‘लडाख : हिवाळ्यात हवाई दल महत्त्वाचे’
2 राशिभविष्य : दि. २ ते ८ ऑक्टोबर २०२०
3 राजकारणाला मिळाला हमीभावाचा मुद्दा!
Just Now!
X