कर्करोगामुळे रुग्णांचं मानसिक खच्चीकरण होतं, नैराश्य येतं; पण यातूनही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला सांगणाऱ्या पुण्याजवळच्या वाघोली इथल्या ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या संस्थेची नुकतीच द्विदशकपूर्ती झाली. ते करत असलेल्या त्यांच्या कामाविषयी..

‘शुभं करोति..’ म्हणताना त्यामध्ये ‘आरोग्यम् धनसंपदा’ असं येतं. प्रार्थना करताना देवाला निरोगी ठेव असंही सांगतो; पण आजची जीवनशैली इतकी बदलली आहे की, आपणच आपल्या शरीराला पुरेसा वेळ देत नाही, त्याची काळजी घेत नाही. त्यामुळे नाना प्रकारचे आजार, त्रास, रोग होत असतात. वैज्ञानिक भाषेत असं म्हणतात की, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.’ नेमकं इथेच आपण कमी पडतो. मग एखादा छोटा वाटणारा त्रास मोठं रूप घेतो आणि त्या त्रासाची व्याप्ती वाढते. हा त्रास अनेकदा थेट कॅन्सपर्यंत पोहोचतो. ‘कॅन्सर’, मनाचा थरकाप उडवणारा शब्द. कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं, ही मानसिकता त्या व्यक्तीमध्ये कायमची जागा घेते; पण आता कर्करोगग्रस्त रुग्ण यातून सहीसलामात बाहेर पडू शकतात हे सिद्ध झालेलं असलं तरी भीती ही वाटतेच. काही वेळा अनेक शस्त्रक्रिया, उपचारांनीही रुग्ण यातून बाहेर पडत नाहीत. अशा रुग्णांना वेगवेगळ्या मार्गानी यातून बाहेर काढण्याचं, या आजारातून पूर्णपणे बरं करता येणं शक्य नसलं तरी किमान त्यांची जीवनशैली सुखकर, आनंदी करण्याचं काम पुण्यातल्या वाघोली इथलं ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ गेली वीस र्वष सातत्याने करत आहे. या संस्थेच्या व्दिदशकपूर्तीचा सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या वेळी संस्थेचे संचालक डॉ. सदानंद सरदेशमुख, डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. अनिल संगनेरिया, डॉ. विनीता देशमुख अशा काही दिग्गज डॉक्टरांचा सहभाग होता. कर्करोगाविषयीचे समज-गैरसमज, माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, विविध मार्ग अशा काही मुद्दय़ांवर या प्रमुख डॉक्टरांनी माहिती दिली. तसंच त्यांचे अनुभवकथनही केलं. या संस्थेत वेगवेगळ्या चिकित्सा घेऊन कर्करोगमुक्त झालेले तसंच त्याची तीव्रता कमी झालेल्या काही रुग्णांचं मनोगत आणि त्यांची माहिती, संस्थेविषयक माहितीपट, तक्तेस्वरूपात कर्करोगविषयक माहिती असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं.

व्याधिजर्जर अशा रुग्णांचं शारीरिक आणि मानसिक दु:ख हलकं करण्यासाठी परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टतर्फे आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्राची १९८४ साली स्थापना केली. कॅन्सरसारख्या असाध्य व्याधीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने संशोधन व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजीच्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, परमपूज्य सरदेशमुख महाराज आणि डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी अनेक र्वष याबाबत चर्चा केली. १९९४ मध्ये वाघोली इथे संशोधन प्रकल्प सुरू केला. पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, दिल्ली अशा ठिकाणी प्रकल्पांची केंद्रे सुरू आहेत. ६३ एकर जागा असलेल्या या संस्थेत जवळपास ५० ते ६० डॉक्टर्स काम करत असून आतापर्यंत साधारण ७५०० रुग्णांनी आयुर्वेदीय चिकित्सा घेतली आहे. ‘सुरुवातीची काही र्वष या प्रकल्पाचं काम करण्याचं स्वरूप लहान होतं. कालांतराने त्याची व्याप्ती वाढत गेली. सरदेशमुख महाराजांचं असं म्हणणं होतं की, हा प्रकल्प, संशोधन केवळ आयुर्वेदाशी निगडित राहता कामा नये. तो जगन्मान्य झाला पाहिजे. म्हणून आधुनिक गोष्टींशीही या प्रकल्पाचा संबंध असायला हवा. म्हणून संस्थेत असलेल्या आयुर्वेदिक चिकित्सेला काहीसं आधुनिक वलय आहे’, संस्थेचे संचालक डॉ. सदानंद सरदेशमुख कार्यक्रमात सांगत होते. त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम मेहनती आणि हुशार असल्याने हा प्रकल्प उत्तमरीत्या सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते पुढे सांगत होते की, ‘आमच्या संस्थेत कॅन्सर बरा होतो, असा आमचा दावा बिलकूल नाही; पण कॅन्सरग्रस्त लोकांची जीवनशैली मात्र आम्ही सुखकर करतो.’ केवळ भारतीयच नाहीत तर जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांतल्या रुग्णांनीही या संस्थेतून चिकित्सा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यानिमित्ताने आयुर्वेद परदेशात जातोय ही आनंदाची बाब असल्याचंही ते म्हणत होते.

या कार्यक्रमात विविध कॅन्सरची लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय अशा माहितीचे अनेक तक्ते लावले होते. कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाने त्या माहितीचा लाभ घेतला. सोप्या आणि मोजक्या शब्दांत चित्रांच्या माध्यमातून ही माहिती सांगितल्यामुळे लोकांच्या मनातली कॅन्सरबाबतची अढी काही प्रमाणात तरी कमी झाली. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी सांगितलं, ‘कॅन्सर झाला तरी घाबरायचं काहीच कारण नसतं. कारण ७० ते ८० टक्के लोकांचा कॅन्सर बरा होऊ शकतो. कॅन्सर हा आपल्याच जीन्समध्ये काही बदल झाल्यामुळे होत असला तरी त्या बिघडवण्याचं काम आपणच करतो. त्यामुळे आपणच आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणू शकतो.’ कर्करोग झाला की, मग उपचार घेण्यासाठी धावाधाव सुरू होते; पण तो होण्यासाठी माणूसच कुठे तरी कारणीभूत असतो,’ ते पटवून देत होते. ‘आपल्या शरीरात एखादी बारीकशी गोष्ट खटकत असली तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हेच नेमकं चुकीचं आहे. वेळीच चिकित्सा घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे,’ असंही ते सांगत होते. तर डॉ. अनिल संगनेरिया यांनी सांगितलं की, ‘प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ट्रीटमेंट. रोग, आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं हे योग्यच आहे. तसंच प्रतिबंधात्मक उपाय करणं हीच एक मोठी आणि महत्त्वाची चिकित्सा आहे. ही चिकित्सा करण्याची प्रत्येकाची क्षमता असते. त्यामुळे या चिकित्सेचं महत्त्व खूप आहे. आधीच योग्य ती काळजी घेतली तर रोग किंवा आजार होण्याची शक्यता दूर असते.’

बायप्सी आणि रक्तचाचणी याद्वारे कॅन्सरचं निश्चित निदान झालेल्या रुग्णांचीच संस्थेमध्ये चिकित्सा केली जाते. रुग्णांना आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी अशी दोन्हीची चिकित्सा दिली जाते. आयुर्वेदिकदृष्टय़ा चिकित्सा करताना रुग्णाचा व्यवहार, आहार, आनुवंशिकता, व्यसनं याची माहिती संकलित केली जाते तर अ‍ॅलोपथीदृष्टय़ा चिकित्सा करताना रुग्णाचे वैद्यकीय रिपोर्ट्स तपासले जातात. चिकित्सेच्या सुलभतेसाठी रुग्णांचं चार गटांमध्ये विभाजत केलं जातं. ‘ग्रुप ए’मध्ये केमिओथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रकर्म अशी कोणतीही आधुनिक चिकित्सा न घेता आयुर्वेदिक चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांचा समावेश होतो. तर ‘ग्रुप बी’मध्ये केमिओथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रकर्म करूनही पुनरोद्भव झालेल्या किंवा अन्य अवयवांना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचा समावेश असतो. ‘ग्रुप सी’मध्ये केमिओथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रकर्म अशा आधुनिक चिकित्सेसह आयुर्वेदिक चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांना समाविष्ट केलं जातं. तर ‘ग्रुप डी’अंतर्गत आधुनिक चिकित्सेनंतर कॅन्सर व्याधी पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांचा समावेश होतो. ही माहिती देत डॉ. वासंती गोडसे या ‘हे केवळ चिकित्सा केंद्र नाही तर संशोधन केंद्र आहे’, असं म्हणाल्या. तर ‘संस्थेची केवळ भारतातच नव्हे तर जगभरात व्याप्ती आहे. ही प्रेरणा मिळत संस्थेत अधिकाधिक आधुनिक चिकित्सा उपलब्ध व्हावी, रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्यात असा प्रयत्न आहे. तसंच पंचकर्म, पथ्यकर आहार अशा सगळ्या चिकित्सा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात असा संस्थेचा प्रयत्न आहे’, असं डॉ. विनीता देशमुख या म्हणाल्या.

संस्थेमार्फत होणाऱ्या चिकित्सेमुळे रुग्णांचं आयुष्य कसं बदललं हे कार्यक्रमात आलेले काही रुग्ण आपले अनुभव सांगत होते. एक महिला रुग्ण सांगत होत्या की, ‘मी रुटीन चेकअपसाठी गेलेले असताना माझ्या डाव्या ब्रेस्टच्या जवळ टय़ुमर असलेलं माझ्या लक्षात आलं. शेवटचे सहा महिने आहेत असंही मला सांगण्यात आलं. मग मी या संस्थेत आले. इथे होत असणाऱ्या चिकित्सेला सकारात्मकदृष्टय़ा प्रतिसाद देत गेले आणि आता सात र्वष मी या टय़ुमरशी लढतेय. माझी जीवनशैली मी आनंदात जगतेय.’ तर ८२ वर्षीय एक महिला त्यांचा अनुभव सांगत होत्या की, ‘कर्करोगाचं निदान झालं तेव्हा मी ६५ वर्षांची होते. माझं हिमोग्लोबिन कमी झालं होतं. खूप त्रास झाला होता. मग या संस्थेत यायचं ठरवलं. इथल्या चिकित्सेमुळे मला साइट इफेक्ट्स कमी झाले. त्या उपचारांमुळे मी गेली पंधरा र्वष सुखाने आयुष्य जगतेय.’ उतारवयातही त्या आजींना जगण्याची उमेद देण्याचं काम या संस्थेने केलं. चाळिशीचे एक रुग्ण सांगत होते की, ‘आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी या दोन्हीची चिकित्सा केली जाते म्हणून मी या संस्थेत आलो. इथे मिळालेल्या चिकित्सेमुळे मी बरा तर झालोच, पण माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. आज जो मी आहे ते या संस्थेमुळे. आपण फक्त शारीरिक त्रासाकडे लक्ष देतो. मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करतो. तसं करता कामा नये. आपुलकीने बोलणं, वागवणं हे या संस्थेत मी अनुभवलं. मानसिकदृष्टय़ा मला सक्षम केलं. एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कॅन्सरला कॅन्सल करू शकतो.’

‘कॅन्सर’ या केवळ शब्दानेच आयुष्य संपल्यासारखं वाटतं. हा आजार शारीरिक असला तरी त्याचे घाव मनावर अधिक होतात आणि यामुळेच रुग्णांचा अर्धा धीर तिथेच संपतो. अशाने त्यांच्या जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम होतो. नेमकं हेच सुधारण्यासाठी, रुग्णांची ही मानसिकता बदलण्यासाठी आयुर्वेदासह आधुनिक चिकित्सा करून त्यांना आजारातून बाहेर काढण्याचं, मानसिक बळ देण्याचं आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम ही संस्था करत आहे. यांच्या या कामामुळे अनेक रुग्ण आणि त्यांचे आप्तेष्ट यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय हे खरं..!