नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com
घरात लावायची झाडे (इनडोअर प्लान्ट्स) आणि घराबाहेर खिडकी, बाल्कनी, गच्ची किंवा अंगणात लावायची झाडे असे ढोबळ वर्गीकरण आपण नेहमीच ऐकतो. मात्र प्रत्यक्षात घरात लावायची झाडे असा काही प्रकारच अस्तित्वात नाही. तसे असेल तर इनडोअर प्लान्ट्स हा शब्द एवढा प्रचलित कसा काय, असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे, तर इनडोअर प्लान्ट्स म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून फक्त, कुठलेही रोप ग्राहकाच्या गळ्यात मारण्याची एक क्लृप्ती आहे. शहरांची जशी वाढ होत गेली, तशी बंगले, त्यांच्या सभोवतालीच्या बागा नाहीशा होऊन तिथे इमारती उभ्या ठाकल्या. बागांची जागा पार्किंग लॉटने बळकावली. नावापुरती आणि ती सुद्धा, महापालिकेचे आदेश पाळावे लागतात म्हणून, १०-१२ झाडे कंपाउंडच्या भिंतीच्या कडेने लावली जातात. अशा झाडांच्या सभोवार, अगदी त्यांच्या बुंध्यापर्यंत, काँक्रीट टाकून त्यांची वाढही खुंटवली जाते. अशा परिस्थितीत काही फ्लॅटधारक मात्र बागवेडे असतात, पण शहरांतील बहुतेक रहिवाशांना बागकामाची फारशी माहिती नसते. मग एखाद्या नर्सरीत जाऊन रोपे विकत घेऊन बागकामाची सुरुवात होते.

रोपे विकत घेताना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘हे इनडोअर प्लान्ट आहे का?’ मग ते कुठलेही झाड असो, ते खपवण्यासाठी नर्सरीवाला ते झाड घरात वाढण्यायोग्य, आहे असे ठासून सांगून मोकळा होतो. त्या रोपांना लागणारी (नर्सरीवाल्याने सांगितली म्हणून) महागडी पण ‘जादुई’ खतेही आपण खरेदी करतो. पण नर्सरीवाल्याने सांगितलेले सर्व सोपस्कार भक्तिभावाने करूनही ते झाड काही तग धरू शकत नाही. मग आपल्या मनात, आपले काय चुकले, की आपल्याला ‘ग्रीनफिंगर्स’च नाहीत असा संभ्रम निर्माण होतो. ‘बागेमधली तणे उपटली, सर्वही जाळून नष्ट केली, जादू पाहा ही कशी जाहली, नव-जोमाने पुन्हा उगवली. पण, महागडे जे रोप आणिले, औषध-पाणी सर्वही दिधले, मरतुकडे ते मात्र जाहले, आणि शेवटी मरून गेले.’ अशी गत अनेकांची होते.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

असे होण्याचे कारण काय, तर आपले बागकामाविषयीचे अज्ञान. झाडे, झुडपे, वेली या सर्व मोकळ्या निसर्गातच वाढणाऱ्या वनस्पती असतात. त्यापैकी कोणालाही घराच्या आश्रयाची गरज नसते. काही खुल्या सूर्यप्रकाशात, तर काही निम-प्रकाशातच (semi shade) तग धरू शकतात. निम-प्रकाशात वाढणाऱ्या वनस्पतींना आपण घरात वाढवू शकतो. पण घरात म्हणजे नेमके कुठे? एक लक्षात घ्या, निम-प्रकाशात वाढणाऱ्या वनस्पतींनाही खुल्या सूर्यप्रकाशाच्या ५० ते ७० टक्के उजेडाची गरज असते. बाल्कनीत किंवा खिडकीत (Box window) दिवसाचे काही तास ऊन मिळू शकते, अशा ठिकाणी आपण विविध प्रकाराच्या वनस्पती लावू शकतो. परंतु, घरातील हॉल किंवा बेडरूममध्ये झाडे ठेवताना, त्यांना ७० ते ५० टक्के उजेड मिळतो की नाही याची खातरजमा करून घ्यावी लागते. तसे नसेल तर आपल्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात; एक म्हणजे त्यांना काही दिवसच त्या जागी ठेवून नंतर त्यांना आवश्यक असलेल्या जागी हलवणे. दुसरा पर्याय म्हणजे, त्यांना कृत्रिम प्रकाश देणे. एलईडी दिवे त्यासाठी उत्तम. पण किती वॉट्सचे किंवा किती, हे आपल्याला वनस्पतींच्या वाढीवरूनच ठरवावे लागते. वनस्पती लुकडय़ा आणि उंच वाढत गेल्या, पाने फिकट पिवळी झाली तर त्यांना जास्त प्रकाशाची गरज आहे हे समजते. अशावेळी त्यांना जास्त वॉट्सचे दिवे लागतील. निम-प्रकाशात वाढणाऱ्या काही वनस्पतींची आणखी एक गरज असते; ती म्हणजे हवेतील आद्र्रतेची. घरांतील वातावरण साधारणपणे बाहेरच्या मोकळ्या वातावरणापेक्षा जास्त शुष्क असते. अशा वेळी घरात ठेवल्या जाणाऱ्या काही वनस्पतींसाठी आद्र्रता उपलब्ध करावी लागते. ही आद्र्रता आपण पुढील प्रकारे देऊ शकतो. (अ) रोपे घोळक्यात ठेवणे (ब) रोपांवर दिवसातून पाच ते सहा वेळा पाणी फवारणे. (क) रोप पाणी भरलेल्या पसरट थाळीत ठेवणे. वरील कुठलीही एक गोष्ट आपल्या सोयीनुसार करावी. वातानुकूलित खोल्यांत आद्र्रता तसेच उजेड या दोघांचीही कमतरता असल्याने, तिथे वनस्पती फार काळ सुदृढ राहू शकत नाहीत.

आता आपण घरात ठेवण्यासाठी सुयोग्य वनस्पती कशा निवडाव्यात हे पाहू. साधारणपणे आपण असे म्हणू शकतो की मोठय़ा पानांच्या आणि ज्यांची खोडे नरम असून ती लाकडासारखी कडक होत नाहीत अशा वनस्पती आपण घरातील बागेत ठेवू शकतो. निम-प्रकाशात वाढणाऱ्या बहुतेक वनस्पती शोभिवंत पानांच्या असतात; त्यांना फुले असली तरी बऱ्याचवेळी ती देखणी नसतात. पण निम-प्रकाशातही शोभिवंत फुले देणाऱ्या काही वनस्पती असतात. उदाहरणार्थ अँथुरीयम, स्पॅदिफायलम (Peace lily), आफ्रिकन व्हायोलेट, इम्पेशन्स, एपिसिया, क्रायझोथेमिस, ऑर्किड व ब्रोमेलीड्सचे (अननस कुळातील) काही प्रकार. नेच्यांचे अनेक आकर्षक प्रकार, पानांवर लाल किंवा पांढरे ठिपके असलेली पोल्काडॉट्स, पानांवर लाल, गुलाबी किंवा पांढऱ्या रेषा असलेली फिट्टोनिया, बेबी टीअर्स, पेलिओनिया, पिलिया, स्पायडर प्लांट, बटरफ्लाय ऑक्झालीस अशा कितीतरी वनस्पती आपण छोटय़ा कुंडय़ांतून किंवा हॅँगिंग बास्केट्समधून लावू शकतो. याशिवाय डायफेनबेकीया, अ‍ॅग्लोनेमा, ड्रासेना, मनी प्लान्टच्या अनेक जाती, फिलोडेंड्रॉन, अरेलीया, अरेका पाम ही सर्वच झाडे घरातील बागेसाठी सुयोग्य आहेत. अ‍ॅस्पिडिस्ट्रा (कास्टआयर्न प्लान्ट) ही वनस्पती कमी उजेडात इतर कोणत्याही वनस्पतीपेक्षा चांगली राहू शकते.

काही छोटय़ा वेलींचे प्रकार घरातील बागेची शोभा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तारेचा किंवा बांबूचा वापर करून छोटे पडदे (trellis) तयार करून त्यांवर रेक्स बिगोनिया वाईन, पायपर क्रोकॅटम आणि होयासारख्या वेली चढवता येतात. रेक्स बिगोनिया वाईन, पायपर क्रोकॅटमची पाने फारच सुरेख असतात. होयाची (वॅक्स क्रिपर) मांसल पाने तुकतुकीत असून वेलीला झुपक्यात फुले येतात. फुलांचा सुगंध संध्याकाळी तसेच रात्री दरवळतो. ती साधारण सहा दिवस टिकतात. पण गंमत अशी की फुलांच्या गुच्छाचा देठ गळून पडत नाही; तर त्याच देठावर परत परत फुले लगडतात. होया वेलीबद्दल थोडी जास्त माहिती द्यावीशी वाटते; कारण अशी दुसरी बहुगुणी वेल दुर्मीळच! ही वेल सावकाश वाढणारी आहे. त्यामुळे रोप लावताच तिला फुले येतील असे समजू नका. बऱ्यापैकी मोठे रोप मिळाले तर साधारण एका वर्षांनंतरच फुले येऊ लागतात; पण जवळ जवळ वर्षभर फुले येतात. या वेलीला निम-प्रकाश चांगला मानवतो. कधीमधी पाण्याकडे दुर्लक्ष झाले तरी चालू शकते. ही वेल फार वेगाने वाढत नाही आणि फार जास्त पसारा नसल्याने फक्त चार किंवा सहा इंचांच्या कुंडीतही अनेक वर्षे राहू शकते. होयाच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही भारतात नैसर्गिकपणे वाढताना आढळतात. जातीप्रमाणे फुलांचे रंगही विविध असतात. सकाळी फुलांतून मकरंदाचे थेंब गळू लागतात. आणि मकरंद पिण्यासाठी शिंजीर पक्षी हमखास भेट देतात. या वेली माती न वापरता फक्त मॉसमध्येही वाढवता येतात. नारळाच्या सोडणाच्या पोकळीत मॉस गच्च भरून त्यात लावलेली होयची वेल काही काळानंतर सबंध सोडण व्यापून टाकते. अशी सोडणातील होया बाल्कनीत लटकावता येते. होयाच्या कुळातीलच आणखी एक छोटुकली वेल म्हणजे डिस्चिडीया. हिची फुले मात्र फारच छोटी असतात आणि कळ्यांसारखी अर्धोन्मिलितच राहातात. पण होयापेक्षा ही जास्त वेगाने वाढते. या वेलीत अनेकविध आकाराची पाने असतात. एका जातीत तर, पाने चेंडूसारखी गोलाकार, पोकळ असतात. डिस्चिडीयाचेही अनेक प्रकार आहेत; त्यापैकी एक म्हणजे, डिस्चिडीया बेन्गालेन्सीस; ही जात भारतातलीच आहे. डिस्चिडीयाच्यासुद्धा सर्व जाती मातीशिवाय वाढवता येतात.

झुलती झाडे (हॅँगिंग बास्केट) बाल्कनीत टांगून ठेवल्यास त्यांचीही एक शोभा असते. बास्केटमधून किंवा शिंकाळ्यातून ओघळणारी रोपे बास्केट आणि शिंकाळे पूर्णपणे झाकून टाकतात. पुदिनाही हॅँगिंग बास्केटमध्ये लावला तर शोभिवंत तर दिसतोच पण, स्वयंपाकघराच्या खिडकीत टांगून ठेवला तर हवा तेव्हा ताजा पुदिना खुडून वापरता येतो. प्लास्टिकच्या हॅँगिंग बास्केटपेक्षा सुंदर, वजनाला हलके आणि फक्त मॉसमध्ये वनस्पती वाढवण्यासाठी नायलॉनच्या बारीक किंवा जाड दोऱ्या वापरून घर-बसल्या अनेक प्रकारचे हँगर्स तयार करता येतात. त्यासाठी कसल्याही अवजारांची किंवा अन्य साधनांची गरज नसते. दोऱ्यांना फक्त गाठी मारून अत्यंत सुबक आणि अनेकविध हॅँगर्स करता येतात. असे हॅँगर्स कमीत कमी दहा वर्षे टिकतात. काही आकर्षक हॅँगर्स कुंडय़ा टांगण्यासाठीही उपयोगात येतात.

छोटय़ा, पसरट ट्रेमध्ये अप्रतिम अशी निसर्गदृश्ये तयार करता येतात. त्यांना ट्रे लॅण्डस्केप किंवा फेयरी गार्डन्स (परींचे बगिचे) म्हणतात. मात्र अशा कलाकृतींना भरपूर उजेडाची गरज असते. असे हे बगिचे कधीमधी दिवाणखान्यात ठेवले तरी त्यांची योग्य जागा म्हणजे बाल्कनीत किंवा खिडकीत, जिथे त्यांना भरपूर उजेड मिळेल.

निम-प्रकाशात वाढणारी बरीच झाडे शोभिवंत पानांची असल्याने, त्यांची पाने नेहमी स्वच्छ ठेवावीत. यांतील बऱ्याच झाडांना सहसा कीड-रोग लागत नाहीत. पण प्रादुर्भाव दिसताक्षणीच नीम ऑईलयुक्त कीटकनाशकांचा वापर केल्यास प्रतिबंध होऊ शकतो. पाणी फक्त माती भुसभुशीत ओली राहील इतकेच द्यावे. बरीच झाडे जास्त पाण्यानेच मरतात. जास्त पाणी दिल्यास ते कुंडीच्या भोकातून बाहेर पडत असले तरी त्या पाण्याबरोबर उपयुक्त क्षार वाहून जातात व ते झाडांना उपलब्ध होत नाहीत. लागवडीसाठी माती वापरतो ती नेहमीच भुसभुशीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी बागकामाची माती, खत (शेणखत किंवा पालापाचोळ्याचे) आणि वाळू समभागात मिसळून वापरावी. वाळूऐवजी भाताचे तूस किंवा कोकोपीट वापरले तरी चालते. कोकोपीटची पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप असल्याने पाणी जास्त साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. आठवडा किंवा १५ दिवसांतून एकदा रोपाची माती वरवर मोकळी करावी; त्यामुळे मातीत हवा खेळती राहून मुळांची सुदृढ वाढ होते.

(लेखक उद्यानतज्ज्ञ आहेत.)

(छायाचित्रे – नंदन कलबाग)