27-lp-vaishali-archikस्क्वेअर फुटांचे हिशेब करावे लागणाऱ्या आजच्या काळात घरात जेवणासाठी वेगळी खोली असण्याची शक्यता फारच कमी. पण अशा वेळी आहे त्या जागेतच वेगळेपणा कसा आणता येईल?

ऑक्सफर्ड केम्ब्रिजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हाय टेबलसाठी आमंत्रण मिळणे म्हणजे जणू आकाशाला हात टेकण्यासारखे आहे. हाय टेबल म्हणजे काय तर साधारण १५ सेंटिमीटर उंचीच्या साध्या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रोफेसरांसोबत एका टेबलावर बसून जेवणे. पण हा मान ज्याला मिळतो त्याचा आनंद काय वर्णावा! कुठल्याही सोहळ्यापेक्षा हा सोहळा कमी नसतो. हॅरी पॉटरच्या सिनेमात थोडय़ा उंचीवर बसलेली प्रोफेसर मंडळी व खालच्या बाजूला त्यांच्या काटकोनात मांडलेली विद्यार्थ्यांची जेवणाची टेबले या दृश्यांवरून या रचनेची थोडीफार कल्पना येईल. अशाच एका जेवणाला जायचा योग आम्हाला आला होता. तेथील भारावून टाकणाऱ्या वातावरणात ब्रिटिश फूड पहिल्यांदाच चविष्ट लागले. जेवणासारखी रोजच्या जीवनातील साधी गोष्ट पण प्रत्येक संस्कृती ही जेवणाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती गुंफली गेली आहे. मग तो आपल्या कुटुंबातील व जवळच्या मित्रांसोबत केलेला ख्रिसमस लंच असो, इफ्तारचे जेवण असो किंवा दिवाळीच्या दिवसातील पंचपक्वान्नाची मेजवानी असो. टेबलाभोवती बसून हात सुकेपर्यंत गप्पा मारत जेवण्याचे प्रसंग वरचेवर येणारी मंडळी खरोखरच नशीबवान!! तर अशा या कुटुंबाबरोबर मित्रांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना सामावून घेणारी जेवणाची खोली कशी असावी हे बघू.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

पूर्वीच्या काळची खाली पाटावर बसून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत जेवायची पद्धत आता मागे पडली आहे. सध्या आपापल्या खोल्यांमध्ये जाऊ न टीव्ही समोर बसून खायची पद्धत रूढ झाली असली तरी अजूनही बऱ्याच घरात सर्वानी एकत्रच जेवण घ्यायचे याचा आग्रह होताना दिसतो. पूर्वी जेवणाची खोली छोटी का होईना वेगळी असायची किंवा स्वयंपाकघरातच पाट मांडले जायचे. पण आजकालच्या युगात घरात जेवणाची स्वतंत्र खोली असेल तर उगाचंच श्रीमंत झाल्यासारखे वाटते. अशा वेळी बाकी कुठल्याही खोल्यांसारखी याची सजावटपण उठावदार होईल याकडे लक्ष द्यावे. लहानपणापासून आपले आईबाबा ओरडत आले आहेत की शांतपणे, लक्ष देऊ न खा.. तरच अन्न नीट पचेल. हा शांतपणा रंगसंगतीतून, नैसर्गिक व कृत्रिम प्रकाशाच्या उत्तम वापराने, आजूबाजूचा इतर फर्निचरची गर्दी कमी करून आणू शकतो.

बदलत्या जीवनपद्धतीमुळे म्हणा, कितीही नाही म्हणाले तरी जेवतानाही टीव्हीचा आनंद घ्यायला म्हणा किंवा जागेच्या कमतरतेमुळे म्हणा जेवणाची स्वतंत्र खोली असणे आता दुर्मीळ झाले आहे. बैठकीच्या खोलीला लागूनच लिव्हिंग कम डायनिंग केले जाते. या प्रकारच्या रचनेला आधी नाके मुरडली गेली. पण अशा प्रकारच्या रचनेचा एक फायदा असा आहे की मित्र-मंडळी जमली असताना खाणेपिणे, गप्पा मारणे या  दोन्ही गोष्टी या जागांमध्ये छान विभागल्या जातात. सगळ्यांच्या समोरच टेबल असल्याने हक्काने, न संकोचता वाढून घेणे सोयीचे होते. थोडे खासगीपण जपणारी ही खोली जेव्हा बैठकीच्या खोलीला जोडली जाते तेव्हा औपचारिकता आपोआप गळून पडते. लोक जास्त सैलावतात.

वरील रचनेत एक फक्त गैरसोय अशी होते की अचानक बाहेरून कोणी आले आणि तुम्ही जेवत असाल तर जरा कठीण परिस्थिती उद्भवते. स्वत: पोटभरून जेवताना पाहुण्यांना फक्त चहा देऊन कटवणे बरोबर दिसत नाही आणि जेवायला बसा म्हणायचे तर रिकामी होत चाललेली भांडी समोर दिसतात. अशा वेळी दोघांचीही परिस्थिती अवघडल्यासारखी होते. त्याचबरोबर जेवताना किंवा जेवून झाल्यावर टेबलावर पसरलेल्या खरकटय़ा भांडय़ांचा पसारा थोडय़ा वेळासाठी का होईना दुसऱ्यांच्या समोर आलेला नको वाटतो. अशा वेळी बैठकीच्या आणि जेवणाच्या जागेमध्ये स्लायडिंग फोल्डिंग दारे, तसंच दुधी काचेचा वापर करून केलेले आकर्षक पार्टिशन किंवा सरळ सजावटीला पूरक असे सुंदर पडदे लावावेत. याचा उपयोग अचानक आलेल्या पाहुण्यांपासून पसारा लपवायला व शांतपणे जेवायला होतो.

बऱ्याच घरांमध्ये मुख्य दरवाजाच्या समोरच जेवणाचे टेबल ठेवले जाते. माझ्या मते हे चुकीचे आहे. याचे मुख्य कारण परत हेच की कुरिअरवाल्यामुळे, पोस्टमनमुळे, भाजीवाल्यामुळे थोडे जरी दार उघडले तरी या जागेसाठीची जी शांतता, खासगीपणा अपेक्षित आहे तो कमी होतो.

जेवणाच्या टेबलाभोवती पसारा व बाकीच्या फर्निचरची अनावश्यक गर्दी टाळावी. एखादेच सुंदर डिझाइन केलेले क्रोकरीचे कपाट या जागेत उठून तर दिसतेच, पण उपयोगीही पडते. ही जागा जरा मोकळीढाकळी, शांत असणे जरुरी आहे. लाल केशरी रंगाच्या छटांनी ही जागा सजवल्यास भूक वाढायला मदत होते. निसर्गाचा हिरवा रंगपण या जागेत खुलून दिसतो. ही रंगसंगती टेबल मॅट्स, टेबल क्लॉथ, शोभेच्या मेणबत्त्या, खुर्चीच्या कापडामधून साधू शकतो. सध्या इंटिरिअर डिझायनर जेवणाच्या टेबलावरील दिव्यांचा फोकल पॉइंट म्हणून वापर करतात. या दिव्यांमुळे सजावट सुंदर तर दिसतेच, पण टेबलावर पडलेल्या याच्या प्रकाशाच्या झोतात खाली मांडलेल्या पदार्थाना व भांडय़ांना वेगळीच झळाळी प्राप्त होते.

लिव्हिंग कम डायनिंग जिथे आहे तिथे बैठकीचीच सजावट जेवणाच्या जागेतही नेली तर जास्त चांगले दिसते. दोन्ही जागा एकसंध दिसतात. यामध्ये सोफा, कव्हर्स, खुच्र्याचे कापड, पडदे हे एकमेकांना पूरक असतील याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. बरेच वेळेला दुकानात टेबल खुच्र्याचा जो सेट आहे तो तसाच घेतला जातो. खरे तर जेवणाच्या जागेची सजावट खूपशी टेबलापेक्षा खुच्र्याच्या दिसण्यावर अवलंबून असते. टेबलाचा फक्त वरचा सपाट भागच दिसण्यात येतो, जो बरेच वेळा काचेचा किंवा लाकडाचा असतो. खाली कितीही हिरेजडित पाय लावले तरी खुच्र्यामुळे ते झाकलेच जातात.  खुर्चीच्या उंच पाठीवर  व बसण्याच्या जागेवर वापरलेले कापड, लेदरनेच सजावटीत खरा जिवंतपणा येतो. तेव्हा टेबलावर जास्त खर्च न करता खुच्र्यासाठी आपल्या पसंतीची कापडे आणून त्या बनवून  घेतल्या तर निश्चितच सजावटीला वेगळेपणा येईल. टेबलाच्या बाजूची सगळी आसने खुच्र्याच्या रूपात न ठेवता भिंतीलगत एखादा लाकडी बेंच टाकून किंवा सोफ्यासारखा आकार देऊन सजावट चित्तवर्धक बनवता येईल.

कधी कधी एकत्र असूनही ‘रंग माझा वेगळा’ असे भासवण्यासाठी जेवणाचे टेबल व खुच्र्याची पातळी बैठकीच्या जागेपेक्षा थोडय़ा उंचीवर ठेवली जाते. फक्त अशा ठिकाणी खुर्चीच्या मागे जागा भरपूर आहे की नाही हे बघणे गरजेचे आहे. नाहीतर खुर्ची टोकाला येऊन पडण्याचा संभाव असतो. जर का अपुऱ्या जागेमुळे किंवा काही इतर कारणाने प्लॅटफॉर्म करायचा नसेल तरी वेगळ्या डिझाइन व रंगाच्या टाइल्सनी ती जागा वेगळी दाखवू शकतो.

जेवणाची जागा अर्थातच स्वयंपाकघराच्या जवळ पाहिजे. जेणेकरून तयार झालेले पदार्थ टेबलावर न्यायला सोयीस्कर होईल. स्वयंपाकघरात जागा असेल तर दोघांसाठी ब्रेकफास्ट टेबलची सोय असणे केव्हाही चांगले.

जेवणाच्या टेबलाचा आकार तुमच्या कुटुंबातील मंडळींवर तर अवलंबून असतोच, पण तुमच्या जीवन पद्धतीवरही असतो. तुमच्याकडे पाहुण्यांचे बरेच येणेजाणे, मित्रांना किंवा ऑफिसमधील लोकांना बोलवून पाटर्य़ा देण्याचे प्रमाण जास्त असेल तर अगदी छोटे टेबल घेऊन उपयोगी नाही. बसण्यासाठी नाही तरी पदार्थ ठेवण्यासाठी लांबी-रुंदी व्यवस्थित असणे गरजेचे आहे. जागा नसेल तर फोल्डिंग टेबलचाही पर्याय विचारात घेऊ  शकतो. छोटय़ा जागेसाठी व कमी लोकांसाठी (तीन ते चार) गोलाकार टेबल उत्तम. यामुळे आजूबाजूची जागा प्रशस्त वाटायला मदत होते. त्याच बरोबर छोटय़ा जागेत हात नसलेल्या खुच्र्या ठेवाव्यात, त्यामुळे हालचाल करणे सोप्पे जाते. पण हेच जास्त लोकांसाठी (सहापेक्षा जास्त) आयताकृती टेबल केव्हाही चांगले. कारण गोलाचा व्यास जास्त झाल्यामुळे समोरच्या माणसाशी संवाद साधणे कठीण जाते. त्याचबरोबर टेबलाच्या मधली जागा वाया जाते व काही ठेवल्यास तो पदार्थ घ्यायला खूप वाकावे लागते. यावर उपाय म्हणजे टेबलावर अजून एक फिरती चकती ठेऊन त्यावर भांडी ठेवणे.

टीव्हीवर फूड चॅनल्सवर बरेच वेळा नदीकाठी किंवा झाडाखाली चविष्ट पदार्थ शिजवून तिथेच टेबल टाकून त्यावर ताव मारताना दाखवतात. काय सुंदर दृश्य दिसते ते. आजूबाजूला झरे, हिरवळ आणि समोर आपली आवडती डिश.  माणसाला मुळातच निसर्गाच्या सान्निध्यात दोन घास जरा जास्तच जातात. झाडांचा हिरवेपणा, वाऱ्याची झुळूक मनाला कशी प्रसन्नता आणते. उगाचंच नाही एसीचा कृत्रिम थंडावा सोडून रूफटॉप रेस्टॉरंटसाठी लोकं गर्दी करतात. आपल्या घरातसुद्धा हा बाहेरचा निसर्ग आत आणता आला तर उत्तम. त्यासाठी आपल्याला अवलंबून राहावे लागते आपल्या लिव्हिंग कम डायनिंगला असलेल्या एकमेव खिडकीवर. जेवणाची जागा गच्चीच्या बाजूला किंवा घराभोवती केलेल्या बागेत उघडणाऱ्या नशीबवान लोकांपैकी तुम्ही असाल तर प्रश्नच नाही. पण नाहीतर या आपल्या एकुलत्या एका खिडकीजवळ जेवणाचे टेबल ठेवणे केव्हाही चांगले. दिवसाची सुरुवात या जागी बसून हातातल्या वाफाळत्या चहाने झाल्यावर उरलेला दिवस वाईट जाईलच कसा?

तर अशी ही जेवणाची जागा. पूर्वीसारखी खासगी न राहता तिचा उपयोग मुलांच्या अभ्यासापासून मित्रांच्या पार्टीपर्यंत आपल्याला करता येतो. असे म्हटले जाते की कुटुंबाचा आनंद एकत्र  जेवल्यामुळे टिकतो. किती खरे आहे हे. अशा या माणसाला जोडून ठेवणाऱ्या जागेला सजावटीत मानाचे स्थान देण्याची जबाबदारी आता आपली आहे.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com