रंग, पोत, प्रमाणबद्धता, समतोल हे घटक घराच्या सजावटीत महत्त्वाचे आहेतच, पण या सगळ्यापेक्षा आणि या सगळ्यावर आणि आपल्या शरीर-मनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे घरातला प्रकाश. त्याच्याबाबतीत नो तडजोड!

बरेच दिवस आमच्या एका नातेवाईकांच्या घरी जायचे जायचे म्हणून ठरवत होते, तो योग शेवटी मागच्या आठवडय़ात आला. नवीन कॉम्प्लेक्स, नवीन घर.. मलासुद्धा खूप उत्सुकता होती तिथे जायची. एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या तोडीची खालची लॉबी होती. पण जसे घरात पाऊल ठेवले, माझ्या कपाळावरची आठी लपवायला मला जड गेले. सर्व घरात एक प्रकारचा अंधारलेपणा पसरला होता. इतके पसे खर्च करून घेतलेल्या त्या घराच्या एकाही खोलीत पुरेसा प्रकाश नव्हता. सगळा प्रकाश दाटीवाटीने उभारलेल्या आजूबाजूच्या इमारतींनी अडला गेला होता. भरपूर उजेडाचा अभाव असल्याने वातावरणात एक प्रकारची उदासी, मरगळ आली होती. कॉलेजमध्ये शिकलेला वास्तुकला व गृहसजावटीमधील हा महत्त्वाचा घटक पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला होता.

उत्क्रांतीपासूनच माणूस निसर्गावर शारीरिक आणि मानसिकरीत्या अवलंबून आहे. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सूर्य. सूर्याच्या प्रकाशामध्ये फक्त आपल्याला समोरची गोष्ट दिसते एवढेच नाही तर त्याच्यापासून मिळालेल्या ऊर्जेने माणसाची सर्वागीण वाढही होते. याच कारणासाठी म्हणून काही निसर्गावर आधारित आवश्यक तत्त्वे माणसांनी पुढे घर बांधणीमध्येसुद्धा तंतोतंत पाळली. ऊन, वारा व पाऊस यापासून स्वत:चे संरक्षण करण्याबरोबरच भरपूर प्रकाश व वायुविजनाची (ventilation) सोय असणे हा वास्तुकलेचा पाया झाला. या मूळ गोष्टी सांभाळल्या गेल्या की घर सुंदर दिसण्याची निम्मी लढाई आपण तिथेच जिंकतो. त्यानंतर येतो रंग, पोत, प्रमाणबद्धता, समतोल वगरेंचा क्रमांक. प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ चार्ल्स कोरिया, बी व्ही दोषी यांनी बांधलेल्या इमारतींमधील प्रकाश व सावलीचा कल्पकतेने केलेला वापर बघितला की इतके मंत्रमुग्ध व्हायला होते की प्रश्न पडतो याला अजून सजावटीची गरजच काय? सूर्याच्या भ्रमणमार्गावर आधारित बनवलेल्या िभतींपासून छतापर्यंतच्या खिडक्या सूर्याचा दाहकपणा जाणवून न देता फक्त प्रकाशाला वाट करून देतात. कधी हा प्रकाश घराच्या मधोमध तयार केलेल्या चौकातून येतो तर कधी िभतीवरील खिडक्यांतून. कधी छतावरील उत्तरेला उघडणाऱ्या खिडक्यातून तर कधी उष्णतेला बाहेर ठेवणाऱ्या राजस्थानमधील जाळी व झरोक्यातून.

पुणे-मुंबईसारख्या फ्लॅट संस्कृतीमध्ये घरामध्ये प्रकाश आणायला आपल्याला खिडक्यांवरच अवलंबून राहावे लागते. बांधकाम करताना िभतीच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के खिडक्या पाहिजेत व दोन इमारतींमध्ये किती अंतर पाहिजे, जेणेकरून भरपूर प्रकाश येईल यासाठी काही नियम आहेत. आता ते आपल्याकडे किती पाळले जातात तो प्रश्नच आहे. पण काही आमिषांना भुलून नजरेआड केलेल्या या गोष्टी भविष्यात महाग पडू शकतात. वर सांगितल्या प्रमाणे आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपल्या घरात किती प्रकाश येतो यावर खूप अवलंबून असते. याचा अनुभव मला माझ्या इंग्लंडमधील वास्तव्यात आला. तिथे हिवाळ्यात दुपारी दोन वाजताच अंधार होतो. अशा वेळी सूर्यप्रकाशाअभावी नराश्याने व इतर मानसिक व्याधींनी त्रस्त झालेल्या माणसांची संख्या वाढीस लागते. सरकारकडूनच दूरचित्रवाणीवरील बीबीसी व इतर चॅनेल्सवर दिवसभर विनोदी मालिका दाखवण्याचे आदेश दिले जातात, जेणेकरून लोकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. देवाच्या कृपेने आपल्याकडे पावसाळ्याचे काही दिवस सोडता वर्षभर चांगले सूर्यदर्शन घडते. त्याचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.

एकदा एका फोर बेडरूम किचनच्या सजावटीचे काम माझ्याकडे आले. मुंबईच्या मानाने एकदम प्रशस्त-मोकळा ढाकळा फ्लॅट. स्वस्तातली डिझायनर मिळाली म्हणून घर मालक खूश तर मोठ्ठे काम करायला मिळाले म्हणून मी खूश. एवढय़ा प्रशस्त घरात फक्त तीनच माणसे. म्हणजे गरजापण तशा कमीच. मोठय़ा उत्साहाने सजावटीचे दोन-तीन पर्याय घेऊन त्यांच्याकडे गेले. बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या. पण प्रत्येक वेळी त्यांचा मुख्य भर सामान ठेवायच्या कपाटावर असायचा. प्रत्येक खोलीत पुरेशी कपाटे देऊनसुद्धा कुठे खिडकीची उंची खालून कमी करून भारतीय बठक व त्याखाली सामान ठेवायला जागा कर, नाहीतर बाल्कनीची जागा आत घेऊन दोन्ही बाजूंना बांधकाम करून शोभेच्या वस्तूंसाठी फळ्या टाक, असे चालले होते. घरातील प्रकाश अडवण्यासाठी त्यांच्याकडे १०१ पर्याय उपलब्ध होते. मला मान्य आहे की ८० टक्के मुंबईकरांना तुटपुंज्या जागेत संसार करावा लागतो. अगदी साधे गरजेचे सामान ठेवायलापण जागा नसते. पण उरलेल्या २० टक्के लोकांची मानसिकतापण काही वेगळी नसते. दिसली जागा की कर स्टोरेज. सामान साठवून ठेवायच्या हव्यासापायी मी अशी कितीतरी घरे बघितली आहेत की जिथे नसíगकरीत्या मिळणारा प्रकाश, वारा अडवला जातो. याचा परिणाम आत्ता लगेच जाणवणार नाही, पण कालांतराने जाणवल्याशिवाय राहणार नाही. पुरेशा प्रकाशाअभावी नराश्य, चिडचिडेपणा, एकाकीपणा वाढीस लागतो. मुख्य करून वृद्धांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी त्यांच्या खोलीत पुरेसा प्रकाश आहे ना याची खबरदारी घ्यावी. कुठल्याही भौतिक गोष्टींपेक्षा या नसíगक गोष्टींचा वापर जास्त फायदेशीर ठरतो.

वरील सर्व गोष्टी शक्य आहेत जोपर्यंत सूर्य आकाशात आहे. पण रात्रीचे काय? माणसाने आगीचा शोध लागेपर्यंत कित्येक रात्री अंधारात घालवल्या. अन्न शिजवण्याच्या गुणधर्माबरोबरच रात्रीचा काळोख नाहीसा  करण्याच्या त्याच्या गुणामुळे शब्दश: माणसाच्या जीवनातील अंधार नष्ट झाला. मशाल, चिमणी, कंदील वगरे प्रकाशाची साधने अगदी मागच्या शतकापर्यंत वापरात होती. पण विजेचा शोध लागला आणि माणसाचे आयुष्यच पूर्ण बदलून गेले. सूर्यास्तानंतर कामावर येणारी मर्यादा नाहीशी झाली. सूर्यप्रकाशाइतकाच उजेड रात्रभर मिळाल्याने कामाचे तास वाढले व उत्पादकता वाढीस लागली. नसíगक प्रकाशावर आपले नियंत्रण नसते. त्याचा काळ, प्रकाशाचा रंग, तीव्रता या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत. पण कृत्रिम प्रकाशामुळे वरील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले व माणसाच्या आयुष्यात खरोखरच क्रांती घडली.

कृत्रिम प्रकाश ढोबळपणे तीन भागांत विभागला जातो. १) सर्वसाधारण प्रकाश २) विविक्षित प्रकाश (task light) नाटय़मय प्रकाश. सर्वसाधारण प्रकाश हा संपूर्ण जागेला उजळवून टाकायचे काम करतो. खोलीतील कोपरान्कोपरा दिसण्यासाठी, कुठल्याही फíनचरला न अडखळता चालण्यासाठी, अंधारलेपणा घालवण्यासाठी ही प्रकाशयोजना असणे एकदम आवश्यक. विविक्षित प्रकाश हे एखाद्या नेमक्या, विशिष्ट कामासाठी योजलेल्या प्रकाशाचे नाव आहे. जसे वाचनासाठी लागणारा टेबल लॅम्प, म्युझियममध्ये एखाद्या प्राचीन वस्तूवर टाकलेला प्रकाशाचा झोत, सिनेमागृहात पायऱ्या दिसण्यासाठी पायालगतचे दिवे किंवा अन्न शिजले आहे की नाही हे दिसण्यासाठी शेगडीवरती केलेली प्रकाशाची सोय. या सगळ्या गोष्टी या विभागात येतात. हे दिवे फक्त एकाच गोष्टीवर प्रकाश टाकतात त्यामुळे ती जागा सोडून आजूबाजूची जागा अंधारलेलीच राहते. त्यामुळे खोलीतील दुसऱ्या व्यक्तीला प्रकाशाचा त्रास होत नाही. तिसऱ्या प्रकारच्या प्रकाशाची योजना आपल्याला मुख्यकरून पंचतारांकित हॉटेल्स, पब, नाइट क्लबमध्ये बघायला मिळते. दिव्यांच्या अफलातून सजावटीमधून पूर्ण माहोलच नाटय़मय दिसतो. या प्रकाशरचनेवर एकच जबाबदारी असते, ती म्हणजे सुंदर दिसण्याची. मग तुम्हाला त्याच्या प्रकाशात हॉटेलमधील मेन्युकार्ड वाचता आले नाही तरी चालेल! वेगवेगळ्या आकारातून, रंगातून ही रचना करता येते. दिवसा उजेडी अगदीच सामान्य वाटणारे एखादे छत किंवा िभत रात्री केलेल्या कल्पक दिव्यांच्या सजावटीने श्वास रोखायला लावते. घरामध्येसुद्धा याचा कल्पकतेने केलेला वापर वातावरणात चतन्य आणतो. अशा रीतीने या तीन प्रकारांचा अभ्यासपूर्ण वापर सजावटीतील दोष नाहीसे करून सजावट व्यावहारिक व आकर्षक बनवते.

प्रकाश व काही प्रमाणात रंग सोडल्यास सजावटीतील कुठल्याच घटकांचा आपल्या शरीर -मनावर थेट परिणाम होत नाही. बाकीचे घटक कमी-जास्त झाले तर जास्तीत जास्त काय होईल की सजावट चांगली दिसणार नाही. पण प्रकाश फक्त खोलीचा कोपराच नाही तर आपले जीवनही प्रकाशमय करतो. तेव्हा त्याच्याशी नो तडजोड!

समाप्त

response.lokprabha@expressindia.com