वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

एकेकाळी दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या त्रिमूर्तीचा जसा बोलबाला होता, तसा ९० च्या दशकात शाहरूख खान, आमिर खान आणि सलमान खानचा होता. बॉलीवूडच्या या ‘खाना’वळीच्या काळातच खरंतर इरफान खानचीही कारकीर्द सुरू झाली. पण सुपर हिरो ठरण्यासाठी ना त्याच्याकडे होतं चिकणचुपडं रूप, ना हा एकाच वेळी दहा-बारा गुंडांना लोळवेल असा प्रेक्षकांना विश्वास वाटावा असा आविर्भाव, ना आपला सिनेमा १०० कोटींचा व्यवसाय करेल असे दावे करण्याचा स्वभाव.. आणि तरीही इरफान खानच्या जाण्याने आपलं कुणीतरी गेलं आहे, ही सार्वत्रिक भावना आहे. आपण काहीतरी गमावलं आहे ही हळहळ आहे. आणि हीच त्याची कमाईही आहे.

सगळ्याच पातळीवरच्या लोकांना तो आपला माणूस वाटावा असं खरं तर काय होतं त्याच्याकडे? त्याच्याकडे प्रेक्षकांना विश्वास ठेवायला लावणारी अभिनयाची जादू होती. तो जी भूमिका करत असेल, समजा ‘लंच बॉक्स’मधली साजन फर्नाडिसची भूमिका आहे, तर तिथे प्रेक्षकांना तो चुकूनही इरफान वाटत नाही, तर साजन फर्नाडिसच वाटतो. ‘लाइफ इन मेट्रो’मध्ये तो लग्नाळू माँटीच वाटतो. ‘पानसिंग तोमर’मध्ये तो  पानसिंगच वाटतो. ‘करीब करीब सिंगल’मध्ये तो काहीही कामधंदा न करता फूड क्रिटिक आणि कवी आहे, आणि त्याचा एक नाही तर तीन वेळा ब्रेकअप झाला आहे यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवता.

‘तो इतका कसलेला अभिनेता होता की तो त्याला दिलेल्या भूमिकेत शिरायचा, ती व्यक्तिरेखा जिवंत करायचा,’ अशी सगळी वाक्यं समीक्षकांसाठी ठीक असतात. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी मात्र पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी विश्वसनीय वाटणं आवश्यक असतं. शाहरूख-सलमानसारखी मंडळी ते आपल्या मार्केटिंगवर, डोलेशोले यावर करत असतील, पण इरफान करायचा ते त्याच्या जगण्याबद्दल, अभिनयाबद्दल असलेल्या आकलनाच्या बळावर. मोठेमोठे डोळे, काहीसा अस्ताव्यस्तपणा, काहीसा अघळपघळपणा असलेला त्याचा लुक आणि कॅमेऱ्यासमोरचा सहज वावर बघितला की प्रेक्षकांना हिरो चिकणाचुपडा असतो, याचा तर विसर पडायचाच, पण आपल्यासारखा दिसणारा माणूसदेखील हिरो होऊ शकतो असं वाटायचं. त्यांना हा विश्वास इरफानने दिला होता. ‘मकबूल’मध्ये तो जेवढय़ा ताकदीने पंकज कपूर यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर उभा राहून तोडीस तोड अभिनय करतो, तेवढय़ाच सहजपणे ‘कारवाँ’सारख्या सिनेमात सलमान डुलकर आणि मिथिला पालकरसारख्या नवोदितांसमोर वावरतो. त्याच्यासमोर तब्बू असो की करिना कपूर, इरफान हा इरफानच राहतो. कॅमेऱ्यासमोरची त्याच्या वागण्याबोलण्यातली सहजता अभिनय करणं किती सोप्पं असतं, असं वाटायला लावणारी असते. अर्थात ही सगळी त्याने घेतलेली पोझ नाही, तर प्रत्यक्षातला इरफानही असाच आहे, याचा प्रत्यय येतो तो मृत्यूची चाहूल लागल्यावर त्याने प्रेक्षकांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रातून. ‘वेळेची किंमत आता खरी कळली आहे. अजून किती काय काय करायचं होतं, पण टीसी येऊन मला सांगतोय की बाबा, चल उतर, तुझं स्टेशन आलं’, असं त्या पत्रातून सांगणारा इरफान आता अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. बॉलीवूडच्या बेगडी जगात वावरूनही आपल्यामधली संवेदनशीलता त्याने कशी टिकवून ठेवली होती, याबद्दलचे आपल्याला आलेले अनेक अनुभव त्याचे चाहते सध्या समाजमाध्यमांमधून मांडत आहेत. अशा या मंत्रावेगळ्या कलाकाराला आदरांजली.