News Flash

शब्दार्त : अतर्क्य लीला..

वस्तूचं बाह्य़रूप पालटणं, माणसाचं लिंगरूप पालटणं, अदृश्य होणं; आदी गोष्टी त्यांच्या चरित्रात आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

स्वामी समर्थ हे अतर्क्य आहेत.. अवधूत आहेत! अतर्क्य म्हणजे ते जे काही करू शकतात किंवा करतात त्याचा उलगडा तर्काच्या पातळीवर अचूकतेनं घेता येत नाही. स्वामींच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत. वस्तूचं बाह्य़रूप पालटणं, माणसाचं लिंगरूप पालटणं, अदृश्य होणं; आदी गोष्टी त्यांच्या चरित्रात आहेत. इतरही अनेक संत-सत्पुरुषांच्या जीवनात अशा गोष्टी घडल्या आहेत. बसप्पा नावाच्या एका गरीब भाविकाची कथा समर्थभक्तांना परिचितच आहे. मंगळवेढय़ाच्या जंगलात समर्थ राहात होते तेव्हा हा बसप्पा त्यांना पाहात असे. या जंगलात निर्भयपणे मुक्त वावर करत असलेल्या समर्थावर त्याचं मन हळूहळू असं जडलं, की दिवसभर तो त्यांच्याच सान्निध्यात राहू लागला. आधीच घरी दारिद्रय़ नांदत असताना नवरा एका फकिराच्या नादी लागल्यानं बसप्पाची पत्नी मनस्वी संतापत असे; पण एक नवा बदल मात्र झाला होता. याआधी तिनं विरोधी सूर काढताच नवराही वरचा सूर लावी आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होई. आता मात्र नवरा तिचं रागातलं बोलणं शांतपणे ऐकून घेत असे. असे बरेच दिवस लोटले. एकदा समर्थ अचानक उठले आणि वेगानं चालू लागले. बसप्पा त्यांच्या मागोमाग धावल्यागत चालत होता. समर्थ अचानक ‘कांटवण’ या निबिड जंगलात शिरले. बसप्पाही पाठी होताच, पण अचानक तो थबकला. अवतीभवती सर्वत्र पिवळेधम्मक सापच साप दिसू लागले. भीतीनं तो थिजून गेला असता समर्थानीच त्याला शुद्धीवर आणलं आणि घरी परतून संसार नीट करण्याची आज्ञा केली. बसप्पा कसाबसा राजी होताच समर्थ म्हणाले, ‘‘हे बघ, घरी जाताना यातले हवे तेवढे साप बरोबर ने!’’ हे ऐकताच बसप्पा अधिकच गांगरला. अखेर समर्थानीच एक मोठा साप उचलून एका वस्त्रात बांधला आणि ते गाठोडं बसप्पाच्या हाती दिलं. भयकंपित बसप्पा तिथून जो निघाला तो थेट घरी आला. भुकेनं व्याकूळ आणि तापानं फणफणलेली त्याची पत्नी अंथरुणाला खिळली होती. पतीला पाहून तिच्या मनाला उभारी आली. तोच तिचं लक्ष गाठोडय़ाकडे गेलं. त्यात काय आहे, असं तिनं दोन-तीनदा विचारलं, तरी नवरा बोलेना. अचानक त्या गाठोडय़ात हालचाल दिसताच तिनं ते खेचून घेतलं. उघडून पाहते तर त्यात जर्द सोन्याची लगड होती! ती पाहताच दोघं विस्मयचकित झाली. मग बसप्पानं जे घडलं ते सगळं सांगितल्यावर तीदेखील पतीसह समर्थाना शरण आली; पण याचा अर्थ समर्थानी कायमच असा ‘सुवर्णयोग’ सर्वाच्या जीवनात घडवून आणला, असं नाही!

आपलं दारिद्रय़ दूर व्हावं, अशी प्रार्थना करायला एक गरीब ब्राह्मण बायकोच्या आग्रहावरून समर्थाकडे अक्कलकोटला आला होता. तेव्हा समर्थ स्मशानात हाडांची रास मांडून बसले होते. त्याची विनवणी ऐकून, हवी तेवढी हाडं न्यायला समर्थानी सांगितलं. मनातून चरफडत त्यानं कसंबसं एक हाड झोळीत टाकलं. घरी जाऊन पाहतो, तर ते सोन्याचं झालेलं! तो धावतच समर्थाकडे परत आला आणि आणखी हाडं मागू लागला! समर्थ कडाडले, ‘‘तुझ्या शरीरात काय कमी हाडं आहेत? ती झिजव आणि सोन्यासारखं जीवन जग!’’ आपण मिडास राजाची कथा ऐकतो ना? हात लावीन त्याचं सोनं व्हावं, असा वर त्यानं मागितला होता; पण लालसेतून मागितलेल्या त्या वरानंच त्याचं जगणं कठीण झालं. आवडती माणसं, आवडत्या वस्तू, आवडते खाद्यपदार्थ सगळं सोन्याचं होऊ लागलं! सोनं महाग खरं, पण जिवंतपणा, चतन्यशील अस्तित्व, स्पर्शातून मिळत असलेला धीर आणि प्रेम यापुढे सोनं फिकंच पडतं! या गोष्टींचं मोल कोणत्याही परिमाणानं मोजता न येणारं असतं, हा धडा मिडासनं जगाला शिकवला! मिडास हा भोगी होता, तर स्वामी समर्थ योगी होते. मिडासची लालसा स्वत:साठी होती, समर्थाची कृती ही दुसऱ्यासाठी होती, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मुख्य म्हणजे समर्थाच्या कृतीमागचा हेतू आध्यात्मिक दारिद्रय़ दूर करणं, हा होता.

नामदेवांच्या चरित्रातही अशीच एक घटना आहे. पंढरपुरात परिसा भागवत नावाचा रुक्मिणीचा एक भक्त होता. त्याची भक्ती एके दिवशी खरंच ‘फळली’ आणि रुक्मिणीनं प्रसन्न होऊन त्याला एक परीस दिला. त्या परिसानं त्याच्या जगण्यात जणू क्रांतीच झाली. त्या परिसानं रोज थोडय़ा लोखंडाचं सोनं करावं आणि ते विकावं, या पद्धतीनं त्याची भरभराट होऊ लागली. त्याची पत्नी कमळजा आणि नामदेवांची पत्नी राजाई मत्रिणी होत्या. तेव्हा त्या परिसाची कथा काही राजाईपासून लपली नाही. अखेर राजाईवरच्या प्रेमापोटी कमळजानं एका दिवसापुरता तो परीस तिला दिला. राजाईनंही घरी येऊन थोडं सोनं करून पाहिलं आणि ते विकून घरी पंचपक्वान्नांचा बेत केला. नामदेव महाराज घरी आले. तो अनपेक्षित थाटमाट पाहून त्यांनी विचारलं तेव्हा राजाईनं मोठय़ा कौतुकानं तो परीस त्यांना दाखवला आणि परिसा भागवतांकडे तो कसा आला, हेही सांगितलं. नामदेवांनी तो परीस हाती घेत चंद्रभागेकडे धाव घेतली आणि नदीच्या प्रवाहात तो फेकून दिला! हा प्रकार कळताच संतापलेले परिसा नामदेवांच्या घरी आले. बरीच माणसंही जमली. परिसा रागानं म्हणाले, ‘‘नामदेवानं माझा परीस चोरलाय आणि वर तो खोटंच सांगतोय, की तो त्यानं चंद्रभागेत फेकला आहे.’’ नामदेव त्यांची समजूत काढू लागले, ‘‘की या मोहात कशाला अडकेन?’’ पण उपयोग होईना. अखेर नामदेव त्यांना घेऊन चंद्रभागेच्या तीरी आले. म्हणाले, तुम्ही चंद्रभागेत उडी मारा आणि तुमचा परीस काढून घ्या! यावर परिसा आणखीनच संतापले. काल फेकलेला परीस वाहत्या नदीत आज मिळणं शक्य तरी आहे का, असंही त्यांनी रागानं विचारलं. नामदेवांनी तात्काळ चंद्रभागेत उडी घेतली आणि हातात चार-पाच दगड घेऊन ते काठावर आले. म्हणाले, यातला तुमचा परीस कोणता तो पाहा. परिसा भागवतांनी एक दगड घेतला आणि लोखंडाला लावला, तो त्याचं सोनं झालं. त्यांनी आश्चर्यानं दुसरा दगड घेतला, त्यानंही लोखंडाचं सोनं झालं. सर्वच दगडांनी तेच साधलं. एका परिसानं लोखंडाचं सोनं होईलही, पण ज्यांच्या नुसत्या हस्तस्पर्शानं दगडाचा परीस होऊ शकतो ते माझ्या जीवनाचंही सोनं का करणार नाहीत, हा भाव परिसा भागवतांच्या मनात दाटून आला. त्यांनी नामदेवांचे पाय धरले आणि ते सर्वच दगड चंद्रभागेत टाकून दिले! तर खरं रूपांतर बाह्य़ वस्तूत नाही, आंतरिक वृत्तीत आहे!

एकदा देहविक्रय करून जगत असलेली एक अत्यंत लावण्यवती स्त्री समर्थाच्या दर्शनाला आली. मनात हेतू मात्र विपरीत होता. आपल्या सौंदर्यानं समर्थाचं वैराग्य भंग करता येईल, असा महाभ्रम होता. तो हेतू मनात ठेवून जेव्हा तिनं नमस्कार केला, तेव्हा समर्थ गडगडाटी हसले. म्हणाले, ‘‘माई, माझ्यासमोर स्त्री-पुरुष भेद नाही!’’ ते असं म्हणताहेत तोच आपल्यातली स्त्रीत्वाची लक्षणं ओसरत असल्याचा भास तिला झाला. भेदरून समर्थाची वारंवार क्षमायाचना करत तिनं तेथून पोबारा केला. थोडक्यात, ज्या गोष्टी भगवत्कृपेने मिळाल्या आहेत त्यांचा गर्व झाला, तर ज्यानं त्या दिल्या त्याला किंवा जो त्याच्याशी अखंड एकरूप आहे त्याला त्या नष्ट करणं का कठीण आहे?

या ज्या अतर्क्य गोष्टी आहेत त्यांच्यामागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न पंडित श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांनी केला आहे. त्यांनी लिहिलेल्या स्वामी समर्थाच्या चरित्रात हा सर्व ऊहापोह मुळातच वाचावा, असा आहे. त्यात किंजवडेकर शास्त्री म्हणतात की, ‘ज्या परात्पर शक्तीने या विश्वब्रह्मांडातील सर्व घडामोडी चालतात, त्या मूळ शक्तीशी समरसून गेलेल्या योग्याला कोणत्याही चराचर पदार्थाचं रूपांतर करणं अशक्य नसतं. सृष्टी ही दोन प्रकारची आहे. स्थूल आणि सूक्ष्म. त्यात सूक्ष्म म्हणजे आपणांस न दिसणाऱ्या गोष्टीत असते. म्हणजेच कार्य दिसले तरी कारण दिसत नाही. कोणताही पदार्थ आपण पाहतो त्या वेळी त्या पदार्थाचं स्थूल रूप तेवढंच आपण पाहू शकतो. त्याचं परमाणुस्वरूप आपल्याला दिसत नाही. निसर्गामध्ये ज्या तत्त्वावर पदार्थाचं रूपांतर चाललेलं असतं, त्याच तत्त्वावर योगीही पदार्थामध्ये इष्ट ते रूपांतर घडवून आणू शकतो.. निसर्गामध्ये मूलद्रव्याहून वेगळी द्रव्यं असणारा कोणताही पदार्थ आढळत नाही. अर्थात, सर्वथव नवीन असा पदार्थ या जगात निर्माण करणं, ही गोष्ट माणसाच्या हाती नाही. गोष्टीचे मूळ वस्तुधर्म कधीही बदलत नाहीत. फार तर त्यांचे रूपांतर होऊ शकतं. ज्या वेळी एखाद्या पदार्थामध्ये रूपांतर घडून येतं त्या वेळी त्या पदार्थामध्ये घटकीभूत असलेल्या परमाणूंचं प्रसरण किंवा संकोच होणं अवश्य असतं.. निसर्गात चाललेलं रूपांतर हे चतन्य परमाणूंवर होणाऱ्या शक्तिपरिमाणाने घडून येतं, तर भौतिक विज्ञानाने घडून येणारं रूपांतर हे जड परमाणूंपर्यंतच सीमित असतं. याउलट योग्याची शक्ती असते. तो मूळ कारणाशी तादात्म्य पावत असल्याने त्या मूळ शक्तीचा उपयोग संयमद्वारे हवा त्या ठिकाणी त्याला करता येतो. त्याला भौतिक साधनांची मुळीच गरज नसल्याने त्याची रूपांतरक्रिया सर्वथव स्वतंत्र आणि निसर्गाप्रमाणेच स्वायत्त असते.’ (पृष्ठ १९९ ते २०१).

‘आत्मप्रभा’ या ग्रंथात श्रीगजानन महाराज गुप्ते यांनीही या अतर्क्य भासत असलेल्या आणि म्हणूनच ‘चमत्कार’ ठरत असलेल्या गोष्टींबाबत भाष्य केलं आहे. त्याचं सार असं की, ‘या गोष्टी आत्मिक बलाने होऊ शकतात. देहाच्या बलापेक्षा मनाचं बल अधिक असतं, इच्छाशक्तीचं त्याहून अधिक असतं. मग या सर्व शक्तींना आधारभूत असलेलं जे आत्मतत्त्व, त्याच्या बलावर काय होऊ शकणार नाही? सिद्धास अशी शक्ती प्राप्त झाली असतानाही तो तिचा स्वत:साठी उपयोग करत नाही.’ ज्यांच्या आधारे माणसाला आत्मशक्तीची जाण होते, त्या सदैव ब्रrौक्य स्थितीत लीन असलेल्या सत्पुरुषांकडून असे ‘चमत्कार’ घडणं कठीण नाही. जो संकटात सापडला आहे, त्याला या ‘अतर्क्य’ गोष्टी घडविणारी स्वामिकृपाच अपेक्षित असते, हेही खरंच. पण तरीही चमत्कारावर विसंबणं काही हिताचं नव्हे. कायमचा टिकणारा असा जो चमत्कार स्वामी समर्थ घडवितात तोच महत्त्वाचा आहे. तो ‘अतर्क्य’ चमत्कार कोणता, हे या स्तोत्राच्या निरूपणाच्या अखेरीस आपण पाहणार आहोत.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:16 am

Web Title: irresistible leela in a word abn 97
Next Stories
1 कृती पूर्वेकडे
2 भविष्य : दि. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२०
3 जीवाची ‘मुंबई २४ तास’
Just Now!
X