एके काळी लावणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाने वाढत्या शहरीकरणाबरोबर कात टाकली, विषय बददले, सादरीकरण बदललं. त्याबरोबरच मराठीमध्येही आयटम डान्सचा तडका स्थिरावू लागला आहे.

मराठी चित्रपट ‘सोनेरी संगीत खजिन्या’मध्ये गीतरूपी हिरे-माणिके कमी आहेत का? किती भावछटा, किती प्रकार, किती विविधता काही गणतीच नाही. गीत-संगीत-नृत्याच्या सुरेल माध्यमातून मराठी चित्रपटाचा प्रवास अलौकिक आहे.
गाण्याच्या ‘मुखडय़ा’वरून त्यातील चौफेर गुण स्पष्ट होतात.
इंद्रायणी काठी देवाची आळंदी (गुळाचा गणपती), सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती (भाऊबीज), बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला (सांगत्ये ऐका), आली हांसत पहिली रात (शिकलेली बायको), एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे (जगाच्या पाठीवर), घननिळा लडिवाळा (उमज पडेल तर) अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर (मानिनी), बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला (मोहित्यांची मंजुळा), छबीदार छबी मी तोऱ्यात उभी (पिंजरा).. भावगीतापासून फक्कड लावणीपर्यंत बरेच काही यामध्ये आहे, तरी मराठी चित्रपटाला ‘आयटेम डान्सचा ठेका’ कशाला हवा? त्याचा सूर/बेसूर कसा आहे?
‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ हे मराठी चित्रपटातले सर्वकालीन फक्कडबाज व कडक असे आयटेम साँग्ज आहे. हे पटायलाच हवे. कारण तब्बल ३५ वर्षांनंतरही त्याचा ठेका व ठसका कायम आहे. सुषमा शिरोमणीनिर्मित व दिग्दर्शित ‘फटाकडी’ या मनोरंजनाच्या मसालेदार चित्रपटाला आणखी तिखट चव येण्यासाठी रेखाला हिंदीतून मराठीत आणले व असे काही नाचवले की त्या चित्रपटाच्या यशाचा तो हायपॉइंट ठरला. या लज्जतदार नृत्याला पाहण्यासाठी तेव्हा पब्लिकने पुन्हा पुन्हा चित्रपटगृहाच्या वाऱ्या केल्या. आपल्या नृत्य गाण्याला असे तुडुंब यश लाभल्याची खबर रेखापर्यंत पोहचली व तिने आपल्यावरचं बेभानपणे चित्रित झालेले हे नृत्य स्वत:च पाह्ययचे ठरवले आणि सुषमा शिरोमणीने ‘मॅडम रेखा’ची ही मागणी पूर्ण करण्यासाठी एका प्रीव्ह्य़ू थिएटरमध्ये तेवढय़ा गाण्यापुरती ट्रायल ठेवली.
एखाद्या चटकदार-रंगतदार गाण्याचा प्रवास कधी, कसा, कुठे वळेल काही सांगता येत नाही. सिनेमाच्या रंगीन जगातील गंमत न्यारी.
आजही खेडय़ापाडय़ात सार्वजनिक कार्यक्रमात हे गाणे आवर्जून लाऊड स्पीकरवर हुकमी स्थान मिळवते. आजच्या तांत्रिक प्रगतीच्या काळात एखाद्या नवीन आयटेम डान्सला इंटरनेटवर मिळणाऱ्या अगणित लाईक्सचे केवढे कौतुक होते, त्या आकडय़ाच्या बातम्या होण्यात धन्यता मानली जाते. पण एखाद्या गाण्याला लाऊड स्पीकरवर पुन्हा पुन्हा स्थान मिळणे म्हणजे ते समाजाच्या अगदी मध्यम व खालच्याही स्तरामध्ये पोहचले, असा त्याचा अर्थ होतो..
रेखाचे ‘कुठं कुठं जायचं’ म्हणूनच सर्वकालीन आयटेम डान्स फंडा.. अं..हं.. त्या काळात त्याला पाहुणीचे नृत्य म्हटले जाई. हिंदी व मराठी अशा दोन्ही चित्रपटात ते असे/दिसे. रामन्ना दिग्दर्शित ‘हमजोली’त जीतेंद्र-लीना चंदावरकर अशी जोडी अगदी छानच जमली असतानाही मुमताजचा रंगतदार क्लब डान्स होताच. मराठीत त्या काळात दोन प्रकारे पाहुणी अभिनेत्रीची नृत्ये असत. एक म्हणजे क्लब डान्स व दुसरे म्हणजे, लावणी, मुजरा वगैरे. दोन्हीसाठी बऱ्याचदा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना मराठीत पाचारण केले जाई. आपल्या चित्रपटाला ग्लॅमर हवे, त्यात काही विशेष आकर्षण हवे, त्यानिमित्ताने भरघोस प्रसिद्धी हवी यासाठीच असा फंडा खेळवला अथवा नाचवला जाई. खरं तर सर्व प्रकारच्या नृत्यात मराठी तारका सरस व वाकबगार, पण पाहुण्यांचा मान ठेवावा, तीच आपली परंपरा संस्कृती आहे, अशा भावना व भूमिकेमुळे नेहमीच आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीतला लहान-मोठा कोणीही कलाकार मराठीत आला रे आला (व जेमतेम एखादे मराठी वाक्य वेडेवाकडे पाठांतर करून बोलला) की केवढा आनंद होतो..
पूर्वी मराठीतील क्लब डान्ससाठी हेलनही झक्कास व लयबद्ध नाचली, हे ‘धाकटी बहीण’, ‘शांतता खून झाला आहे’ अशा चित्रपटात दिसते. या कृष्णधवल चित्रपटांना त्यामुळे तर रंग आला. चित्रपट कोणताही असो (मराठी अथवा हिंदी) हेलन आपल्या लवचीक नृत्यात रमते. तिचे नृत्याचे शास्त्र वेगळेच! ‘माफीचा साक्षीदार’मधील बिंदूचा क्लब डान्स थोडा स्फोटक होता. (ती हिंदीत जहाल असली तरी त्या काळातील मराठी चित्रपटासाठीची सेन्सॉरशिप कडक होतीच, पण मराठीला अवाजवी मादकता आवश्यक नव्हती.) दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे लावणी, मुजरा वगैरे नृत्यासाठीही हिंदीतील तारका मराठीत आल्या व त्यांना श्रेयनामावलीत पाहुणी कलाकार असेच मानाचे स्थान मिळाले. सुषमा शिरोमणीने रेखाचा नृत्य तडका हिट ठरल्यावर मौशमी चटर्जी (मोसंबी, नारंगी), रती अग्निहोत्री (गुलछडी) यांनाही मराठीत आणले. रतीवरील नृत्याच्या चित्रीकरणाच्या वेळी सुषमाने शूटिंग कव्हरेजसाठी आवर्जून सेटवर बोलावले. तेव्हा सुषमा रतीचे उगाचच अवाजवी लाड वगैरे करत नाही हे ठळकपणे लक्षात आले. अन्यथा, काही मराठी निर्माते हिंदीतील तारका मराठीत आणताना तिला जरा जास्तच मानधन देतात, ती मराठीत नाचताना हिंदीतील महागडा नृत्यदिग्दर्शक अथवा नृत्यदिग्दर्शिका आणते (मराठीत केवढे तरी गुणवान व अस्सल नृत्यदिग्दर्शक नेहमीच होते.) आपला मेकअपमन, हेअर ड्रेसर, बॉय असाही ‘स्टाफ’ तिच्यासोबत येतो, म्हणजे पाहुणी म्हणून ती मराठी चित्रपटात नाचायला येते व कधी कधी फार महागात पडते. या सिच्युएशनला कोणी अपवादही ठरले असेल, अथवा यावरून उगाचच काही तरी कंडय़ा पिकवल्या जात असतील, गॉसिप खेळवले-रंगवले जात असेल. (हा तर चित्रपटसृष्टीचा स्वभाव झाला.)

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
Nashik, Foreign state Businessman, Mobile parts, Shut Shops, Second Day, Dispute, Local Marathi Businessmen,
नाशिकमध्ये अमराठी व्यावसायिकांकडून मराठी युवकांची कोंडी, दुकाने बंद राहिल्याने भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प

‘वासुदेव बळवंत फडके’तही आयटेम डान्स
या आयटेम डान्सचा प्रभाव किती विलक्षण माहित्येय? ‘वासुदेव बळवंत फडके’ या नावाच्या चित्रपटात अशा नृत्याला काही स्कोप आहे अथवा असावा असे वाटते का? पण त्यातही आदिती भागवतचा फक्कडबाज आयटेम डान्स होता. ती उत्तम नर्तकी आहे. लावणी व पाश्चात्त्य यांच्या मिश्रणाचे उत्तम फ्युजन ती साकारते. देश-विदेशात तिचे सतत नृत्याचे कार्यक्रम रंगतात. तिच्या त्या कलेला मराठी चित्रपटातून संधी मिळण्याऐवजी आयटेम डान्समध्ये सौंदर्य व नृत्य यांची आग पेटवायाची तिला संधी मिळाली.

पूर्वी मराठीत पद्मा खन्नानेही ‘सोयरिक’मध्ये नृत्य साकारले, दादा कोंडके यांनी ‘आंधळा मारतो डोळा’मध्ये अरुणा इराणीला नाचवताना ‘तू छत्तीस नखरेवाली’ हा ठेका झकास पकडला. स्वत: दादा लोककलेतून आल्याने त्यांना नृत्याची लय माहीत होती. म्हणूनच तर ते कायम गीत-संगीत-नृत्यात नेहमीच भारी पडले. अरुणा इराणीने त्या काळात ‘भिंगरी’ (पुन्हा सुषमा शिरोमणीच) इत्यादी चित्रपटातूनही नाचकाम केले. कधी फराह (तब्बूची बहीण) विनय लाडच्या ‘बलिदान’मध्ये दारूच्या गुत्त्यावर नाचली, तर विलास रकटेच्या ‘प्रतिकार’मध्ये शीबाने फक्कडबाज लावणी साकारली. एखादा हिंदीतील निर्माता मराठीत येताना तिकडच्या आपल्या ओळखीपाळखीतून हिंदीत तारका मराठीत आणतो, बऱ्याच जणांना मात्र ही चाल खूप महागात पडते. त्यांना हिंदीतील तारका मराठीत हवी तर असते, (त्यातून स्वत:वर ‘फोकस’ही पाडून घ्यायचा असतो.)
त्यांची ती गरज व्यवस्थित ओळखून काही तारका फार चलाखीने सांगतात, हिंदीत खूप-खूप बिझी आहे हो, पण मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आल्याचे मला समजलेय म्हणून एक नृत्य करायचे म्हणते. पण मी फक्त दोनच दिवस देईन.. तिचा एवढासा होकारदेखील उत्साह वाढवणारा ठरतो. कुठे कशी मात्रा लागू पडेल, काय सांगावे?
पूर्वीची ही पाहुणी नृत्ये बदलत्या काळात आयटेम डान्स म्हणून नव्या लेबलने ओळखली जाऊ लागली, तसा त्यात फ्रेशनेस, कधी कलरफुल, कधी बोल्ड, तर कधी अवाजवी वाह्यतपणाही आला. खरे तर, नृत्य कोणत्याही रंगाचे वा ढंगाचे असा, त्यात कष्ट, क्षमता व सर्जनशीलता यांचे मिश्रण असते. त्यात सुख, आनंद, प्रणय, विरह, दु:ख, आव्हान, क्रोध, मोह, हाव, काम, मत्सर असे सगळय़ाच प्रकारचे भाव व्यक्त होतात. कोणत्याही प्रकारचा अभिनय साकारण्याचे ते उत्तम माध्यम आहे. याला आयटेम डान्सचा तडका अपवाद नाही. पण कधी-कधी नेमके ते भान सुटते, त्याचे हो काय? एखादी नवसंस्कृती वाढताना अथवा फोफावताना काही चांगले घडताना, थोडसे वाईट (की विकृत?) घडणारच, सिनेमाचे जग त्याला अपवाद कसे हो ठरेल? मराठी चित्रपटाच्या पडद्यावरही आयटेम साँग्जचा धटिंग धिंगाणा मस्त रमलाय, याकडे सतत आपले लक्ष जाते, अशी त्याची निर्मितीची प्रक्रिया आहे. त्यांच्या उडत्या चालीची मोहिनी आहे. ‘आयटेम डान्स’ हा शब्दप्रयोग रुजल्यानंतर मराठीच्या पडद्यावर हिंदीप्रमाणेच मराठी अभिनेत्रींनाही ‘नाचो’ संधी मिळाली हे जास्त महत्त्वाचे! वेगळय़ा भाषेत सांगायचे तर, दोनों को बराबर का सही मौका मिळतो आहे. कधी तो झ्याक खुलतो, कधी मात्र अंगविक्षेप असतो. त्याला सेन्सॉरचा आक्षेप असावा.
‘अगं बाई अरेच्चा’मध्ये बारमध्ये सोनाली बेंद्रे ज्या सहजतेने ‘छम छम करता यह नशिला बदन’ नाचली (नृत्य दिग्दर्शिका फराह खानची कृपा असे प्रत्येक वेळी टोचून बोलायला हवे का?) तशीच ‘नटरंग’मध्ये ‘आता वाजले की बारा’ या लावणीवर अमृता खानविलकर बेफाम नाचली. या दोन्ही आयटेम साँग्सना कायमस्वरूपी लोकप्रियता लाभलीय. आता या लावणीला आयटेम डान्स म्हणायचे का, असा प्रश्न येऊ शकतो, पण हे ‘बारा वाजले’ लोकप्रियतेत सतत अग्रेसर राहिल्यावर काही चित्रपटांतून एखादे लावणीनृत्य, एखादी बैठकीची लावणी यांना आयटेम डान्सप्रमाणे पटकथेत जागा काढली जाऊ लागली. तसे नाचकाम नसेल तर क्लब डान्स, पब डान्स, कोळी डान्स (याला वेगळी संस्कृती आहे) त्यात दर्जा, परंपरा आहे. ती जपावी अशा रूपात आयटेम डान्स फिट बसवला जाऊ लागला. लगेचच येथे दिग्दर्शक दिसतो असे कौतुकाने म्हणण्याची गरज नाही. एव्हाना, उपग्रह वाहिन्या स्थिरावल्यात, मनोरंजन वाहिन्यांना गीत-नृत्य-संगीताचा पुरवठा हवा असतो. जुनी गाणी कितीही कसदार/ श्रवणीय/ अर्थपूर्ण असली तरी ती कृष्णधवल, त्यात रंग दिसत नाही (पण तो ऐकायला येतो याकडे दुर्लक्ष का बरे होते?) आयटेम सॉँग्ज म्हणजे तडतड, कडक-भडक मामला, डोळय़ांत रंग खुपला तरी ही गाणी पब-क्लबमध्ये नृत्याचा ठेका पकडायला उपयोगी पडतात, बारमधील गोंगाटात भर घालतात, बत्तीस-चाळीस इंचाच्या दूरचित्रवाणी संचावर ती भरभरून दिसतात. गावभरच्या रिक्षात कानात शिरतात. आयटेम्स डान्स म्हणजे ऐकण्याची गाणी नाहीत, तर ती पाहण्याची संस्कृती आहे, अशी गाणी जन्माला घालण्यामागे विचार असावा. एखादी नवसंस्कृती रुजताना काही चांगले, काही वाईट यांचा मिलाफ होतो. एखादी श्वेता तिवारी मराठी चित्रपटातून नाचायला मिळाले म्हणून पटकन अतिउत्साह दाखवत नाही. ‘येडय़ांची जत्रा’साठी आयटेम साँग्जवर ताल पकडताना तिने मराठी गाण्याचा अर्थ समजावून घेतला याचा अर्थ ती अविश्वास दाखवते असा नव्हे तर उगाचच अतिउत्साहात गाण्याच्या मुखडय़ात द्वयर्थ तर नाही ना, गाण्याचा अर्थ समजला तर तसा हावभाव देणेही सोपे जाते असा त्यामागे हेतू असतो. ही खरी व्यावसायिकता असे. कौतुक करतानाच, यात कामामागची योग्य जाणीवही आहे, असे कौतुकाने म्हणायला हवे.
मराठीच्या पडद्यावरची आयटेम डान्सची ‘हिट लिस्ट’ तशी वाढत आहे. हिंदीशी स्पर्धा करायची म्हणजे हे होणारच. राखी सावंत (सातच्या आत घरात), रेशम (लालबाग परळ, मुंबई झाली सोन्याची), ऊर्मिला मातोंडकर (हृदयनाथ), प्रीती झांगियानी (ये रे ये रे पैसा), नेहा पेंडसे (फक्त लढ म्हणा), दीपाली सय्यद (मध्यम वर्ग), श्रुती मराठे (बाजी), मुम्मेत खान (धमक) अशी उदाहरणे वाढत चाललीत.
शिवानी दांडेकरला आपण प्रामुख्याने आयपीएलच्या क्रिकेट सामन्याच्या मैदानावर मोहक रूपात पाहिले. तिच्या दर्शनामुळेच म्हणे काही सामन्यातील कंटाळाही सहन केला गेला. ती लटके-झटके देत देत, मारत मारत झ्याक नाचेल अशी कोणी कल्पनाच केली नव्हती. ‘टाइमपास’मध्ये तिने ही पोरी साजूक तुपातली असे झटका देत खुलवलेय की तिच्या नृत्यअदेभोवती एक अख्खी पटकथा लिहिली जावी. (ही अतिशयोक्ती वाटली, तरी सिनेमाच्या जगात त्यालाच वस्तुस्थिती मानतात.)
आयटेम साँग्ज नाचवताना ‘देहभान’ विसरून काही जणी झोकांडी देतात, तेव्हा त्यांनी ऱ्हिदम पकडला नसावा असे वाटते, (काही आयटेम डान्स ‘बाई’ तर दाखवत नाहीत ना? हे पाहणाऱ्याच्या ‘दृष्टी’वर नव्हे तर नाचणारीवर अवलंबून आहे) पण ते अश्लील होऊ देऊ नका. फक्त आणि फक्त आयटेम्स डान्सचा खच्चून भरणा असणाऱ्या काही चित्रफितीमध्ये तसे पाह्यला मिळते. कपडे वाचवले, अपुरी वस्त्रेही कशी तरी घातलीत, मेकअप भडक केला, विचित्र हावभाव केले, शरीराला आळोखेपिळोखे दिले म्हणजे, आयटेम डान्स झटपट सुपरहिट होईल व इंटरनेटवर भरभरून लाइक्स मिळतील ही कल्पना चुकीची व स्वप्नाळू आहे. अशी सवंग व दर्जाहीन नृत्ये फारशी कोणी पाहत नाहीत. आंबट शौकीनही त्यावरून नजर हटवतात व लयबद्ध आयटेम डान्सवर ते दृष्टी खिळवून आपली हौस पूर्ण करतात. तेही गैरकृत्यच! पण आयटेम्स डान्सलाही क्लास असतो, त्यातही डिसेण्टपणा असतो अथवा असावा. कारण, मुळात नृत्य ही अप्रतिम/ अलौकिक कला आहे, त्याला दीर्घ परंपरा आहे. आयटेम्स डान्स हे त्याचे आधुनिक व फिल्मी रूप आहे. ‘पप्पी दे पारूला’ नाचताना स्मिता गोंदकरने एक पाऊल पुढे टाकताना बिकिनीरूपात दर्शन घडवले. आपली व्यायामाची शरीरसंपदा आहे याचे पूर्ण भान राखतच ते आकर्षक दिसेल याचा प्रयत्न केला आहे.
उत्तम आशय हाच मराठी चित्रपटाचा प्राण असला तरी मनोरंजनाच्या मसाल्यामध्ये आयटेम्स डान्सचाही तुकडा आपला रंग भरतो, अस्तित्व दाखवतो. ती काही हिंदी चित्रपटांची जणू अस्मिता झाली असली तरी मराठी चित्रपट खालची पायरी उतरणार नाही याचा विश्वास आहे. पण मराठी चित्रपटांतही आयटेम्स डान्सने आपली जागा निर्माण केली आहे, हे नाकारूनही चालणार नाही.
दिलीप ठाकूर