28 February 2021

News Flash

आदरांजली : कमलाक्षरे

शब्दांना, अक्षरांना रंग, रूप, मन असते. हे अक्षर चित्रकार कमल शेडगे यांनी त्यांच्या कलाकृतीतून मराठी रसिकांना दाखवून दिले.

कमल शेडगे

प्रशांत मानकर – response.lokprabha@expressindia.com

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शास्त्रे यत्न करू

शब्दचि आमच्या जीवाचे  जीवन

शब्द वाटू धन जन लोका

तुका  म्हणे पहा शब्दचि हा देव

शब्दांचि गौरव पूजा करू’

ही तुकारामांची काव्यपंक्ती मराठी भाषेसमोर नतमस्तक व्हायला लावते. असेच शब्दांना, अक्षरांना रंग, रूप, मन असते. हे अक्षर चित्रकार कमल शेडगे यांनी त्यांच्या कलाकृतीतून मराठी रसिकांना दाखवून दिले. डॉ. श्रीराम लागू यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल कमल यांनी अभिनंदनाचे पत्र डॉ. लागू यांना पाठविले. पत्रातील विष्णुदासांचे सुंदर चित्र व सुलेखन पाहून डॉ. लागू भारावून गेले. त्यांनी कमल यांना उत्तर पाठविले. डॉ. लागू यांनी पत्रात म्हटले, ‘विष्णुदासांच्या चित्राने व तुमच्या सुलेखनाने मी अचंबित झालो. आता पुरस्काराचे पदक नाही मिळाले तर मी तुमचे अक्षरचित्र छातीला चिकटवून हिंडेन.’ एका श्रेष्ठ कलाकाराने दुसऱ्या मोठय़ा कलाकाराला दिलेली ही अस्सल दाद होती.

उपयोजित कलाशाखेचे शिक्षण न घेता चित्रकार वडील व नामवंत चित्रकारांच्या  मार्गदर्शनाने कमल शेडगे अक्षरपंढरीचे वारकरी झाले.  १९५६ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कला विभागातून कमल यांनी कलाजीवनास प्रारंभ केला. उपयोजित कलेचे शिक्षण न घेतल्याने कला विभागात काम करण्यास अडचणी येत होत्या, परंतु सुंदर अक्षरलेखन, पानांची उत्तम रचना व मांडणी करून कमलजींनी वरिष्ठांचा विश्वास मिळविला.

कला दिग्दर्शक वॉल्टर लँगहॅमर, मारिओ मिरांडा, शंतनु माळी, रवि परांजपे, प्रभाशंकर कवडी, दत्ता पाडेकर, दीनानाथ दलाल, द. ग. गोडसे, वसंत सवाई यांच्या कलाकृती पाहून कमलजी प्रभावित झाले. त्यांच्या  मार्गदर्शनाने त्यांनी ‘अक्षरचित्रां’चा वेगळा मार्ग निवडला.

साठीच्या दशकात शिशांचे बॉक्स बनवले जात. संपूर्ण मजकूर हाताने धातूंचे एक एक अक्षर जोडून टाइप होत असे. त्या काळी छापखान्यात जाऊन पाने सजवावी लागत. नंतरच्या ऑफसेट पिंट्रिंगमध्ये टाइप होऊन आलेला मजकूर, रेखाटने, छायाचित्रे एकत्रित करून मजकूर चिकटवून वृत्तपत्र, मासिक, पुस्तके, जाहिरात, कार्यक्रमपत्रिका यांची पाने तयार करावी लागत. हा सगळा काळ कमलजींनी अनुभवला. या काळात वृत्तपत्राच्या मुद्रणपद्धतीला अनेक  मर्यादा होत्या. देवनागरी अक्षरवळण मोठय़ा आकारात, विविध शैलींत उपलब्ध नव्हती. पुढे ऑफसेट तंत्रज्ञान आल्यावर प्रिंटिंगमध्येही बरेच बदल झाले. अशा काळामध्ये कमलजींनी त्यांच्या अक्षरांकनाने रसिकांची मने जिंकली.

मोहन वाघ यांच्या ८८ नाटकांची शीर्षके, जाहिरातींची कामे कमल यांनी केली. १९६२ ते २०१७ पर्यंत ५५ वर्षे कमलजींनी अक्षरचित्रांसाठी अविरत काम केले. १९६५ मध्ये ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ याची अक्षररचना करून कमलजींची अक्षरयात्रा सुरू झाली. कमलजींनी अक्षरांचे सुंदर राजवाडे बांधले. सिनेमा, नाटक, वृत्तपत्र, मासिके, पुस्तके, दिवाळी अंक, कार्यक्रम पत्रिका यांच्या शीर्षकांना, त्यांच्या जाहिरातीतील मजकुरांना देखणे स्वरूप  प्राप्त करून दिले. १९७०-८० च्या दशकात कमलजींनी ‘एचएमव्ही रेकॉर्ड’ची कव्हर डिझाईन्स तयार केली होती. त्यांनी तयार केलेल्या ‘पाकिज़ा’ सिनेमाच्या रेकॉर्ड कव्हरच्या डिझाईनला १९७१ मध्ये ‘प्रेसिडेन्ट अ‍ॅवॉर्ड’ मिळाला होता. मोहन वाघ यांनी शेडगेंच्या चित्राक्षरांना ‘कमलाक्षरे’ नाव दिले होते.

वृत्तपत्रांमध्ये नाटक, सिनेमा यांच्या जाहिराती दाटीवाटीने छापून  येतात. त्यातही कमलजींची अक्षरे उठावदार दिसायची. शेडगे यांच्या वेधक अक्षरवळणाने नाटक, चित्रपट, पुस्तके, वृत्तपत्रे,  मासिके, दिवाळी अंक यातील लेख, कथा, कविता यांचा अर्थ चित्राक्षरांतून समजायचा. सामाजिक, गंभीर, विनोदी, संगीतप्रधान, रहस्यमय आशयाच्या छटा अक्षरांतून दिसायच्या. नाटकांच्या जाहिरातीतले ‘एकमेवाद्वितिय’ पद  त्यांनी कायम ठेवले. त्यांची अक्षरबाळं खेळताना, बागडताना, रांगताना, उभी राहताना दिसायची.

कमल शेडगे यांच्या ‘अक्षरगाथा’, ‘कमलाक्षरे’, ‘चित्राक्षरे’, ‘ऐसी अक्षरे कमल शेडगे’ या पुस्तकांतून विविधरूपी अक्षरांचा खजिना पाहायला मिळतो. यातील अक्षरगाथा विद्यार्थ्यांसाठी बोधक ठरणारी आहे. शेडगे यांनी अनेक कलाकृती अजरामर केल्या. दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’, दैनिक ‘सामना’, वार्षिक पंचांग ‘कालनिर्णय’, गडकरी रंगायतन, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, रवींद्र नाटय़मंदिर यांच्या अक्षररचना शेडगे यांनी साकारल्या आहेत. ‘फिल्मफेअर’, ‘फेमिना’, ‘माधुरी’, ‘अक्षर’, ‘आयडियल’, ‘षटकार’, ‘चंदेरी’, ‘माहेर’, ‘चारचौघी’, ‘अमृत’, ‘दीपलक्ष्मी’, ‘कथाश्री’, ‘चंद्रकांत’, ‘किलरेस्कर’ यांची बोधचिन्हे कमलजींनी तयार केली आहेत. त्यांच्या अक्षरचित्रांच्या प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळत असे. अनेक नानाविध पुस्तके, दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांना शेडगे यांनी ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळवून दिली.

प्रभाकर पणशीकर, मोहन तोंडवळकर, मच्छिंद्र कांबळी, सुधीर भट, अमोल पालेकर, डॉ. श्रीराम लागू, महेश मांजरेकर यांच्या नाटकांची शीर्षके शेडगे यांनी केली होती.

रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकांचा आशय शेडगेंच्या अक्षरांतूनच दिसून यायचा. ‘गारंबीचा बापू’, ‘वाऱ्यावरची वरात’,  ‘ती फुलराणी’, ‘पुरुष’, ‘वस्त्रहरण’, ‘ऑल दि  बेस्ट’ या नाटकांच्या जाहिरातीतूनच प्रेक्षकांची आतुरता कमलजींनी त्यांच्या अक्षरचित्रांतून वाढविली होती. अक्षरांच्या देहबोलीतून नाटकाचा अर्थ रसिकांना उमगायचा. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची निमंत्रण पत्रिका कमलजींनी त्यांच्या सुलेखनाने साकारली होती.

‘नटसम्राट’च्या जाहिरातीतील रिकामी खुर्ची, ‘चारचौघी’मधील लढवय्यी स्त्रीशक्ती, ‘लग्नाची बेडी’मधील प्रेमाची बेडी, ‘रणांगणा’तील दणकटपणा, ‘नक्षत्रांचे देणे’तील तारे, ‘गाढवाचे लग्न’मधील अल्लडपणा, ‘वादळा’तील सुसाट वारा, ‘जंगली कबूतर’मधील बेफाम स्त्री, ‘नागमंडल’मधील नाग, वाऱ्यावर डोलणारी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘लव्ह बर्ड’ या नाटकांची अक्षरचित्रे बोलकी होती. ‘ती फुलराणी’, ‘सही रे सही’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘वाडा चिरेबंदी’, सहलीच्या गमतीजमतीमधील ‘टूरटूर’, ‘गिधाडे’तील अत्याचार, ‘वस्त्रहरण’मधील अजब पात्रे, बेदरकार ‘तो मी नव्हेच’ या नाटकांची देहबोली कमलजींच्या अक्षरांतून दिसून यायची. शेडगे यांनी अनेक चांगली प्रतीके, बोधचिन्हे साकारली. त्यांच्या ‘चित्राक्षरं’ पुस्तकात नवनवी अक्षरवळणे पाहायला मिळतात. ही अक्षरवळणे रोमन लिपीतल्या इंग्रजी अक्षरवळणांवरून साकारली होती. साठच्या दशकात मराठीचे तुरळक टाइप वापरले जात. त्या काळात इंग्रजीच्या भांडारातील अनेक टाइपांना मराठी वळणे देऊन कमलजींनी मराठी अक्षरांचे सुशोभीकरण केले.

कमल शेडगे हे खऱ्या अर्थाने मराठीचे ‘अक्षर क्रांतिकारक’ होते. ‘नटसम्राट’ नाटकाचे शीर्षक ‘गॉथिक’ शैलीतील होते. ‘गगनभेदी’ या नाटकाच्या शीर्षकामध्ये पाश्चात्त्य मुद्रावळणाचा वापर शेडगे यांनी केला. ‘दुभंग’ नाटकात तडा गेलेली अक्षरं, ‘क्रॉस कनेक्शन’मधील क्रॉस,  ‘पुरुष’ नाटकातली ऊर्मी, ‘केस नं. ११’ची पाळंमुळं, ‘स्वामी’तील गणेशाचे बोधचिन्ह, ‘प्रियतमा’चे लक्केदार शीर्षक, ‘हे वयच असं असतं’मधील अवखळपणा, ‘मी नथुराम गोडसे’ची धिटाई या नाटकांच्या संवेदना कमलजींच्या अक्षरचित्रांतून जाणवत होत्या. त्यांच्या अक्षररचनेतून शब्दांच्या आशयलक्ष्मीचे दर्शन घडत असे. सुहास शिरवळकर यांनी ‘कमलजींच्या हस्ताक्षरांना चित्रगुप्ताचे वरदान आहे’ अशा शब्दांत प्रशंसा केली होती.

‘आनंदघन’, ‘वपु कथाकथन वपु’, ‘आवाज की दुनिया’, ‘मंगलगाणी दंगलगाणी’, ‘माणिकमोती’ या कार्यक्रमांचा साज अक्षरचित्रांनी सजविला. कमल शेडगे यांनी हिंदी चित्रपटांचे फलकही बोलके केले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कहो ना प्यार है’, ‘ताल’, ‘धडकन’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘विरासत’, ‘चायना गेट’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘रंगीला’, ‘यस बॉस’, ‘मिशन कश्मिर’, ‘जंगल’, ‘अकेले हम- अकेले तुम’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘झूट बोले कौवा काटे’, ‘सिंघम’, ‘डॉन-२’ या हिंदी चित्रपटांच्या अक्षररचना शेडगे यांनीच केल्या होत्या. मराठी चित्रपट ‘वीर सावरकर’, ‘बिनधास्त’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘तुकाराम’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘लालबाग परळ’, ‘कुटुंब’ या चित्रपटांची अक्षरचित्रे कमलजींनी साकारली होती. त्यांनी त्यांच्या मुलाचे  नावही ‘अक्षर’ हे ठेवले. अक्षरनेही बाबांचा वारसा पुढे चालवला आहे. कमलजींना नाटय़दर्पण, अखिल भारतीय नाटय़ परिषद पुणे, चंद्रकला, काशिनाथ घाणेकर अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कमल शेडगे यांनी गेली सहा दशके अक्षरचित्रांमधील मक्तेदारी कायम ठेवली. संगणक शिकता आले  नाही, त्याची खंत त्यांना होती. अक्षरसौंदर्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने त्यांना एका डोळ्यानेच दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताची तीनच बोटे नीट काम करीत होती. अशा परिस्थितीतही ‘अक्षरांची खूप वळणं शोधायची आहेत’ हा ध्यास कायम होता. ते खऱ्या अर्थाने ‘अक्षरसैनिक’ होते. गंगाराम गवाणकर कमलजींना ‘अक्षरांचे डॉक्टर’ म्हणायचे. यशवंत दत्त यांनी कमलजींना ‘अक्षरशहा’ ही पदवी दिली होती. तसे ते अनेक पदकांचे मानकरी होते.

उपयोजित कला शाखेतील विद्यार्थी या ‘अक्षरदेवाला’ सदैव स्मरणात ठेवतील. कमलजींनी बांधलेले अक्षरांचे मनोरे मराठीची शान वाढवतात. कमलयोगींची अक्षरसाधना वंदनीय आहे. कमल शेडगे यांचे ‘अक्षर भांडार’ नव्या पिढीला प्रेरक ठरेल. नाटक, सिनेमा, पुस्तके यांच्या यशाचा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा त्यांच्या अक्षरांना जिवंत करणाऱ्या, अक्षरांतून विषयाचा आशय सांगणाऱ्या गमतीदार, नाजूक, डौलदार, प्रेमळ, प्रभावी, दणकट, बहुरंगी, बहुढंगी अक्षरांना मानवंदना दिली  जाईल. कमलाक्षरातून शेडगे सदैव अजरामर राहतील. या अक्षर क्रांतिकारकाला मानाचा मुजरा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 7:28 am

Web Title: kaml shedge typography adaranjali dd70
Next Stories
1 समाजमाध्यमे : आभासी जगातलं वास्तव
2 विज्ञान : पर्यावरणीय कामगिरीत भारत नापास
3 राशिभविष्य : दि. १० ते १६ जुलै २०२०
Just Now!
X