श्रीलंकेच्या कॅण्डी परिसरात बघण्यासारखं खूप आहे. काही अवशेष रावणाचे महाल, सीतेला ठेवलं होतं ती जागा अशा वास्तू म्हणूनही दाखवल्या जातात. त्याशिवाय वेगवेगळ्या मॉनेस्ट्री, सिगिरिया किल्ला असं बरेच काही आपल्याला खिळवून ठेवतं.

‘याला’ हे श्रीलंकेमधले अभयारण्य बघून ‘कॅण्डी’कडे निघालो. हवामानाने साथ दिली तर याला ते कॅण्डी हा सहा तासांचा प्रवास आहे. वाटेत नुवारा इलिया नावाचे श्रीलंकेमधले थंड हवेचे ठिकाण लागते. ब्रिटिश लोकांनी इथली हवा लक्षात घेऊन इथे चहा आणि कॉफीचे मळे लावले. ह्य रस्त्यावर रावणाचा तथाकथित महाल आणि सीतेला ठेवले होते ती तथाकथित कुटी आहे.
आमचा प्रवास सुरू झाला. लंकेत, शहर असो अथवा गाव, सगळीकडे हिरवगार दिसतं. हिरव्या रंगाच्या किती तरी छटा दिसत असतात. हिरवी जमीन आणि निळेशार आकाश.. किती सुंदर कॉम्बिनेशन! आणि अशा रंगसंगतीत बहुतेक सर्व घरांचे रंग हे लाल, पिवळे, शेंदरी अशा विरुद्ध रंगांचे. त्यामुळे एकंदर देखावा फारच विलोभनीय दिसतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरांना जोडणारे हायवे असो किंवा गावांना जोडणारे छोटे रस्ते दोन्हीमध्ये खूपच कमी खड्डे पाहायला मिळाले. जवळपास नव्हतेच असे म्हणायला हरकत नाही. श्रीलंकेसारख्या छोटय़ा देशातपण रस्त्यांसारख्या गोष्टींना किती महत्त्व दिले जाते हे पाहिल्यावर आपल्यासारख्या देशात इतकी दुरवस्था का याचा विचार येतो. तसं पाहिलं तर आपल्यापेक्षा इथे जास्त पाऊस पडतो आणि जवळजवळ वर्षभर पडतो तरी..!
साधारण दोन-अडीच तासांच्या प्रवासानंतर आमचा सारथी जयान्थाने एका प्रचंड मोठय़ा धबधब्याजवळ गाडी थांबवली. साधारण ८०० फुटांवरून पाणी कोसळत होते. या धबधब्याला ‘रावण फॉल्स’ म्हणतात. अशी आख्यायिका आहे की या धबधब्याच्या उगमाजवळ रावणाचा राजवाडा होता. इथे आजूबाजूला गर्द जंगल आहे.
या धबधब्याच्या डावीकडून एक पायवाटसदृश रस्ता आहे, ज्यावरून पुढे वर चढत गेल्यावर दहा किलोमीटरनंतर रावणाच्या तथाकथित राजवाडय़ाचे अंश दिसतात. जयान्थाच्या मते हा रस्ता खूप खडतर आहे. या ठिकाणी अर्धा तास थांबून आम्ही पुढे कूच केले.
पुढे वाटेत एका खूप जुन्या मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन पुढच्या वाटेला लागलो. श्रीलंका हे प्रामुख्याने बौद्ध राष्ट्र आहे. त्यामुळे इथे खूप जुन्या मॉनेस्ट्री आहेत आणि त्या सगळ्यांना काही न काही इतिहास आहे. पुढे साधारण अध्र्या तासाच्या प्रवासानंतर जयान्थाने एका देवळापाशी गाडी थांबवली. हीच ती जागा जिथे रावणाने सीतेला बंदिस्त करून ठेवले होते, असे त्याने सांगितले. ते एक सुंदर मंदिर होते. रात्र झाल्यामुळे आम्हाला आत जाता आले नाही, म्हणूनच बाहेर उभे राहून कुडकुडत्या थंडीत जमतील तसे फोटो काढले. दाक्षिणात्य पद्धतीचं मंदिर होतं ते.
खूप उशीर झाला होता आणि पाऊसपण पडत होता, त्यामुळे नुवारा इलिया पाहता येणार नव्हते. वाईट वाटत होते पण पर्याय नव्हता, कारण रात्री मुक्कामाला कॅण्डीमध्ये पोचायचे होते. अशीच मजल-दरमजल करत धो-धो पावसातून आम्ही एकदाचे कॅण्डीला पोचलो. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. कॅण्डी हे तसे लंकेमधले महत्त्वाचे शहर किंबहुना त्यांची उन्हाळी राजधानी. तरीही रात्री नऊ वाजता सगळं शहर एकदम शांत होतं. गर्दी नाही, माणसांची धावपळ नाही, पाहून जरा आश्चर्यच वाटलं. आज पण प्रवास खूप झाला होता आणि पुढच्या दिवशी आम्हाला ‘सिगिरिया’ला जायचं होतं.
‘सिगिरिया’ हे जगातील २० आश्चर्यापकी एक मानलं जातं. सिगिरिया हा एक किल्ला, दम्बुला शहरापासून साधारण ३० किलोमीटरवर आहे. सिगिरिया हा साधारण १६०० वर्षांपूर्वीचा किल्ला आहे. त्याचा माथा म्हणजे ६०० फूट उंचीचा ग्रॅनाइट दगड आहे. या कातळात तत्कालीन बौद्ध गुहा आहेत. ज्यात खूप सारी चित्रं आहेत, जी नसर्गिक रंगांनी रंगवलेली आहेत.
त्या कातळावर लावलेल्या लोखंडी जिन्यांवरून सिगिरिया किल्ल्यावर जायला जवळपास एक-दीड तास लागतो. ज्या लोकांना व्हर्टगिोचा त्रास आहे त्यांनी न गेलेलंच बरं. कारण एका बाजूला खोल दरी आहे. पण एकदा माथ्यावर पोचलो की सगळा शीण निघून जातो. तिथल्या गाइडच्या सांगण्यावरून या किल्ल्यावर त्या काळी दहा ते पंधरा हजार लोकवस्ती होती. वेगवेगळ्या पद्धतीचे वाडे होते, तळी होती. या सगळ्यांचे अवशेष आजही दिसतात. या किल्ल्याचा माथा जवळपास दहा एकरांचा आहे. किल्ल्याखाली उभे राहिल्यावर वर इतक्या मोठय़ा वास्तू आणि मनुष्य वस्ती असेल असं वाटतच नाही.
आम्ही किल्ल्यावर जवळजवळ तीन तास घालवले. किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर खूप रम्य दिसतो. चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. आपल्या राजगडाची आठवण येते.
किल्ल्याच्या पायथ्याला खूप मोठय़ा परिसरात घनदाट जंगल आहे आणि त्यात अनेक रॉक फॉर्मेशन्स आहेत. त्यातल्या एकाचा आकार बाजूने ‘हत्ती’सारखा दिसतो. असे अनेकविध खूप सुंदर आकाराचे खडक आहेत. या भागात संपूर्ण दगडात बांधलेली अनेक मोठी मोठी तळी आहेत. यामुळे हा संपूर्ण परिसर फारच सुंदर आणि नयनरम्य दिसतो.
इथे फोटो काढत तीन-चार तास मजेत जातात. साधारण चार तासानंतर आम्ही तिथून कॅण्डीकडे निघालो. वाटेत खूप पाऊस होता त्यामुळे दम्बुलामध्ये थांबता आले नाही. खरं तर दम्बुलापण खूप पाहण्यासारखं आहे. तिथे खूप जुनी जुनी मंदिरे आहेत.
कॅण्डी हे भौगोलिकदृष्टय़ा श्रीलंकेच्या मध्यभागी वसलेलं आणि लंकेमधलं दुसरं सर्वात मोठं तसंच थंड हवेचं ठिकाण असलेलं शहर आहे. हे शहर चहुबाजूंनी चहाच्या मळ्यांनी घेरलेलं आहे.
कॅण्डीमध्ये एक प्रसिद्ध बुद्ध मंदिर आहे. इथे बुद्धाचा एक दात ठेवलाय. हे बुद्ध मंदिर जगातील सर्व बौद्धांसाठी अतिशय पवित्र आहे. युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिलाय. या मंदिराचा परिसर खूपच अवाढव्य आहे.
या शहराच्या नावाबद्दल वेगवेगळ्या व्युत्पत्ती ऐकायला मिळतात. काहींच्या मते, या प्रदेशाला पूर्वी सिंहली भाषेत ‘कांदा उदा रादा’ असे म्हणायचे, ज्याचे पोर्तुगीज लोकांनी पुढे ‘कॅण्डी’ असे केले. तर काहींच्या मते ‘कॅण्डी’ म्हणजे ‘ग्रेट सिटी’- असो, पण हे शहर खूप सुंदर आहे.
कॅण्डीमध्ये एका रस्त्यात एक सुरेख गोष्ट पाहायला मिळाली. तिथे लंकन सरकारने, ब्रिटिशांनी १८६७ साली रस्ते बांधले त्यावेळी वापरलेली सगळी यंत्रे रस्त्याच्या कडेला चांगल्या पद्धतीने रंगवून ठेवली आहेत. इतकी जुनी यंत्रे पाहायला फारच मजा आली.
कॅण्डी खरंच एक टुमदार शहर वाटलं. लंकेमधलं इतकं मोठं शहर असूनसुद्धा आपल्या इथे असते तसे धकाधकीचे जीवन नाही. कॅण्डीमधली आजची शेवटची रात्र होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ‘नेगोम्बो’कडे प्रयाण करणार होतो.
नेगोम्बो हे कोलंबोच्या उत्तरेकडे साधारण ४० किलोमीटर वर असलेले समुद्रकिनाऱ्यावरचे गाव आहे. कॅण्डीहून तिथे जायला साधारण पाच-सहा तास लागतात. वाटेत एक हत्तींसाठी केलेले अनाथालय आहे. इथे अनेक जखमी किंवा वय झालेल्या हत्तींना ठेवण्यात आले आहे आणि इथे त्यांच्यावर जे लागतील ते सर्व उपचार केले जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते.
परदेशातून बरेच लोक हत्तींवर संशोधन करण्यासाठी इथे येऊन राहतात. इथे हत्तींना नसíगक वातावरण असावं म्हणून दाट जंगल केले आहे. त्यांना पाण्यात डुंबायला आवडतं म्हणून बरीच तळी बांधली आहेत. इथे एका हत्तीच्या हाडांचा संपूर्ण सांगाडा ठेवलाय. तो सांगाडा पाहून आणि त्यातले काही भाग हाताळले की हा किती अजस्र प्राणी आहे ते कळतं.
लंकेच्या किनारपट्टीवर वसलेले ‘नेगोम्बो’ म्हणजे सिंहली भाषेत ‘मधमाश्यांचे पोळे’. नेगोम्बोमध्ये आल्यावर तर अगदी गोव्यामध्ये आल्यासारखंच वाटतं.
आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता आज. त्यामुळे फार कुठे न िहडता आम्ही आराम करायचा निर्णय घेतला. आमचे हॉटेल अगदी समुद्रकिनाऱ्यावरच होते. बीचवर पडून गेल्या चार दिवसांत केलेल्या सर्व गोष्टींचा आढावा घेत आम्ही शेवटचा दिवस घालवला. श्रीलंका हे खऱ्या अर्थानं ‘पाचूचं बेट’ आहे याचा अनुभव घेतला.
द्विजेंद्र काणे response.lokprabha@expressindia.com