सध्या सर्वच मोबाइल कंपन्यांना भारतीय बाजारपेठेची भुरळ पडली आहे. कारण ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यातही सुरुवातीच्या काळात मोठय़ा कंपन्यांनी त्यांचे हायएण्ड हॅण्डसेटस् बाजारपेठेत आणले. त्याला चांगला प्रतिसाद मिळालाच, पण त्यानंतर सामान्य ग्राहक हीदेखील मोठी बाजारपेठ आहे, हे लक्षात आल्यानंतर काही बडय़ा कंपन्याही मध्यमवर्गीय ग्राहकांच्या क्षेत्रात उतरल्या. बहुतांश मध्यमवर्गीय तोवर फीचर फोन वापरत होते. मात्र जग आता स्मार्टफोनच्या दिशेने चालल्यानंतर त्यांनाही त्याची आस लागून राहिली होती. मात्र अधिक किमतीचे स्मार्टफोन परवडणारे नव्हते. हेच नेमके जाणून आता अनेक कंपन्यांनी फीचर फोनच्या किमतीत परवडतील असे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या स्पर्धेतील एक महत्त्वाची कंपनी म्हणजे कार्बन. कार्बननेही आता अद्ययावत असलेल्या अँड्रॉइड ४.४ किटकॅट या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केलेला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
प्रथमदर्शनी हा स्मार्टफोन दिसायला आयफोनसारखाच आहे. क्षणभर फसगत होऊ शकते असे डिझाइन आहे. मात्र आयफोनला मध्यभागी असलेले गोलाकार बटन ही त्याची खासियत आहे ती यात नाही हे लक्षात आल्यावर खरी बाब आपल्या लक्षात येते. स्क्रीन कपॅसिटीव्ह पद्धतीचा आणि ४ इंचांचा आहे. मोबाइलच्या उजव्या बाजूला वरती ऑन-ऑफचे बटन तर त्याखाली चाìजग डॉक आहे. वरच्या बाजूस हेडफोन जॅक तर डाव्या बाजूला वरती व्हॉल्यूम कंट्रोलची सोय आहे. इअरफोनच्या बाजूला व्हीजीए कॅमेरा आहे. तर मागच्या बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्याच बाजूला फ्लॅशची सोयही आहे. तर खालच्या बाजूस मागे स्पीकर्स आहेत.
या डय़ुएल सिम फोनसाठी १.३ गिगाहर्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर वापरला आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम अद्ययावत किटकॅट वापरण्यात आली आहे. क्वाड कोअर प्रोसेसरच्या वापरामुळे सिस्टीम हँग होणे टाळले जाते आणि स्मार्टफोन चांगल्या वेगात काम करतो.
स्मार्टफोनमध्ये ४ जीबी इंटर्नल मेमरी असून एसडी कार्डाच्या माध्यमातून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. ५ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासोबत दिलेला फ्लॅश ही चांगली उपयुक्त बाब आहे. घरातील फोटो बेतास बात आले तरी बाहेरचे चित्रण मात्र चांगले येते असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले.
सध्या मोटो जी आणि मायक्रोमॅक्सचा युनाइट टू या दोन्हींच्या स्पर्धेत सध्या हा कार्बन टायटॅनिअम एस ९९ उतरला आहे. याचा स्क्रीन ४ इंचांचा असून म्हणूनच किंमतही एक हजार रुपयांनी कमी ठेवली आहे. वैगुण्य एकच की, १४०० एमएएच असलेली बॅटरी अनेकदा थ्रीजी वापरताना वेगात खाली येते.
फीचर फोनवरून ज्यांना स्मार्टफोनच्या दिशेने उडी घ्यायची आहे आणि ज्यांचा थ्रीजीचा वापर फारसा असणार नाही त्यांच्यासाठी कार्बन टायटॅनिअम एस ९९ चांगला पर्याय ठरू शकतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ५,९९०.

वैशिष्टय़े
डिस्प्ले – ४ इंच
स्क्रीन – कपॅसिटिव्ह
प्रोसेसर – १.३ गिगाहर्ट्झ
रॅम – ५१२ एमबी
समोरचा कॅमेरा – आहे
पाठीमागचा कॅमेरा – ५ मेगापिक्सेल
फ्लॅशची सोय – आहे
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.४
इंटर्नल स्टोरेज – ४ जीबी
एक्स्पान्डेबल मेमरी – ३२ जीबीपर्यंत
कनेक्टिव्हिटी – वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ,
एफएम – सोय आहे
बॅटरी – १४०० एमएएच