कर्नाळ्याच्या अभयारण्यात जायचं ठरलं तेव्हा स्वर्गीय नर्तक बघायला मिळेल अशी वेडी आशा मला होती. आणि चक्क ती खरी ठरली.

बरेच दिवस ठरवूनही आमचा कर्नाळा पक्षी अभयारण्यात जायचा योग येत नव्हता. एक दिवस योग जुळून आला आणि आम्ही कर्नाळ्याला जायचं नक्की झालं.. आणि त्या क्षणापासून माझं स्वप्नरंजन सुरू झालं.. जय्यत तयारी चालू केली.. कर्नाळ्यात काय काय दिसू शकेल याची थोडी माहिती बघून ठेवली.. माझी स्वर्गीय नर्तक (paradise flycatcher) पाहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. बरीच ठिकाणं पालथी घालूनही स्वर्गीय नर्तक दिसला नव्हता.. माहिती पाहता पाहता कर्नाळ्यात स्वर्गीय नर्तक दिसतो, असं माझ्या वाचण्यात आलेलं आणि कर्नाळ्यात नर्तक पाहिला अशी स्वप्नं पाहायला लागले.. मला खूप मनापासून स्वर्गीय नर्तक पाहायचा होता.. खूप मनापासून!!! आणि गम्मत म्हणजे, मला नेहमी असं वाटतं ..मी कोणत्या अभयारण्यात गेले की, तिथे गेल्या गेल्या तिथले सगळे पक्षी, प्राणी, साप स्वागतासाठी उभे असतील आणि वेगवेगळे फोटो द्यायला आतुर झाले असतील.. त्याचप्रमाणे कर्नाळ्यात शिरल्या शिरल्या स्वर्गीय नर्तक मला दर्शन देईल अशा गोड समजुतीत वावरत होते मी. तो फक्त माझा गोड गैरसमज आहे हे माहीत असूनही मी प्रचंड खूश झाले होते. आणि गोड समजुतीतच राहायला आवडत होतं मला. त्यातली मजाही औरच होती..
ठरल्याप्रमाणे आम्ही कर्नाळ्यात जायला निघालो.. कर्नाळ्याला जाता जाता खंडय़ा दिसला आणि आमच्या ट्रिपची मस्त सुरुवात झाली. कर्नाळ्यात सगळे नाही पण थोडे तरी पक्षी दिसणार अशी एक आशा पल्लवित झाली. आम्ही कर्नाळ्यात पोहोचलो त्या दिवशी वातावरण एकदम आल्हाददायी होतं.. गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय झाली होती. गेस्ट हाऊस मस्त होतं. आजूबाजूला मस्त झाडं होती! जंगलाचा वास आला आणि मी ताजीतवानी झाले.. गेस्ट हाऊसमध्ये आत शिरता शिरता माकडांनी आमचं जंगी स्वागत केलं.. स्वागत केलं म्हणण्यापेक्षा माकडांनी मला घाबरवलं हे म्हणणं जास्त योग्य ठरेल..! अर्थात मी घाबरले होते पण थोडी शूर होऊन त्यांना कॅमेरात टिपलंच. गळ्यातला कॅमरा बाजूला काढून निवांत बसायला लागले तितक्यात समोर शिRो पक्षी दिसला! आणि मग परत घाईघाईनं कॅमेरा गळ्यात अडकवून शिRोला माझ्या कॅमेरात कैद करायची माझी लगबग चालू झाली.. फोटो काढून झाले आणि मग तो उडाला. पक्ष्यांनी मस्त पोझेस दिल्या आणि फोटो चांगले आले की जग जिंकल्याचा आनंद होतो मला. पण फोटो काढण्याआधीच पक्षी उडाले की प्रचंड त्रास होतो. आमच्या रूमच्या बाहेरच भरपूर बगळे होते.. हिरव्या गालिच्यावरचे पांढरेशुभ्र बगळे. इकडे तिकडे बिनधास्त हिंडत होते. पिवळी चोच आणि पांढरेशुभ्र बगळे.. देखणं रूप. मी फोटो काढत होते पण त्यांना काही फरक पडल्यासारखा वाटत नव्हता. मनासारखे फोटो काढून झाले पण माझी नजर न पाहिलेल्या पक्ष्यांच्या शोधात होती.. तेव्हाच जास्त त्रास न होता झाडात लपून बसलेला verditer flycatcher(नीलिमा)चं दर्शन झालं. निळ्याशार रंगाचा आकर्षक पक्षी.. त्याला इकडे तिकडे उडताना पाहून धुंद व्हायला होत होतं. कर्नाळ्यातला मुक्काम मी एन्जॉय करत होते. जंगलाची शांतता अनुभवत हिंडणं चालू होतं आणि स्वर्गीय नर्तक पाहायची ओढ उत्कट होत होती. पण पहिल्या दिवशी स्वर्गीय नर्तक काही दिसला नाही.. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उठून पक्षी पाहायला बाहेर पडलो.. खूप हिंडलो. स्वर्गीय नर्तक काय, पण दुसरा एकही पक्षी दिसला नाही.. पण वाटेत मस्त दोन फुलपाखरं दिसली. निवांत बसली होती.. क्व चित दिसणारं दृश्य होतं ते.. निवांत बसलेली फुलपाखरं पाहून माझे हात आपोआप कॅमेऱ्याकडे वळले आणि किती फोटो काढू असं झालेलं मला.. मनसोक्त फोटो मिळाले त्यांचे.. मध्ये मध्ये चुकून नर्तक दिसतोय का याचा शोध चालू होताच. पण नर्तक सोडाच, कोणत्याही पक्ष्याचा आवाजही येत नव्हता! या वेळीपण नर्तकाला न पाहताच जावं लागणार या विचारानं मी खट्टू झालेले. विचारात गुंग झालेले तितक्यात समोर छोटा निखार (स्कार्लेट मिनिवट) दिसला.. आणि माझ्या तोंडून ‘आ हा’ बाहेर पडलं. त्याचे रंग इतके मनमोहक होते.. त्याच्यावरून नजर हलत नव्हती. मग भानावर आले आणि फोटो काढायची धावपळ चालू झाली.. पुढून मागून मस्त फोटो मिळाले. त्याचे फोटो काढताना मला आता लगेच नर्तक दिसेल अशी काडीमात्र आशा नव्हती ..पण त्या दिवशी मला नर्तक दिसणार होताच.
आता नर्तक काही दिसणार नाही आणि रूमवर जाऊन बसू अशा विचारांनी वळले आणि अनपेक्षित पणे समोर स्वर्गीय नर्तक. दिमाखात एका फांदीवर बसला होता. जगाची पर्वा त्याला नव्हतीच मुळी.. स्वर्गीय नर्तक न पाहताच पुण्याला परत जावं लागणार असं वाटत असतानाच नर्तक समोर आलेला पाहून मला काय वाटलं हे शब्दात सांगणं जरा कठीणच! नर्तक पहिला आणि त्याक्षणी मला वाटलं, ‘जणू, स्वर्गातली अप्सराच जमिनीवर अवतरली..’ त्याच्या सौंदर्याला किती उपमा दिल्या तरी त्या कमीच पडतील.. मी किती दिवस नर्तक पाहायची वाट पाहत होते. आणि नर्तक माझ्या समोर होता. आधी माझा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.. मग हा भास नसून खरच नर्तक समोर आहे हे कळल्यावर मी हरखूनच गेलेले.. काय करू, काय नको अशी विचित्र स्थिती झालेली माझी! ओरडायचं होतं पण मी ओरडले असते आणि घाबरून नर्तक उडून गेला असता. म्हणून फक्त मनातच ओरडले. किती सुंदर पक्षी. पुस्तकात पाहिलेला त्यापेक्षा किती तरी पटींनी सुंदर. माझ्या अंगावर काटा आला होता..माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती.. अंगातून एक लहर गेल्याचा आभासही झाला.. प्रत्येक पक्षीप्रेमीला स्वर्गीय नर्तक पाहायची ओढ असतेच.. मलाही होती. जेव्हापासून पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण झालेली तेव्हापासूनच नर्तकाला पाहायची मी वाट पाहत होते.. आणि नर्तक दिसला तेव्हा मी अक्षरश: वेडी झालेले.. एकटाच निवांत बसलेला नर्तक.. त्याच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतात. त्याचं नाव त्याच्या रूपाला साजेसाच आहे.. सुंदर तुरा, सुंदर रंग. त्याची लांबलचक शेपूट हलत होती. त्याला पाहून कोणीही भान हरपल्याशिवाय राहणारच नाही. त्याला डोळे भरून पाहून घेतलं.. नर्तकाला पाहताना मी कुठल्या जगात आहे याचंही मला भान नव्हतं.. शेजारी कोण काय बोलतंय त्यातलं एकही अक्षर मला ऐकू येत नव्हतं. फक्त दिसत होता सौंदर्याची देणगी मिळालेला नर्तक.. मी भान हरपून त्याच्याकडे पाहत बसलेले! या सगळ्यात गळ्यात कॅमेरा आहे हेही विसरून गेलेले.. भानावर आले आणि फोटो काढायला कॅमेरा डोळ्यावर लावला, पण हात अक्षरश: थरथरत होते.. पटापट दोन-चार क्लिक केले.. पण फोकस करायलाही विसरून गेले. फोटो नीट नाही आले हे लक्षात आलं आणि कॅमेरा परत डोळ्याला लावला पण त्याक्षणी तो उडाला.. तो उडताना तर काय दिसत होता. अप्रतिम!! त्याची शेपूट लहारीसारखी उडत होती. समुद्राच्या लाटाच जणू.. ते दृश्य तर इतकं अप्रतिम होतं.. शब्दात वर्णन करता येणारच नाही असं काहीसं दृश्य होतं ते. तो उडून गेला पण मला प्रचंड आनंद देऊन गेला. माझ्या मनातून आता तो कधीच जाणार नव्हता! त्याचा फोटो माझ्या मनावर चिकटवला गेला.. किती तरी वेळ मी नर्तकाला आठवत.. स्मित हास्य करत बसले होते. कोणाशी बोलायची इच्छा नव्हती.. मी किती वेळ त्या देखण्या नर्तकाचाच विचार करत बसले होते कोण जाणे. तो सतत डोळ्यापुढे असल्याचा भास होत होता मला.. काय करावं काही सुचत नव्हतं. जरा वेळाने भानावर आले.. जेवायची वेळ झालेली पण भुकेचं भान तर नव्हतंच.. माझं पोट भरलं होतं नर्तकाला पाहून. स्वर्गीय नर्तकाला पाहायची माझी इच्छा पूर्ण झाली होती. आता वेध लागलेत पुढच्या वेळी कर्नाळा गाठायचे.. आणि परत स्वर्गीय नर्तकाला पाहून हरवून जायचे!!!