लहानसहान गोष्टींनी नाउमेद होण्याच्या स्वभावामुळे अनेक जणांचे आयुष्य जगायचेच राहून जाते. आपल्याकडे काय नाही, यापेक्षा आपल्याकडे काय आहे, याचा विचार करून पुढे जायचे ठरवले तर जगणे सुंदर होते.

सकारात्मक माणूस जेव्हा बंद घडय़ाळाकडे बघतो तेव्हा त्याच्या मनात येते, की अरे, हे घडय़ाळ तर दिवसातून दोनदा अचूक वेळ दाखवते. आपल्याला खरी सकारात्मकता अंगी बाळगायची असेल तर अनेक खेळाडूंची जीवने जवळून बघायला हवीत. त्यांची जीवन चरित्रे अभ्यासायला हवीत. आपण आज अशाच एका अलौकिक चरित्रात डोकावून पाहणार आहोत
करोली टॅकास हे हंगेरिअन सैन्यात सरजट पदावर काम करीत होते. १९३८ साली ते त्यांच्या देशातील पिस्तोलातून गोळी मारणारे सर्वोत्तम खेळाडू (शूटर) म्हणून ओळखले जात होते. जवळजवळ सगळीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकने त्यांनी मिळविली होती. १९४० साली टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील संभाव्य सुवर्णपदक विजेता म्हणून त्यांच्याकडे सारे जग मोठय़ाच आशेने बघत होते.
परंतु एक अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना घडली. सैन्यातील एका प्रशिक्षण सत्रात एका ‘हॅण्डग्रॅनाइड’चा स्फोट lp42करोली यांच्या उजव्या हातातच झाला आणि त्यात त्यांचा उजवा हातच निकामी झाला. या दुर्दैवी अपघाताबरोबरच त्यांचे ऑलिम्पिक विजयाचे स्वप्नच उद्ध्वस्त झाले.
सर्वसामान्य माणसाची यावर काय प्रतिक्रिया झाली असती? माझ्याच बाबतीत असे का झाले? माझेच दैव खोटे का निघाले? विजयश्रीच्या इतक्या जवळ नेऊन परमेश्वराने मला ही शिक्षा का दिली? इ. इ. आणि करोलीनेही असेच प्रश्न विचारले असते तरी आपण त्यांना नक्कीच माफ केले असते. इतकेच नाही तर त्यांनी स्वत:ची कीव करून आपल्या नशिबाला दोष दिला असता तरीही आपण त्यांना माफ केले असते, कारण तेवढा मोठा दुर्दैवी आणि करुणामय प्रसंग त्यांच्यावर कोसळला होता. ते कुणाचे तरी आश्रित झाले असते तरी ते आपण मान्य केले असते. माणसाने केलेल्या योजना, पाहिलेले स्वप्न परमेश्वर कसे छिन्नभिन्न करतो याचे करोली हे एक उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिले असते. परंतु करोलींना यातील काहीही नको होते. करोलींनी वरील गोष्टींपैकी काहीही केले नाही, कारण ते एका वेगळ्याच मातीचे बनलेले होते. आपण काय गमावले आहे (म्हणजे हमखास सुवर्णपदक मिळवून देणारा उजवा हात) यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याकडे काय शिल्लक आहे (अजून उत्तम स्थितीतील डावा हात) यावर लक्ष केंद्रित करावयाचे त्यांनी ठरविले. त्यांचे मनोबल प्रचंड कणखर होते. त्यांची मनोभूमिका जेत्याची होती. विजयी होण्याची प्रचंड जिद्द आणि धगधगता अंगार त्यांच्या हृदयात अजूनही धुमसत होता. पूर्णपणे कार्यक्षम असा आपला डावा हात अजूनही आपल्या जवळ शिल्लक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. त्यांनी विचार केला की उजवा हात निकामी झाला याचे दु:ख करीत बसण्यापेक्षा आपण आपल्या डाव्या हाताला प्रशिक्षण देऊन जगातला सर्वोत्तम नेमबाज म्हणून तयार करू शकतो. याच विचाराने ते पछाडले गेले.
त्यांचा जवळपास एक महिना हॉस्पिटलमध्येच गेला. जवळपासच्या माणसांच्या प्रतिक्रियांचा अंदाज करोलींना आला होता. त्यामुळे जगाच्या झगमगाटापासून दूर जायचे त्यांनी ठरविले. परिचितांपासून स्वत:ला वेगळे करून आपल्या डाव्या हाताने नेमबाजीचा सराव त्यांनी चालू केला. शरीराला होणाऱ्या सर्व यातना, डाव्या हातावर पडणारा ताण या सर्वाकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष करून उजवा हात जे जे करीत होता ते ते आपल्या डाव्या हाताकडून करून दाखवायचे असा निश्चयच त्यांनी केला होता. आपल्या या ध्येयावर संपूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित केले होते. एकवटले होते. आपल्या निश्चयाप्रमाणे अहर्निश प्रयत्नांनी आपल्या डाव्या हाताला करोलीने तयार केले.
वर्षांनंतर करोली हंगेरीतील नेमबाजीच्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत हजर झाले. त्यांना तेथे बघून स्पर्धेसाठी हजर असलेल्या सर्व खेळाडूंना खूपच आनंद झाला. अपघातानंतर सर्वाना पहिल्यांदाच त्यांचे दर्शन होत होते. त्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दल सर्वानाच त्यांचे खूप कौतुक वाटत होते कारण ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी येथे आले आहेत अशीच सर्वाची समजूत झाली होती. त्यामुळे सर्वानाच धन्यता वाटत होती. परंतु जेव्हा करोलींनी हे स्पष्ट केले की मी आपले कौतुक तर करायला आलोच आहे, परंतु त्याच बरोबर मी येथे आपला प्रतिस्पर्धी म्हणूनही आलो आहे. या स्पर्धेतील राष्ट्रीय मानांकन मिळविण्याचा मी निश्चय केलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सर्व प्रतिस्पध्र्याना आश्चर्याचा चांगलाच धक्का बसला.
त्यांनी सर्व प्रतिस्पध्र्यापुढे चांगलेच आव्हान उभे केले आणि करोलींनी स्पर्धेत प्रथम मानांकन मिळवले. त्याच बरोबर आपला उजवा हात निकामी झाल्यावरदेखील केवळ एका वर्षांतच आपल्या डाव्या हाताचा वापर करून स्पर्धेचे जेतेपद त्यांनी मिळवून दाखवले. इतरांच्या नजरेआड जाऊन एकांतात सराव करण्याचा करोलींचा निर्णय किती अचूक आणि महत्त्वपूर्ण होता हे त्यांनी सिद्धच करून दाखविले होते. त्यांना पटले होते की आपण खूप मोठ्ठी स्वप्ने बघितलेलीसुद्धा समाजाला सहन होत नाहीत, आवडत नाहीत. अशी स्वप्ने त्यांच्या डोळ्यावर येतात आणि अशी स्वप्ने बघणारा त्यांच्या टीकेची शिकार बनतो आणि त्यामुळे अधिकच निरुत्साही होतो. आपल्या दु:खात डुंबत राहणे खूपच सोपे असते कारण त्यामुळे आपल्याला सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ होऊन प्रवास करता येतो. परंतु प्रखर स्वयम् प्रेरणा असणारी करोलीसारखी माणसं मात्र यापासून दूर राहतात.
मानांकन मिळूनही करोलीचे ऑलिम्पिक विजयाचे स्वप्न मात्र दुर्दैवाने काही र्वष मृगजळच ठरले, कारण लागोपाठ दोन वेळेस, म्हणजे लागोपाठ आठ र्वष ऑलिम्पिक स्पर्धा जागतिक महायुद्धामुळे रद्द केल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या १९४८ सालच्या लंडन येथील ऑलिम्पिकसाठी करोलींची निवड झाली आणि त्यात आपल्या डाव्या हाताने नेमबाजी करीत त्यांनी सुवर्णपदक हस्तगत केले.
कल्पना करा सुवर्णपदकाचा संभाव्य विजेता अपघातात आपला उजवा हातच गमावून बसतो. अचानक दुर्दैवाने ग्रासलेल्या परिस्थितीतही आपल्या डाव्या हाताला प्रशिक्षण देतो, त्याला तितकाच कार्यक्षम बनवितो. आठ वर्षे ही क्षमता असूनही रद्द झालेल्या स्पर्धा परत चालू होण्याची प्रतीक्षा करतो आणि स्पर्धा सुरू होताच आपल्या डाव्या हाताने त्या स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी ठरतो तेही विशेष गुणवत्तेने. इतकेच नाही तर त्यानंतरच्या स्पर्धेतही पुन्हा एकदा सुवर्णपदक खेचून आणतो! खरे जेते अशाच मातीचे बनलेले असतात. परिस्थिती कोणतीही असो रडत न बसता जेत्याचं चैतन्य त्यांच्यात मुसमुसत असतं आणि आपले ध्येय गाठण्यासाठी ते अखंड, अथक आणि अविश्रांत परिश्रम घेतात. पुन्हा एकदा सिद्ध होते की परिस्थिती नाही, तर आपण त्या परिस्थितीला कसे सामोरे जातो हे परिणाम देणारे आहे.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. मोठ्ठय़ा यशाच्या, गौरवाच्या, कीर्तीच्या, मोठेपणाच्या आपण अगदी जवळ जातो आणि अचानक दुर्दैवाने हे सारं गमावून बसतो. सगळं जग जणू आपल्याविरुद्ध कटच करीत आहे अशी भावना होते. आपण उरी बाळगलेली स्वप्नं पूर्णपणे बेचिराख होतात, भंग पावतात. आपण संपतो, चिरडले जातो, मार खातो, हरतो, पराजित होतो आणि आक्रोश करतो, की हे असे माझ्या बाबतीतच का? असा प्रसंग यदाकदाचित आपल्यावर ओढवला तर करोलींची आठवण करा, त्यांचे स्मरण करा. खरं तर त्यांचाच सारखा विचार करा. आपण काय गमावलं आहे याची चिंता सोडा. आपल्या जवळ अजूनही काय शिल्लक आहे यावर सारे लक्ष केंद्रित करा, त्यावरच जोर द्या. आपल्या आतील ताकद, आपल्या आतील कणखरपणा याचाच विचार करा. जगातील कोणतीही ताकद या गोष्टी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही यावर संपूर्ण श्रद्धा असू द्या. अंतिम विजय आपलाच होईल.
एखादा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर आला तर स्वत:ची कीव करीत बसू नका. पश्चात्ताप करीत बसू नका, कारण पश्चात्ताप ही नकारात्मक ऊर्जा आहे. तसेच आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वेळ न दवडता लगेचच त्यातून बाहेर पडा. अशा वेळी प्रत्येक क्षण महत्त्वपूर्ण आणि निर्णायक असतो. करोलींनी आपल्या दुर्दैवी अपघातानंतर नकारात्मक प्रतिक्रिया टाळीत केवळ एक महिन्यातच सरावाला पुन्हा सुरुवात केली होती. जेव्हा आपण पडतो, डगमगतो, घायाळ होतो तेव्हा बॉक्सरसारखा विचार करा. जेव्हा तो घायाळ होतो तेव्हा त्याला दहा सेकंदांच्या आत सावरून पुन्हा युद्ध सुरू करणे आवश्यक असते. एक सेकंदही जास्त लागला तर सर्वच संपणार असते याची जाणीव त्याला ठेवावी लागते. तसेच जेते याबद्दल जागृत असतात. ते अशी वेळ कधीही येऊ देत नाहीत. पटकन सावरतात. पुन्हा आपले ध्येय निश्चित करा आणि ते गाठण्यासाठी, प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कटिबद्ध व्हा! ध्येय समोर असले की शरीर आणि मन संघटित होतात आणि उद्दिष्ट प्राप्तीसाठी जोरकसपणे कामाला लागतात. मागे वळून झालेल्या नुकसानीबद्दल वृथा काळजी करणे सोडतात. अर्थातच नकारात्मक विचार बाजूला टाकणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी सकारात्मक विचारांची प्रचंड शक्ती निर्माण करावी लागते, उभी करावी लागते. आपल्या ध्येयावरची प्रखर निष्ठा आपल्या महापुरात अशा नकारात्मक विचारांना, आपल्या प्रवाहात वाहून नेते, नामशेष करते.
ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजीचे सुवर्णपदक मिळविणे याचा संबंध हाताशी नाही, तर आपल्या मनाशी जास्त जवळचा आहे, हे करोलींनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे. आयुष्याचेही असेच आहे. यशाचा संबंध कौशल्यापेक्षा दृष्टिकोनाशी जास्त जवळचा आहे. करोलींनी हेही निर्विवादपणे सिद्ध करून दाखविले आहे, की निष्ठा असेल तर कौशल्ये निर्माण करता येतात. उजवा नाही तर डावा हात आवश्यक ते काम करू शकतो. मला तर असे वाटते की करोलीसारखी प्रखर निष्ठा असेल तर त्यातून माणूस नेमबाजी हाताऐवजी पायानेही करू शकेल आणि सुवर्णपदक मिळवून दाखवेल. अशी असते जेत्याची मानसिकता आणि मनोभूमिका!!!
करोलींचे उदाहरण तसे आधुनिक आहे, परंतु जगाचे आकर्षण झालेल्या महाभारतातदेखील अशाच प्रकारची कहाणी आलेली आहे. ही कहाणी म्हणजे एक महान धनुर्विद्या प्रवीण आणि अतिशय सुसंस्कृत महामानव एकलव्य याची आहे. एकलव्य हा निषाद महादंडनायक हिरण्यधनु याचा अतिशय सुसंस्कृत मुलगा. आपण उत्कृष्ट धनुर्धर व्हावे या हेतूने आचार्य द्रोणांकडे येतो, परंतु तो एकलव्य निशादोत्पन्न आहे आणि तो इतर शिष्यांहून धनुर्विद्येत वरचढ होऊ नये म्हणून द्रोणांनी शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला नाही.
निकृष्ट जातीचा म्हणून द्रोणांनी शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला नाही तरी एकलव्याचा उत्साहभंग झाला नाही, किंवा गुरुवर्य द्रोणाचार्यावरचा त्याचा आदरदेखील कमी झाला नाही. ज्या द्रोणांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्यास नकार दिला, त्याच द्रोणांना त्याने साष्टांग नमस्कार केला आणि जवळच्याच अरण्याचा मार्ग धरला. अरण्यात जाऊन एकलव्याने आचार्य द्रोणांचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्याच्या ठिकाणी गुरूप्रमाणे उत्तम भाव ठेवून, चांगले नियम पाळून तो श्रद्धेने धनुर्विद्येचा आणि अस्त्रांचा अभ्यास करू लागला. त्याची गुरुवर्य द्रोणाचार्यावरची श्रद्धा आणि विद्येविषयीची जिद्द अभंग होती. त्यामुळे गुरूशिवायही एकलव्याने सतत अभ्यास करून उच्च प्रतीचा धनुर्धर म्हणून कौशल्य संपादन केले. एकलव्याच्या या नैष्ठिक तपश्चर्येची द्रोणांना किंवा हस्तिनापुरातील राजकुमारांना काहीच कल्पना नव्हती. एक दिवस असा उजाडला की या सर्वाना त्याची दखल घ्यावी लागली.
एक दिवस सर्व राजकुमार द्रोणांच्या संमतीने शिकार करण्यासाठी त्याच अरण्यात आले. त्यांच्या बरोबर एक कुत्राही होता. तो चुकला आणि एकलव्य जेथे अभ्यास करीत होता तेथे आला. काळ्या, व्याघ्रजीन घातलेल्या, आणि जटा वाढलेल्या निषाद पुत्राला पाहून तो कुत्रा भुंकत त्याच्याजवळ उभा राहिला. आपल्या अभ्यासातील व्यत्यय थांबून कुत्र्यालाही इजा होऊ नये म्हणून एकलव्याने मोठय़ा कौशल्याने एकदम सात बाण मारून कुत्र्याचे तोंड बंद केले. कुत्रा तसाच पांडवांकडे परतला. त्याला पाहून वीर पांडवांना फार आश्चर्य वाटले. ते उत्कृष्ट शब्दवेधित्व आणि चापल्य पाहून त्यांनी सर्व प्रकारे त्या कृत्याची प्रशंसा केली. त्या बाण मारणाऱ्याला शोधीत असताना अरण्यात राहून धनुर्विद्येचा अभ्यास करणारा एकलव्य त्यांना दिसला. त्याला त्यांनी विचारले. ‘तू कोण आहेस, कोणाचा शिष्य आहेस?’ वगैरे चौकशी करू लागले. त्यावर एकलव्य म्हणाला, ‘वीर हो! मी निषादाधिपती हिरण्यधनुचा पुत्र आणि आचार्य द्रोण यांचा शिष्य आहे.’ अर्जुनाने ताबडतोब जाऊन हा अद्भुत प्रकार आचार्य द्रोणांच्या कानावर घातला. आपल्यापेक्षा वरचढ शिष्य आचार्य द्रोण यांना आहे याची खंत अर्जुनाला वाटत होती. ही कल्पनाच अर्जुनाला असह्य़ होती. त्याने सरळसरळ द्रोणाचार्याना त्यांच्या ‘तुझ्यासारखा धनुर्धर दुसरा कोणीही असणार नाही’ या वाचनाची आठवण करून दिली. त्यानंतर द्रोण अर्जुनाला घेऊन एकलव्याकडे गेले.
त्या वेळी एकलव्य सतत शरसंधान करीत होता. मातीच्या पुतळ्याला प्रमाण मानून वज्रकठोर निश्चयाने शरीराचे भान विसरून त्याची तपश्चर्या, उपासना, साधना चालू होती. ज्यांचे अष्टौप्रहर ध्यान व चिंतन-मनन आपण केले ते आचार्य द्रोणच आपल्याजवळ येत असल्याचे पाहताच एकलव्याने हातातले धनुष्य टाकून दिले आणि पुढे होऊन त्याने आचार्य द्रोणांना साष्टांग प्रणिपात करून त्यांचे स्वागत केले. त्यांची पूजा केली. मात्र याचवेळी द्रोणांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाची मागणी केली. ही मागणी ऐकूण एकलव्य अतिशय आनंदित झाला. हसतमुखाने आणि प्रसन्न मनाने त्याने कोणताही विचार न करता आपला धनुर्विद्येतील प्राणाधार असलेला अंगठा कापून गुरुदक्षिणा म्हणून आचार्य द्रोणांना अर्पण केला.
अर्थात पुढे एकलव्याने उरलेल्या चार बोटांचा उपयोग करून धनुर्विद्येत पूर्वीपेक्षा जास्त चांगले कौशल्य आत्मसात केले. पुढे आचार्य द्रोणांच्या मृत्यूनंतर काही तत्त्वांसाठी युद्धातही भाग घेतला. आपले कर्तृत्व दाखवले. यावरूनही हे निर्विवाद सिद्ध होते, की कौशल्य निर्माण करता येते आणि ते साधनात नाही तर साधनेत आहे. स्वत:च्या मनात आहे. मनाच्या निश्चयाची शक्ती अपार आहे आणि त्याच्या मदतीने आपण काहीही साध्य करू शकतो. मिळवू शकतो. अलौकिक गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो. अशी असते जेत्याची मानसिकता आणि मनोभूमिका !!!
जयप्रकाश भालचंद्र झेंडे – response.lokprabha@expressindia.com