या वर्षीच्या कशिश, या समलैंगिकांच्या फिल्म फेस्टिव्हलची संकल्पना होती रिचिंग आऊट, टचिंग हार्ट. समलैंगिकांच्या विश्वातले भावभावनांचे अनेक पदर या फेस्टिव्हलमध्ये सादर झालेल्या फिल्म्समधून उलगडले गेले.

‘‘म्हणजे नंगू पंगू फिल्म्स का?’’ समलैंगिकांच्या फिल्मसाठी अगदी हमखास विचारला जाणारा प्रश्न. किंबहुना समलैंगिकांच्या फिल्म्स म्हणजे केवळ आणि केवळ त्यांच्या शारीरिक संबंधांवरच असणार असा एक सार्वत्रिक गैरसमज असतो. आपण आणि ते यांची विभागणी लैंगिक ओळखीवरच झालेली असल्यामुळे की काय पण समलैंगिकांबद्दल बोलताना लैंगिकताच आधी विचारता घेण्याचा एक सार्वत्रिक कल दिसून येतो. पण त्यांना खरी गरज असते ती त्यांच्या भावना पोहोचविण्याची. त्यांच्या-त्यांच्यात, त्यांच्या-आपल्यात. एकेकाळी समलैंगिक आहोत हेच सांगण्याची चोरी असण्याच्या टप्प्यावरून आता बराच पल्ला गाठला असल्यामुळे तर ही भावना आणखीनच तीव्र म्हणावी अशी आहे. किमग आऊटच्या पुढची पातळी.. अर्थातच रिचिंग आऊटची..
म्हणूनच २०१५ च्या कशिश, या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर) क्विअर फिल्म फेस्टिव्हल संकल्पना होती रिचिंग आऊट, टचिंग हार्ट. त्यांचं विश्व म्हणजे केवळ शारीरिक नाही तर त्यालादेखील इतरांसारख्या भावभावनांचे अनेक पदर आहेत. हेच पोहोचविण्याची ही धडपड होती. जगभरातून आलेल्या तब्बल ७०० प्रवेशिकांपैकी १४४ माहितीपट, चित्रपट, लघुपटांच्या माध्यमातून ‘त्यांच्या’ भावनांचं कोलाजच या फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात आलं होतं. लिबर्टी चित्रपटगृह, अलायन्स फ्रान्सेस आणि मॅक्समुल्लर भवन येथे २८ ते ३१ मे दरम्यान सुमारे हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादात हा फेस्टिव्हल पार पडला.
अत्यंत तरलपणे भावना उलगडणाऱ्या ‘लव इज स्ट्रेंज’ या चित्रपटाने फेस्टिव्हलची सुरुवात झाली. साठीच्या आसपास पोहोचलेला संगीत शिक्षक (जॉर्ज) आणि सत्तरी ओलांडलेला त्याचा चित्रकार (बेन) जोडीदार यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील एका वेगळ्याच घटनेचे चित्रण या चित्रपटात दिसून येते. जवळपास चार दशकं एकत्र राहिल्यानंतर हे दोघे लग्न करतात. परिणामी चर्चच्या शाळेत काम करणाऱ्या जॉर्जला नोकरी गमावण्याची वेळ येते. जोडीदाराने सत्तरी ओलांडल्यामुळे दोघांचा कुटुंब सांभाळायची जबाबदारी जॉर्जवर येते. राहतं घर विकून कमी खर्चाची जागा शोधण्याची वणवण सुरू होते. जागा मिळेपर्यंत बेन राहतो पुतण्याच्या घरी आणि जॉर्ज त्याच्या आणखीन एका नातेवाईकांच्या घरी. उतारवयात झालेली ताटातूट त्याच्या नाजूक मनाला झेपत नाही. वयोवृद्ध आईवडिलांना मुलांनी वाटून घेतल्यावर जे होतं अगदी तसंच येथेदेखील.
वयोमानानुसार बडबड, लुडबुड वाढलेली असते. अर्थातच त्यांना सांभाळणाऱ्या घराचं गणित बिघडू लागतं. तर जोडीदारापासून तुटल्याच्या भावनेने मनाची घालमेल वाढलेली असते. त्यात शारीरिक संबंधांचा लवलेशदेखील नसतो. असतं ते मन खिन्न करणारं तुटलेपण. एकेदिवशी बेन गच्चीवरून चित्र काढून येताना जिन्यावर अपघात होतो. संकटात भरच पडते. अखेरीस त्यांच्या आवाक्यातलं घर मिळतं. दोघे मिळून एका अपार संतोषाने तो क्षण सेलिब्रेट करतात, जेवतात, भटकतात, भरपूर गप्पा मारतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच बेन शांतपणे हे जग सोडून निघून जातो आणि इतके दिवस बेनच्या असण्याचा त्रास वाटणारा पुतण्याचा मुलगादेखील गदगदतो.
खरं तर हे प्रसंग कोणत्याही वयोवृद्ध जोडप्याला लागू होतील असेच म्हणावे लागतील. गात्र थकल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात गरज असते ती फक्त आपल्या माणसाच्या सोबतीची. त्यात शारीरिक आकर्षणाचा भागच उरत नाही. असते ती फक्त काळजी. त्याच काळजीपोटी एक जोडीदार वणवण करतो. दुसऱ्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मधल्या काळात त्यांना सांभाळणाऱ्या चित्रपटातली एक न् एक प्रेम अगदी मोजूनमापून तोलून घ्यावी अशीच आहेत. प्रभावी संवाद, नाजूक झालेल्या मनाची घालमेल दाखविणारी दृश्य सारं काही हृदयाला थेट भिडणारं.
प्रेमाचं हे असं चटका लावणं हेच महोत्सवातील अनेक चित्रपटांतून जाणवणारे होते. यंदा डॉक्युमेंटरी आणि नॅरेटिव्ह फीचर्सची संख्या लक्षणीय तर होतीच. मुख्य धारेतील चित्रपटांप्रमाणेच व्यावसायिक मांडणी यामध्ये जाणवत होती. काही परदेशी नॅरेटिव्हमध्ये प्रकर्षांने जाणवणारी बाब म्हणजे त्यांची अनोखी मांडणी. दीड-दोन तासांच्या या प्रदीर्घ नॅरेटिव्हमध्ये सुरुवातीच्या संपूर्ण भागात एलजीबीटी संदर्भातील विषयाला थेट हात न घालता ती गोष्ट फुलवत नेणं आणि क्लायमॅक्सला थेट भावनांच्या प्रकटीकरणावर आणून वेगळी उंची गाठली गेली आहे.
सवरेत्कृष्ट नॅरेटिव्ह ठरलेल्या बॉइज हा नेदरलॅण्ड चित्रपट आणि ‘द वे ही लूक्स’ हा पोर्तुगीज चित्रपटातदेखील हाच प्लॉट वापरण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरील रिले चॅम्पियन स्पर्धेतल्या स्पर्धकांवर हे कथासूत्र बेतलेलं आहे. सराव शिबिरादरम्यान सेजर आणि मार्कची भेट होते. एकमेकांकडे आकर्षित झाले नसले तरी एकप्रकारची ओढ निर्माण झालेली असते, पण भावना व्यक्त झालेल्या नसतात. सेजरच्या भावाच्या एका कृत्यामुळे दोघांमध्ये काहीशी तेढदेखील निर्माण होते. स्पर्धेचा दिवस जवळ येत जातो आणि हे दोघेही एका चमत्कारी एकाकीपणाने वेढले जातात. स्पर्धेत मार्ककडूनच सेजरला बॅटन मिळणार असतो. मनात भीती असते की आपल्या नसलेल्या पण ताणलेल्या संबंधाचा त्यावर काही परिणाम होईल का? पण अखेरीस प्रेम जिंकते, त्यांची टीम स्पर्धा जिंकते. आणि त्याच रात्री दोघे एकत्र येतात.
महोत्सवाचा समारोप झालेल्या ‘द वे ही लूक्स’ या अंध आणि डोळस गे मित्रांच्या जीवनावरील पोतुर्गीज चित्रपटाने सर्वानाच एक वेगळाच अनुभूती मिळाली. पौगंडावस्थेतील शाळकरी मित्रमैत्रीण (ली आणि जीवो) आणि नव्याने आलेला आणखीन एक मित्र (गॅब्रियल) या त्रिकोणात हा चित्रपट फिरतो. अर्थात हा हिंदी मसालापटातला त्रिकोण नाही. ली हा अंध असल्यामुळे त्याला सदोदित मदत करणाऱ्या जीवोला गॅ्रबियलच्या येण्याने दुराव्याची भावना जाणवू लागते. तर इकडे ली आणि ग्रॅबियल शालेय प्रोजेक्टच्या निमित्ताने जवळ येतात. मैत्रीण जिवाभावाची असते, पण तिच्याबद्दल लीला इतर कसलीच भावना नसते की त्याला त्याबद्दल काही माहीत असते. ग्रॅबियलचं लीला समजून घेणं आवडू लागतं आणि न कळत आकर्षण वाढू लागतं. पण कोणीच कोणाबद्दल काही बोलत नसते. शालेय पार्टी, पिकनिक, एक्स्चेंज प्रोग्राम अशा घटनांमधून अनेक गोष्टी घडतात. तिघांच्या नात्यात दुरावा वाढतो. अखेरीस एके दिवशी जीवोच पुढाकार घेते आणि ली-ग्रॅबियल एकत्र येतात.
लीचं अंध असणं, त्याच्या दृष्टीने रंग, रूप, शरीर या भावना दुय्यम असणं आणि केवळ वागण्या-बोलण्यातून जाणवणारी आधाराची प्रेमाची भावना तयार होणं यावर कथानकाची पातळी उंचावली आहे.
‘वेटिंग इन द विंग्ज- द म्युझिकल’ हा चित्रपट एकदम धम्माल पद्धतीने मांडला आहे. कलाकारांच्या एजन्सीच्या गफलतीमुळे ब्रॉडवेवर पाठवयाचा कलाकार जातो स्ट्रीपर बारमध्ये आणि तिकडचा कलाकार येतो ब्रॉडवेवर. कार्यक्रमाच्या सादरीकरणाचं काठिण्य, कलाकाराचं गे असणं यामुळे प्रशिक्षक अडचणीत पडतो. तोदेखील गे असतो. अर्थात हे सारं धम्माल पद्धतीनं मांडल्यामुळे एक निखळ करमणूकदेखील होते.
यंदाच्या ऑस्ट्रेलिया केंद्रित चित्रपटांना विशेष वेळ देण्यात आला होता. वैविध्यपूर्ण विषयांच्या हाताळणीचे तब्बल वीस चित्रपट यामध्ये दाखविण्यात आले. त्यापैकी ‘द ड्रीम चिल्ड्रन’ एकदम वेगळ्या वळणाचा. गे जोडप्याला हवं असणारं मूल सरोगसीमधून मिळतं, पण काही दिवसांनी सरोगसी माताच मुलावर हक्क सांगायला येते. सरोगसी माता, तिचा बॉयफ्रेंड आणि गे जोडपं यांच्यातल्या संघर्षांचं अगदी यर्थाथ चित्रण करून एलजीबीटी समुदायाच्या संभाव्य अडचणीला वाचा फोडली असेच म्हणावे लागेल. त्याचबरोबर इंटरसेक्स या नव्याने प्रकाशात येणाऱ्या घटकाला स्पर्श करणारा ‘बॉय मीट गर्ल’ हादेखील काहीसा भविष्यवेधीच म्हणावा लागेल.
भारतीय चित्रपटांच्या मुख्य धारेतील काही चित्रपटदेखील येथे दाखविण्यात आले. क्विस्सा ष्टय़ा पंजाबी चित्रपटातून तर अगदी खोलवर रुजलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेचा परिणाम मुलांवर कसा होऊ शकतो हे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. फाळणीदरम्यान पंजाबातील एका स्थलांतरित
शेतक ऱ्याला सलग चौथ्यांदा मुलगीच (कंवर) होते. सामाजिक परिस्थितीचा पगडा इतका असतो की सरदारला मुलगा नाही हे त्याला सहन होत नसते. त्यामुळे तो त्या मुलीला मुलगी म्हणून जगू न देता मुलासारखेच वाढवतो. सारे मुलाचे संस्कार करतो. एका निसटत्या क्षणी मुलगा म्हणूनच तिचं लग्न एका मुलीशी केलं जातं आणि एका संघर्षांला सुरुवात होते. स्त्रीत्वाची ओळख पूर्णपणे पुसून टाकलेल्या कंवरला आपली नेमकी ओळख काय, हाच प्रश्न सतावू लागतो. परिणामी जगासाठी मुलगा पण खरी मुलगी असणाऱ्या कंवरला या सर्व गुंत्यातून सुटका करण्याची संधी मिळाली तरी त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. लैंगिक ओळखीचा हा गुंता थेटपणे आणि भेदकपणे मांडला आहे, पण शेवटच्या दहा मिनिटांत मसाला चित्रपटाप्रमाणे संकल्पनेची माती केली आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय शॉर्ट फिल्ममध्ये करण्यात आलेले अनेक नवे प्रयोग पाहता आले. ‘द फुलस्टॉप दॅट सर्चेस फॉर इटस् एंड’ ह्य़ा दाक्षिणात्य लघुपटाने आयुष्याच्या सायंकाळी थांबलेल्या शोधाची घेतली आहे. शाळा-कॉलेजपासून एकत्र असणाऱ्या दोन मित्रांपैकी एकाचं लग्न होतं, त्याला मूलदेखील होतं. मात्र त्याच वेळी कृष्णन हा दुसरा मित्र त्याच्याविषयी असणारी प्रेमाची भावना व्यक्त करतो आणि मित्राच्या आयुष्यातून निघून जातो. पुढे कधीच भेटत नाही. आयुष्यभर परत येत नाही. मात्र कृष्णनची भेट न होणं हे कायमच मनाला खात होतं. आणि अचानक आयुष्याच्या सायंकाळी त्याचा फोन येतो आणि एक शोध थांबतो. जोडीदाराप्रती असणारी उत्कट प्रेमाची अनोखी भाषा मांडणाऱ्या या चित्रपटाने परीक्षकांचे मनदेखील जिंकले.
महोत्सवातला सर्वात भन्नाट आणि धम्माल चित्रपट म्हणजे ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ प्रिसिलिया-क्वीन ऑफ डेझर्ट.’ १९९४ सालचा हा चित्रपट क्वीअर क्लासिक म्हणून ओळखला जातो. तीन समलिंगी ऑस्ट्रेलियाच्या एका टोकावरून निघून महाप्रचंड असं वाळवंट पार करत दुसऱ्या टोकाच्या रिसॉर्टमध्ये कार्यक्रमासाठी जात असतात. त्यांचा हा प्रवास अफलातून अशा लवेंडर रंगाच्या बसमधून (प्रिसिलिया) होतो. प्रिसिलियाचा हा प्रवास म्हणजे मानवी भावभावनांचं, साजरीकरणाचं जगाच्या प्रतिक्रियांचं आणि उत्साहाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. अप्रतिम अशी सिनेमॅटोग्राफी, उत्कृष्ट लोकेशन्स आणि या तिघांचं धम्माल कॉम्बिनेशन यातून तयार होणारा निखळ करमणुकीच्या सक्षम प्लॉटवर चित्रपट बेतला असला तरी जाता जाता अंतर्मुख करून जातो.
कशिश, हा चित्रपट-लघुपटांचा महोत्सव असला तरी त्या समुदायाच्या चळवळीचादेखील भाग आहे. त्यातच आपल्या देशात कायद्याने समलिंगी संबंधांना मान्यता नसल्यामुळे या चळवळीला आणखीनच धार येते. समलिंगी समुदायाला छळणारं भारतीय कायद्यातलं ३७७ वं कलम हा अत्यंत संवेदनशील असा विषय. देशात समलैंगिकांनी उघडपणे व्यक्त व्हायला सुरुवात केल्यानंतर ३७७ चा वापर कसा होत गेला हे श्रीधर रंगायन यांनी ‘ब्रेकिंग फ्री’ या माहितीपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडलं आहे. २००७ ते २०१४ या काळातील ३७७ चा हा प्रवास कोणत्याही संवेदनक्षम व्यक्तीला चीड आणणारा आहे. समलिंगींच्या समुदायाने झेललेल्या अन्यायाचं हे दस्तऐवजीकरण प्रकाशात आणून श्रीधर रंगायन यांनी पुन्हा एकदा या विषयाला वाचा फोडली आहे. संपूर्ण देशभरातील समलिंगींच्या मुलाखती, कायदेतज्ज्ञांची मते, अभ्यासकांची निरीक्षणं यांचा समावेश असणारी हा माहितीपट केवळ समलिंगींसाठी नाही तर इतर लोकांनीदेखील आवर्जून पाहावी अशीच आहे.
२००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना परवानगी दिल्यानंतरच्या काळात देशभरात या विषयावर खूपच अवेअरनेस तयार झाला होता. परिणामी अनेकांनी आपली लैंगिक ओळख खुलेपणाने मांडण्याचं धाडस केलं. अर्थात आपल्या पारंपरिक समाजात हे मांडणं इतकं सोप्पं कधीच नव्हतं. पण नव्या पिढीतल्या तरुण-तरुणींनी कुढत जगण्यापेक्षा आपली ओळख अगदी बेधडकपणे मांडली. सिद्धांत मोरे, अनुजा पारेख, उर्मी जाधव यांनी स्वत:ची ही कहाणी स्वत: मांडलेला लघुपट म्हणजे ‘टेल मी अ स्टोरी’. या पाच जणांच्या प्रातिनिधिक मांडणीमुळे समलिंगींच्या सद्यस्थितीवर प्रकाश पडण्यास मदत होते.
अर्थात आज ही सारी चळवळ बऱ्यापैकी जोर पकडू लागली आहे. इतकंच नाही तर ‘मिस्टर गे ऑफ द वर्ल्ड २०१४’ मध्ये स्पर्धेत सुशांत दिगवीकर याने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. अत्यंत उत्साही, धम्माल आणि एक उत्तम गायक, नर्तक अशा ह्य़ा कलाकाराने महोत्सवातील समारोपाच्या वेळी तर धम्माल केलीच, पण त्याच्या मिस्टर गे स्पर्धेवर आधारित चित्रफितीतून जागतिक स्तरावरचा त्याचा वावर, त्याने तेथे मिळवलेली बक्षिसं ह्य़ा पाश्र्वभूमीवर जग आपल्याकडे कसे पाहते याची जाणीव होते.
चार दिवस तीन प्रेक्षागृहांत सुरू असणाऱ्या या महोत्सवाने एकूणच एलजीबीटी समुदायाला एक उत्साहाचा बूस्टर डोसच दिला आहे. लैंगिकतेच्या पलीकडे जाऊन, स्ट्रेट लोकांच्या भावभावना येथेदेखील असतात. त्यांचे राग-लोभ, रुसवे-फुगवे, ताणेबाणे असे नातेसंबंधात असणारे सारे घटक एलजीबीटी समुदायालादेखील लागू होतात हेच या चित्रपटांनी प्रकर्षांनं जाणवून दिलं. केवळ नंगू-पंगू चित्रपट म्हणून याकडे पाहता येणार नाही याचं भान जगभरातील चित्रपटांनी दिलं, आता हेच भान इतरांपर्यंतदेखील पोहचणं गरजेचं आहे, तेव्हा हा महोत्सव त्यांचा न राहता सर्वाचा होईल.

कशिश २०१५ पुरस्कार
कशिश रेनबो वॉरियर अ‍ॅवार्ड – बेटू सिंग
बेस्ट इंडियन शॉर्ट नॅरेटिव फिल्म – ‘सुंदर’ – (रोहन कानवडे) आणि ‘अ फुल स्टॉप दॅट सर्चेस फॉर इटस् एंड’
– (विवेक विश्वनाथन)
रियाद वाडिया अ‍ॅवार्ड फॉर बेस्ट इमर्जिग फिल्ममेकर
– वैभव हातकर – ‘एक माया अशी ही’
बेस्ट डाक्युमेंटरी फीचर – ‘डू आय साऊंड गे?’ – डेव्हिड थोर्पे
बेस्ट डाक्युमेंटरी शॉर्ट फिल्म अ‍ॅवार्ड – ‘नोविना’ – अ‍ॅना रॉजर्स
बेस्ट इंटरनॅशनल नॅरेटिव फिल्म – ‘०९:५५ – ११:०५ इंग्रिड एकमन बर्गजगॅटन ४बी’ – क्रिस्टिन बर्गलंड
बेस्ट नॅरेटिव फीचर फिल्म अ‍ॅवार्ड – ‘बाइज’ – मिशा कॅम्प
बेस्ट परफॉर्मन्स – क्रिस्तिना हर्नानडेट्झ ट्रान्सजेंडर अ‍ॅक्टर
– ‘स्टेल्थ’

डॉक्युमेंटरी फीचर्सची दमदार छाप..
यंदाच्या महोत्सवात डॉक्युमेंटरी फीचर्स गटातली सर्वच फिल्म उत्तम होत्याच पण, डू आय साऊंड गे, आऊट इन द लाइन-अप, ओपन विंडोज, कार्लाज जर्नी, टू मेन अ‍ॅण्ड अ क्रेडल हे पाच माहितीपट प्रभावी असल्याचे परीक्षक चित्रा पालेकर यांनी लोकप्रभाशी संवाद साधताना सांगितले. पाचही माहितीपटांनी अत्यंत मेहनतीने विषय पोहोचविण्याचं काम केले आहे. त्यात विषय वैविध्य तर आहेच, पण तांत्रिक बाबीदेखील तेवढय़ाच सक्षमतेने हाताळल्या आहेत.
डू आय साऊंड गे हा माहितीपट म्हणजे एका गे व्यक्तीने घेतलेल्या अनेक लोकांच्या (गे आणि स्ट्रेट) मुलाखतीचे अप्रतिम संकलन आहे. गे समुदायच्या साऱ्या प्रश्नांचे सारे कंगोरे यात टिपले आहेत. आपले सारे पूर्वग्रह आणि चौकटीतल्या कल्पना मोडून काढणारा माहितीपट असेच त्याबाबत म्हणावे लागेल. त्यामागे मेहनत तर आहेच, पण मांडणीच्या वेगळेपणामुळे ते आणखीनच प्रभावी झाले आहे.
असेच दुसरे डॉक्युमेंटेशन आहे ते आऊट इन द लाइन-अप या माहितीपटातून दिसून येते. जगभरातील सी – सर्फर्समध्ये असणाऱ्या गे व्यक्तींच्या.. पट येथे दिसून येतो. तर टू मेन अ‍ॅण्ड अ क्रेडल या माहितीपटात पॅरिसमध्ये राहणाऱ्या गे जोडप्याने मुलासाठी केलेली धडपड मांडली आहे. त्या दोघांना हव्या असणाऱ्या मुलासाठी अमेरिकेतली एक महिला सरोगसीसाठी तयार होते. पितृत्वाची आस, त्याची असोशी, प्रेम, आपण बाप होणार याचा आनंद, अभिमान हे सारे तरल बारकावे या माहितीपटात उलगडतात.
ओपन विंडोज हा माहितीपट उतारवयातील लेस्बियनांच्या आयुष्याची चर्चा करतो. उतारवयातील सुरक्षा, भावभावना अशा अनेक घटकांना स्पर्श करत हा माहितीपट एका वेगळ्या वाटेवर घेऊन जातो. तर लेस्बियन असणाऱ्या कार्ला या माद्रिद संसद सदस्याच्या आयुष्याचा पटच ‘कार्लाज जर्नी’मध्ये उलगडण्यात आला आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर आपल्या शहरात परत आलेली कार्ला एलजीबीटी कम्युनिटीसाठी झगडणारी कलाकार, टीव्ही अँकर आहे. तिच्या आयुष्याची चित्तथरारक कथा प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेल.

मराठीची आघाडी..
समलैंगिकत्वाची संकल्पना जगभर बहुतांश ठिकाणी मान्य झालेली असल्यामुळे परदेशी चित्रपटांचे प्रमाण अधिक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारतीय चित्रपट, माहितीपट आणि लघुपटांनीदेखील आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. या वर्षी २१ भारतीय चित्रपट, माहितीपट आणि लघुपट महोत्सवात दाखविण्यात आले. तर छबी, जयजयकार, अ लव सच अ‍ॅज धिस (एक माया अशीही), शॉट, डिल्यूजन (भ्रम), सुंदर या सहा मराठी लघुपटांनी एकदम वेगळ्या पातळीवरील भूमिका, संकल्पना मांडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यातून व्यक्त होण्यापलीकडचा विचार दिसून येतो. पण मोजकाच एखादा दुसरा अपवाद वगळता तांत्रिक कौशल्यात उणिवा जाणवल्या. गणेश मतकरी, मनोज थोरात, रोहन कानवडे, वैभव हातकर आणि शंतनू गणेश रोडे यांच्या लघुपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
कमी शब्दात, कमी वेळात एखादी गोष्ट थेटपणे कशी भिडवायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेश मतकरी यांची ‘शॉट’ ही शॉर्ट फिल्म. दोन महिला कलाकारांच्या चित्रपटातील चुंबनदृश्यापूर्वी त्या दोघींची मेकअप रूममधील चर्चा हा या लघुपटाचा विषय. दोघींपैकी एकीला हे दृश्य देण्यात फारसे वावगे वाटत नसते, तर दुसरीला ते दृश्य काहीही करून टाळायचे असते. या मुद्दय़ावरून होणारी चर्चा दाखवली आहे. हा प्रसंग चित्रित का करायचा नाही, तर त्यामागे दुसऱ्या महिला कलाकाराला पहिल्या कलाकाराबाबत असणारे आकर्षण. या चुंबनदृश्यामुळे या आवडण्याच्या पुढचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता तिला सतावत असते. दृश्य टाळण्यामागच्या कारणावर लघुपट संपतो. समलैंगिकतेच्या मुळाशी दडलेली भीती अथवा दबलेपण तर त्यातून दिसतेच, पण हे सारे मांडताना होणारी घालमेल, घुसमटदेखील.
सुंदर, एक माया अशीही आणि भ्रम या तीन लघुपटांमध्ये एलजीबीटी कम्युनिटीतल्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. हे तीनही लघुपट एलजीबीटी या संकल्पनेकडे हे केवळ उच्चभ्रूंचे फॅड नसून समाजातल्या अगदी सामान्य स्तरातल्या समूहातदेखील असे असू शकते हे मांडणारे आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याची उकल याचा विचार करायला लावणारेदेखील आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्यामागे एक कथासूत्र आहे.

‘एक माया अशीही’ या लघुपटातून घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरातील घालमेल टिपण्यात आली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेला जेव्हा कळते की तिचा मुलगा गे आहे आणि त्याला एक बॉयफ्रेंड आहे, तेव्हा तिला स्वीकारताच येत नाही. हे नैसर्गिक आहे हे तिच्या पचनीच पडत नाही. शेकडो प्रश्नांचे जंजाळ तिच्या डोक्यात तयार झालेले असते. त्यातून होणारे वादविवाद, भांडण यामुळे एके दिवशी मुलगा घर सोडून जातो आणि त्याची आई त्याला शोधत त्याच्या बॉयफ्रेंडच्या घरी जाते. तेव्हा तिला सुखद धक्का बसतो. कारण बॉयफ्रेंडच्या आईने ही परिस्थिती स्वीकारलेली असते. घरकाम करणाऱ्या महिलेला ती हे सारे समजावून देते आणि ती मुलांचे वास्तव स्वीकारते.
एखाद्या कष्टकरी घरात जेव्हा असा प्रसंग उद्भवला तर काय होऊ शकेल याचे अगदी नेमके चित्रण यात मांडले होते. वैभव हातकरचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयोग. महत्त्वाचे म्हणजे त्याने स्वत: यात कामदेखील केले आहे. घरकाम करणाऱ्या आईची भूमिका छाया कदम यांनी अगदी चोखपणे साकारली. विशेषत: मुलगा गे आहे हे कळल्यानंतरचे हताशपण आणि त्रागा या दोन्ही गोष्टींमुळे प्रसंगाची तीव्रता थेट जाणवते.
भ्रम हा लघुपट तर आणखीनच वेगळा पैलू मांडणारा आहे. समलैंगिकत्व मान्य केलंय पण सद्य:स्थितीतल्या भेदभावाच्या इतर पारंपरिक भिंती (जातपात, धर्म, वर्ण, वर्ग) या तशाच असतील तर काय होते हे दिसून येते. पुण्यासारख्या शहरातली सामाजिक कामात असलेली ब्राह्मण आई मुलाचं गे असणे स्वीकारते पण जेव्हा त्याचा बॉयफ्रेंड भेटायला येतो आणि तो दलित आहे हे कळल्यावर मात्र ते तिला स्वीकारणे जड जाते. किंबहुना आजवर मुलाचे सारे बदल स्वीकारले असले तरी त्याचा जोडीदार जातीबाह्य़ तोही दलित असणे तिला झेपत नाही.
सुंदर या लघुपटातून रोहन कानवडे यांनी खूपच सुंदर पद्धतीने एका ट्रान्सजेंडरच्या मनातील घालमेल पडद्यावर आणली आहे. जयूला नवरात्रीच्या दिवसात स्त्रीवेशात दांडिया खेळायची इच्छा असते. आईवडिलांचा विरोध, समाज काय म्हणेल याची भीती, किंबहुना गेल्या वर्षांतील दांडियाचा अनुभव असल्यामुळे त्याला बाहेर न सोडणे. मनातल्या इच्छा दाबून ठेवत कोंडमारा सहन करत तो झोपी जातो. पण अखेरीस इच्छाशक्तीचा विजय होतो. सारी वस्ती गाढ झोपी गेल्यावर जयू देवीच्या मांडवात येतो आणि नाचू लागतो. येथपर्यंत कृष्णधवल तेदेखील गडद पद्धतीने असणारे चित्रीकरण जयूच्या गिरकीनुसार बदलते आणि त्याला हव्या असणाऱ्या लाल रंगाच्या साडीत साऱ्या दागदागिन्यासहित अत्यंत आनंदाने मनापासून नाचणारा ट्रान्सजेंडर दिसू लागतो. दृश्यमाध्यमाचा पुरेपूर आणि परिणामकारक वापर करत एखादा टर्निग पॉइंट किती प्रभावीपणे मांडता येतो त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. गोष्टीतल्या बदलाचा थेट परिणाम करणारे आहे.

मुख्य धारेतील व्यावसायिकांनी भारतीय एलजीबीटी चित्रपटात यावं..
– चित्रा पालेकर, परीक्षक
महोत्सवातील भारतीय चित्रपट, लघुपटांमध्ये विषयवैविध्य होते पण एक व्यावसायिक कौशल्याची उणीव मात्र मांडावी लागेल. परदेशातील कलाकृतींची मांडणी, त्यामागील कष्ट, तांत्रिक कौशल्य यामानाने आपण कमी पडतो. हजारो लोकांपर्यंत हा विषय प्रभावीपणे पोहोचण्यासाठी, चित्रपटाचे माध्यम पूरक आणि महत्त्वाचे आहे. म्हणूनच मुख्य धारेतील भारतीय सिनेमाकर्त्यांनी या विषयाकडे वळावे जेणेकरून त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा लाभ मिळेल आणि येथेदेखील तसेच दर्जेदार चित्रपट तयार होतील आणि त्याचबरोबर या चळवळीतल्या लोकांना चित्रपट निर्मितीचे व्यावसायिक कौशल्य जाणीवपूवर्क द्यावे लागेल, जेणेकरून त्यांचे विषय ते आणखीन प्रभावीपणे मांडू शकतील. महोत्सवात एलजीबीटी समुदायाव्यतिरिक्त इतर लोकदेखील येतात, पण चित्रपटप्रेमींची मंडळं आहेत. त्यांचा समावेशदेखील येथे कसा करता येईल हे पाहावे लागेल. प्रभात, इफी, मामी अशा महोत्सवांना हजेरी लावणाऱ्यांनी हेदेखील चित्रपट आवर्जून पाहावे असेच आहेत.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com