काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गाला एकदा तरी भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काश्मीरला जाऊन तिथल्या बर्फाचा आनंद लुटण्याचा अनुभव आपल्यासारख्या उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांना आगळावेगळाच ठरतो.

काश्मीर.. भूनंदनवन, काश्मीर.. पृथ्वीवरील स्वर्ग. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेले, शंकर-पार्वतीच्या विहाराने दैवी स्पर्श लाभलेले, जन्माला यावे आणि एकदा तरी पाहावे असे म्हटले जाणारे काश्मीर. आपणही पाहावे अशी माझी फार इच्छा होती. गेल्या वर्षीच मी हिमाचल प्रदेश पाहिला होता. उंच उंच वृक्ष, खळाळणाऱ्या नद्या, रंगीबेरंगी फुले, सफरचंदाच्या बागा हे सर्व पाहायला मिळाले होते. पण रोहतांगपास वगळता बर्फाच्छादित सौंदर्य पाहायला मिळाले नव्हते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेल्यास मनसोक्त बर्फ आणि बर्फवृष्टी अनुभवायला मिळते असे समजले. याच वेळी एका युरिस्ट ऑपरेटरची ‘ऑफ सीझन कॉस्ट सेव्हर टूर’ची जाहिरात वाचनात आली. माझे दोन्ही गुडघ्यांचे रिप्लेसमेंट ऑपरेशन झाले असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. संभाव्य तापमानाची माहिती घेऊन गरम कपडय़ांची जुळवाजुळव केली. पैसे भरले आणि बर्फातले काश्मीर पाहण्यास सज्ज झालो.
पुणे-श्रीनगर व्हाया दिल्ली असा विमानप्रवास होता. श्रीनगर येथे केसरी ग्रुप जॉइन करायचा होता. पण नमनालाच माशी शिंकली. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला नेमके याच दिवसात फाशी जाहीर झाल्याने श्रीनगर येथे निदर्शने झाली व अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू झाली. वातावरण अशांत होते. धाडस करून विमानात बसलो. दिल्लीला पोहोचताच समजले, काश्मीरमध्ये गारांची वृष्टी झाल्याने श्रीनगरसाठीची विमानसेवा कधी सुरू होईल सांगता येत नाही. आमची कनेक्टिंग फ्लाइट असल्याने सामान तर श्रीनगरलाच मिळणार होते. आम्ही उभयता एअरपोर्टवर बसून राहिलो. अखेर अडीच तासांनी विमान सुटले आणि चाळीस मिनिटांत आम्ही श्रीनगरला उतरलो. त्या दिवशी तिथे कर्फ्यू पुकारलेला होता. पण आमच्या हॉटेल मालकाने टॅक्सी पाठवली होती. ड्रायव्हर अनुभवी होता. तो म्हणाला, तुमचे तिकीट प्रत्येक सिक्युरिटीवर दाखवा. टुरिस्टना येथे त्रास दिला जात नाही. टॅक्सीत बसलो. हवेत एकदम फरक होता. तापमान ० अंश डिग्री होते. जीवघेणी थंडी, हातपाय कापू लागले. दात वाजू लागले. बुटाच्या आत असूनही पाय बधिर झाले. तीन स्वेटर चढवूनही थंडी वाजतच होती. बंदमुळे मनात भीती होती. खिडकीतून बाहेर पाहिले तर निर्मनुष्य रस्ते, जागोजागी बर्फाचे ढीग, दोन्ही बाजूस उंचच उंच खराटय़ासारखे निष्पर्ण वृक्ष आणि दहा दहा फुटांवर स्टेनगनधारी जवान. श्रीनगरचे प्रथम दर्शन मनाला आणि डोळय़ांना सुखावणारे मुळीच नव्हते. आम्ही निराश झालो.
आम्ही उतरणार होतो ते हॉटेल अकबर एअरपोर्टपासून बारा किलोमीटर्स दूर होते. छोटेसे पण टुमदार हॉटेल. रेखीव चेहऱ्याचे आणि मजबूत बांध्याचे उंचेपुरे चार जण आमचे सामान उचलण्यासाठी धावले. प्रत्येकाचा एक हातोपा लोंबकळत होता. मनात धस्स झाले. वाटले, दंगलीत या लोकांनी आपले हात गमावले की काय? पण मग समजले, थंडीत येथे सगळे जण लांब व ढगळ गरम कोटाच्या आता ‘कांगडी’ म्हणजे पेटते निखारे असलेली शेगडी पोटाशी धरतात. आम्ही उत्सुकतेने ती शेगडी पाहून घेतली. आमच्या दिमतीला फारुख नावाचा उमदा तरुण होता. त्याने खोलीत हीटर, गरम पाणी, गरम चहा अशी जमवाजमव करून दिली. थंडी मी म्हणत होती. जेवण करून झोपलो. रात्री हलक्याशा आवाजाने जाग आली. पावसाचा भास होता. पहाटे पहाटे पुन्हा जाग आली. पडदा बाजूला करून बाहेर पाहिले आणि आम्ही थक्क झालो. संपूर्ण परिसर गुडघाभर उंचीइतक्या भुसभुशीत बर्फाने भरून गेला होता. झाडे, सभोवतालचे डोंगर, इमारतीचे छप्पर सर्वत्र कापसासारख्या बर्फाचा थर होता. आकाशातून रांगोळीसारखे बर्फ सांडत होते. चांदणे पाझरणे म्हणजे असेच असणार. निसर्गाचे ते विलक्षण शांत, शुभ्र आणि अतीव थंड रूप पाहून आम्ही स्तिमित झालो. अनेक सिद्धहस्त लेखकांनी लिहिलेले काश्मीरचे वर्णन मी वाचले होते. पण हे दृश्य त्यापलीकडचे आगळीच अनुभूती देणारे होते. आम्ही त्या बर्फाच्या समुद्रात घुसलो. हाताने त्याचे गोळे करून त्याचा स्पर्श अनुभवला. वय विसरून मनमुराद खेळलो. खूप फोटो काढले. ट्रिप सुरू होण्यापूर्वीच आम्हाला आनंद मिळत होता. कॅमेरा न पकडता येणारा अभूतपूर्व, अविस्मरणीय अनुभव होता.
दुसऱ्या दिवशी सगळा ग्रुप एकत्र जमला. सर्व जण जवळच्याच ‘निशीन लेक’मधील हाऊस बोटीवर मुक्काम करणार होतो. संथ पाण्याने भरलेल्या सरोवरात अतिशय सुंदर कोरीव काम केलेल्या हाऊस बोटी नांगरल्या होत्या. बोट कसली, थ्री बीएचके फ्लॅटच होता तो. सुंदर लाकडी कोरीव काम, गालिचे, सर्व सुखसोयी सुविधा, उबदार शेगडी आणि दिमतीला देखणा सेवक. इथले सगळेच स्त्रीपुरुष रेखीव, गोरेपान अणि सुंदर आहेत. सरोवराच्या पाण्यात बर्फाच्या डोंगरांचे प्रतिबिंब, विलक्षण शांतता. रात्र असल्यामुळे परिसरातल्या बर्फावर निळा रंग चढला होता. स्वर्ग म्हणजे याहून काही वेगळा असेल असे नाही वाटत.
दुसरे दिवशी सकाळीच ‘गुलमर्ग’ पाहण्यासाठी निघालो. श्रीनगरपासून ५७ कि.मी.वर गुलमर्ग आहे. समुद्रसपाटीपासून २६५३ फूट उंचीवर कपाच्या आकाराचा डोंगर आहे. हिरव्यागार उंचच उंच फर वृक्षांनी वेढलेल्या या परिसराला पार्वतीच्या नावावरून ‘गौरीमार्ग’ असे म्हणत. पण १५८१ मध्ये मुघल राजा युसूफ शहाने याचे नाव ‘गुलमर्ग’ ठेवले. मे महिन्यात बर्फाऐवजी या भागात निळी- जांभळी- पिवळी- पांढरी रानफुले गालिचा अंथरतात. टनमर्ग या पायथ्यापासून गुलमर्गला मिनी बसने जावे लागते. तेथेच गमबूट, फरकोट भाडय़ाने मिळतात. हा सरंजाम चढवून आम्ही निघालो. सुंदर नागमोडी रस्ता, दोन्ही बाजूला उंच उंच वृक्ष अंगाखांद्यावर बर्फाचे अलंकार घालून उभे, नजर पोहोचेल तिथपर्यंत शुभ्र बर्फ आणि नीरव शांतता, निसर्गाचा हा आविष्कार आमच्यासाठी नवीन होता. बस पार्किंगमध्ये पोहोचताच स्लेजगाडीवाल्यांनी गराडा घातला. पार्किंग ते गंडोला स्टेशन हा दोन किलोमीटर्सचा रस्ता पायी जाणे अशक्य नव्हते. पण बर्फावरून पाय घसरत असल्याने अवघड होते. स्लेजगाडीवरून आम्ही ‘गंडोला’ म्हणजे केबल-कापर्यंत पोहोचलो. सहा जण बसू शकणारी, अॅटोमॅटिक दरवाजे असणारी, ही एक काचेची खोली असते. त्यात बसून प्रवास करीत नजारा पाहणे म्हणजे पर्वणीच होती. खाली बर्फाने भरलेली दरी, स्कीइंग करणारी मुंग्यांएवढी माणसे, चौफेर बर्फाच्छादित पर्वतरांगा, पायथ्याशी पाइन, फर, चिनारचे हिरवेगार उंच वृक्ष, त्यावर चांदण्यासारखे पडलेले बर्फ या सर्वामधून गंडोलात बसून अधांतरी प्रवास करणारे आपण. फार रोमांचकारी अनुभव होता. आमच्याबरोबर तरुण मुली होत्या. त्यांनी या प्रदेशात चित्रित झालेली गाणी आठवून आठवून म्हटली. पहिल्या फेजवर उतरून बर्फात थोडी धमाल केली आणि दुसऱ्या फेजवर ‘खिलनमर्ग’ येथे पोहोचलो. पुन्हा बर्फाचा समुद्र. तापमान उणे ७ डिग्री. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे स्वच्छ सूर्यप्रकाश होता. ऊन बर्फावर पडल्याने चांदीच्या डोंगरावर उभे असल्याचा भास होत होता. आम्ही साधारण सात हजार फूट उंचीवर होतो.

खळखळ वाहणारी लीडर आणि संगीत नदी, दोहो बाजूस वृक्षराई, बर्फाचे डोंगर हा तर निसर्गाचा अविभाज्य भागच होता.

केबल-कारचा प्रवास संपवून परत आलो. येताना पुन्हा भारावून टाकणारी शांतता, थंडी आणि वृक्षराई, बर्फाचे डोंगर. निसर्गाचे हे रूप मला शंकरासारखे भासले. या विराट रूपापुढे आपण किती क्षुद्र आहोत हे जाणवले. मी नतमस्तक होऊन हात जोडले. हा नमस्कार ईश्वरी, दैवी निसर्गाला होताच, पण बर्फाने वेढलेल्या निर्मनुष्य पर्वतांवर उभे राहून सतत पहारा देणाऱ्या सैनिकांनाही होता. ते डोळय़ात तेल घालून सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण मजा करू शकतो. परत येऊन हाऊस बोटीवर मुक्काम केला. रात्री पाण्यात उतरलेले चांदणे पाहात पाहात निद्राधीन झालो.
सकाळी श्रीनगर दर्शनासाठी बाहेर पडलो. सर्वप्रथम शंकराचार्य मंदिर पाहिले. २६५ पायऱ्या चढून जावयाचे होते. वरून श्रीनगर शहराचा मनोरम देखावा दिसतो. सुंदर नैसर्गिक दगडी बांधकामाचे प्रशस्त मंदिर, काळेभोर शिवलिंग, शेजारी शंकराचार्याचे तपाचे स्थान पाहून परतलो. आता जगप्रसिद्ध दल लेकमध्ये शिकाऱ्यातून तीन तासांचा प्रवास करायचा होता. रंगीबेरंगी कशिद्याने सजवलेल्या कापडांनी शिकारे नटले होते. बसायला मऊ गादी, पांघरायला उबदार रग, पहाडी आवाजात गाणारा नावाडी. सहा किमी. लांब आणि तीन किमी. रुंद अशा या लेकमध्ये संथपणे प्रवास करताना फार मजा आली. वाटेत तराफ्यात बसून हँडीक्राफ्टचे नमुने, शाली, ड्रायफ्रूट घेऊन विक्रेते भेटत होते. फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी मागे लागले होते. ‘चारचिनार’ या बेटावर उतरून खास काश्मिरी कावा म्हणजे गरम मसाल्याचा मध घातलेला चहा घेतला. थोडी विश्रांती घेऊन परतलो. संध्याकाळी शालिमार, निशात या बागा पाहिल्या. पण हा सीझन फुलांचा नसल्याने केवळ बागेची भव्य रचना पाहण्यावरच समाधान मानावे लागले. केशराचे मळे आणि टय़ूलीप गार्डनसुद्धा या दिवसात उमलत नाही. सुप्रसिद्ध ‘हजरतबल दर्गा’ वाटेत आहे. येथे महम्मद पैगंबरांच्या दाढीचा केस ठेवला आहे. पण हा भाग ‘सीआरपी एफ’च्या ताब्यात असल्याने काही विशिष्ट वेळीच खुला असतो. काश्मीरच्या प्रसिद्ध गालिच्यांची फॅक्टरी पाहिली. ५०० रु.पासून अकरा लाख रुपयांपर्यंतचे सुंदर कलाकुसरीचे गालिचे पाहिले. ते तयार करण्याची पद्धत, असली व बनावट ओळखण्याची कसोटी हे समजून घेतले.
पुढचा दिवस पहलगामला जाण्याचा होता. श्रीनगरपासून ५६ किमी. दूर आणि २१९५ फूट उंचीवर असणारे हे रमणीय ठिकाण सर्व फिल्मी दिग्दर्शकांचे आवडते ठिकाण प्रति स्वित्र्झलड म्हणून ओळखले जाते. पण आमच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या दोन एनआरआय जोडप्यांनी सांगितले की, पहलगाम त्यापेक्षाही अधिक सुंदर आणि चैतन्याने रसरसलेले आहे. खळखळ वाहणारी लीडर आणि संगीत नदी, दोहो बाजूस वृक्षराई, बर्फाचे डोंगर हा तर निसर्गाचा अविभाज्य भागच होता. वाटेत क्रिकेट बॅटची फॅक्टरी आणि अवंतिपूर येथील विष्णू मंदिराचे अवशेष पाहिले. अप्रतिम कोरीव काम असलेले शिलाखंड गतवैभवाच्या खुणा मिरवत भग्न स्वरूपात उभे आहेत. पहलगामला पोहोचताच पुन्हा स्नोफॉल झाला. छोटय़ा गाडय़ा करून बेताब व्हॅली, अरू व्हॅली, चंदनवाडी पाहून आलो. निसर्गाच्या विराट चमत्काराचे दर्शन परत परत घेऊन माघारी फिरलो.
यानंतरचा टप्पा होता वैष्णोदेवी. जम्मूपासून ९५ किमी. वर हे देवस्थान आहे. ५२०० फूट उंचीवर त्रिकुटा पर्वतावर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली देवीच्या पिंडी आहेत. सृजन, संवर्धन आणि विनाश अशी दैवी शक्तीची तीन रूपे येथे वास करतात.
१४ किमी. रस्ता पायी, घोडय़ावरून किंवा डोलीतून पार करता येतो. हेलिकॉप्टर सेवासुद्धा आहे. पण खराब हवामानामुळे ती बंद असल्याने मी मात्र पायथ्यापासून नमस्कार करून परतले. इतर ग्रुप दर्शन घेऊन आला. देवदर्शनाने भारावलेल्या मनाने परतीचा प्रवास सुरू झाला.
लहानपणापासून विविध पुस्तकांत मी काश्मीरचे वर्णन वाचले होते. या निसर्गरम्य प्रदेशाला राजकीय आणि सामाजिक अस्थैर्याचा शाप आहे. विलक्षण सुंदर स्त्रीपुरुष, गोजिरवाणी मुले एका अनामिक दहशतीखाली वावरत आहेत असे वाटते. जागोजागी वाळूच्या पोत्यांनी भरलेल्या चौक्या, हिरव्या खाकी कपडय़ातले सशस्त्र सैनिक. कधी निदर्शने, दंगा, गोळीबार, आत्मघातकी हल्ले, संचारबंदी होईल याचा नेम नाही. आम्ही असतानाच दोन दिवस बंद होता. पण तरीही येथील जनजीवन सुरू असते. रस्त्यांवर स्त्रियांची वर्दळ दिसत नाही. पण इथे पूर्ण बुरखा नाही हे पाहून आश्चर्य वाटले. पर्यटनावर इथली उपजीविका अवलंबून असल्याने आदरातिथ्य, अदब, नम्रता यांचे दर्शन होते. इथल्या विलक्षण थंडीत, बर्फात, गारांच्या मारातही झाडे तग धरून राहतात आणि वसंत येताच पुन्हा उमलतात.
श्रीनगर, जम्मूसारखी शहरे सोडली तर इतर भाग फारसा समृद्ध दिसत नाही. एकीकडे महागडी हॉटेल्स, पंचतारांकित सुविधा तर दुसरीकडे गमबूट भाडय़ाने घ्या, स्लेजवरून चला, गाइड करा म्हणत मागे लागणारे गरीब लोक असा विरोधाभास दिसतो. बंदच्या काळातही तिथले लोक घाबरू नका, इथे टुरिस्ट लोकांना काही त्रास दिला जात नाही असे समजावत होते. येथे जर शांतता नांदली तर या भागाची किती प्रगती होईल, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.
बर्फातले काश्मीर पाहण्याची माझी इच्छा सुफळ संपूर्ण झाली. निसर्गाचे एक अगदी वेगळे आणि आपल्याला पाहायला न मिळणारे, अभूतपूर्व, विराट रूप पाहून मनाला आलेले भारावलेपण अजून कमी झाले नाही. हिमालय आपल्याला जीवनाचा अर्थ सांगतो. परिस्थिती प्रतिकूल असो अगर अनुकूल, डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे, मजबूत पाय रोवून उभे राहावे ही शिकवण तो आपल्याला देतो. मलाही या हिमालयाने जगण्याचा नवा अर्थ सांगितला.