11 December 2019

News Flash

बलाढय़ पातशाहीला गुंगारा

शिवाजी महाराजांनी खरोखरच कौटिल्याची सूत्रे अभ्यासली होती का हे समजायला आज वाव नाही. पण त्यांची एकूण राजनीती पाहता ते त्या पातळीवर जाऊन विचार करत होते

| July 3, 2015 01:21 am

lp47शिवाजी महाराजांनी खरोखरच कौटिल्याची सूत्रे अभ्यासली होती का हे समजायला आज वाव नाही. पण त्यांची एकूण राजनीती पाहता ते त्या पातळीवर जाऊन विचार करत होते अशी मांडणी करणाऱ्या या सदराचा अखेरचा भाग-

एखाद्या राजाला किती प्रकारच्या आपत्तींना तोंड द्यावे लागते याची चर्चा अर्थशास्त्राच्या नवव्या अधिकरणात आहे. शत्रूची अभिवृद्धी करून देणाऱ्या कारणांमध्ये आपद्रूप अर्थातून निर्माण होणाऱ्या आपत्तींचे समंततो- अर्थ -आपत्ती, समंततो- अर्थ-संशया आपत्ती, समंततो अनर्था आपत्ती, समंततो-अनर्था संशया आपत्ती आणि उभयतो-अनर्था आपत्ती असे विविध प्रकार (९.७.२३) कौटिल्याने मानले आहेत. मिर्झाराजांच्या मोहिमेमुळे राजांवर इकडे अनर्थ, तिकडे अनर्थ अशी ‘उभयतो अनर्था’ आपत्ती कोसळली होती.
या आपत्तींच्या निराकरणाचे उपायही अर्थशास्त्रात सांगितले आहेत. त्यानुसार उभयतो अनर्था आपत्तीत मित्रांच्या साहाय्याने सिद्धी मिळवावी असा प्रथम उपाय आहे. ते नसल्यास प्रकृतींपैकी कमी महत्त्वाची प्रकृती अर्पण करून एका बाजूच्या अनर्थाचे निवारण करावे, दोन बाजूंना अनर्थ असल्यास जास्त महत्त्वाची प्रकृती अर्पण करून किंवा सरते शेवटी मूळ राज्य अर्पण करून सर्व बाजूंनी येणाऱ्या अनर्थाचे निवारण करावे आणि हे काहीच शक्य नसल्यास सर्वाचा त्याग करून निघून जाण्यास कौटिल्य सांगतो. कारण व्यक्ती जिवंत राहणे अधिक महत्वाचे. राजा जिवंत राहिल्यास स्वकर्तृत्वावर सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त करू शकतो.
शिवाजी राजांच्या बाबतीत मित्रांद्वारे आपत्ती निराकरणाचा मार्ग उपलब्ध नव्हताच. त्यामुळे राजांनी राज्य अर्पण करण्याचा पर्याय स्वीकारला. अर्थात हा पर्याय सहजासहजी स्वीकारला नव्हता.
राजकारणाच्या सगळ्या खेळी राजांनी खेळून पाहिल्या होत्या. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर तोडाफोडीच्या राजकारणाला नेहमीच रंग चढतो. शिवाजीराजांनीही एकाच वेळी मिर्झाराजांना व दिलेरखानालाही फोडण्याची शिकस्त केली होती. त्या प्रयत्नांत राजांना यश आले नव्हते. राजांचे फुटीचे प्रयत्न लक्षात येताच दिलेरखान प्रचंड संतापला होता तर मिर्झाराजे, ‘राजांची संपूर्ण शरणागती’ या भूमिकेवर ठाम उभे होते. पण जयसिंगांच्या मनात एक वेगळे स्थान राजांनी निश्चितपणे निर्माण केले.
तहापर्यंत अत्यंत ताठरपणे वागणाऱ्या मिर्झाराजांनी तहानंतर शिवाजी राजांना सन्मानाने वागवण्यास प्रारंभ केला. मिर्झाराजे शिवाजीराजांना आपल्याबरोबर एकाच हौद्यात बसवून नेत असल्यामुळे मिर्झाराजांना कुर्निसात करताना तो शिवाजीलाही करावा लागतो याचा संताप मोगलांच्या लोकांना होई. तहात राजांना दिलेली बारा गडांची सूट मोगलांना धोक्याची वाटत होती. त्यांच्या मते या राहिलेल्या गडांपासून मोगलांना धोका होता (वा. सी. बेंद्रे, छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. ५२६). या सगळ्या गोष्टींतून मिर्झाराजांविषयीचा असंतोष इस्लामी सैन्यात वाढत होता. सुरुवातीला मिर्झाराजे शिवाजी महाराजांना देत असलेल्या मानाचे औरंगजेबाला वावगे वाटले नसले तरी हळूहळू त्याच्या विचारातही बदल होत गेला होता. मुळात दक्षिण दिग्विजयाच्या मार्गातील शिवाजी महाराज हा सर्वात महत्त्वाचा शत्रू जिवंत राहिल्याचा सल औरंगजेबाला होता. त्यात इतर असंतोषी लोकांनी भर घालायला सुरुवात केली. औरंगजेबाने आपला असंतोष पत्राद्वारे व्यक्त केला. त्यामुळे मिर्झाराजांना त्याला राजी राखण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत होते. या प्रयत्नात मिर्झाराजांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिले. त्या पत्रात ते लिहितात, ‘‘आता आदिलशहा व कुतुबशहा आमच्याविरुद्ध एक झाले आहेत, तेव्हा कसेही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे. बादशहाची भेट घेण्याकरिता म्हणून त्यांस उत्तरेकडे पाठवून देणे जरूर आहे.’’ (वा. सी. बेंद्रे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. ५२६), म्हणजे मोगलांना दक्षिणेतून घालवून लावण्यासाठी दक्षिणेतील शाह्य़ा एक होऊ लागल्या होत्या. त्यांना शिवाजी राजे मिळाले असते तर परिस्थिती अधिक धोक्याची झाली असती. या सगळ्या परिस्थितीत शिवाजी राजांना दख्खनपासून दूर ठेवण्यासाठी मिर्झाराजांनी औरंगजेबाकडून मोठाली आश्वासने घेऊन त्यांना दिल्लीला पाठवण्याची तयारी केली.
मिर्झाराजांच्या वरील पत्राने शिवाजी राजांच्या औरंगजेबाच्या भेटीला जाण्याच्या विचाराने मूळ धरले. स्वत:चा भूप्रदेश सोडून न जाण्याच्या शिवाजी राजांच्या प्रयत्नांना त्यामुळे सुरुंग लागला.
अर्थशास्त्राच्या सातव्या अधिकरणातील सतराव्या अध्यायात ‘संधिकर्म’ व ‘समाधिमोक्ष’ या प्रकरणात कौटिल्याने संधी म्हणजे काय व संधीचे प्रकार सांगून केलेला तह कसा मोडावा याचेही मार्गदर्शन केले आहे. ‘शक्तिमत्येकपुत्रे तु लुप्तपुत्रोत्पतिरात्मानमादध्यात् न चैकपुत्रमिति’(७.१७.३१)।
शक्तिसंपन्न राजाने एकच पुत्र असता स्वत: ओलीस म्हणून जावे पण एकुलत्या एक पुत्राला कधीही ओलीस ठेवू नये असे सांगितले आहे. पण राजांनी तर मनसब संभाजीच्या नावे घेतली होती, त्यामुळेच कदाचित त्यांना संभाजी लहान असूनसुद्धा बरोबर न्यावे लागले असावे.
यानंतर आग्य््राात आल्यावर शिवाजी राजांच्या डेऱ्याभोवती पोलादखानाचे चौक्यापहारे बसवले. राजांना मारण्याचा औरंगजेबाचा हेतू स्पष्ट झाला. आता इथून सुखरूप सुटका करून घेणे महत्त्वाचे होते.
दीर्घरोगउन्मादाग्निविसर्गेण वा गूढनिर्गमनम्। (१.१२.१४) गुप्तहेरांनी स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आजारी पडल्याची किंवा वेड लागल्याची बतावणी करणे, आग, विषप्रयोग यांसारख्या उपायांचा प्रयोग करून बाहेर पडावे असे सांगितले आहे. तर समाधिमोक्ष प्रकरणात कौटिल्य ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्याचे उपाय सांगताना म्हणतो, ‘तेषां वा तूर्यभाण्डफेलां गृहीत्वा निर्गच्छेत्। सूदारालिकस्नपकसंवाहकास्तरककल्पकप्रसाधकोदकपरिचारकैर्वाद्रव्यवस्त्रभाण्डफेलाशयनासनसंभोगैर्निर्हियेत’(७.१७.३९-४०)।
शत्रुराज्यात अगोदरपासूनच ठेवलेल्या नट नर्तक इत्यादींची वाद्ये वगैरे सामानाचा पेटारा घेऊन ओलीस ठेवलेल्या राजपुत्राने बाहेर पडावे किंवा आजारी, वाढप्ये, स्नानगृहातील सेवक, संवाहन करणारे बिछाना घालणारे, न्हावी, वस्त्रालंकार चढवणारे किंवा पाणक्ये यांच्या वेषातील हेरांनी वापरावयाचे सामान, वस्त्रे इत्यादी पदार्थाचे पेटारे, पलंग किंवा आसने यांच्यासमवेत त्याला घेऊन बाहेर पडावे. वरील दोन्ही सूत्रांचा संगम करून प्रत्यक्ष प्रयोगराजांनी केल्याचे दिसते.
राजे पेटाऱ्यात बसून पळाले किंवा पेटारा घेऊन पळाले यावर खल सुरू असला तरी अर्थशास्त्रात म्हटल्याप्रमाणे पेटारे नेण्याच्या निमित्ताने राजांनी स्वत:ची व संभाजीची सुटका करून घेतली हे सत्य आहे. कौटिल्याने पेटाऱ्याच्या समवेत राजकुमाराला बाहेर काढावे, असे म्हटले आहे. त्यात बसून पळावे असा उल्लेख केलेला नाही आणि तेच सयुक्तिक आहे. कारण तपासताना लक्ष पेटारा वाहकापेक्षा पेटाऱ्याकडे दिले जाणार. त्यातील वस्तूंचा तपास होणार, त्यामुळे राजे पेटारा नेण्याच्या मिषाने बाहेर पडले असावेत, हे अधिक योग्य वाटते.
मात्र सभासदकारांच्या म्हणण्यानुसार राजे पेटाऱ्यात बसून पळून गेले. सभासदकार म्हणतात, ‘‘दुसरे दिवशी नाना जिन्नस मेवा खरेदी करून आणविला. वेळूचे पेटारे आणून दहा पेटारे मेवा भरिला. एका पेटाऱ्यास दोघे मजूर लावून मध्ये लाकूड घालून मेवा वजिरांस पाठविला. चौकीच्या लोकांनी पुसिले की, पेटारे कोणाचे कोठे जातात मजुरांनी उत्तर दिले की, राजे यांणी चौघा वजिरांस मेवा पाठविला आहे. त्याणे एक दोन पेटारे उघडून पाहिले, तो मेवा खरा, मग जाऊ दिले. असा राबता रोज लाविला, मग आठ चहूं रोजांत आपले स्वार कित्येक कारकून लोक यांसही पळणे म्हणून सांगितले. मग ते कुल पळाले.’’
‘‘मग एके दिवशी राजे, राजपुत्र एकाच पेटाऱ्यांत बसून पुढे-मागे पेटारे करून मध्ये पेटारियांत बसून चालिले.’’ (वा. सी. बेंद्रे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. ६११).
मनुचीसुद्धा बखरकारांच्या वृत्ताला दुजोरा देताना थोडी इतर माहिती देतो. त्याच्या सांगण्यानुसार बादशहा दिलेली वचने पाळण्याच्या विचारात नाही, असे वाटल्यावरून शिवाजीने आपल्या लोकांच्या परत जाण्यासाठी परवाने मागितले. ते बादशहाने लगेच दिले. त्यानंतर शिवाजी दर आठवडय़ाला मिठाईच्या टोपल्या कित्येक आठवडे दरबारातील वजीर व उमरावांना पाठवत राहिला आणि औरंगजेबाने संशयी असूनसुद्धा ‘शिवाजी आपल्या सुटकेसाठी ईश्वराच्या नावाने मिठाई देत असावा,’ म्हणून या गोष्टीला हरकत घेतली नाही. शिवाजीला फिदाईखानाच्या वाडय़ात नेऊन त्याचा निकाल लावावा व त्याला पुरून टाकावे या औरंगजेबाच्या विचाराचा उल्लेख मनुचीने केला आहे.
वरील पेटाऱ्याच्या उपायाबरोबर शत्रूच्या चौकी-पहाऱ्यातून सुटण्याचे इतरही काही उपाय कौटिल्यांनी सांगितले आहेत. त्यानुसार मुंडन केलेल्या अथवा जटाधारी संन्याशांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन रात्री त्यांच्यासारख्याच वेषात बाहेर पडावे किंवा रूप बदलावे, रोगी असल्याचा बहाणा करावा किंवा रानटी मनुष्याच्या वेषात राहावे किंवा राजकुमार मृत झाल्याचे दाखवून त्याचे प्रेत वाहून न्यावे. (७.१७.५०-५१).
कौटिल्याने ओलिस ठेवलेल्या राजकुमाराला सुखरूप परत आणण्यासाठी मृत घोषित करण्यास सांगितले आहे.
राजांवर स्वसंरक्षणाबरोबर संभाजीच्या सुरक्षेची जबाबदारी होती. ते दोघे एकत्र असणे धोक्याचे होते. ‘कॉस्मा द गार्डा’च्या मते शिवाजी राजांनी आधीच त्यांच्या लोकांनी कुठे कुठे घोडे तयार ठेवावेत, याविषयी सूचना केल्या होत्या व त्यांच्या लोकांनी त्यात कोणतीही कुचराई केली नव्हती. पण ठरावीक ठिकाणी जाताच मुलाला एवढा प्रवास सोसवला नाही व तो वाटेत मृत झाला. शिवाजीने त्याचे शव विधीपूर्वक दहन करण्यासाठी पैसे दिले व तो पुढे गेला.
अर्थशास्त्रात संन्याशी, तपस्वी गुप्तहेरांचा फार मोठा उपयोग सांगितला आहे. त्यांचे मठ जागोजागी असण्यावर भर दिला आहे. राजे महाराष्ट्रात परतले, ते संन्याशाच्या वेषात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
तर काफिखानाच्या मते शिवाजी राजे व त्यांचा मुलगा दोन बुरुडी टोपल्यांत बसले आणि अकबराबादेहून जेथे दोन घोडे तयार ठेवले होते, तेथे आले व तेथून जलदीने घोडय़ावर बसून चालू लागले. ‘..माध्यान्ह रात्री मथुरेच्या कलब्यांत दाखल झाले. येथे शिवाजीने आपली दाढी व कल्ले बोडून राख तोंडावर फासून आपल्याबरोबर जवाहीर व सोन्याच्या मोहरा घेऊन संन्यासी बैराग्यांच्या बरोबर यमुनेच्या एका अप्रसिद्ध तीरावर आले. नदी पार झाले (वा. सी. बेंद्रे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. ६१४).’
सूद, आरालिक, आस्तरक, स्नपक, संवाहक अशी विविध कामे करणाऱ्यांची जी यादी वरील सूत्रात येते, ते सारे या वेषांतील गुप्तहेर आहेत, हे मुद्दाम लक्षात ठेवले पाहिजे. कौटिल्याने गुप्तहेरांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. एकेक बातमी काढण्यासाठी, ‘त्रयाणामेकवाक्ये संप्रत्यय:’ म्हणजे तीन गुप्तहेरांनी आणलेल्या एकाच बातमीत एकवाक्यता असेल तरच त्यावर विश्वास ठेवावा, असे कौटिल्यांचे मत आहे. थोडक्यात एक बातमी काढण्यासाठी किमान तीन गुप्तहेर नेमावेत असे सांगितले आहे. गुप्तहेरांनी कोणकोणत्या वेषात काम करावे याची एक मोठी जंत्री अर्थशास्त्रात येते. स्वराष्ट्र व शत्रुराष्ट्रात सर्वत्र गुप्तहेरांचे जाळे असावे, असा कौटिल्याचा आग्रह होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या गुप्तहेरांना परस्परांविषयी कोणतीही माहिती नसावी, असे अर्थशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे. थोडक्यात गुप्तहेरांचे कार्य हे कायम गुप्तच असले पाहिजे, असा कौटिल्याचा आग्रह होता.
या पाश्र्वभूमीवर शिवाजी राजांच्या राजकारणातही एक-दोन गुप्तहेरांची नावे सोडल्यास कोणाचीही नावे आजपर्यंत पुढे आलेली नाहीत. आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या राजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘शिवाजी येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, शिवाजीला ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व राजा विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाजीला दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्तंबातमी असते. तेव्हा या बाबतींत सत्यता अजमावण्यासाठी तो कुमाराच्या छावणीत आला..’’ (उद्धृत, वा. सी. बेंद्रे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. ६२३).
थोडक्यात आग्य््रााहून सुटका किंवा इतर प्रत्येक प्रसंगात राजांचे गुप्तहेर खाते किती महत्त्वाचे होते ते आपल्या लक्षात येते.
अर्थशास्त्राच्या चतु:सूत्रीत ‘लब्धपरिरक्षणी’ म्हणजे प्राप्त केलेल्या राष्ट्राचे रक्षण हे सूत्र आहे. राजांनी आपल्या राष्ट्राचे रक्षण कसे केले याचा एक उल्लेखसुद्धा पुरेसा बोलका आहे. राजगड सोडताना महाराजांनी आपल्या किल्ल्यांचा व मुलुखाचा कडेकोट बंदोबस्त करून ठेवला होता. आपण मिर्झाराजांकडून लवकर परत न आल्यास मृत्यू पावलो, असे समजून आपल्या अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी स्वराज्याचे सर्वतोपरी रक्षण करावे, अशी सक्त ताकीद दिलेली होती अशी पक्की बातमी मिर्झाराजांना हेरांकडून कळलेली होती (शककर्ते शिवराय, भाग – २, पृ. ३५).
शिवाजीने औरंगजेबासारख्या बलाढय़ पातशहाला दिलेला गुंगारा पाहता, ‘आत्मसंपन्न राजा लहान देशाचा स्वामी असला तरी प्रकृतींच्या संपन्नतेने युक्त होऊन, राजनीतीत पारंगत असल्यामुळे सर्व पृथ्वी जिंकून घेतोच, कधीही पराभूत होत नाही,’ (६.१.१८) हय़ा कौटिल्याच्या सूत्राची प्रचिती येते.
या संपूर्ण लेखमालेसाठी अमात्यांची नियुक्ती, राजाचे प्रिय व हित करण्यात तत्पर अशा अधिकाऱ्यांचा सन्मान यांसारखी छोटी सूत्रे विचारात घेतली नाहीत, कारण सुयोग्य प्रशासनासाठी या गोष्टी सार्वकालिक आहेत. मात्र शिवरायांच्या राजकीय कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या घटना व त्यासाठी समांतर सूत्रे विचारात घेतली गेली.
कौटिल्यांनी अर्थशास्त्रात राजाला मार्गदर्शक अशी सूत्रे दिली आणि अनेक ठिकाणी त्या सूत्रांनुसार शिवरायांचे आचरण होते, असे वरील अभ्यासावरून लक्षात येते. महाराजांनी खरोखरच अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता का, हे कळण्यास कोणतेही साधन सध्या तरी उपलब्ध नाही. पण स्थल आणि कालाच्या मर्यादा ओलांडून ‘ग्रेट पीपल थिंक अलाइक’ या उक्तीची सत्यता कौटिलीय अर्थशास्त्र व त्याला समांतर असे शिवाजीचे राजकारण यांवरून निश्चितपणे येते.
आसावरी बापट response.lokprabha@expressindia.com

First Published on July 3, 2015 1:21 am

Web Title: kautilya ani shivrai
Just Now!
X