एका मध्यमवर्गीय घरातून येऊन ‘नासकॉम’च्या बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट कौन्सिलच्या चेअरमनपदापर्यंत मारलेली मजल हा केशव मुरुगेश यांच्या करिअरचा आलेख निव्वळ थक्क करणारा नाही तर आकाशाला गवसणी घालू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला अखंड प्रेरणा देणारा आहे.

‘विशाखापट्टणम्ला (वायझ्ॉक) कॉलेजमध्ये असताना एके दिवशी वडिलांनी विचारले, ‘मग आता काय व्हायचं ठरवलयंस?’ तेव्हा कोणताही मागचा-पुढचा विचार न करता त्यांना उत्तर दिलं, ‘सीए!’ कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही उलट धक्काच बसेल.. कारण उत्तर दिलं त्या वेळेस सीए म्हणजे नेमकं काय हेही माहीत नव्हतं’-
डब्लूएनएस या जगातील सर्वात मोठय़ा बीपीओ कंपनीचे ग्रुप सीईओ केशव मुरुगेश सांगत होते.. आज ते केवळ या कंपनीचे सीईओच नाहीत तर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या ‘नासकॉम’च्या बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट कौन्सिलचे चेअरमन आहेत. भारतासाठी या क्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम ही कौन्सिल करते.. मध्यमवर्गीय घरातून येऊन त्यांनी इथपर्यंत मारलेली मजल ही केवळ कौतुकास्पद नव्हे तर अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. या प्रवासात टीव्ही, एरिअल दुरुस्त करणे इथपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता जगभरातील १० देशांतून तब्बल २७ हजार कर्मचाऱ्यांसह काम करणाऱ्या एका जागतिक दर्जाच्या कंपनीचे सीईओ इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या या यशस्वी प्रवासातील अनेक कोडी त्यांनी ‘लोकप्रभा’शी साधलेल्या संवादामध्ये उलगडली..
‘सीए काय माहीत नव्हते मग ते उत्तर तरी कसे काय दिले?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘माझे वडील वायझ्ॉकला वॉल्टर क्लबमध्ये जायचे. तेव्हा तिथे असलेल्या खजिनदाराशी मी नेहमी बोलायचो, गप्पा मारायचो. त्या वेळेस मला लक्षात आले की, क्लब मेंबर्स भरपूर होते. पण सगळेजण या खजिनदाराशी बोलताना मात्र अतिशय आदराने बोलायचे. मग एके दिवशी मी वडिलांना त्या अतीव आदराचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले ‘अरे, तो सीए आहे’ म्हणून लोक अतिशय आदराने बोलतात. सीएला या समाजात प्रचंड मान असतो एवढेच मला त्या वेळेस लक्षात आले होते. ते काय असते, ते कठीण असते की सोपे किंवा त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते यापैकी कोणत्याही गोष्टी मला माहीत नव्हत्या!’
वडिलांना उत्तर दिल्यानंतर मात्र मी माहिती काढली आणि त्यांच्याशी जाऊन बोललो त्या वेळेस लक्षात आले की, सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे हेच महाकर्मकठीण मानले जाते. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. वडिलांचे मित्र असलेल्या त्या खजिनदार काकांनी मार्गदर्शनाची तयारी दर्शवलीही. त्याच वेळेस लक्षात आले की, मला लगेचच काही महिन्यांत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेला बसावे लागणार होते. त्यानंतर जमके मेहनत केली आणि त्या नोव्हेंबरच्या परीक्षेत जे दोन जण राज्यातून उत्तीर्ण झाले त्यात मी होतो.
त्याच वेळेस घरची परिस्थितीही माहीत होती, असे सांगून केशव मुरुगेश म्हणाले, आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहोत आणि आपल्या करिअरचा खूप मोठा खर्च वडिलांना सहन करावा लागणार आहे, याची कल्पना होती. शिवाय वडिलांना बहिणीच्या शिक्षणावरही खर्च करावा लागणार होता. आम्ही चार भावंडे होतो म्हणून मग मीच ठरवले की, आपण यातून काही मार्ग काढला पाहिजे आणि स्वत:चा खर्च स्वत:च उचलला पाहिजे. आर्टिकलशिप करायला लागलो पण त्यातून त्या वेळेस फक्त १०० रुपयेच मिळायचे. त्यात फारसे काही होत नव्हते. मग परिस्थितीचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, आपल्याला नियमित कॉलेज करता येणार नाही म्हणून मग मुक्त विद्यापीठातून डिग्री करण्याचा निर्णय घेतला. सीएची आर्टिकलशिप सुरूच होती. त्याशिवाय काहीतरी आणखी चांगले करणे आवश्यक होते पैसे मिळवण्यासाठी. मग त्या वेळेस परिस्थितीच्या अभ्यासातून मला ब्रोकिंगच्या क्षेत्रात उतरावेसे वाटले. त्या वेळेस शेअर्स खरेदी करणे हे सामान्यांसाठी खूपच नवीन होते. त्या वेळेस अक्षरश: घरोघरी जाऊन शेअर्सची विक्री केली.’
‘शेअर्स ब्रोकिंगच्या या प्रकारात थेट प्रवेश कसा काय मिळाला?’ या प्रश्नावर मुरुगेश म्हणतात.. त्यातही गंमतच झाली. निर्णय घेतल्यानंतर मी चेन्नई आणि इंदोरमधील दोन चांगल्या शेअर ब्रोकरना पत्र पाठवले आणि सबब्रोकर होण्याची इच्छा व्यक्त केली. ते करताना मी एकदम स्मार्ट मूव्ह केली होती. माझ्या नावाचा स्टॅम्प तयार करून घेतला आणि पत्र टाइप न करता इकनॉमी हॅण्डरिटन कॉपी असे लिहून पाठवले.. त्यामुळे तो स्टॅम्प, पत्रातील सफाईदार मायना पाहून त्यांना असे वाटले की, हा घाईगडबडीतील व्यावसायिक असल्याने वेळ नाही म्हणून त्याने टाइप करत न बसता तसेच हाती लिहून पत्र पाठवले आहे, त्या प्रभावानेच त्यांनी मला सबब्रोकर करण्याचा निर्णय घेतला. माझे मार्केटिंग स्किल तिथे पहिल्यांदाच लक्षात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ८६-८७ साली तेव्हा आयटीसी नावाच्या आघाडीच्या कंपनीची जाहिरात आली होती, त्यांनी नॉन कन्व्हर्टेबल बॉण्ड्स बाजारात आणले होते. त्याच्या जाहिरातीतील वाक्ये आजही आठवतात.. मिट द न्यू बॉण्ड थ्रिलर इन टाऊन. हे सारे करत असताना मी आर्टिकलशिपही करत होतो. घरी अनेक जर्नल्स आणि कंपन्यांचे रिपोर्ट्स यायचे. त्यात आयटीसी नेहमी पाहायला मिळायचे. मी त्यात पैसे गुंतवले आणि नंतर यातून कमावलेले पैसे मला सीए होत असताना कामी आले. मी एकाच वेळेस पदवी बाहेरून करत होतो आणि सीएदेखील. त्याच वेळेस वडिलांनी नोकरी सोडली आणि मग काहीशी पंचाईत झाली. मग आम्ही रिटेल आउटलेट सुरू केले. त्यात डायनोरा टीव्ही, टू इन वन अशी उपकरणे ठेवली. मग गरज पडली की, मीच टीव्ही रिपेअर कर, लोकांच्या घरी एरिअल लावायला जा, एरिअल दुरुस्त कर असे उद्योगही गरज म्हणून केले. त्याच वेळेस आंध्र प्रदेशमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. उद्योगांची पंचाईत झाली होती तेव्हा डोके चालवून मीच निर्णय घेतला आणि होण्डा जनरेटर्स विक्रीसाठी भारतीय बाजारपेठेत आणले. कोलकातामार्गे त्याची आयात सुरू केली होती..
हे सर्व करत असताना एखादा लक्षात राहण्यासारखा काही प्रसंग घडला का? यावर ते म्हणतात.. बीकॉमची अंतिम वर्षांची परीक्षा होती. त्याच्या आदल्या दिवशी रात्री अभ्यास करत होतो. वडिलांनी दुकान रात्री नऊ वाजता बंद केले. त्याच वेळेस एक ग्राहक आला आणि त्याला तातडीने डिलिव्हरी हवी होती. वडिलांनी सांगितल्यावर मी म्हटले, ‘उद्या सकाळी परीक्षा आहे’ त्यावर वडील म्हणाले की, तू शिक्षण घेतोयस त्यातील एक महत्त्वाचा उद्देश हाऊ टू सव्‍‌र्हाइव्ह हे शिकणे हेही आहे, हे लक्षात ठेव. परीक्षा तर तू पास होणार याची खात्री आहे मला. मला त्यातील संकेत कळला आणि मी तातडीने बाहेर पडलो, डिलिव्हरी करून आलो आणि नंतर अभ्यास केला. त्या वेळेस अभ्यासाइतकेच पैसे मिळवणे किंवा कुटुंबाला पैसे मिळणे हेही तेवढेच महत्त्वाचे होते!
आर्टिकलशिपच्या दरम्यानही असेच शिकायला मिळाले. सीए म्हणजे केकवॉक नाही हेही कळले होतेच. पण रिअल लाइफ स्किल्स शिकता आली. तोच अनुभव नंतर आयुष्यात महत्त्वाचा ठरला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. दरम्यानच्या काळात जे उद्योग केले त्यातून ग्राहक म्हणून समोर येणारी माणसे समजावून घेता आली, त्यांची मानसिकता कळली. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे धडे या कालखंडात मिळाले. ब्रोकिंग करताना उत्पादनाचे मार्केटिंग कसे करायचे, काय केले की आपले उत्पादन लोकांच्या गळी उतरते हे कळले. संभाषण- संवाद याचे अतुलनीय असे महत्त्व कळले. बोलणी कशी करायची ते शिकता आले. त्याच वेळेस तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेचे तुमच्या यशाशी असलेले नातेही कळले. गुणवत्ता सांभाळली तर दीर्घकाळाने का होईना यश तुमचेच असते हे कळले आणि म्हणूनच तुमच्याचसारखे चांगले गुण असलेली माणसे तुमच्या आजूबाजूला असणे यशासाठी महत्त्वाचे आहे, याचा धडाही मिळाला. हे आयुष्यात सारे खूपच आधी कळले! पण त्याचा नंतर प्रचंड फायदा झाला, त्यामुळे परिस्थितीला दोष कधीच नाही दिला.
अगदी सामान्य घरातून आलेले मुरुगेश आपल्या यशाचे सर्व श्रेय आईला देतात. वडील एके काळी रणजी खेळले होते आंध्र प्रदेशसाठी. संघाला जिंकूनही दिले होते. आई शिक्षिका होती. आई बंगाली आणि वडील तमिळनाडूमधले. मद्रास कॉलेजमध्ये भेटले, प्रेमात पडले आणि लग्नही झाले. त्यांना एकूण चार मुले. वडिलांनी सुरुवातीला पॅरीज चॉकलेट्समध्ये नोकरीही केली. मुरुगेश म्हणतात, मी चार मुलांपैकी एक त्यामुळे घरात सुबत्ता नसलेल्या त्या काळात सर्वच गोष्टींसाठी भाऊबहिणीशी स्पर्धा करावी लागे. कधी अंथरुणासाठी, कधी अन्नासाठी, कधी कपडय़ांसाठी तर कधी पालकांचे लक्ष आपल्याकडे जावे या कारणासाठी. पण याच बालपणातील या स्पर्धेने दोन गोष्टी शिकवल्या स्पर्धा अटळ आहे आणि त्याच वेळेस आपल्या माणसांना सोबत घेऊन जावे लागते. स्पर्धेत ते मागे राहणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागते.. आजही तब्बल २७ हजार कर्मचाऱ्यांची कंपनी चालवताना त्या शिकवणीचा फायदा सर्वाधिक होतो.
मुरुगेश यांचे सुरुवातीचे शिक्षण अवर लेडी ऑफ गर्ल्समध्ये तर नंतरचे शिक्षण डॉन बॉस्को शाळेत झाले. प्रसिद्ध खेळाडू विजय अमृतराज, कलानिधी मारन, सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक हे सारे याच शाळेचे विद्यार्थी. ९वी पर्यंतचे शिक्षण इथे झाल्यानंतर वडिलांची बदली वायझ्ॉकला झाली आणि नंतरची सारी घडण इथलीच. कॉलेजमध्ये गेल्या गेल्या जाणवले की, तिथला हॉस्टेलचा खर्च आणि एकूणच सारे प्रकरण वडिलांना परवडणारे नाही, म्हणून मुक्त विद्यापीठामधून शिक्षण घेण्याचा आणि बाहेर काही उद्योग करण्याचा निर्णय घेतला होता. याच काळात वडिलांनी तो प्रश्न विचारला होता, काय होणार? याच प्रश्नाच्या उत्तराने नंतर मुरुगेश यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

मी माझ्यापुरते एक तत्त्वज्ञान तयार केले आणि पाळले. तीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. काम करताना पराकोटीची मेहनत घ्या. एवढी की, तुमच्यावरच सारी जबाबदारी आहे आणि तुमच्याशिवाय हे काम करणारे कोणीही नाही व ते करणे सर्वाधिक गरजेचे आहे अशा प्रकारे करा.

सीए फायनल झाल्यानंतर आईला आधी सांगितले आणि तिच्यासोबत वडिलांकडे गेलो तेव्हा चेहरा रडवेला केला होता, त्यांना फसवण्यासाठी. पण वडील फसलेच नाहीत. ते मला पाहून म्हणाले, पास नक्कीच झालेला असणार मग चेहरा रडवेला का? माझ्यापेक्षा त्यांना अधिक आत्मविश्वास होता माझ्याबद्दल.. मुरुगेश म्हणाले. मग त्यानंतही बरेच उद्योग केले, जे जे नवीन वाटले त्यात प्रयत्न केला. मग सँडपेपरचा व्यवसाय केला, क्लीअरिंग अ‍ॅण्ड फॉरवर्डिग एजंट म्हणूनही काम केले. खरे तर त्यात तसा सुखी होतो. फार काही करण्याचा विचार नव्हता. पण आई सारखी म्हणत होती की, सीए केले आहेस तर कोणत्या तरी मोठय़ा कंपनीत काम कर. नाही तर तुझ्या सीएला अर्थच राहणार नाही. तेव्हा घरी अनेक कंपन्यांचे रिपोर्ट्स यायचे, जर्नल्स यायची पण माझे फारसे वाचन होत नव्हते. पण एके दिवशी अचानक.. आयटीसी या प्रख्यात कंपनीचे मुलाखतीचे पत्र आले. मलाच धक्का बसला, अर्ज न करता कसे बोलावले तेव्हा, विचारल्यानंतर कळले की, आईनेच एका जर्नलमधली जाहिरात पाहून एका कागदावर माझी माहिती लिहून पाठवली होती.. चेन्नईला गेलो तेव्हा कळले माझ्यासारख्या २० सीएंची निवड प्राथमिक स्तरावर झाली होती. दोन दिवस मुलाखती झाल्या त्यातून १२ जणांची निवड झाली आणि कोलकाताला बोलावण्यात आले. तिथे आलेले सर्व जण सीएमधील देशभरातील रँकहोल्डर्स होते. मी त्याला आत्मविश्वासाने सामोरा गेलो. फायदा एकाच गोष्टीचा झाला की, आयटीसीचे बॉण्ड्स घेताना मी कंपनीच्या रिपोर्ट्सचा माझ्या पद्धतीने पूर्ण अभ्यास केला होता. अखेरीस फायनान्स डिरेक्टरला भेटण्यासाठी माझ्या एकटय़ाची निवड करण्यात आली तेव्हा मी विचारले सिलेक्शन झाले का, त्यावर मला सांगण्यात आले की, त्यांच्या भेटीसाठी निवड झाली आहे. त्यांनी मंजुरी दिली तरच नेमणूक होणार.. पाच वाजताची वेळ होती, रात्री साडेआठला ते भेटले. मी अगदीच लहान गावातून आलेलो हे ऐकून ते म्हणाले, तू कसे काय हे सारे निभावणार. त्यांचा संशयाचा सूर वाढत गेला. मी त्यांना म्हटले ‘व्हाय डोंट यू टेस्ट माय नॉलेज?’
त्याच चर्चेदरम्यान मी ज्या हॉटेल डॉल्फिनच्या ताळेबंदाचे काम केले होते, त्याचे नाव सांगितले. त्यावर मात्र त्यांचा चेहरा पालटला. ते म्हणाले की, हे बेंचमार्क हॉटेल आहे. मग खूप चर्चा झाली. नंतर ते म्हणाले, शेवटचा प्रश्न. यावर ठरणार तुला घ्यायचे की, नाही. फायदा हवा असेल तर तू काय घेशील, खाद्यतेल की ऑइल केक. त्यावर मी उत्तर दिले ऑइल केक. त्याचे स्पष्टीकरणही दिले की, त्यावर गुंतवणूक फार करावी लागणार नाही आणि फायदा मात्र अनेक प्रकारचा असेल, त्यावर ते खूश झाले आणि मग आयटीसीमध्ये नोकरीला सुरुवात झाली.
सुरुवातीस आयटीसीमध्ये नंतर सिंटेल या विख्यात कंपनीमध्ये सीएफओ, सीओओ आणि नंतर सीईओ असा मुरुगेश यांचा प्रवास झाला आणि सध्या ते डब्लूएनएसचे ग्रुप सीईओ आहेत. या प्रवासाबाबत ते म्हणतात, खरे तर माझे काम हे फक्त फिनान्सेसच्या संदर्भात होते, पण मी तिथे माझ्या कुवतीनुसार अनेक गोष्टी सांगितल्या. त्या कंपनीने सुरू केल्या. त्यात त्यांना यश आले. मी कंपनीच्या विस्तारात महत्त्वाचा ठरत गेलो. हेच सिंटेलमध्येही घडले. तिथेही माझे काम मुख्य वित्त अधिकाऱ्याचे (सीएफओ) होते. पण मी त्यांना सांगितले की, कंपनी चांगली करायची तर एचआर महत्त्वाचा विभाग असतो. जबाबदारी घ्यायला कुणी तयार नव्हते. मग मी नियमित कामकाजाबरोबरच त्याचीही जबाबदारी घेतली. यश लक्षात आल्यावर आणखीही विभागांची जबाबदारी आली. तीही पार पाडली. असे करत सीईओ पदापर्यंत पोहोचलो.
या सर्व प्रवासात महत्त्वाच्या लक्षात आलेल्या बाबी- परीक्षेतील गुणांएवढेच महत्त्व तुमच्यातील सर्वागीण विकासालाही असते. सध्या केवळ परीक्षेतील गुणांनाच प्राधान्य देण्याचा ट्रेंड आहे, तो अयोग्य आहे. मी फुटबॉल- क्रिकेट खेळलो. शाळेचे प्रतिनिधित्व केले. मला ९५ टक्के मार्क कधीच मिळाले नाहीत, पण ७५ टक्केनक्की असायचे. आज आयटी कंपन्यांचे सीईओ पाहिलेत तर एक गोष्ट मुलांना लक्षात येईल ती म्हणजे रमण रॉय, प्रमोद भसीन, दीपक घैसास किंवा अगदी मी घ्या; आम्ही सारे सीए आहोत. आमचा माहिती तंत्रज्ञानाशी काही संबंध नव्हता. मग तुम्हाला दिलेले काम तुम्ही व्यावसायिकदृष्टय़ा फायद्यात राहून कसे मॅनेज करता हे सर्वाधिक महत्त्वाचे असते. मग ते करताना तुम्हाला चांगली नीती-मूल्ये कशी सांभाळायची ते कळते. अखेरीस महत्त्वाचे ठरते ते तुम्ही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कसे पुढे जाता हेच. यात महत्त्वाचे ठरते ते इन्नोव्हेशन. भविष्यात तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर इन्नोव्हेशन हे महत्त्वाचे असणार आहे.
आज पूर्वीच्या बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिगला (बीपीओ) आपण बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंटचा दर्जा दिला. त्याचे नाव बदलले, दृष्टिकोन बदलला. २० वर्षांपूर्वी हे बॅकऑफिसचे काम मानले जायचे. ते ग्राहकाभिमुख केले. आज देशाला यातून २१ दशकोटी अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळतो. आणि तो ५० दशकोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचा आमचा मानस आहे. पूर्वी बीपीओ म्हणजे केवळ कॉल सेंटर्स असे समीकरण होते, तेही आम्ही बदलले आहे. हे बदलले ते इन्नोव्हेशनच्या माध्यमातून. आज या बीपीएममध्ये काम करणाऱ्यांमध्ये अनेक विषयांतील पीएच.डी. केलेले, अ‍ॅक्च्युअरिज, सीए कार्यरत आहेत. पूर्वी कमीत कमी पैशांत काम करणाऱ्याला काम दिले जायचे. आता जग बदलले आहे, प्रसंगी अधिक पैसे घेऊन चांगले काम करणाऱ्या कंपनीला काम दिले जाते. म्हणूनच गुणवत्ता महत्त्वाची ठरते. या क्षेत्रात स्वस्त म्हणजे चांगले हे समीकरण जाऊन बेस्ट अ‍ॅण्ड ब्राइटेस्ट माइंड्स हे नवीन समीकरण आले आहे. त्यामुळे आज केवळ डब्लूएनएसमध्ये काम करणाऱ्या अकांऊंटमधील तज्ज्ञ, सीए, डॉक्टर्स, अ‍ॅनालिस्ट यांची संख्या साडेनऊ हजारांच्या घरात आहे. आताच्या विद्यार्थ्यांनी या परिपक्व झालेल्या क्षेत्राकडे करिअर म्हणून वळायला हवे. इंटर्नशिपपासून या कंपन्यांमध्ये काम करण्यासही हरकत नाही. मध्यंतरीच्या काळात बीपीओ म्हणजे २४ तास काम आणि बहुसंख्य वेळा रात्रपाळी असे समीकरण होते. खरे तर तो गैरसमज होता. आता चांगल्या कंपन्यांमध्ये फोनाफोनीचे काम केवळ २० टक्के आणि उर्वरित आकडेमोड किंवा माहितीच्या विश्लेषणाचे काम ८० टक्के असते. त्यामुळे कामाच्या वेळाही सोयीच्या आहेत. शिवाय कंपन्यांचे अस्तित्व जगभरातील असल्याने जगभर फिरण्याची, अनेक नव्या गोष्टी समजून घेण्याची संधीही मिळते. बीपीएमच्या क्षेत्राचा विकास दर १२ टक्के आहे. आज एवढा विकास दर असलेली क्षेत्रे फार कमी आहेत. त्यामुळे तरुणांसाठी हे केवळ एक्सायटिंग नाही तर चांगले पैसे मिळवून देणारे करिअर आहे. मी अगदी सुरुवातीच्या काळात आयुष्यात ग्राहक राखण्यासाठी जे काही केले, त्याचा फायदा आता होतो आहे. या साऱ्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे मी सर्वच उद्योगांमध्ये कंट्रोल्ड रिस्क घेतली. मी वेडाच्या भरात धाडसी निर्णय घेतले नाहीत. अनेकदा तरुणपणी धाडसी निर्णय अविचाराने घेतले जातात. ते मी टाळले. मला वाटते माझ्या यशाचे हेही गमक असावे, मुरुगेश म्हणतात.
अखेरीस आणखी एक भाग महत्त्वाचा आहे, तोही करिअर निश्चित करताना लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे तुमचे समाजाशी असलेले संबंध आणि त्यातील स्थान. तुम्ही जे काही करताय त्याचा समाजाला उपयोग व्हायला हवा.. आता बीपीएम कंपन्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला असून, त्यात मुंबई पोलिसांना सायबर क्राइमसाठी प्रशिक्षण देऊन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. कारण नॅसकॉमला असे वाटते की, आमच्या व्यावसायिक कामाबरोबरच हे कामही समाजासाठी आम्ही करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तक्रार सगळेच करतात समाजामध्ये आणि समाजाबद्दल. आपण व्यवसाय करताना किंवा चांगले व्यावसायिक म्हणून काम करताना समाजाचाही विचार करावा, असे मला वाटते. मी अगदी सुरुवातीच्या काळापासून तो केला आणि समाजाचे देणे फेडण्याचा त्या त्या वेळी माझ्या परीने प्रयत्नही केला. आज देशासाठी या क्षेत्राचे धोरण ठरविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, त्याही वेळेस निर्णय घेताना मी व्यवसायाइतकेच महत्त्व समाजालाही देतो. शेवटी समाज आहे म्हणून तुम्ही आहात, म्हणून याविषयीच्या देशाच्या धोरणात प्रत्येक बीपीएम कंपनीला आम्ही समाजाभिमुख केले आहे. मला वाटते की, करिअर म्हणून आपण मोठे होत असताना आपल्या समाजाला विसरता कामा नये..
आजच्या तरुण वर्गाला केवळ एकच सांगावेसे वाटते की, तुमच्या परीक्षेतील गुणांबरोबरच सर्वागीण विकासालाही तेवढेच महत्त्व द्या. तो नंतर खूप कामी येणार आहे.. अखेरीस यशाची गुरुकिल्ली सांगताना ते म्हणाले की, मी माझ्यापुरते एक तत्त्वज्ञान तयार केले आणि पाळले. तीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे, ती सांगतो.. काम करताना पराकोटीची मेहनत घ्या. एवढी की, तुमच्यावरच सारी जबाबदारी आहे आणि तुमच्याशिवाय हे काम करणारे कोणीही नाही व ते करणे सर्वाधिक गरजेचे आहे अशा प्रकारे करा. आणि देवाची प्रार्थना करतानाही अशा प्रकारे पराकोटीने करा की, त्या प्रार्थनेवरच तुमची सारी भिस्त आहे आणि देवाशिवाय तुम्हाला वाचविणारे आणि यश देणारे कुणीही नाही.. मी सांगतो या मार्गावर चाललात तर लक्षात येईल, की या मार्गाने जाताना तुमचे निर्णय कधीच चुकत नाहीत आणि मग यशच तुमच्यामागे धावते!