चित्रपट संगीतात गाण्यांच्या निर्मितीसाठी ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित राग-रागिण्यांचा व बंदिशींचा मुक्त वापर केलाच, शिवाय ऑर्केस्ट्रेशनमध्ये सारंगी, सतार, दिलरुबा, बासरी व पखवाजसारखी पारंपरिक वाद्य्ो आवर्जून वापरली. ‘संगीतकारांचा संगीतकार’ असे नूरजहाँने त्यांना संबोधले आहे…

ख़ुर्शीद अन्वर हरफनमौला (सर्व कलानिपुण) कलावंत असल्यामुळे त्यांचं व्यवधान चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, संगीत अशा क्षेत्रांत विभागलं गेलं. परिणामत: पाकिस्तानात जेमतेम वीसेक चित्रपटांना ते संगीत देऊ शकले; परंतु या मोजक्याच चित्रपटांना दिलेल्या यादगार संगीतामुळे आजही त्यांची गणना पाकिस्तानातील अव्वल दर्जाचे संगीतकार म्हणून होते.
भारतातील आपला शेवटचा चित्रपट ‘नीलमपरी’ (१९५२) अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करू शकल्याने ख़ुर्शीद अन्वर यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी सुलतान जिलानीबरोबर नव्या चित्रपटाची आखणी केली. नूरजहाँ, संतोष, आशा भोसले, ग़ुलाम मोहंमद अशी टीम तयार झाली. ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांची निर्मिती असलेला तसेच त्यांच्या लाजवाब संगीताने नटलेला ‘इंतजार’ (१९५६) हा चित्रपट पडद्यावर झळकला आणि पाहता पाहता सुपरडुपर हिट झाला.

‘इंतज़ार’ या चित्रपटातील ज़ुबेदा ख़ानमच्या ‘जवानी की राते जवानी के दिन’ या गाण्याचा एकमात्र अपवाद वगळता चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी नूरजहाँने गायली होती. १९५४ नंतर नूरजहाँच्या गायकीसाठी आसुसलेल्या सिनेसंगीत शौकिनांना रेडिओशिवाय अन्य पर्याय उरला नव्हता. सीमेपलीकडून ऐकू येणाऱ्या गाण्यांवर पाकिस्तानातील रसिकांपेक्षा काकणभर जास्त प्रेम भारतातल्या संगीतप्रेमींनी केले. नूरजहाँने गायलेल्या ‘चाँद हंसे, दुनिया बसे रोऽये मेरा प्यार रे..’, ‘जिस दिन से पिया दिल ले गये दुख दे गये..’, ‘आऽ गये, घर आये, सजन परदेसी बलम परदेसी..’, ‘ग़ज़्ाब किया तेरे वादे पे इंतज़ार किया..’, ‘आ भी जा देख आकर ज़्ारा, मुझपर ग़ुज़्ारी है क्या तेरे प्यार में..’, ‘आँख़ से आँख़ मिला ले..’, ‘छुन छुन नाचूंगी, गुन गुन गाऊंगी संया मोरे आयेंगे उनको रिझाऊंगी..’, ‘हो सावन की घनघोर घटाओ, तरस गये मेरे नन पिया बिन बरस बरस मत मुझे रुलाओ..’, ‘ओ जानेवाले रेऽ ठहरों ज़्ारा रुक जाओ लौट आओ..’ यांसारख्या यादगार गाण्यांनी अक्षरश: कोटय़वधी लोकांची मने जिंकली. आजही दोन्ही देशांत ‘इंतज़ार’च्या गाण्यांची क्रेझ कायम आहे.
‘इंतज़ार’नंतर ‘मिज़्रा साहिबां’ चित्रपटगृहात झळकला. ‘मिज़्रा साहिबां’ला पुन्हा एकदा सुरेल सुरावटींचा नजराणा बहाल करून ख़ुर्शीद अन्वर यांनी आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला. मुसर्रत नज़्ाीर आणि सुधीर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी ख़ुर्शीद अन्वर यांनी ‘वीरन मेरे वारी मैं तेरे मुझको रोती छोडम् न जाना..’, ‘िज़्ादगी है बेकरार जानेवाले आ भी जा’ (स्वर: जुबदा ख़ानम), ‘झिलमिल झिलमिल गोरी ने माथे पे झूमर पहना है..’ (स्वर: कौसर परवीन-जुबदा ख़ानम), ‘परेशां चाँदनी है चाँद तारे याद करतें हैं..’ (स्वर: सलीम रज़ा), ‘जहाँवाले जलते हैं जलते रहेंगे..’, ‘ये रंगे-चमन, ये मस्त हवा..’ (स्वर: जुबदा ख़ानम-सलीम रज़ा) यांसारख्या गाण्यांनी रसिकांना सुरेल संगीताचा नजराणा बहाल केला. ज़ुबदा ख़ानमने गायलेल्या ‘बन ठन के सजन तेरी राह तकन को घडी घडी, म बीच झरोखें आन खडी..’ या गाण्याने तर लोकांना ‘दीवानं’ केलं.
निर्माते सुलतान जिलानी, भारतातल्या ‘नागिन’ (१९५४) चित्रपटातल्या संगीतावर फिदा झाले होते. फिल्मिस्तान चित्रसंस्थेची निर्मिती असलेल्या या चित्रपट संगीतात हेमंतकुमार यांनी प्रथमच गारुडय़ांच्या ‘बीन’चा सुश्राव्य प्रयोग करताना जी सदाबहार व यादगार गाणी दिली होती त्यावर जिलानीच काय, पाकिस्तानातील तमाम जनता नागाप्रमाणे डोलत होती. जिलानींनी ‘नागिन’च्या धर्तीवर ‘ज़्ाहरे-इश्क़’ नावाचा चित्रपट पाकिस्तानात काढायचे ठरविले. संगीतकार म्हणून ख़ुर्शीद अन्वर यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवताच सुरुवातीला त्यांनी तो चक्क फेटाळून लावला. ‘बीन’ची सुरावट ‘नागिन’ चित्रपटात हेमंतकुमार यांचे साहाय्यक असलेले कल्याणजी वीरजी शाह यांनी ‘क्लॅव्हायलिन’ नावाच्या इलेक्ट्रॉनिक कीबोर्डवर वाजविली होती. मुळात ख़ुर्शीद अन्वर यांना चित्रपट संगीतात इलेक्ट्रिफाइंग वाद्यांचा उपयोग मुळीच पसंत नव्हता; तथापि जिलानी व मसूद परवेज खनपटीलाच बसल्यावर त्यांनी या प्रकारचे संगीत द्यायला मान्यता दिली. क्लॅव्हायलिनबरोबर अन्य अकूसस्टिक वाद्यांचा मेळ घालत त्यांनी ‘ज़्ाहरे-इश्क़’ (१९५८) ला कर्णप्रिय संगीतानं समृद्ध केलं.
ज़ुबदा ख़ानमने गायलेले ‘सुनो अरज मेरी कमलीवाले, कोई क्या समझे कोई क्या जानेऽ’ या एकमात्र गाण्याचा अपवाद वगळता जवळपास सर्वच गाण्यांत ‘बीन’चे स्वर गुंजताना दिसतात. सर्वाधिक आकर्षक गाणं ‘पल पल झुमूं झूमके गाऊं दिलमें प्यार है तेरा, मैं तेरी तू मेरा रेऽ’ हे कौसर परवीन हिनं गायलं होतं. याशिवाय ‘मैं तो तुम्हे जाने ना दूंगी, संया तुम्हे जाने ना दूंगी..’ हे कौसरच्याच लाडिक स्वरातलं गाणंदेखील लाजवाब होतं. ‘छम छम नाचूं मेरे पिया घर आए मेरे पिया घर आए रे..’ (स्वर: जुबदा ख़ानम) व ‘देखो जी देखो बेदर्दी संया जा के फिर ना आये..’ व ‘मोहे पिया मिलन को जाने दे..’ (स्वर: नाहीद नियाज़्ाी) यांसारख्या गाण्यांमुळे चित्रपट सुपरहिट ठरला. ख़ुर्शीद अन्वर यांनी नाहीद नियाज़्ाी या हरहुन्नरी गुणी गायिकेला पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात दिलेली ही पहिलीच संधी होती. काहीशा नाटय़मय घडामोडीमुळे ही संधी नाहीदला मिळाली.

झालं असं, ‘पिया मिलन को जाना..’ हे गाणं नूरजहाँने गावं अशी ख़ुर्शीद अन्वर यांची इच्छा होती. तथापि चित्रपटात मुख्य भूमिकेत नूरजहाँऐवजी मुसर्रत नज़्ाीर असल्याने तिने गायला नकार दिला. मग हे गाणं इक़बाल बानोच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. या गाण्याला इक़बाल बानोने न्याय दिला आहे असे ख़्वाजासाहेबांना वाटेना.. त्यांनी या गाण्यासाठी गीता दत्तला भारतातून पाचारण करायचं ठरविलं. गीता दत्तला भारतात ख़ुर्शीद अन्वर यांच्याबरोबर कामाचा अनुभव आणि मनात नितांत आदर असल्याने तिने या प्रस्तावाला आनंदाने स्वीकृती दिली. यामुळे पाकिस्तानातल्या पत्रकारांचा मत्सर जागृत होऊन काही फिल्मी नियतकालिकांनी ख़ुर्शीद अन्वर यांना धारेवर धरले. भारतातून गायिका आयात करण्यापेक्षा ख़ुर्शीद अन्वर यांना पाकिस्तानातल्या अन्य प्रतिभावान गायिका दिसत नाहीत का? म्हणून त्यांनी टीकेची झोड उठविली.. यामुळे व्यथित झालेल्या ख़ुर्शीद अन्वर यांनी गीता दत्तकडे दिलगिरी व्यक्त करून नव्या आवाजाचा शोध सुरू केला. अचानक त्यांना आपल्या मित्राच्या मुलीची आठवण झाली. पाकिस्तान रेडिओचे माजी केंद्राधिकारी असलेले सज्जाद सरवर यांची मुलगी नाहीद नियाझी (मूळ नाव शाहिदा नियाझी) हिने एकदा त्यांच्याकडे ऑडिशन दिली होती. ख़ुर्शीद अन्वर यांनी तात्काळ ‘ज़्ाहरे-इश्क़’चं गाणं तिच्याकडून गाऊन घेतलं. गाण्याचं ध्वनिमुद्रण आणि चित्रपट रखडल्यामुळे लांबलेलं प्रदर्शन यामुळे सकृद्दर्शनी जी. ए. चिश्ती व रशीद अत्रे यांच्याकडे नाहीदने प्रथम गाणी म्हटल्याचं दिसत असलं तरी नाहीदला पहिली पाश्र्वगायनाची संधी ख़ुर्शीद अन्वर यांनीच दिली होती.
१९५९ साली ख़ुर्शीद अन्वर यांनी ‘झूमर’ या चित्रपटाची निर्मिती करायचं ठरविलं. चित्रपटाची कथा व पटकथा त्यांनीच लिहिली होती. दिग्दर्शन मसूद परवेजवर सोपविलं होतं. कारण एव्हांना मसूदबरोबर त्यांचं खास ‘टय़ुिनग’ जमलं होतं. गीतकार तन्वीर आज़्ामी होते. ‘इंतज़ार’ हा जसा नूरजहाँच्या गाण्यामुळे लक्षात राहिला तसाच ‘झूमर’ हा चित्रपट नाहीद नियाझीच्या स्वरांमुळे व ख़ुर्शीद अन्वर यांच्या अजरामर सुरावटींमुळे लक्षात राहिलेला चित्रपट म्हणता येईल. नाहीदची एकापेक्षा एक सरस गाणी या चित्रपटात होती..
ना कोई संया मेरा ना कोई पिया रेऽ
पिया पिया कूक ना पपीहा रेऽ
हे कमालीचं श्रुतीमधुर गाणं या चित्रपटाचं खास वैशिष्टय़ म्हणता येईल. याशिवाय ‘पिया पिया पिया ना कूक पपीहा, कूक की हूक कलेजवा पे लागेऽ हूक से फूंक ना जियाऽ’ व ‘जब याद किसीकी तडम्पाये और अपने आप दिल भर आये, जब रातको नींद ना आयेऽ तो जान ले किसीसे प्यार हो गया..’, ‘इक अलबेला परदेसी दिलमें समा गया है पहली नज़्ार में मुझको अपना बना गया है..’, ‘चली रे चली रे चली रे बडम्ी आस लगाके चली रे मैं तो देऽस पिया के चली रेऽ’, ‘मुरली बजाये दूरसे कोई किस को बुलाये..’ (स्वर : नाहीद नियाझी) या गाण्यांची गोडी काय वर्णावी? या शिवाय ‘बुझी बुझी सी रौशनी और हम’ (स्वर : ज़ुबदा बेग़म), ‘फूंक दो बिजलियों आके मेरा जहाँ’ (स्वर : मुनीर हुसन) ही गाणीसुद्धा श्रवणीय होती. तथापि हा चित्रपट सर्वस्वी नाहीद नियाझीच्या गाण्यांमुळेच चालला असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
‘झूमर’च्या प्रदर्शनानंतर जेमतेम दीडच महिन्यात दिग्दर्शक मसूद परवेजने आपली घरची निर्मिती असलेला ‘कोयल’ (१९५९) हा कर्णमधुर संगीताने नटलेला सुरेल चित्रपट प्रदíशत केला. नूरजहाँ ‘कोयल’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत होती. साहजिकच ख़ुर्शीद अन्वर यांनी एकापेक्षा एक सरस गाणी तिच्याकडून गाऊन घेतली. ‘कोयल’ची सदाबहार गाणी पाकिस्तानासह भारतातही दुमदुमली. नूरजहाँ आणि मुनीर हुसनच्या आवाजातलं ‘रिमझिम रिमझिम पडे फुहार, तेरा मेरा नीत का प्यार..’, ‘दिल का दीया जलाया मैंने दिलका दीया जलाया..’, ‘तेरे बिना सूनी सूनी लागे रे चाँदनी रात..’, ‘ओऽ बेवफा, मैंने तुझसे प्यार क्यूं किया..’, ‘महकी फ़िज़ाएं, गाती हवाएं, बहके नज़ारे.’ ही नूरजहाँने गायलेली गाणी लाजवाब होती; परंतु या चित्रपटातलं सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक गाणं होतं.
सागर रोये, लहरें शोर मचाऽयें
याद पियाकी आये, नना भर आये
या शिवाय ‘ओऽ दिल जला ना दिलवाले..’ हे एकमात्र गाणं ज़ुबदा खानमने गायलं होतं. चित्रपटाची टायटल बंदिश उस्ताद फतेहअली ख़ां यांनी ‘मेघमल्हार’ रागात आळवली होती. नूरजहाँच्या स्वरांनी व ख़ुर्शीद अन्वरच्या सुश्राव्य सुरावटींनी गाजलेला हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला.
यानंतर रिलीज झालेला मिज़्रा अदीबच्या कथेवर आधारित ‘अयाज़्ा’ (१९६०) हा ऐतिहासिकपट बॉक्स ऑफिसवर फारशी करामत दाखवू शकला नसला तरी तो केवळ संगीताच्या जिवावर तरून गेला. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत नूरजहाँ नसल्याने ख़ुर्शीद अन्वर यांनी पुन्हा एकदा नाहीद नियाज़्ाी व ज़ुबदा ख़ानमला झुकतं माप दिलेलं दिसून येतं. कौसर परवीन आणि इक़बाल बानोच्या वाटेला प्रत्येकी एक एक गाणं आलं होतं. ‘ऐ माहेलक़ा, ऐ जाने-वफा, क्यूं आज है तू..’, ‘बचाले आबरूमेरी, सितम ढाने लगा सय्याद..’, ‘जो न होता तेरा जमाल ही, सल्लू अल ही हो आलेही..’, ‘ये कौन आया है..’ (स्वर : ज़ुबदा ख़ानम), ‘ऐ प्यार भरे दिल क्या कहिए इस दर्द भरे अफसाने को..’, ‘खिल गये तरह तरह के दिलों के महफ़िल में कौन आया..’, ‘मं दिल ही दिल में नाचू..ं’, ‘रक्स में है सारा जहां, आ गये वो’, ‘मिल गया दिल को क़रार, झूम उठा मेरा प्यार’ (स्वर : नाहीद नियाझी) ही सर्वच्या सर्व गाणी अप्रतिम होती. कौसर परवीनने गायलेलं ‘नाच नाच परवाने जब तक शमा जले’ हे गाणंही ‘भूलाए न बने’ असंच होतं. तथापि इक़बाल बानोचं गाणं सर्वाधिक चित्ताकर्षक व चित्रपटाचा मुकुटमणी शोभणारं ठरलं..
शबे-महताब है, तन्हाई है
ऐसे में याद तेरी आई है
चाँद बादल में हंसें,
चाँदनी मुझ को डसे
दर्द बन बन कर के तेरा
प्यार मेरे दिल में बसे
जो सितारा है तमाशाई है
ऐसे में याद तेरी आई है
१९६२ साली ख़ुर्शीद अन्वर यांनी ‘घुंघट’ हा चित्रपट काढला. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व संगीतकार ख़ुर्शीद अन्वरच होते. नूरजहाँने या चित्रपटात पाच गाण्यांसाठी ‘प्ले-बॅक’ दिला होता. नाहीद नियाज़्ाी आणि नज़्ामा नियाज़्ाीचं प्रत्येकी एक गाणं चित्रपटात होतं. या चित्रपटातलं सर्वात वैशिष्टय़पूर्ण गाणं नसीम बेग़मच्या आवाजात होतं. ‘छुन छुन छुन मेरी पायल की धून, गाये तेरा ही तराना कभी आके तो सून..’ या गाण्यात ‘पॉझेस’चा अनोखा प्रयोग करताना ़ पंजण, घुंगरू व विविध पक्ष्यांचे आवाज यांचा इंटरल्यूडमध्ये केलेला उपयोग ख़ुर्शीद अन्वर यांचं वेगळेपण अधोरेखित करतो.
मियाँ ज़्ाहूर अहमद, सय्यद बशीर असगर व ख़्वाजा ख़ुर्शीद यां तिघांनी मिळून ‘चिंगारी’ (१९६४) या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचं कथानक, दिग्दर्शन आणि संगीत अशी तिहेरी जबाबदारी ख़ुर्शीद अन्वर यांच्यावरच होती. हा चित्रपट फारसा चालला नाही; परंतु यातली काही सुंदर गाणी अजरामर बनली. उदा. नूरजहाँने गायलेलं ‘कली कली मंडलाये भंवरा कहीं भी चन न पाये’ चांगलंच गाजलं. ‘आजा पास मेरे ग़म की लंबी रात मेरे मन को चन मिले..’ हे गाणं नूरजहाँ व सलीम रज़ा यांच्या स्वरात स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलं होतं. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मेहदी हसन यांनी गायलेल्या ‘ऐ रौशनियोंके शहर बता’ या स्वररचनेत कौशी कानडा रागाबरोबर पाश्चात्त्य संगीताचा केलेला मिलाफ आणि नूरजहाँने गायलेल्या ‘दिल की बात बतायें किस को हम दुख दर्द के मारे लोग..’ या गाण्यात प्रील्यूडमध्ये फ्ल्यूटवर बिलासखानी तोडीचा अप्रतिम जो पीस ख़ुर्शीद अन्वर यांनी अरेंज केला आहे, त्याला दाद द्यावी लागेल.
‘हवेली’ (१९६४) हा ख़लील क़ैसरने दिग्दíशत केलेला व ख़ुर्शीद अन्वर यांच्या मधाळ संगीताने नटलेला सुरेल चित्रपट होता. यात एकूण आठ गाणी होती; परंतु सर्वाधिक आकर्षक म्हणून यातल्या तीन गाण्यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. नूरजहाँने गायलेलं ‘जबसे गयेऽ पिया, भेजी नही पतियाँ, सूनी सूनी रातें मेरी लागे नाही अख़ियाँ..’ हे गाणं नितांतसुंदर लाजवाब चालीत बांधलं होतं. मनाला विलक्षण हुरहुर लावणारं हे कातर गाणं नूरजहाँने आपल्या गायकीच्या अदाकारीनं अप्रतिम सजविलं होतं. दुसरं गाणं आयरिन परवीन आणि कोरसबरोबर नूरजहाँनेच गायलं होतं. हे विवाहप्रसंगी गायलं जाणारं गीत होतं. ‘जा के सुसराल गोरी मके की लाज रखना..’ या गाण्याने वर्षांनुवष्रे धूम मचवली होती. तिसरं गाणं नसीम बेग़मच्या स्वरात होतं. या गाण्याचे पडसाद मात्र दूरवर उमटले. हे सदाबहार गाणं आपलं स्थान आजही राखून आहे. बोल होते..
मेरा बिछडम बलम घर आ गया घर आ गया
मेरी पायल बाजे छनन छनन छनन् छनननननननन
गाण्यात मंजूर अहमदने तबल्याबरोबरच ढोलकीचा आणि घुंगरांचा केलेला प्रयोग वेधक होता, तर ऑर्केस्ट्रेशनमध्ये फ्ल्यूट, सतार, मेंडोलीनसारख्या वाद्यांचा मेळ दृष्ट लागावा इतका छान जुळून आला होता. विशेषत: पिक्लो फ्ल्यूटवर वाजविलेली कोकिळेची तान तर आवर्जून दाद देण्याजोगी होती.
‘सरहद’ (१९६६) या चित्रपटात मेहदी हसन व नूरजहाँने गायलेलं ‘चाँद तू जब भी मुस्कुराता है मेरा दिल डूब डूब जाता है..’ हे दर्दभरं गाणं दिलखेचक होतं. यानंतर ख़ुर्शीद अन्वर यांनी संगीतबद्ध केलेले ‘हमराज़्ा’ (१९६७), ‘गुड्डो’ (१९७०), ‘हीर-रांझा’ (१९७०), ‘परायी आग’ व ‘सलामे-मुहब्बत’ (१९७१), ‘शिरीं-फ़रहाद’ (१९७५), ‘इन्सान’ (१९७७), ‘हैदर अली’ (१९७८), ‘मिज़्रा जट’ (१९८२) हे चित्रपट झळकले. ‘शिरीं-फ़रहाद’मध्ये गझलसम्राट गुलाम अलीने चित्रपटासाठी प्रथमच पाश्र्वगायन केलं.
ख़ुर्शीद अन्वर यांचा शास्त्रीय संगीताने नटलेला ‘तानसेन’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट पूर्णत्वास जाऊ शकला नाही.. ‘आओ रे बदरी तरस गई मैं तो घनघोर घटाओं कहाँ हो आओ..’ नूरजहाँने मेघमेल्हार रागात गायलं होतं. ‘करम करो दाता हम पर..’ व ‘केवडा रे सखी केवडा चंपा चमेली..’ ही बसंतबहार रागातील बंदिश श्याम चौरसिया घराण्याचे उस्ताद सलामत अलीखांसाहेबांनी गायली होती. ‘मेरी िज़्ादगी के राजदाँ मुझे दे सदा तू है कहाँ..’ (स्वर: मुजीब आलम व आयरिन परवीन), हे भावपूर्ण गीत होतं. ‘राधा नाचो नाचो रे कृष्णमुरारी आऽये दुआरे बारो घी के दीया..’ ही मुनीर हुसनने गायलेली कृष्णभक्तीपर शास्त्रोक्त बंदिश ध्वनिमुद्रित होऊनसुद्धा रसिकांपुढे येऊ शकली नाही. दीपक रागावर आधारित एक बेहतरीन तज़्र्ा मेहदी हसनच्या आवाजात ख़ुर्शीद अन्वर यांनी ध्वनिमुद्रित केली होती. मेहदी हसन यांचा स्वर आणि क़तील शिफाई यांचं काव्य यांचा सुरेल समन्वय असलेली ही स्वररचना बहारदार होती.
जल जा जल जा ओ परवाने
जल जा जल जा जल जा
चित्रपट प्रदíशत झाला असता तर ख़ुर्शीद अन्वर यांचं अभिजात संगीत ऐंशीच्या दशकातसुद्धा दुमदुमलं असतं. तमाम कलावंतांनी केलेल्या मेहनतीचं चीज झालं असतं; परंतु नियतीच्या मनात ते नव्हतं.
‘घराण्यांची गायकी’ या विषयावर आधारित शंभर रागांचे जतन करताना ‘रागमाला’ची निर्मिती करून ख़ुर्शीद अन्वर यांनी नव्या पिढीसाठी शास्त्रोक्त संगीताचा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे. संगीताची घराणी, विविध राग, त्यांचे थाट यावर ख़ुर्शीद अन्वर यांनी तयार केलेला ‘रागमाला’ नावाचा प्रकल्प पाकिस्तानातल्या एटक कंपनीने १० कॅसेट्सच्या संचात आणला होता.
नोटेशन पद्धतीवर फारसं विसंबून न राहणाऱ्या ख़ुर्शीद अन्वर यांच्या मते वेगवेगळ्या कलाकाराने गायलेला विशिष्ट राग एकसारखा असूच शकत नाही. कलाकाराच्या घराण्याचा प्रभाव, तयारी, रियाज़्ा, कलाविष्करण, कलावंताचा मूड यानुसार रागांचं सादरीकरण बदलत असतं. शिवाय आरोह-अवरोह, मींड, मुरक्या, गमकयुक्त ताना यांना नोटेशनमध्ये कसे बंदिस्त करता येईल? पं. विष्णुपंत भातखंडे यांनी आपल्या ‘लक्ष्यसंगीत’ या ग्रंथात रागांना जतन करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याचं ख़ुर्शीद अन्वर यांना काळानुरूप आवश्यक वाटत असलं तरी भातखंडेंकडे ध्वनिमुद्रणाची अत्याधुनिक साधनं उपलब्ध असती तर त्यांनी नक्कीच नोटेशनऐवजी अनेक बंदिशी ध्वनिमुद्रित करण्यावर भर दिला असता, असं एका मुलाखतीत ख़ुर्शीद अन्वर यांनी सांगितले होते.
१९४१ ते १९८२ अशी तब्बल चार दशकांची सफल कारकीर्द गाजविल्यानंतर १९८३ सालापासून ख़ुर्शीद अन्वर यांनी आजारपणामुळे काम जवळपास थांबविलं होतं. प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना ३० ऑक्टोबर १९८४ रोजी लाहोर येथे या महान संगीतकाराचं निधन झालं.