‘‘ज्या दिवशी चित्रपट संगीताची नाळ शास्त्रीय संगीतापासून तुटेल आणि पारंपरिक वाद्यांच्या सहभागाऐवजी इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा कल्लोळ वाढेल; त्या दिवशी चित्रपट संगीतातील माधुर्य लोपलेलं असेल.. गाणी अल्पायुषी ठरतील व सिनेसंगीताचे वैभवशाली दिवस इतिहासजमा होतील.’’ असं भाकीत, भारतात एक तप व पाकिस्तानात दोन तपांहून अधिक काळ प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्द गाजविलेले ख्यातनाम संगीतकार, संवादलेखक, निर्माता-दिग्दर्शक ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांनी केलं होतं.. दुर्दैवाने आज दोन्ही देशांतल्या संगीताची दारुण अवस्था पाहता त्यांचं अनुमान खरं ठरल्याची खात्री पटते.. ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘महल’सारख्या कर्णमधुर संगीताने नटलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून लता मंगेशकर नावाचा झंझावाती दौर सुरू होण्याआधीची ही घटना. लताजींच्या संघर्षांचा तो काळ होता. संगीतकार ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांनी त्यांना रिहर्सलसाठी बोलावणं धाडलं. त्या ठरल्याप्रमाणे वेळेवर पोहोचल्या तेव्हा दोन वादक वगळता तिथे कुणीच उपस्थित नव्हतं. दोघांपकी एक जण सारंगीच्या तारा छेडीत होता, तर दुसरा हार्मोनियमवर कुठल्याशा गाण्याची धून आळवीत होता. लताजी काही काळ बसून राहिल्या. मग हार्मोनियमवाला म्हणाला, ‘‘चला आता तुम्हाला गाणं शिकवतो.’’ ‘‘तुम्ही ख़ुर्शीदसाहेब आहात?’’ लता मंगेशकरांनी विचारले. ‘‘ख़ुर्शीदसाहेब काही कामासाठी बाहेर गेले आहेत. परंतु त्यांना पेटी वाजविता येत नाही व गाणंही म्हणता येत नाही. ते फक्त गाणं कंपोझ करतात. गायकांना गाण्याची चाल समजावण्याची जबाबदारी माझीच असते.’’ पेटीवाला फुशारकीने म्हणाला. लता मंगेशकर ताडकन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या ‘‘माफ करा! ज्या संगीतकाराला हार्मोनियम वाजविता येत नाही व गाताही येत नाही अशा संगीतकाराकडे मी काम करू इच्छित नाही.!’’हा किस्सा हरीश भीमानी यांनी लिहिलेल्या लता मंगेशकर यांच्या चरित्रपर पुस्तकात स्वत: लता मंगेशकर यांनी सांगितला आहे. यावर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तिथल्या काही अभ्यासकांच्या मते ख़ुर्शीद अन्वर यांना हार्मोनियमचा तिटकारा होता. त्यामुळे त्यांची चाल पेटीवाला समजावून देईल हे संभवत नाही.ख़ुर्शीद अन्वर यांच्या मुलानं इरफ़ान अन्वरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ख्वाजासाहेबांना उत्तम गायकी अवगत होती. उस्ताद तव़क्कुल हुसनख़ाँसाहेबांकडे त्यांचं शास्त्रोक्त संगीताचं रीतसर शिक्षण झालं होतं. आपल्या गुरूच्या गायकीची हुबेहूब नक्कल करता येण्याइतकं नपुण्य त्यांनी कमावलं होतं. मानवी गळ्याशी सुसंगत म्हणून ख़्वाजासाहेबांच्या म्युझिक रूममध्ये कायम सारंगीवाला असायचा. गाण्यातल्या हरकती, मुरक्या व मिंडसारख्या नजाकतदार गोष्टी मानवी गळ्याखेरीज केवळ सारंगीतूनच काढता येतात असं ख़्वाजासाहेबांचं ठाम मत होतं. सारंगीवादकाला ते चाल समजावून सांगत. गायकांना गाणं समजून सांगण्याची जबाबदारी त्याचीच असे. ख़ुर्शीद अन्वर यांच्या बालपणीचे सवंगडी असलेले उस्ताद मंज़ूर त्यांचे साहाय्यक व ऱ्हिदम अरेंजर होते. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे म्युझिक रूममध्ये कुठलंच वाद्य वाजत नसे.. तरीही गाण्याची तर्ज मुकम्मल केली जायची. एवढंच नव्हे तर गीतकाराला मुखडा कसा असावा हेसुद्धा ख़ुर्शीद अन्वरच लिहून देत. त्याच मुखडय़ाचा आधार घेत गीतकार गाण्याचे अंतरे लिहित. कित्येकदा हे अंतरे प्रसिद्ध उर्दू शायरांच्या ग़ज़्ालांचे ‘मतले’ असत. ख़्वाजासाहेब उत्तम दिग्दर्शक असल्याने गाणं ‘व्हिज्युलाइझ’ करून ते त्याची चाल बांधत.वरील घटनेत लतादीदींना चाल समजावण्यासाठी पुढे सरसावलेला वादक हा सारंगीवाला होता की पेटीवाला होता याला महत्त्व उरत नाही. त्याने अर्धसत्य सांगून अकारण लताजींना भ्रमित केले. यात नुकसान न लताजींचं झालं न ख़्वाजासाहेबांचं.. कोटय़वधी लोक या दोन महान कलावंतांच्या सुरेल सृजनाला मुकले. पुढे लता मंगेशकर नावाची गायिका गानसम्राज्ञी बनून भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवील असं माहीत असतं तर कदाचित ख़ुर्शीदसाहेब त्यांना साजिंद्याच्या भरवशावर सोडून बाहेर पडले नसते व ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर भविष्यात प्रतिष्ठित संगीतकार म्हणून नावारूपास येतील याची पूर्वकल्पना असती तर लताजीसुद्धा एवढय़ा तडकाफडकी गाण्याची ऑफर धुडकावून तेथून निघून आल्याच नसत्या.ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांच्याकडे असंख्य गाणी गायलेल्या नूरजहाँच्या मतानुसार ख़्वाजा ख़ुर्शीद यांची गायकांना चाल समजावण्याची रीत क्लिष्ट होती. गाण्याची चाल व त्यातल्या अवघड जागा गाता गळा असूनही कित्येकदा ते हाताच्या इशाऱ्याने व खाणाखुणांनी विषद करीत. नूरजहाँचं म्हणणं होतं की, सुरुवातीला दोन-तीन वेळा तिला हे सर्व समजून घ्यायला खूप त्रास झाला. नंतर त्यांना नेमकं काय सांगायचंय याचं आकलन होऊ लागलं आणि मग पुढची वाटचाल खूपच सुखद होती. ख़ुर्शीद अन्वर हे नाव भारतातल्या चित्रपटशौकिनांसाठी नवं नाही. भारतातली त्यांची सांगीतिक कारकीर्द फारशी गाजली नसली तरी नक्कीच ती संस्मरणीय होती. आपल्या बुजूर्ग संगीतकारांनी त्यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. अखिल भारतीय सिनेसंगीतकारांच्या संघटनेने भारतीय चित्रपटांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाच्या निमित्ताने ‘मॉर्टल मॅन इमॉर्टल मेलडीज’ या कार्यक्रमात १९८२ साली ख़ुर्शीद अन्वर यांना एक विशेष मानपत्र देऊन गौरवलं होतं.ख्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांचं खानदान, सुसंस्कृत काश्मिरी मुस्लिम परिवाराशी नातं सांगणारं. ख़ुर्शीद यांचा जन्म फाळणीपूर्व भारतात २१ मार्च १९१२ रोजी पंजाब प्रांतातल्या मियाँवाली जिल्ह्यत (जे सध्या पाकिस्तानात आहे) झाला. त्यांचे पिताश्री ख़्वाजा फ़िरोज़ुद्दीन अहमद हे बॅरिस्टर होते. ‘आजोबा’ (वडिलांचे वडील) ख़ानबहाद्दुर ख़्वाजा रहिमबख़्श प्रशासकीय सेवेत उपायुक्त (डेप्युटी कमिशनर) होते. मियाँवाली येथे त्यांचे आजोबा (आईचे वडील शेख) अता मोहंमद हे सिव्हिल सर्जन, तर मावशी (शेखसाहेबांची थोरली मुलगी) उर्दूचे महान कविश्रेष्ठ डॉ. इक़बाल यांची पत्नी होती. लहानपणी ख़ुर्शीद अन्वर यांना अल्लामा इक़बालच्या अंगाखांद्यावर खेळण्याचं भाग्य लाभलं. ख़ानबहाद्दुर ख़्वाजा रहिमबख़्श यांना संगीताचा शौक होता. त्यांच्या निवासस्थानी मोठमोठय़ा कलावंतांच्या मफली झडत. या मफलीत उस्ताद अब्दुल ख़ाँ, उस्ताद आशिक़ अली ख़ाँ, छोटे ग़ुलाम अली ख़ाँसाहेब व उस्ताद तवक्क़ुल हुसन खाँ यांची हजेरी असायची. या महान कलावंतांना खुर्शीद अन्वर यांना जवळून ऐकता आलं व त्याचबरोबर अभिजात संगीताविषयी कमालीची आवडही निर्माण झाली. खुर्शीद अन्वर यांचे वडील फ़िरोज़ुद्दीनसुद्धा संगीताचे शौकीन होते. त्यांच्याकडे ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या रूपात शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा प्रचंड मोठा संग्रह होता. फ़िरोज़ुद्दीन यांचं निवासस्थान कलावंतांची मांदियाळी असलेल्या लाहोरच्या भाटी गेट (भाटी दरवाज़ा) परिसरातच होतं.खुर्शीद किशोरवयातच उर्दू शायरी करू लागले. त्यांनी आपलं शालेय शिक्षण सेंट्रल मॉडर्न स्कूल लाहोर येथून पूर्ण केलं. १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजात प्रवेश मिळवला. तेथे त्यांना अनेक विद्वान आणि अनुभवी शायरांचं तसेच साहित्यिकांचं मार्गदर्शन लाभलं. यात अहमदशहा बुखारी ‘पतरस’, इस्लामिया कॉलेजचे डॉ. तासीर, सुफी ग़ुलाम मोहंमद तबस्सुम, इम्तियाज़्ा अली ताज, चिराग़हसन हसरत, हफीज़्ा जालंधरी व अख़्तर शिरानीसारख्या दिग्गजांचा समावेश होता. त्याचबरोबर फ़ैज़्ा अहमद फ़ैज़्ा व नून मीम राशीदसारखे जिवाभावाचे मित्रही मिळाले. अभ्यासक्रमात फ़ैज़्ासाहेब खुर्शीद अन्वर यांच्या एक वर्ष पुढे, तर राशीदसाहेब दोन वर्षांनी पुढे होते. ख़ुर्शीद अन्वर यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९३५ साली एम.ए.ची पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. भारतीय मुलकी परीक्षेत (आयसीएस) प्रवेश घेऊन १९३६ साली ते प्रथम स्थान पटकावून उत्तीर्ण तर झाले, परंतु प्रत्यक्ष मुलाखतीत मात्र त्यांना कमी मार्कस् देऊन डावलण्यात आलं. १९३० साली शहीद भगतसिंहच्या क्रांतीकारी कारवायांत सामील असल्याकारणाने त्यांना कारावास घडला होता. याचा डूख मनात धरून पॅनेलवरच्या सदस्यांनी त्यांना हेतुत: मुलकी सेवेची संधी मिळू नये अशी तजवीज केली. यानंतर मुलकी सेवेचा नाद सोडून ते संगीताकडे आकृष्ट झाले.ख़ुर्शीद अन्वर यांनी शास्त्रीय संगीताची कास धरली. त्या काळात लाहोर येथे ‘सरगमचे बादशहा’ समजले जाणारे तवक्क़ुल हुसेनख़ाँसाहेबांसारखी नामीगिरामी श़िख्सयत ‘उस्ताद’ म्हणून त्यांना लाभली. विविध रागांचे आरोह-अवरोह, ताना, पलटे, गमक, मिंड, मुरक्या हरकती त्यांनी ख़ाँसाहेबांकडून आत्मसात केल्या.लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजात मित्रपरिवारातले सदस्य असलेले पतरस बुख़ारी यांनी १९३८ साली ऑल इंडिया रेडिओ दिल्ली येथे डायरेक्टर जनरल म्हणून सूत्रे हातात घेतली. १९३९ साली त्यांनी ख़ुर्शीद अन्वर यांना दिल्लीत बोलावून त्यांच्यावर संगीत विभागाची जबाबदारी सोपविली.आपल्या कार्यकाळात ख़ुर्शीद अन्वर यांनी शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलावंतांना स्टुडिओत पाचारण करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कला सादर करण्याची संधी दिली. कर्मधर्मसंयोगाने रोशनलाल नागरथ ऊर्फ (संगीतकार) रोशन ‘ऑडिशन’साठी तेथे आले होते. ख़ुर्शीद अन्वर यांनी त्यांच्यातला ‘स्पार्क’ ओळखून रोशन यांना ते वाजवीत असलेल्या ‘दिलरुबा’ (इसराज) या वाद्यासाठी स्टाफ आर्टस्टि म्हणून नियुक्त केले होते. ओळखीतून निर्माण झालेल्या या मत्रीचे बंध पुढे रोशनजींच्या मृत्यूपर्यंत कायम होते. केवळ इतकंच नव्हे, तर रोशन यांचं लग्न ‘इरा निगम’ या पाश्र्वगायिकेशी व्हावं म्हणून ख़ुर्शीद अन्वर यांनीच पुढाकार घेतला होता.ख़ुर्शीद अन्वर दिल्ली नभोवाणी केंद्रासाठी एक साप्ताहिक कार्यक्रम करीत असत. त्यात एक कथानक योजून त्याची पटकथा-संवाद ते लिहीत, तसेच त्यात प्रसंगानुरूप गाणी व ग़ज़्ालांचा समावेश करीत. कथानकात पाश्र्वसंगीतांचे नियोजन करण्यातही ख़ुर्शीद अन्वर यांचाच पुढाकार असे. या काळात त्यांची चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या विविध गीतकारांशी, कलावंतांशी ओळख व ऋणानुबंध निर्माण झाले. हा साप्ताहिक कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. तो ऐकूनच सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ए.आर. कारदार यांनी त्यांना मुंबईत बोलावून ‘कुडमाई’ (वाङ्निश्चय या अर्थाने) या पंजाबी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपविली.‘कुडमाई’ १९४१ साली प्रदíशत झाला. गाणी डी. एन. मधोक यांनी लिहिली होती. चित्रपटातली बहुतेक गाणी राजकुमारी व त्या काळी गायकीतले बडे प्रस्थ समजले जाणारे जी.एम. दुर्रानी यांनी गायली होती. जी.एम. दुर्रानी ख़्वाजासाहेबांचे साहाय्यकदेखील होते. बनारसी ढंगाने गाणाऱ्या राजकुमारीला पंजाबी भाषेतलं गाणं गाताना खूप जड गेलं. तथापि, ख़्वाजासाहेबांनी तिच्याकडून पंजाबी उच्चारणाचा व गाण्याचा कसून सराव करून घेतला. राजकुमारीने जी.एम. दुर्रानीबरोबर ‘गोटेदा हार वे मैं गलविच पाणियाँऽ मिल डोल जाणियाँऽ.’ हे युगुलगीत इतकं समरसून गायलं की तिच्याकडून आपल्या चित्रपटाची गाणी ध्वनिमुद्रित करण्यासाठी संगीतकार श्यामसुंदर यांनी लाहोरवरून थेट मुंबई गाठली. ‘कुडमाई’ चित्रपटात जी.एम. दुर्रानीने गायलेलं ‘दिल ऐंज ऐंज करदा.’ हे गाणंसुद्धा रसिकांना खूपच आवडलं. या चित्रपटात ख़ुर्शीद अन्वर यांनी पुढे प्रख्यात ग़ज़्ालगायिका म्हणून नावारूपाला आलेल्या ‘इ़क्बाल बेग़म’ लायलपुरी हिच्या आवाजात एक-दोन गाणी गाऊन घेतली होती.‘कुडमाई’च्या यशानंतर कारदार यांनी आपल्या ‘शारदा’ (१९४२) या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून ख़ुर्शीद अन्वर यांचीच निवड केली होती, परंतु काही व्यक्तिगत कारणास्तव ख़ुर्शीद अन्वर यांनी हा चित्रपट सोडला. तत्पूर्वी ख़ुर्शीद अन्वर यांनी डी.एम. मधोक लिखित ‘घिर आई बदरिया घर आओ कुछ कह जाओ कुछ सुन जाओ’ हे गाणं संगीतबद्ध करून ठेवले होतं. ख़ुर्शीद अन्वर यांनी चित्रपट सोडताच संगीतकार नौशाद यांनी संगीताची सूत्रे हातात घेतली. डी. एन. मधोक यांनी नौशाद यांना ख़ुर्शीद अन्वर यांनी चाल लावलेलं गाणं वापरण्याचा सल्ला दिला. नौशादमियाँनीही पडत्या फळाची आज्ञा मानून ही चाल निर्मलादेवींच्या आवाजात जशीच्या तशी ध्वनिमुद्रित करून त्यावर बिनदिक्कतपणे संगीतकार म्हणून स्वत:च्या नावाचं लेबल लावलं. ख़ुर्शीद अन्वर यांनी आपल्या स्वभावाला अनुसरून यावर आक्षेप घेतला नाही.यानंतर डी. आर. डी. प्रॉडक्शन्सचा ‘इशारा’ (१९४३) हा चित्रपट ख़ुर्शीद अन्वर यांना मिळाला. पृथ्वीराज कपूर, स्वर्णलता व सुरय्याच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ख़्वाजासाहेबांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली ग़ौहर सुल्ताना, सुरय्या, राजकुमारी, जी. एम. दुर्रानी व एक काळ गाजविलेल्या गायिका व अभिनेत्री वत्सला कुमठेकरांच्या आवाजात गाऊन घेतलेली गाणी लोकप्रिय झाली. विशेषत: ग़ौहर सुल्तानाची ‘शबनम क्यूं नीर बहाये.’, ‘सजनवा आ जा रे खेले दिल के खेल’ व ‘हमे ग़म दे के न जाओ सजन’, वत्सला कुमठेकरांच्या ठसकेबाज स्वरात ‘इश्क़ का दर्द सुहाना’, ‘दिल लेके दगा नहीं देना, तुम्हे मेरी कसम’ या गाण्यांनाही रसिकांची मोठी दाद मिळाली. सुरैयाचं ‘पनघट पे, पनघट पे मुरलिया बाजे’ हे सोलो गाणं तर सतीशबरोबर गायलेलं ‘बागों में कोयल बोली, मेरे दिल की दुनिया डोली’ यासारख्या युगुलगीतांनी रसिकांना डोलायला लावलं. राजकुमारीने जी. एम. दुर्रानीबरोबर गायलेलं ‘धीरे धीरे बोल मेरे राजा’ हे एकमात्र युगुलगीतही या चढाओढीत मागं नव्हतं. ‘इशारा’ची सर्व गाणी डी. एन. मधोक यांनी लिहिली होती.दिग्दर्शक सोहराब मोदींचा ‘परख’ (१९४४) हा चित्रपट ख़ुर्शीद अन्वर यांच्या संगीतामुळे लक्षणीय ठरला. या चित्रपटात एकूण नऊ गाणी होती. सात गाणी ख़ुर्शीद अन्वर यांनी तर उर्वरित दोन गाणी सरस्वतीदेवींनी संगीतबद्ध केली होती. यात इरा निगम (संगीतकार रोशन यांची पत्नी) ने ‘कोई क्या जाने दर्द हमारा क्या है’ व ‘दुनिया है ये प्यार की दुनिया, ओ जाने वाले’ ही दोन गाणी गायली होती. ही दोन्ही गाणी अनुक्रमे आरज़ू लख़नवी व ग़ाफ़िल हरनालवीने लिहिली होती. गायिका-अभिनेत्री कौशल्याच्या आवाजात ‘ग़ुरुरो-नाज़्ा से गेसू का बलखाना नही अच्छा’, ‘आए दिन प्यार के सजना’ व ‘लेती हैं दम-ब-दम बलायें चेहरे-ग़ुल अज़ार की’ या ख़ुर्शीद अन्वर यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. १९४५ साली ज़िया सरहदी यांनी आपल्या ‘यतीम’ या चित्रपटाला संगीत देण्यासाठी ख़ुर्शीद अन्वर व दत्ता कोरगावकर ऊर्फ के. दत्ता यांची निवड केली होती. चित्रपटात एकूण आठ गाणी होती. ख़ुर्शीद अन्वर यांनी चित्रपटासाठी पाच गाणी तर दत्ता कोरगावकरांनी तीन गाणी कंपोझ केली होती. या चित्रपटात याकूब, चंद्रप्रभा, ललिता पवार, डेव्हिड व सुरयाच्या प्रमुख भूमिका होत्या. यातील गाणी जी. एम. दुर्रानी, राजकुमारी व सुरैया यांनी गायली होती.के. ए. अब्बास दिग्दíशत ‘आज और कल’ (१९४७)साठी संगीत देताना ख़ुर्शीद अन्वर यांनी ज़्ाीनत बेग़मच्या आवाजात स्वरबद्ध केलेल्या ‘आओ साथी आओ, साथी तुम किस ओर चली’ व ‘पडे इश्क़ में जान के हमको लाले, ख़ुदा इम्तिहाँ में किसी को न डाले.’ तसेच नसीम अख़्तर ने गायलेल्या ‘जाम उठा ले ओ पीनेवाले’ आणि ‘कलियों को मसलने आयें हैं फूलों को जलाने आयें हैं’ या गाण्यांना बऱ्यापकी लोकप्रियता मिळाली.सुरेल गीतांमुळे चच्रेत असलेला चित्रपट म्हणून ‘पगडंडी’ (१९४७) कडे अंगुलीनिर्देश करता येईल. यात ‘आँख के पानी आँख में रह’, ‘बलमा पटवारी हो गये नौकर सरकारी हो गये’ (स्वर: मुनव्वर सुल्ताना), ‘अंबवा पे गाये कोयलिया गाने’, ‘ऐ लो बादल आये वो नहीं आये रे’, ‘परदेसी बालम आई घटा घनघोर पपीहे मोर मचायें शोर जिया न लागे आजा’, ‘इक बांवरा पंछी नदिया के किनारे’ व ‘ओ मोरे राजाजी मोरी गली आना’, ‘झूलना डला दे मोहे सैंया को बुला दे.’ (स्वर : ज़्ाीनत बेग़म) या गाण्यांनी गानशौकिनांना मंत्रमुग्ध केलं.‘परवाना’ (१९४७) हा ख़ुर्शीद अन्वर यांचा भारतात सर्वाधिक गाजलेला चित्रपट! हा सर्वार्थाने सुरैयाचा चित्रपट होता. यातला तिचा अभिनय व गाणी तुफान लोकप्रिय ठरली. ‘जब तुम ही नहीं अपने दुनिया ही बेग़ानी है’,‘आजा बालमा रे नगरी डर लागे’, ‘पापी पपीहा रेऽ पी पी न बोल बरी पी पी न बोल.’ व ‘मेरे मुंडेरे न बोल जा कागा कागा जा.’ यांसारख्या गाण्यांनी संगीतशौकिनांना अमाप आनंद दिला. आजही ‘परवाना’ची गाणी ऐकली तरी रसिकांना डोलायला लावतात. ‘परवाना’ हा सगलचा अखेरचा चित्रपट म्हणूनदेखील याचे महत्त्व असाधारण आहे. ‘परवाना’त सगल नायक तर सुरैया नायिकेच्या भूमिकेत होती. ‘टूट गये सब सपने मेरे, टूट गयेऽ ये दो नना सावन भादों बरसे सांज सवेरेऽ.’, ‘उस मस्त नज़्ार पर पडी जो नज़्ार. कहीं उलझ ना जानाऽ’, ‘मुहब्बत कभी ऐसी भी हालत पाई जाती है’ व ‘जीने का ढंग सिखाए जाऽ काटों की नोक पर खडम मुस्कुराए जा.’ या सगलने गायलेल्या गाण्यांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात राजकुमारीने गायलेले ‘सैंय्याने उंगली मरोडी रेऽ राम कसम शरमा गई मैं’ या गाण्याची खुमारीच आगळी होती. सुरैयाने गायलेलं ‘जब तुम ही नहीं अपने’ हे गाणं पाकिस्तानात नूरजहाँसह नायरा नूर, मुसर्रत नज़्ाीर सारख्या पाश्र्वगायिकांनी आपल्या परीने गाण्याचा प्रयत्न करून पाहिला तथापि या तमाम ‘परछाई’ गीतांना सुरैयाने गायलेल्या गाण्याची सर काही आली नाही. १९८२ साली नुरजहाँने आपल्या भारत भेटीत याची जाहीर कबुली दिली होती.‘सिंगार’ (१९४९) हा ख़ुर्शीद अन्वर यांच्या कर्णमधुर संगीताने नटलेला चित्रपट. या चित्रपटासाठी संगीतकार रोशन साहाय्यक संगीतकाराच्या भूमिकेत होते. ‘सिंगार’मध्ये जयराज, सुरैया, मधुबाला, दुर्गा खोटे व के. एन. सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात एकूण अकरा गाणी होती. यात पुरुष गायकाचं एकही गाणं नव्हतं. सर्वच्या सर्व ‘फीमेल-साँग्ज’ होती. ‘ऐ दर्दे-मुहब्बत तूने मुझे दीवाना बनाकर छोडम् दिया’ (स्वर : सुरैया व सुिरदर कौर), ‘धरक धरक तेरे बिन मेरा जियरा सगरी रात सताये रेऽ’, ‘नया ननों में रंग, नई उठी उमंग जिया बोले मीठी बानी’, ‘ऐ भूलनेवाले तुझे ये कौन बताये’, ‘वो दिन किधर गये कहो वो दिन किधर गये’ (स्वर : सुरैया), ‘कौन समझेगा किसे समझाऊं दिल आने की बात’ व ‘चंदा रेऽ मैं तेरी गवाही लेने आई’ ही लाजवाब गाणी सुिरदर कौरने गायली होती. ‘सिंगार’ची गाणी शकील बदायुनी, डी. एम. मधोक व नख़्शब यांनी लिहिली होती. संगीतकार रोशन यांच्या सहभागामुळे या चित्रपटतल्या गाण्यांचं ऑर्केस्ट्रेशन अधिक दमदार व बहारदार वाटतं.‘सिंगार’च्या ध्वनिमुद्रणप्रसंगी सुिरदर कौरला ख़ुर्शीद अन्वर म्हणाले, ‘‘तुम्ही गाताना अभिनय केला पाहिजे तर गाण्यातला नेमका भाव गायकीत उतरेल.’’ यावर सुिरदर कौर उत्तरल्या, ‘‘मी गाण्यातला भाव गळ्यातून उतरवण्याचा प्रयत्न जरूर करीन; परंतु त्यासाठी हावभाव करणे मला शक्य नाही, कारण अभिनय हा काही माझा पेशा नाही.’’ आजच्या काळात ‘परफॉर्मन्स’ देताना गायकांच्या हावभावालाही आलेलं महत्त्व पाहता ख़्वाजासाहेबांच्या आग्रहात तथ्य होतं याची खात्री पटते.कमाल अमरोहींबरोबर ‘मुग़ले-आज़्ाम’ चे धुंवाँधार संवाद लिहिणारे संवाद लेखक-पटकथाकार व दिग्दर्शक वजाहत मिज़्रानी १९५० साली ‘निशाना’ हा चित्रपट दिग्दíशत केला होता. यातही स्त्रीगीतांचाच भरणा होता. गीता दत्त, शमशाद बेग़म व राजकुमारीसारख्या नामांकिन पाश्र्वगायिका असूनही एक-दोन गाण्यांचा अपवाद वगळता यातली गाणी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाहीत.‘नीलमपरी’ (१९५२) हा ख़ुर्शीद अन्वर यांचा भारतातला शेवटचा सुरेल चित्रपट होता. यातली गाणी बऱ्यापकी लोकप्रिय झाली. या वेळी प्रथमच मोहंमद रफी व आशा भोसले यांच्या मदभऱ्या स्वरांचा उपयोग ख़ुर्शीद अन्वर यांनी आपल्या संगीतात केला. ‘जब तक चमके चाँद सितारेऽ तुम हो हमारे सैंया’ (स्वर: जी. एम. दुर्रानी व गीता दत्त), ‘चाहे किस्मत हमको रुलाये, और अपना पराया समझाये चाहे दुनिया लाख सताये. तेरा मेरा प्यार न जाए.’ (स्वर : मो. रफी व गीता दत्त), ‘छम छम छम छम. रहे दोनों साथ हरदम’ व ‘सपनों में आनेवाला बालम’ (स्वर : आशा भोसले व गीता दत्त), ‘रात चाँदनी करे इशारे’, ‘इक तुम दूजी मं, तीजा चाँद चौथी ठंडी हवा’, ‘किस्मत ने ये ज़ुल्म किया है’ (गीता दत्त), ‘महेफिल तेरी सजे रही’ यासारखी गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत.ख़ुर्शीद अन्वर यांनी भारतात अनेक दिग्गज कलावंताना वादक म्हणून आपल्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये आवर्जून स्थान दिले. यात पन्नालाल घोष (फ्ल्यूट), पं. रामप्रसाद शर्मा (ट्रंपेट), उस्ताद अल्लारख़ां (तबला), उस्ताद सोनीख़ां (क्लॅरनेट), अब्दुल हलिम जाफरख़ां (सतार) यांचा प्रामुख्याने समावेश होतो.लेखाच्या पुढील भागात ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांची पाकिस्तानात गाजलेली कारकीर्द, यादगार चित्रपट व तिथली सदाबहार गाणी यांचा प्रामुख्याने ऊहापोह करू. तोवर अलविदा! या लेखाशी संबंधित निवडक गाणी ऐकण्यासाठी लिंक- www.youtube.com/results?search_query=Aasifali+Pathan