धम्माल
डिंग्याची कार शंभरच्या स्पीडनं धावत होती.. एकदम सुसाट. रस्ता घाटाचा, वाकडय़ातिकडय़ा वळणांचा होता. पण डिंग्याला त्याचं कायपण नव्हतं. समोर धावत असलेली पाकिस्तानी अतिरेक्यांची कार नजरेआड होता कामा नये, एवढंच त्याच्या डोक्यात होतं. त्याने एक्सलेटरवरचा पाय अजून दाबला. वेग वाढवला. स्पीडोमीटरचा काटा आता एकशेवीसला शिवू लागला होता. अतिरेक्यांची काळी गाडी आणि डिंग्याची बीएमडब्लू यांच्यातलं अंतर कमी कमी होत चाललं होतं. पण.. अचानक पुढच्या दरीतून एक अगडबंब हेलिकॉप्टर वर आलं. डिंग्याने कच्कन कारचा ब्रेक दाबला. तेवढय़ात त्या हेलिकॉप्टरमधून त्याच्या कारवर गोळ्यांचा वर्षांव सुरू झाला. पावसाचे टपोरे थेंब पडावेत तशा त्या गोळ्या कारवर थडाथडा आपटू लागल्या. डिंग्या सीटवर खाली झुकला. त्याने स्टिअरिंग व्हील गरागर फिरवत कार एका बाजूला गर्रकन वळवली. पण त्या हेलिकॉप्टरमधून आलेल्या एका गोळीने नेमका कारच्या एका टायरचा वेध घेतला. फट्कन आवाज करीत तो टायर फुटला. कार नियंत्रणाबाहेर गेली आणि काही कळायच्या आत ती खोल दरीत धाडकन् कोसळली. पडता पडता कारचा स्फोट झाला. डिंग्याला वाटलं, आता संपलंच सगळं. त्याच्या तोंडातून आपोआप किंकाळी बाहेर पडली.. बचाव, बचाव..
* * *
‘‘ये. डिंग्या, ऊठ! बचाव बचाव काय? स्वत:च पडतोस आणि वर ओरडत बसतोस. ऊठ!’’
एका हाताने डिंग्याचा खांदा जोरजोरात हलवत यशोधन म्हणाला. तो जाम चिडला होता. चिडणार नाही तर काय? डिंग्याचं हे नेहमीचंच होतं. कसली कसली स्वप्नं पाहतो. बेडवरून खाली पडतो आणि असा ओरडत बसतो. दुसऱ्यांना काही झोपबीप आहे की नाही?
डिंग्याने डोळे उघडले. त्याचं डोकं चांगलंच झिणझिणलं होतं. ते चोळतच तो उठला. ते पाहून मल्लिकाला हसूच फुटलं.
ती म्हणाली, ‘‘काय, सपनों के सौदागर? झाली का झोप?’’
यशोधन अजून चिडलेलाच होता. तो म्हणाला, ‘‘रोज रोज कसली रे स्वप्नं पाहतोस? उगाच आम्हांला त्रास?’’
मल्लिका म्हणाली, ‘‘तो तरी काय करणार? त्याला स्वप्न पडतात. म्हणून तो पडतो. होय ना रे डिंग्या? पण कसलं रे स्वप्न होतं? भूताचं की राक्षसाचं?’’
डिंग्या म्हणाला, ‘‘हॅट्. मी अशी कार्टूनवाली स्वप्नं पाहात नाही.’’
मल्लिका म्हणाली, ‘‘अँहॅहॅ. म्हणे मी अशी स्वप्नं पाहात नाही! कोणतं स्वप्न पाहायचं हे काय आपल्यावर असतं काय?’’
यशोधन डिंग्याला चिडवत म्हणाला, ‘‘याचं काही सांगता येत नाही बाबा! तो काय, त्याला पाहिजे त्या स्वप्नाची सीडी लावत असणार!’’
मल्लिका म्हणाली, ‘‘त्याच्या डोक्यात ना स्वप्नांचा केबल टीव्ही असेल!’’
डिंग्या म्हणाला, ‘‘सॉलिड स्वप्न होतं. जेम्स बॉण्डचं. मस्त पाठलाग चालला होता! पुढं अतिरेकी. मागं माझी बीएमडब्लू.. मी त्या अतिरेक्यांना पकडलंच असतं. पण..’’
‘‘पण तू बेडवरून खाली पडलास!’’ यशोधन म्हणाला आणि सगळे हसू लागले.
तेवढय़ात डिंग्याचं लक्ष कोपऱ्यातल्या बेडवर झोपलेल्या हृषीकडं गेलं.
तो म्हणाला, ‘‘तो हृषी बघा. कसा झोपेत हात हलवतोय. त्यालापण स्वप्न पडलंय बहुतेक.’’
त्याला पाहून मल्लिकाला हसूच फुटलं. ती त्याला हाक मारू लागली, ‘‘हृषीदादा, ए हृषीदादा..’’
पण हृषी गप्पच होता. हूं नाही की चूं नाही. यशोधन उडी मारत त्याच्या बेडवर गेला. पाहतो, तर हृषीने दोन्ही हात असे छातीजवळ धरलेले. हाताच्या मुठी वळवलेल्या आणि दोन्ही अंगठे तेवढे खालीवर हलताहेत. आणि बापरे! हृषीचे दोन्ही डोळे टक्क उघडे होते.
‘‘याचं बघ काय नाटक चाललंय?’’ यशोधन म्हणाला आणि त्यानं हृषीच्या हातावर एक चापटी मारली. पण हृषी गप्पच. हूं नाही की चूं नाही. यशोधनने त्याचे दोन्ही दंड धरून गदागदा हलवलं. तरीही हृषी शांतच. फक्त अंगठे हलताहेत आणि डोळे टक्क उघडे. त्याची पापणीसुद्धा लवत नव्हती.
‘‘बाप रे. हे काहीतरी भलतंच आहे.’’ यशोधन घाबरला.
मम्मी, पप्पांना हाका मारीत तो बाहेर पळाला.
डिंग्या आणि मल्लिकापण जाम टरकले होते. तेपण यशोधनच्या मागे बाहेर पळाले.
‘‘काय रे? झाली का उठल्याबरोबर तुमची मस्ती सुरू? तुमच्या दिवाळीच्या सुटीने वात आणलाय सगळ्या घराला!’’ मम्मी वैतागून म्हणाली, ‘‘काय झालं हृषीला?’’
यशोधन म्हणाला, ‘‘तो बघ, कसा करतोय?’’
हृषीच्या अंगावरची चादर ओढत मम्मी म्हणाली, ‘‘हृषू, ऊठ पाहू आता.. हृषू.. ये बाळा..’’
पण हृषी गप्पच. अगदी पुतळ्यासारखा. स्तब्ध. हूं नाही की चूं नाही. फक्त अंगठे हलताहेत. डोळे टक्क उघडे आणि नजर अशी शून्यात.
मम्मीला काहीच कळेना. तीही घाबरली आणि तिने यशोधनच्या पप्पांना हाक मारली, अहो, लवकर या. हृषीला काय झालंय बघा..
* * *
यशोधनच्या पप्पांनी हृषीला उचललं आणि कारमध्ये घालून लगेच डॉक्टरकडे नेलं. मम्मीपण त्यांच्याबरोबर गेली होती. आता घरात आज्जी, यशोधन, मल्लिका आणि डिंग्या एवढेच उरले होते. हृषीच्या आजारपणामुळे सगळ्यांचा मूड गेला होता. घरातलं वातावरण अधिकच थंड, उदासवाणं झालं होतं.
डिंग्याला तर काहीच सुचत नव्हतं. अंघोळपांघोळ, नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्याला काही कामच उरलेलं नव्हतं. तो बेडरूममध्ये गेला. हृषीचा बेड तसाच अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यावर बसून तो विचार करू लागला.
असं एकदम काय झालं असेल हृषीला? तो फक्त अंगठेच का हलवत होता? आणि डोळे कसे उघडेच होते त्याचे? आपण जरा वेळ पापणी नाही पाडली, तर लगेच डोळ्यांतून पाणी येतं आपल्या. आणि तो, एक सेकंदही डोळे मिटत नव्हता. हे कशाने झालं असेल?
डिंग्याला तसं बसलेलं पाहून यशोधननं विचारलं, ‘‘काय रे? काय करतोयस इथं? चल, बाहेर जाऊन बुद्धिबळ खेळूया.’’
डिंग्या म्हणाला, ‘‘आता डॉक्टर काय करतील रे हृषीला?’’
यशोधन म्हणाला, ‘‘काय माहीत? पहिल्यांदा सगळ्या टेस्ट करतील.’’
डिंग्या म्हणाला, ‘‘किती दिवस ठेवतील काय माहीत त्याला! माझा मूडच गेलाय.’’
बोलता बोलता डिंग्या बेडवर आडवा झाला. अचानक त्याच्या पाठीला काहीतरी रु तलं. त्याबरोबर तो ताडकन् उठला.
‘‘काय झालं रे?’’
‘‘काहीतरी आहे इथं. टोचलं मला.’’
डिंग्याने बेडवरची चादर बाजूला केली. तर खाली मोबाइल फोन होता.
‘‘हा हृषी बघ. अंथरुणात मोबाइल घेऊन झोपतो.’’
यशोधन म्हणाला, ‘‘हो. रात्री किती तरी वेळ मोबाइलवर गेम खेळत बसला होता.’’
‘‘मस्त आहे ना त्याचा मोबाइल,’’ असं म्हणत डिंग्याने मोबाइल ऑन केला, ‘‘चायना मेड आहे का रे हा?’’
यशोधन म्हणाला, ‘‘काही कळत नाही. डी-ट्रिपल सिक्स आहे. तुला माहिताय? हा मोबाइल हृषीला सापडलाय.’’
‘‘आँ? सापडला? कुठं?’’
‘‘इथंच. घरात.’’
‘‘घरात कसा सापडेल?’’
‘‘अरे खरंच. परवाच हॉलमध्ये सोफ्याखाली सापडला. आम्ही किती चौकशी केली, कोणाचा आहे म्हणून. पण काहीच पत्ता लागला नाही. मग पप्पांनी सीमकार्ड टाकून तो हृषीला देऊन टाकला.’’
‘‘मज्जा आहे हृषीची. आमचे पप्पा म्हणतात, कॉलेजला गेल्याशिवाय मोबाइल मिळणार नाही.’’
‘‘अरे माझ्याकडंपण नाहीये. पण हृषी लाडका आहे ना पप्पांचा. त्याला सगळं मिळतं.’’
असं म्हणत यशोधनने तो मोबाइल घेतला. ‘‘एवढासा फोन. हातात घेतला तर दिसतपण नाही. पण गेम्स किती आहेत बघ यात. कट द रोप, टेंपलरन, सब-वे सर्फ, कँडीक्रश सागा.. हे बघ, टॉकिंग टॉमपण आहे.’’
यशोधनने कट द रोप सुरू केला. डिंग्या जरा वेळ तो गेम पाहात बसला. पण मग नंतर त्याला कंटाळा आला. डिंग्याचे बाबा त्याला म्हणायचे, ‘अक्षय, गेम मग तो कंप्युटरवरचा असो, मोबाइलमधला असो की मैदानातला. तो पाहण्यात काहीच गंमत नसते. गेम स्वत: खेळायचा असतो. आणि कम्प्युटरवर गेम खेळणं म्हणजे चित्रातलं आइस्क्रीम चाटण्यासारखं आहे.’ बाबांच्या या बोलण्याचा काय अर्थ आहे, ते काही डिंग्याला नीट कळालं नव्हतं. पण त्याला एक चांगलंच समजलं होतं, की कम्प्युटरवर गेम खेळण्याऐवजी आपण मैदानात जाऊन खेळलेलं बाबांना आवडतं.
डिंग्याला आता जाम बोअर झालं होतं. तो उठला आणि हळूच बाहेर पडला.
तो तिथून कधी गेला हे यशोधनला कळलंपण नाही. तो आता दुसरा गेम उघडून खेळायच्या तयारीत होता..
तो गेम किती धोकादायक आहे, हे मात्र त्याला माहीत नव्हतं.
सकाळपासून घरातील हवा थंडगार पडत चालली आहे, हेही त्याच्या लक्षात आलं नव्हतं.
* * *
डिंग्या हॉलमध्ये येऊन कोचवर बसला.
आज्जी स्वयंपाकघरात काम करीत होती. मल्लिका तिला छोटी-मोठी मदत करत होती. डिंग्याला मात्र काय करावं हेच सुचत नव्हतं. त्याला आता एकदम रडावंसं वाटू लागलं होतं.
मावशीच्या घरी काय काय धम्माल करायची, याचे किती तरी बेत त्याने आखले होते. दिवाळीची सुटी लागल्याबरोबर बाबांकडे हट्ट धरून तो वंदनामावशीकडं आला होता. यशोधन आणि हृषीही त्याच्या मावशीची मुलं आणि मल्लिका ही मामेबहीण. सगळे एकत्र आले की सुटीचे दिवस कसे भुर्रकन उडून जायचे हे कळायचंपण नाही. पण आज सुटीच्या दुसऱ्याच दिवशी हृषी आजारी पडला आणि सगळंच बिघडलं.
डिंग्याने टीपॉयवरचा रिमोट घेतला आणि टीव्ही सुरू केला.
डिस्कव्हरी, नॅटजिओ, एवढंच नाही तर स्टार मूव्हीज, एचबीओ असे इंग्रजी सिनेमांचे चॅनेलपण त्याने लावून पाहिले. एचबीओवर नेहमीप्रमाणे हॅरी पॉटरचा सिनेमा लागलेला होता. पण हॅरी पॉटर झाला म्हणून काय झालं? किती वेळा तो पाहणार?
त्याने फटकन् टीव्ही बंद केला. टीव्ही शेजारी पुस्तकांचं कपाट होतं. ते त्याने सहजच उघडलं. आत किती तरी पुस्तकं होती. इंग्रजी. मराठी. जाडीजाडी.
एका खणात यशोधन, हृषीची गोष्टींची पुस्तकं होती. त्यातलं एक पुस्तक त्याने घेतलं. टिक टॉक फास्टर फेणे. लेखक – भा. रा. भागवत.
छान वाटतंय हे पुस्तक. फास्टर फेणे. नाव वाचूनच डिंग्याला गंमत वाटली. त्याने पुस्तक चाळलं. अरे, हा फास्टर फेणे म्हणजे गुप्तहेरच दिसतोय. गुप्तहेराच्या गोष्टी म्हटल्यावर डिंग्या काय, एकदम खूशच झाला.
तिथंच खुर्चीवर मांडी ठोकून तो पुस्तक वाचू लागला.
* * *
‘‘अक्षय..’’
मावशीने हाक मारली. तसा डिंग्या एकदम दचकला.
फास्टर फेणेच्या गोष्टीत तो एवढा बुडून गेला होता, की मावशी कधी घरी आली तेसुद्धा त्याला समजलं नव्हतं.
‘‘चला, जेवून घ्या आता.’’
‘‘मावशी, हृषी कसा आहे आता?’’ डिंग्याने विचारलं.
मावशीच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. तिने पदराने ते टिपलं.
‘‘बरा आहे आता. डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलंय. झोपलाय आता शांत.’’
‘‘पण त्याला काय झालं होतं?’’
मावशी म्हणाली, ‘‘देवाला माहीत! पण तुम्ही आता जेवून घ्या पाहू. यशोधन कुठंय? त्याला हाक मार.’’
तो हाक मारणार इतक्यात यशोधनच हॉलमध्ये आला आणि म्हणाला, ‘‘यशोधन कुठंय? त्याला हाक मार.’’
मावशी म्हणाली, ‘‘काय रे गधडय़ा. माझी नक्कल करतोस काय?’’
तर यशोधनही त्याच सुरात म्हणाला, ‘‘काय रे गधडय़ा. माझी नक्कल करतोस काय?’’
‘‘हं. आता बस्स झाला चावटपणा. लौकर जेवून घ्या. मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचंय.’’
तर यशोधनही तसंच म्हणाला, ‘‘हं. आता बस्स झाला चावटपणा. लौकर जेवून घ्या. मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचंय.’’
आता मात्र मावशी चिडली. ती ओरडली, ‘‘यशोधनऽऽ!’’
तसा यशोधनही ओरडला, ‘‘यशोधनऽऽ!’’
ते ऐकून आज्जीही बाहेर आली.
यशोधन तसा शहाणा मुलगा. आज्जीचा अतिशय लाडका. पण तीही त्याच्यावर रागावली. म्हणाली, ‘‘यश, काय चाललंय वेडय़ासारखं हे?’’
तर यशोधनने तेच वाक्य पुन्हा उच्चारलं. अगदी आज्जी म्हणाली तस्सं.
अचानक डिंग्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
तो म्हणाला, ‘‘मावशी. यशोधनदादाचा टॉकिंग टॉम झालाय.’’
त्यावर यशोधनही तेच म्हणाला आणि ते पाहून मावशीच्या पायातले त्राणच गेले. ती मटकन् खालीच बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
आज्जीने तिला कसंबसं सावरलं आणि यशोधनच्या बाबांना फोन लावला.
त्यावेळी थंडीने आजीचे हात कापत होते.
पण ही थंडी हिवाळ्यामुळे होती की काही वेगळीच होती, हे अजूनही कुणालाच समजलेलं नव्हतं.
* * *
यशोधनलाही त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधले मानसोपचारतज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत होते. त्याच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नव्हता. त्यांच्या मो यशोधनच्या मेंदूवर प्रचंड ताण आला होता. त्यामुळे तो असं करीत होता. पण नक्की निदान अजूनही झालेलं नव्हतं. यशोधनचे मम्मी, पप्पा अगदी हबकून गेले होते. ऐन दिवाळीत दोन्ही मुलांना विचित्र आजार झाला होता. डोकं फुटायची वेळ आली, पण हे काय संकट आहे याचा उलगडा त्यांना होत नव्हता.  
* * *
खरंच हृषी आणि यशोधनदादाला काय झालं असावं?
डिंग्या घरात एकटाच बसून विचार करीत होता.
काल तर ते दोघे ठीक होते. मस्त बोलत होते, खेळत होते. रात्री झोपताना आपण गावांच्या नावाच्या भेंडय़ाही खेळलो. हां, हृषीने काही त्यात भाग घेतला नव्हता. तो एकटाच मोबाइलवर काही तरी करीत होता.
मोबाइल!
डिंग्याच्या डोक्यात एकदम काही तरी चमकून गेलं.
बरोब्बर. मोबाइलच!
हृषी रात्री मोबाइलशी खेळत होता. सकाळी उठला आणि त्याचं असं झालं. असं म्हणजे पुतळ्यासारखं. डोळे उघडे आणि हाताचे अंगठे तेवढे हलताहेत. ते अंगठेही कसे हलत होते? मोबाइलची बटणं दाबत असल्यासारखे. हो. अगदी तस्सेच. आणि डोळे जणू मोबाइलच्या स्क्रीनवरच खिळल्यासारखे. डिट्टो तस्सेच!
पण मग यशोधनदादाचं काय?
तोसुद्धा मोबाइलवर गेमच खेळत होता. पण मग त्याची अवस्था हृषीसारखी का झाली नाही? तो अशी सगळ्यांची नक्कल का करतोय.. टॉकिंग टॉमसारखी? म्हणजे इतका वेळ तो टॉकिंग टॉमची गंमत पाहात होता की काय?
पण म्हणून काय झालं? नुसतं पाहिलं म्हणून काही कोणी टॉकिंग टॉम बनत नाही. आता आपण नाही अनेकदा टॉम अँड जेरी पाहत टीव्हीवर? मग काय आपण टॉमसारख्या उडय़ा मारू लागतो की काय?
पण मग ते दोघंही असं का करताहेत? यात मोबाइलचा काही तरी संबंध नक्कीच आहे. कुठं आहे तो मोबाइल ते तरी पाहू या, असं मनात म्हणत डिंग्या उठला.
त्याच्या शरीरातून अचानक एक थंड शिरशिरी उठली. जागचं हलूच नये, असं त्याला वाटलं. पण तो उठलाच. आता त्याच्यामध्ये फास्टर फेणे, जेम्स बाँड, शेरलॉक होम्स, करमचंद असे सगळे गुप्तहेर शिरले होते!
४ ४ ४
मल्लिका बेडरूममध्ये शिरली तेव्हा तिला पहिली जाणीव झाली ती थंडीची.
सगळ्या घरापेक्षा इथली हवा जरा अधिकच थंड होती.
तिला तिथं एक क्षणही थांबवेना. ती बाहेर पडणार पण तोच तिला वाटलं, की कोणीतरी आपल्याला इथं खेचून धरत आहे. आपण बाहेर जाऊ नये म्हणून कोणीतरी प्रयत्न करीत आहे. ती किंचित घाबरली. पण मग सावरली. मनाशीच म्हणाली, छे! इथं कोण आहे आपल्याला अडवायला? काहीतरीच आपलं.
चला, इथं थांबण्यापेक्षा बाहेर जाऊन डिंग्याशी गप्पा तरी मारत बसावं, असं मनात म्हणत तिने बेडरूमचा दरवाजा उघडला. तोच ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग असा अत्यंत कर्कश आवाज आला.
मल्लिका जोरात दचकली. असा विचित्र आवाज तिने आयुष्यात कधी ऐकला नव्हता.
तिने पाहिलं, हृषीचा मोबाइल फोन वाजत होता. पटकन जाऊन तिने तो उचलला. कोण फोन करतंय म्हणून तिने पाहिलं, तर स्क्रीनवर कोणाचं नाव नव्हतं की नंबर. पण िरग मात्र वाजतच होती. ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग.
कुणाचा असेल बरं फोन? ना नाव ना नंबर! घ्यावा का आपण? की कट करावा?
ती विचार करीतच होती, तितक्यात तिच्या बोटांनी रिसिव्हचं बटण दाबलं आणि तिने फोन कानाला लावला.
आता बेडरूममधली थंडी तिला जराही जाणवत नव्हती.
हेच काय, भरदुपारी बेडरूममध्ये अंधारून आलं होतं, तेही तिच्या लक्षात आलं नव्हतं.
* * *
बेडरूमचं दार उघडून डिंग्या आत आला आणि उडालाच.
आत मल्लिका फोनवर बोलत होती. ती काय बोलत आहे ते काही त्याला ऐकू येत नव्हतं. पण तिचे ओठ मात्र हलत होते.
आतल्या थंडीने त्याला एकदम शहारून आलं. बाहेर असं थंड वातावरण असताना मल्लिकाने एसी का फूल ऑन केलाय हे त्याला समजेना. पण एसीचं बटण तर बंदच होतं.
त्याने तिला हाक मारली. पण तिचं लक्षच नव्हतं. ती फोनवरच बोलत होती.
तो तिच्या अगदी जवळ गेला, तरी ती काय बोलतेय हे त्याला ऐकू येत नव्हतं.
सगळ्याच मुली फोनवर अशी हलकी कुजबुज करीत असतात हे त्याला माहीत होतं. त्याची मुक्ताताईही असंच बोलत असते तिच्या मैत्रिणींशी.
पण ही मल्लिका.. ती काही बोलतच नाहीये. फक्त ओठ हलताहेत तिचे. म्यूटचं बटण दाबल्यासारखं.
तो तिच्या हातातून फोन काढून घेणार, तोच त्याला चारशे चाळीस व्होल्टचा धक्काच बसला!
मल्लिकाच्या हातात फोन नव्हताच!
तिने कानावर फक्त हात ठेवला होता आणि ती बोलत होती!
डिंग्याचा जाम गोंधळ उडाला. त्याने खांदा धरून तिला हलवलं. पण ती तिच्याच तंद्रीमध्ये होती.
अखेर त्याने तिचा कानावरचा हात ओढला, पण कितीही ताकद लावली तरी तो हात जागचा हलत नव्हता.
त्याला काय करावं हे सुचेना.
अचानक त्याचं लक्ष उशीवर पडलेल्या मोबाइलवर गेलं.
तो छोटासा, लालभडक मोबाइल. पाहताक्षणी कोणालाही आवडावा असा.
डिंग्याने तो हातात घेतला. तो गरम लागत होता. कोणीतरी नुकताच वापरल्यासारखा. त्याला आश्चर्य वाटलं. एवढय़ा थंडीतही हा गरम आहे. आणि कोणी वापरलेलाही नाही.
या मोबाइलमध्येच काहीतरी चमत्कारिक आहे. यानेच हृषी आणि यशोधनदादाची अशी हालत झाली. आणि आता ही मल्लिकाही कसं विचित्रासारखं करतेय..
त्याने तो मोबाइल मागून-पुढून निरखून पाहिला. पण कमी प्रकाशामुळे त्याला नीट दिसेना. म्हणून मग तो लाइटचं बटण दाबण्यासाठी उठला, इतक्यात त्याचा पाय हृषीच्या स्केटवर पडला. तोल जाऊन तो धाडकन् खाली पडला. त्याच्या हातातला मोबाइलही बाजूच्या भिंतीवर दाणकन् आपटला. त्याचे दोन तुकडे झाले होते. त्याची बॅटरी एका बाजूला जाऊन पडली होती.
तत्क्षणी बेडरूममधली थंडीही एकदम कमी झाली. अंधाराचा पडदाही पातळ झाला.
त्या आवाजाने मल्लिकाही भानावर आली.
डिंग्याला तसं खाली आपटलेलं पाहून तिला हसूच फुटलं.
ती म्हणाली, ‘‘तू काय सकाळपासून पडण्याचा सराव करतोयस काय?’’
डिंग्या किंचित हसला. ती भानावर आल्याचं पाहून त्याला खूप खूप आनंद वाटला.
त्याने तिला सहज सुरात विचारलं, ‘‘कुणाशी फोनवर बोलत होतीस गं आत्ता?’’
ती आश्चर्याने म्हणाली, ‘‘मी आणि बोलत होते? नाही रे!’’
तिला काहीच आठवत नाहीये बहुतेक. डिंग्याने तिला विचारलं, ‘‘तू इथं, बेडरूममध्ये कधी आली होतीस?’’
‘‘अं.. झाली असतील पाच मिनिटं! का रे? तू असं का विचारतोयस?’’
डिंग्या विचार करू लागला. आपण आलो तेव्हा ही मोबाइलवर बोलल्यासारखं करीत होती. आता बोलत नव्हते, असं म्हणतीये. मघाशी तिच्या कानावरचा हात काढायला गेलो, तर तिच्या अंगात किती ताकद आली होती. हातपण सरकेना बाजूला. पण मग आता ही ताळ्यावर कशी आली?
त्याचं लक्ष भिंतीजवळ पडलेल्या मोबाइलवर गेलं. त्याची बॅटरी बाजूला पडली होती. त्यामुळे फोन बंद पडला होता. म्हणून तर मल्लिका भानावर नाही ना आली?
नक्कीच! तस्संच असणार.
या फोनमुळेच घरात हे चमत्कारिक प्रकार घडत आहेत. पण हे कसं शक्य आहे?
कदाचित हा योगायोगही असेल.
त्याने फोनचे तुकडे उचलून पँटच्या खिशात ठेवले. बॅटरी दुसऱ्या खिशात ठेवली.
घरातलं मळभ आता दूर झाल्यासारखं वाटत होतं.
* * *
‘‘अक्षय, मल्लिका, अरे ऐकलंत का?’’
आज्जी जोरजोरात हाका मारत होती. ते दोघेही बेडरूमबाहेर आले. आजीचा चेहरा फुललेला होता. ती म्हणाली, ‘‘अरे हॉस्पिटलमधून फोन आला होता वंदनचा. हृषी, यशोधन दोघेही बरे झालेत. अगदी ठणठणीत बरे. देव पावला गं बाई.. कुणाची नजर लागली होती कोण जाणे?’’
ते ऐकून डिंग्या आणि मल्लिका तर आनंदाने उडय़ाच मारायला लागले.
‘‘थांबा. देवासमोर साखर ठेवून येते. मग तुम्हांला खायला ओल्या नारळाची बर्फी देते,’’ असं म्हणत आज्जी आत गेली.
डिंग्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं होतं.
हृषी आणि यशोधन बरे झाले. इकडं मल्लिकाही आजारी पडता पडता वाचली.
मोबाइल फोन फुटला आणि हे सगळं घडलं.
हा योगायोग नाही. नक्कीच नाही. या मोबाइलमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे.
हा आहे तरी कोणता फोन?
त्याने खिशातून मोबाइलचं पाठचं कव्हर बाहेर काढलं. त्यावर बारीक अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं.
यशोधनदादाच्या कपाटातलं भिंग घेऊन तो वाचू लागला.
डी ६६६. मेड इन हॉलंड.
पण स्पेलिंगमध्ये काही तरी चूक आहे. हॉलंडचं स्पेलिंग एच ओ डबल एल ए एन डी असं आहे. आणि इथं ओऐवजी ई आहे. आणि एल तिनदा आहे. म्हणजे हे हेल्लँड झालं.
त्याने जरा विचार करून एका कागदावर ते स्पेलिंग लिहिलं.
एच ई एल एल
एल ए एन डी
म्हणजे
हेल
लँड
हेल म्हणजे नरक. हा फोन नरकात बनलेला आहे.
मग डी ६६६ म्हणजे काय? डिंग्याला कुठल्याशा पुस्तकात वाचलेलं आठवलं. ६६६ हा सैतानाचा क्रमांक आहे. आणि मग डी म्हणजे काय? डी फॉर डेव्हिल!
सगळं कोडं आता सुटलं होतं. हा फोन सैतानाचा होता. भूताचा होता.
त्या विचारानेच डिंग्याला घाम फुटला.
हातातलं कव्हर त्याने घाईघाईने फेकून दिलं. त्याच्या मागेही काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्यावर उन्हाची तिरीप पडून ते चमकत होतं. भिंग धरून डिंग्या ते वाचू लागला आणि त्याचा अर्थ समजताच त्याचे डोळेच विस्फारले. त्यावर लिहिलेलं होतं. –
‘हा फोन सतत मोबाइल फोनशी खेळत असलेल्या मुलांसाठी तयार करण्यात आला आहे.’
डिंग्याला वाटलं, आपले किती तरी मित्र सतत मोबाइलशी खेळत असतात. त्यांना सावध करायला हवं. काय सांगावं, असे आणखीही, वेगवेगळे फोन बाजारात आले असतील.
पण त्या आधी हा फोन नष्ट केला पाहिजे.
तो घराबाहेर अंगणात आला.
मोठा दगड घेतला आणि दाणकन् त्याने त्या फोनचे तुकडे-तुकडे केले.
मग त्याने खिशातून बॅटरी काढली. फोनची बॅटरी कधीही अशी फोडायची नसते की जाळायची नसते. पण डिंग्याचा नाइलाज होता. बॅटरी नष्ट करणं गरजेचं होतं. त्याने तोच दगड बॅटरीवर टाकला. बॅटरीचा धडाम्धूम स्फोट झाला.
तो आवाज ऐकून आज्जी आणि मल्लिका बाहेर आल्या.
तिथला धूरधूर पाहून आज्जीने विचारलं, ‘‘काय रे, काय झालं?’’
‘‘काही नाही आज्जी. हृषी आणि यशोधनदादा बरे झाले ना, म्हणून फटाके फोडतोय.’’
आणि तो हसत हसत घरात आला.
घराचं दार लावत त्याने बाहेर पाहिलं, त्या धुरातून मोबाइलचा स्क्रीन चमकत होता.
आणि त्यावर लिहिलेलं होतं- सी यू सून.. लवकरच भेटू या!