धम्माल
हँडसेटविक्या आणि  वानरं…
सेल्युराम डोक्यावर सामानाचं डबोलं घेऊन पेहलवानपूरच्या दिशेने निघाला. पाठीवर सॅकमध्ये दुपारच्या जेवणाचा टिफीन बॉक्स खमंग वास फवारत होता. सॅकच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या जाळीच्या कप्प्यातून पाण्याची बाटली डोकावत होती. बाहेरगावी जाताना सेल्युराम कटाक्षाने घरचं अ‍ॅक्वागार्डवाला पानीही युज करता था. तसं फार पूर्वीपासून सेल्युरामचं घराणं या आठवडी बाजाराच्या बिझनेसमध्ये होतं. त्यांच्या सात पिढय़ा छोटय़ा भीमफेम ढोलकपुरात राहिल्या होत्या. सेल्युरामचे आजोबा सखाराम रोजच्या रोज ढोलकपूर-पेहलवानपूर अप-डाऊन करायचे. डोक्यावर भलीमोठी पेटी घेऊन गावोगावी ‘टोप्या’ विकण्याचा त्यांचा पुश्तैनी धंदा होता. सखारामतात्यांनी त्यांच्या त्या बिझनेसवल्र्डात बडा नाम कमाया था. सेल्युरामचे पिताजी सखाराम-टू हेसुद्धा लोकांना टोप्या घालण्याचा, सॉरी सॉरी विकण्याचा धंदा करीत होते. पण हळूहळू धंद्यात काही ‘राम’ राहिला नाही. हेल्मेट आणि चेहऱ्याला फडकी गुंडाळण्याचा जमाना आला आणि धंद्याची ‘टोपी’ जी सरकली ती पुन्हा नीट बसलीच नाही. अब सेल्युराम की बारी थी. जमाना मोबाइल का था. सेल्युरामने एक आयडिया सोचा. अ‍ॅन आयडिया कॅन चेंज युवर लाईफ हे त्यास चांगले ठाऊक होते. त्यानं धंद्याचा ट्रॅक बदलला. टोप्या विकायचं सोडून सेल्युराम आता मोबाइल हॅण्डसेट विकू लागला. या धंद्यानं मात्र सेल्युमरामला चांगला हात दिला. ढोलकपूर, पेहलवानपूर, सिद्रापूर वगैरे पंचक्रोशीत सेल्युरामचा बोलबाला झाला होता. पण एका ठिकाणी टपरी थाटायची नाही असा त्यांचा खानदानी ‘धंदे का ऊसूल’ था। आपल्याकडे कष्टमर यायची वाट बघण्यापेक्षा आपणच जास्तीतजास्त कष्टमरापर्यंत पोचलो तरच धंदा सिर्फ चलता नही, दौडता है ही आजोबांची शिकवण सेल्युराम सीरीयसली फॉलो करत होता. आता तर काय जोडीला सिमकार्ड, अ‍ॅक्सेसरीज, अ‍ॅप्स, डाऊनलोडिंग यांची पण तुफानी चलती होती. सेल्युरामची गड्डी धंदे के ट्रॅक पे सुसाटली होती.
तर हा आपला सेल्युराम, ढोलकपूरहून पेहलवानपूरकडे आठवडी बाजाराच्या बिझिनेस टूरसाठी निघाला होता. रास्ते मे एक बडासा जंगल था. हॅण्डसेटचा ईअरफोन त्याने कानात टोचला आणि आस्ते आस्ते वो जंगल के रास्ते निकला. हे बरं होतं, कानात ही डाऊनलोडेड गुणगुण असली की डोईवरच्या ओझ्याचा भार हलका होई. बघता बघता तो जंगलाच्या मध्यावर असणाऱ्या मोठय़ा वडाच्या झाडाखाली पोचला. हे झाड पण पुश्तैनी होतं. डोक्यावरची हॅण्डसेटवाली पेटी त्याने डाऊनलोडली आणि हुशहुशला. याच झाडाखाली त्याचे आजोबा, पिताजी वगैरे मंडळी लंच करायचे. सेल्युरामनं पाठीवरची सॅक उसवली आणि भल्लामोठा टिफिन बॉक्स काढला. सॅकेतली सतरंजी जमिनीवर अंथरली आणि टिफिन बॉक्सेतला एक एक डबा तो उचकटू लागला. माँ ने प्यार से बनाया हुआ, ‘सरसोंका साग आणि मक्के की रोटी’ या ट्रॅडिशन मेन्युकार्डावर त्यानं आडवा-उभा हात मारला. शेवटच्या डब्यातलं स्वीट, ‘गाजर का हलवा’ मनसोक्त रिचवला आणि तो समाधानानं ढेकरला. सॅकतली फुगवायची उशी त्यानं काढली, त्यात हवा भरली आणि समाधानानं डोक्याखाली घेऊन तो बिझनेस एक्स्पांशनाची स्वप्नं बघू लागला. अध्र्या एक तासानं त्याचा मोबाइल अलार्मला आणि त्यानं डोळे उघडले. पटापटा डोक्याखालची उशी त्यानं पंक्चरली आणि बघतो तर काय? हे असलं बघण्याआधी माझ्या डोळय़ांचा स्क्रीन तडकला का नाही, असं त्याला वाटू लागला.
त्याची मोबाइल हॅण्डसेटवाली पेटी सताड उघडी होती. पेटीतले सगळे हॅण्डसेटस् गायब होते. त्याने मान अपलोडली, तर झाडावर काळतोंडय़ा माकडांचा तांडा उंडारत होता. प्रत्येकाच्या हातात एक हॅण्डसेट आणि कानात ईअरफोन टोचलेला. मर्कटसेना जाम चेकाळली होती. एकमेकांना टाळय़ा काय देत होती, बंदर छाप दंतमंजनची अ‍ॅड केल्यासारखी दात काय वेंगाडत होती एक्सेट्रा एक्सेट्रा. सेल्युराम मात्र जाम फुसफुसत होता. सडारडय़ा ‘नोबिता’सारखा त्याच्या डोळय़ातून अश्रूंचा पूर येत होता. पण लवकरच तो सावरला. आपल्याला मदत करायला कोणी डोरेमॉन टपकणार नाही याची त्याला खात्री होती. त्याने पूर्वजांचे स्मरण केले आणि अपना पत्ता फेका. पहिल्यांदा त्याने जमिनीवरचे खडे वानरांच्या दिशेने हाणले. लगेच रिप्लाय आला. वडाच्या लालचुटक फळांचा त्याच्यावर जोरदार मारा झाला. जाम सडकून निघालेल्या सेल्युरामाने मग जमिनीवरची काठी वानरांच्या दिशेने मारली. लगोलग वडाच्या झाडाच्या हाळय़ांचा त्याच्यावर पाऊस पडला. मग शेवटी त्याने आपला मोबाइल जमिनीवर आपटायची अ‍ॅक्शन केली. झाडावरून तशीच रिअ‍ॅक्शन आली. त्यानं धंद्याचं गणित मांडलं. आपला मोबाइल ‘मेला’ तरी चालेल, पण वरचे मोबाइल परत आले पाहिजेत. मनाचा हिय्या करून शेवटी आपला मोबाइल धाडकन जमिनीवर आपटला. युवराजने सहा बॉलला सहा सिक्सर हाणाव्यात, तशा त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. बडी उम्मीदसे त्याने रिअ‍ॅक्शन को देखा. बट व्हॉट ए सरप्राईझ! देअर वॉज नो रिअ‍ॅक्शन अ‍ॅट ऑल. सगळी वानरं आपआपल्या मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे चिकटवून बसली होती. यू टय़ुबावर सगळय़ांनी मराठी अ‍ॅनिमेटेड स्टोरीज लावल्या होत्या. सगळेजण एकच, ती सखाराम टोपीवाल्याची गोष्ट बघत होते. तेवढय़ात छोटय़ा भीमातल्या जग्गू बंदरासारखं, एक बोलणारं माकड खाली आलं आणि म्हणालं, ‘‘आम्हाला पण आजोबा आहेत, असं काही मी सांगणार नाही. आमच्यात पण आता तुमच्यासारखी जाईंट फॅमिली राहिलेली नाही. एक तर माझे आजोबा आमच्याबरोबर राहत नाहीत आणि उनकी याद्दाश भी खो चुकी है. नुसतं हॅण्डसेट विकण्यापेक्षा त्या डब्यात काय दडवलंय याकडे पण लक्ष दे जरा. या यू टय़ुबवर सगळं काही असतं. त्यातून बरंच काही शिकायलाही मिळतं. तेव्हा बाबूजी जरा बच के रहना. तुम्हे और बहुत कुछ सीखना है सेल्युराम. सो बेटर लक नेक्स्ट टाईम बाऽऽय.’’
खिन्न मनाने सेल्युरामने मोबाइलच्या ठिकऱ्या उचलल्या आणि ‘वन ट् वन’ करीत तो वापस ढोलकपुरातल्या सव्‍‌र्हिस सेंटरकडे निघाला.

नो इडियट्स इन क्रो कॉलनी
वैशाखातलं रणरणतं ऊन ‘मी’ म्हणत होतं. मिस्टर कोकीळ आपल्या खानदानी मोहिमेवर जायची तयारी करीत होते. त्यांच्या फॅमिलीत नवा मेंबर यायचा होता. त्यासाठीच त्याची कुणी घर देता का घर अशी घरघर चालली होती. मिस्टर आणि मिसेस कोकीळ ‘ऑपरेशन क्रो’ची आखणी करीत होते. ‘‘मी मिस्टर आणि मिसेस कावळे यांना माझ्या मागे मागे कही दूर ले जाऊंगा, मग तू पटकन क्रो हाऊसात शिर, तिथलं एक अंड खाली टाकून दे आणि त्या जागी आपलं अंड राहील अशी अ‍ॅरेंजमेंट कर’’ मिस्टर कोकीळ एसीपी प्रद्युम्नसारखा हाताचा ‘भोवरा’ फिरवीत फिरवीत म्हणाले. मिसेस कोकीळ यांनीही कुठून तरी फुकटात ढापलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड चोचीखाली सरकवली आणि ‘ओके हब्बु’ असं म्हणून पायाचा अंगठा वर केला. त्यातून कुछ ‘एैसी वैसी बात हुई तो सेल पे कॉल करने का’ असं पण ठरलं आणि मीटिंग संपली.
तसं पक्षीवर्गात या फॅमिलीची स्वत:ची खास आयडेंटिटी होती. चिंगटपणात त्यांची तुलना फक्त ‘हागीमारू’ फॅमिलीशीच करता आली असती. ‘खाली हाथ आए है खाली हाथ जाएंगे’ अशी त्यांची फॅमिली पॉलिसी होती. दो चार दिन की ही तो जिंदगी है, त्यात घर बांधण्यात अर्धी जिंदगानी कशाला बरबाद करायची? असा त्यांचा अ‍ॅटिटय़ूड होता. शिवाय क्रो फॅमिलीशी त्यांचा ‘ये तेरा घर, ये मेरा घर’ असा बरसोंसे ‘पवित्र रिश्ता’था. घराची गरज ती फक्त नवीन पाहुणा यायच्या वेळी, एरवी आसमाँ के नीचे, अंबुवा के पेड के पीछे त्यांचा आशियाना ठरलेला. मि. कोळीळ यांनी मनोमन आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले आणि पंखांना बळ देत क्रो हाऊसच्या दिशेने भरारी घेतली. सोबत किक् किक्  अशी कर्णकर्कश ‘गानकिंकाळी’ मारली.
तिकडे क्रो हाऊसात पण नवे फॅमिली मेंबर अ‍ॅड होणार होते. मिस्टर कावळय़ांना मिसेस कावळय़ांना कुठे ठेवू आणि कुठे नको अस झालं होतं. क्रो हाऊसला एक वेगळाच लुक आला होता. बेडरूमात तर भिंतीवर कावळय़ांचे एक काटेरी घरटे आणि त्यातून चोची बाहेर काढणारे त्यांचे तीन-चार बच्चे, असं काहीसं फॅमिली पिक्चर लावलं होतं. मिसेस कावळे डोळय़ांच्या त्रिकोणातून मधूनच चित्राकडे बघत आणि गोऱ्यामोऱ्या (?) होऊन लाजल्यासारखं करीत. कधी कधी लटक्या रागानं मिस्टर कावळय़ांना चोचीनं चिमटाही काढत. त्यांच्या ब्लॅक ब्युटी चेहऱ्यावर ‘लब्बाड, आम्ही नाही जा’ असे प्रिंटेड भावनाविष्कार सहज वाचता येत. खरं तर हे हॅप्पी फॅमिली पिक्चर बघून मिस्टर कोकीळ इमोशनल झाले. पण पुढच्या क्षणी त्यांना आपला राजधर्म आठवला, फर्ज आठवला आणि किक्  किक्  करीत तो क्रो हाऊसच्या रुफावर टणाणा टणाणा नाचू लागला. मिस्टर कावळे वैतागून घरटय़ाबाहेर आले आणि ‘अब की बार तुम्हे नहीं छोडूंगा. आज एक तो तू बचेगा, नहीं तो मैं’ असा बॉलीवूडी डॉयलाग ओकू लागले. लगेच पंखाच्या बाह्या सरकवून मिस्टर कोकिळांच्या मागे उडू लागले. तिकडे घर के अंदर मिसेस कावळे पार सरपटल्याच होत्या ‘ओ माँ माताजी, मेरे उनकी रक्षा करना’चा जप चोचीतून बाहेर पडत होता. इकडे मिस्टर कोकिळांना आंब्याच्या झाडांच्या पानांच्या ट्रॅफिकमध्ये गुंतवून मि. कोकीळ पुन्हा क्रो हाऊसच्या दारावर सीआयडीवाल्या दयासारख्या धडका मारू लागले. मिसेस कावळय़ांनी धीर सोडला नव्हता. जब तक है जानच्या तालावर ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणत त्यांनी डोईवर रुमाल बांधला आणि मिस्टर कोकिळांच्या मागे उडताना मिस्टर कावळे दिसू लागल्या. इसी मौके की तलाश तो हम बरसों से कर रहे थे असं मिसेस कोकीळ मनातल्या मनात मोठय़ांदा बडबडल्या आणि क्रो हाऊसचं फाटक उघडून आत शिरल्या. आता काय रिप्लेसमेंटची अ‍ॅडजस्टमेंट एवढंच काय ते काम होतं. पर नहीं, किस्मत ने कुछ और ही लिखा था. तेवढय़ात एक क्रोबीरसेनची फलटण अशी चाल करून आली, की कोकीळबाई पार गळूनच गेल्या. त्यांना गाडीच्या टाकीतून पेट्रोल लीक झाल्यासारख्या फिलिंग्ज येऊ लागल्या. क्रोबीरसेनेतल्या वीर कावळय़ांनी त्यांच्या डोईवर अशा काही चोची टोचल्या की पूछो मत. कशाबशा जीव मुठीत धरून त्या क्रो कॉलनीतून उडाल्या. उडता उडता त्यांनी मिस्टर कोकिळांना एसएमएस रखडला- ‘इस धरती पर कहीं भी जी लेंगे लेकिन ये जंगल में नहीं रहेंगे.’ आणि धूम पळत जंगल के उस पार गावाकडे उडाल्या.
इकडे क्रो कॉलनीत आनंदीआनंदला होता. पहली बार ऐसा हुवा था, अ‍ॅण्ड क्रेडिट गोज टू, मोबाइल लिटरसी प्रोगॅ्रम. शहरातल्या आपल्या भावंडाकडून अख्ख्या क्रो कॉलनीला तो एसएमएस आला होता. तोच तो कावळय़ांच्या घरटय़ासारखे केस असणारा, थ्री इडियटस्मधला वीरू, त्याचा तो पहिल्या दिवशीचा डोस. रेस जिंकण्यासाठी, बाजूच्याला ढकलून पुढे जाणं आणि कावळय़ाचं घरटं, अंडी आणि कोकीळ घराण्याची चलाखी. अभी सारा पिक्चर आइने की तरह साफ था. म्हणून ठरल्याप्रमाणे, मिस्टर आणि मिसेस कावळे खोटेखोटे बाहेर उडाले आणि क्रोबीरसेनेने अशा काही चोची टोचल्या की कोकीळ फॅमिलींना त्यांची नानी याद आई. सो हिअर आफ्टर नो इडियटस् इन क्रो कॉलनी- जय हो.
 
शिकारी खुद यहाँ…
वनराज शेरसिंहांनी आपला लॅपटॉप ऑन केला नेट कनेक्टले आणि फेसबुकवर अवतीर्ण जाहले. आयुष्याच्या संध्याकाळी महाराजांच्या जिवाला तेवढीच काय ती करमणूक होती. आता पायातला जोर बऱ्यापैकी आटला होता. शिकारीच्या मागे पळणे, पंजाच्या पकडीत पकडणे वगैरे गोष्टी त्यांच्या आवाक्याबाहेर चालल्या होत्या. आताशा ते खूपसे टायर्ड आणि रिटायर्ड झाले होते. एखादी शिकार अगदी चालत चालत समोर आली तरच गटवता येई; नाहीतर त्या दिवशी वनराजांच्या घरी चूल पेटत नसे.
शिकारीचं तंत्र महाराजांना आताशा फारसे साधत नसले, तरी टेक्नोमंत्र त्यांनी सहज अवगत केला होता. सोशल नेटवर्किंग, अ‍ॅप्स, डाऊनलोिडग, अपलोडिंग, चॅटिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वगैरे गोष्टींवर त्यांच्या पंजांची चांगली पकड होती. फेसबुकवरसुद्धा त्यांचं मोठ्ठ फ्रेंड सर्कल होतं. केनयातल्या नाहीतर दक्षिण अफ्रिकेतल्या आपल्या चुलत भावंडांबरोबर ते रात्र रात्र चॅटिंग करत. पर चॅटिंग से पेट नहीं भरता ना! मग रिकाम्यापोटी महाराज आपले जिभल्या चाटिंग चाटिंग करीत बसत. शेवटी महाराजांना एक रास्ता मिल ही गया.
महाराज आता डमी अकाऊंट उघडायला शिकले होते. मग कधी ते ससा बनून सशाशी चॉटिंग करीत, गाजर हलवा खायला आपल्या गुहेजवळ बोलवत आणि ती स्वीट डिश आनंदाने मटकावीत. कधी बकरा बनून बकऱ्यांशी चॅटिंग करत. नदीजवळच्या मैदानात लॉनपार्टीला बोलवत आणि आपला लंच करून टाकीत. कधी हरणांशी चॅटिंग तर कधी डुकरांशी. या चॅटिंगमुळे आताशा एकादशीचाच काय तो उपास घडे. बाकी महाराजांचं मस्त चाललं होतं.
पर जालीम जमानेसे ये देखा ना गया. आताशा त्यांना सांधेदुखीचा त्रास सुरू झाला होता. उठता बसता त्यांची हाडे कडा कडा वाजत. चार पावलं चालणंसुद्धा अवघड होई. परवा केनयातल्या त्यांच्या चुलत चुलत भावाने चॅटिंग करता करता त्यांना सुचवलं, की कोल्ह्य़ाच्या भक्षणानंतर त्यांचा संधिवाताचा त्रास कमी होईल म्हणून. म्हणूनच महाराज किती दिवस कोल्ह्य़ाच्या वासावर होते. आज ते एक डमी कोल्हा झाले होते आणि एका कोल्ह्य़ाशी चॅटिंग करीत होते. हवापाण्याच्या शिळोप्याच्या गप्पा मारून झाल्या. डिस्कव्हरी चॅनलच्या शूटिंगातल्या कोल्ह्य़ांच्या परफॉरमन्सचा उदो उदो करून जाहला, शेवटी हिंग्लिश विंग्लिश सोडून इंग्रजीत मराठी टाईपणं सुरू झालं, ‘आठवते का तुला ती नदीकाठची गुहेतली जीवन शिक्षण प्रशाला, तो लांडगेबाईंचा तास, ती गुहेमागच्या ग्राऊंडवरची पकडापकडी आणि डब्यात वाटून खाल्लेली चिकन चिली; एक्सेट्रा एक्सेट्रा.’ महाराजांची ही साखरपेरणी बघून समोरची पार्टी पार विघळली. रिअल कोल्हा सिरियसली इमोशनला. आँखो में खुशी के आँसू दाट के आए. मग महाराजांनी फिरसे एक गुगली डाल्या. ‘चला आपण पुन्हा एकदा एक लहान कोल्ह्य़ाचं पिल्लू होऊ. आपल्या बॅचचं गेट टुगेदर भरवू. पुन्हा ती पकडापकडी आणि डब्यातली चिकन चिली एन्जॉय करेंगे.’ परवाची तारीख ठरली. दुपारी बाराची वेळ, ठिकाण तेच- जीवन शिक्षण प्रशालेची मोठ्ठी गुहा. ही गुहा महाराजांच्या गुहेच्या अगदी जवळच होती. महाराज परवाच्या तयारीला मनोमन लागले होतेच. तेवढय़ात कोल्होबा को कुछ शक हो गया. आपली कोणी जीवघेणी थट्टा तर करीत नाही ना? असे त्यांना वाटू लागले. त्यांनी पटकन स्काईपवर व्हिडीओ कॉल पाठवला. इकडे महाराज परवाच्या स्वप्नात इतके मशगूल होते की त्यांनी कोल्होबाच्या गुगलीची बिलकुल पर्वा केली नाही. त्यांनी ती रिक्वेस्ट लगेच अ‍ॅक्स्पेटली आणि कोल्होबाच्या स्क्रीनवर साक्षात शेरसिंह दिसू लागले. कोल्होबा काय ते समजले आणि पटकन लॉग आऊट झाले. जाता जाता त्यांनी स्काईपवाल्यांना मनापासून धन्यवाद दिले. महाराज को अपनी गलती का एहसास हुवा था. पण बहुत देर हो चुकी थी. शिकारी खुद यहा शिकार बना था.

जंगल मे मंगल-
जंगल आता पूर्वीसारखं ‘जंगल यस्टरडे’ राहिलं नव्हतं. ते आता पार ई-जंगल झालं होतं. सगळे पशुपक्षी आपले जंगली रीतीरिवाज विसरत चालेले होते. सोशल नेटवर्किंगचा व्हायरस सगळ्यांना चावला होता. आणि हे सगळं झालं होतं ते मागच्या वर्षीपासून. ये जो देस है मेरा, स्वदेस है मेरा, जेव्हा टेक्नोसॅव्ही झाला, तेव्हा ढोलकपूर आणि पेहलवानपूरमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली. मधल्या आमच्या जंगलाला फुकटच ‘वाय फाय’ कनेक्टिव्हीटी मिळाली. आणि ‘जंगल टुडे’चे वरच्यासारखे एपिसोड्स दिसू लागेल. पण भगवान के घर देर है, अंधेर नहीं हेच खरं. अगदी परवाच ते ‘फायलिन’ आलं आणि ढोलकपूर-पहिलवानपूरमधल्या टॉवर्सना आपल्याबरोबर घेऊन गेलं ते वायफाय का हायफाय पण पार कोलमडलं.
आता पुन्हा जंगल ‘मंगल’ वाटू लागलंय, पुन्हा कोकिळेची अंडी कावळ्याच्या घरटय़ात दिसू लागलीयेत. पुन्हा सेल्युरामचा सखाराम झालाय आणि टोप्या विकतोय; वाघोबा कोल्होबाला गंडवण्याची ‘कोशिश’ करतोय. थोडक्यात काय जंगल जंगलासारखं वागतंय, अगदी इसापनीतीतल्या गोष्टीसारखं. नरपशूसारखं नाही.
ते तसंच राहावं, ही ‘ओ माय गॉड’ला फ्रेंड रिक्वेस्ट. जय ताडोबा.