संरक्षण : शत्रूला कंठस्नान घालणारी किलर्स स्क्वॉड्रन

बांग्लादेशच्या निर्मितीस निमित्त ठरलेल्या १९७१ च्या भारत-पाक युद्धाला यंदा तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

killers_squadron
अवजड व्यापारी नौकांच्या माध्यमातून या नौका भारतात आणून कोलकाता येथे १९७१ साली त्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला.

विनायक परब – @vinayakparab / response.lokprabha@expressindia.com

बांग्लादेशच्या निर्मितीस निमित्त ठरलेल्या १९७१ च्या भारत-पाक युद्धाला यंदा तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धामध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तानी सागरी हद्दीत घुसून कराची बंदरावर चढविलेला हल्लाच पाकिस्तानच्या वर्मी घाव ठरला. पाकिस्तानी नौदलाच्या चार युद्धनौकांना थेट जलसमाधी देत २२ व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या (किलर्स स्क्वॉड्रन) ताफ्याने आपल्या आगमनाची वर्दी केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिली. ‘केवळ अनोख्या स्वरूपाचा नौदल हल्ला’ या शब्दांत जगाच्या नौदल इतिहासात या हल्ल्याची नोंद झाली.

४ डिसेंबरच्या मध्यरात्री आणि ५ डिसेंबरच्या पहाटेस भारतीय नौदलाने कराची बंदराच्या परिसरात घुसून केलेला हा हल्ला पाकिस्तानी नौदलासाठी अनपेक्षित असा होता. त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून अमृतसर, पठाणकोठ, श्रीनगर, अवंतीपूर, अमृतसर, जोधपूर, अंबाला, आग्रा, उत्तरलाय येथे हल्ला चढवला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या दिवशी राष्ट्राला उद्देश केलेल्या नभोवाणीवरील भाषणात हे भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे सांगून भारत कडवे उत्तर देईल, असे जाहीर केले. सैन्यदलांना तसे आदेशही दिले.

भारतीय नौदलाची मारकक्षमता वाढविण्यासाठी त्या वर्षी मित्रराष्ट्र असलेल्या सोव्हिएत रशियाकडून ओसा वर्गातील युद्धनौकांचा समावेश नुकताच भारतीय नौदलात करण्यात आला होता. अवजड व्यापारी नौकांच्या माध्यमातून या नौका भारतात आणून कोलकाता येथे १९७१ साली त्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला. भारतीय नौदलातील सर्वात तरुण नौसैनिक आणि नौदल अधिकारी त्या वेळेस या ताफ्यामध्ये होते. पंतप्रधानांच्या आदेशानंतर नौदलप्रमुख असलेल्या अ‍ॅडमिरल एस. एम. नंदा यांनी नौदलातील हा सर्वात तरुण ताफा कराची मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. कारण या ताफ्यातील नौसैनिक तरुण, वेगवान हालचाली करणारे आणि धोका पत्करण्याची सकारात्मक क्षमता असलेले होते. त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे पूर्ण करून सुमारे सहा-सात महिन्यांपूर्वीच सर्व जण भारतात दाखल झाले होते.

‘ऑपरेशन ट्रायडेंट’ असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आले. हा ताफा ४ व ५ डिसेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तानी सागरी हद्दीत कराचीनजीक पोहोचला. कराचीपासून २५ मैल अंतरावर असतानाच ‘आयएनएस निर्घात’ने पहिले क्षेपणास्त्र डागले आणि ‘पीएनएस खैबर’ या विनाशिकेचा यशस्वी वेध घेत तिला जलसमाधी दिली. दुसरा हल्ला ‘आयएनएस वीर’ने चढवला आणि पाणसुरुंगशोधक पाकिस्तानी नौकेला सागरतळाशी धाडले तर ‘आयएनएस नि:पात’ने पाकिस्तानी नौदलाच्या इंधननौकेला आगीच्या भक्ष्यस्थानी देत तिलाही जलसमाधी दिली. एवढय़ावरच न थांबता ८ व ९ डिसेंबरच्या मध्यरात्री हल्ल्याचे दुसरे पर्व सुरू झाले. त्यात ‘आयएनएस विनाश’ या युद्धनौकेने पाकिस्तानी नौदलाच्या ‘ढाक्का’ या इंधननौकेला जलसमाधी आणि कराचीचे  केयमारी तेलसाठे उद्ध्वस्त केले. ती आग चार दिवस धुमसत होती. या हल्ल्याने पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे पूर्णपणे मोडण्याचे काम केले. भारतीय नौदलाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणून प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय नौदलातील या ताफ्याला ‘किलर्स स्क्वॉड्रन’ हे बिरुद मिळाले!

यंदा या शौर्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत तर भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे. याचे औचित्य साधूनच भारत-पाक युद्धामध्ये असीम शौर्य गाजविणाऱ्या आणि शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या या नौदल ताफ्यास येत्या ८ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रपतींचे मानांकन’ देऊन सेनादलांचे सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रपतींचे मानांकन हा सेनादलांसाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो. तब्बल ५० वर्षांपूर्वी गाजविलेल्या या शौर्याबद्दल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्यासाठी खास मुंबईत नौदल गोदीत येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल आणि माजी नौदल अधिकारी या सोहळ्यास खास उपस्थित राहणार आहेत. २२ व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांचा ताफ्याची औपचारिक स्थापना १९९१ साली ऑक्टोबर महिन्यात झाली. यात वीर वर्गातील १० तर प्रबळ वर्गातील तीन क्षेपणास्त्र नौकांचा समावेश आहे. या ताफ्याला मिळालेल्या ‘किलर्स स्क्वॉड्रन’ या बिरुदामागचा इतिहास मात्र हा असा १९७१च्या युद्धापर्यंत मागे जातो! विद्यमान स्थितीत नौदलाच्या पश्चिम तळाच्या ताफ्यात असलेल्या या स्क्वॉड्रनवर भारताच्या सागरी संपत्तीच्या रक्षणाची महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आहे. शिवाय पश्चिम नौदल तळाच्या हद्दीत येणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या संरक्षणाचीही जबाबदारी आहे. या ताफ्याचे सुरक्षाचक्र सध्या मुंबईला लाभले असून त्यामुळेच मुंबईला निश्चिंती लाभली आहे. महत्त्वाचे म्हणजे किलर्स स्क्वॉड्रनचे मुंबईशी अनोखे नाते आहे, त्यांचे मुख्यालय ‘अग्निबाहू’ मुंबईच्या नौदल गोदीमध्येच आहे. म्हणूनच राष्ट्रपती या सन्मानासाठी मुंबईत येणार आहेत.. आता प्रतीक्षा आहे ती ८ डिसेंबरची!

रशियन भाषेचा सांकेतिक वापर

भारताच्या या सर्वात तरुण किलर्स स्क्वॉड्रनचे वैशिष्टय़ म्हणजे कराची बंदरात घुसून करावयाच्या हल्ल्यादरम्यान सांकेतिक भाषा म्हणून या संपूर्ण ताफ्याने रशियन भाषेचा वापर करण्याचा निर्णय घेतला व तो अमलातही आणला. संपूर्ण हल्ल्यादरम्यान सर्व संवाद व आदेश रशियन भाषेतून देण्यात आले, त्यामुळे ते शत्रूला समजेपर्यंत कामगिरी फत्ते झालेले होती, पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे काम पार पडलेले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Killer squadron indian navy sanvrakshan dd

ताज्या बातम्या