महिला गटाच्या उपांत्य फेरीच्या लढती रद्द

उन्हाच्या प्रकोपानंतर न्यूयॉर्कमध्ये पाऊसधारा बरसल्याने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील महिला गटाच्या उपांत्य फेरीच्या लढती रद्द कराव्या लागल्या. कॅलेंडर स्लॅम विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सेरेनाला गुरुवारी वरुणराजाने रोखले.
उपांत्य फेरीच्या पहिल्या मुकाबल्यात सेरेना विल्यम्स आणि रॉबर्टा व्हिन्सी या तिशी ओलांडलेल्या योद्धय़ांमध्ये मुकाबला रंगणार आहे. दुसऱ्या लढतीत सिमोन हालेप आणि फ्लॅव्हिआ पेनेट्टा समोरासमोर आहेत. दोन्ही सामन्यांतील विजेत्या अंतिम लढतीत जेतेपदासाठी खेळतील.
पुढील वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेतील टेनिस कोर्ट्सवर आच्छादन असणार आहे. जेणे करून प्रतिकूल परिस्थितीतही खेळ सुरू राहील. यंदा मात्र खेळाडूंना तळपत्या सूर्याचा सामना करावा लागला. कोर्टवरचे आच्छादन परिसरात दाखल झाले होते, मात्र पुरेशा वेळेअभावी ते बसवण्याचे काम होऊ शकले नाही.
१९८८मध्ये स्टेफी ग्राफने वर्षांतील चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरण्याचा विक्रम केला होता. यंदा सेरेनाला ही संधी आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून सेरेना २ जेतेपदे दूर आहे. यासंदर्भात सेरेनाला विचारले असता ती म्हणाली, ‘‘मी या टप्प्यापर्यंत पोहचेन असे कधीही वाटले नव्हते. स्टेफी ग्राफचा किंवा मार्गारेट कोर्ट यांचा विक्रम मोडण्याविषयी किंवा त्याची बरोबरी करण्याचा विचारही मनात आला नाही. या दिग्गजांच्या संदर्भात माझे नाव घेतले जाते हा माझा सन्मान आहे. सर्वोत्तम प्रदर्शन करायचे आहे या भूमिकेसह मी खेळले. प्रत्येक सामन्यासाठी मी प्रचंड मेहनत करते.’’
अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या सातव्या जेतेपदासाठी सेरेना प्रयत्नशील आहे. उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी असणाऱ्या रॉबर्टा व्हिन्सीविरुद्ध सेरेनाने चारही सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. उपांत्य फेरीतील अन्य दोन दावेदार सिमोन हालेपविरुद्ध ६-१ तर फ्लॅव्हिआ पेनेट्टाविरुद्ध सेरेनाची कामगिरी ७-० अशी आहे.
व्हिन्सीबाबत विचारले असता सेरेना म्हणाली, ‘‘मी कोणत्याही खेळाडूला कमी लेखत नाही. रॉबर्टा सहजासहजी उपांत्य फेरीत दाखल झालेली नाही. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये मजल मारणाऱ्या कोणत्याही खेळाडूचे आव्हान सोपे नाही.’’