नुकताच आपल्या कारकीर्दीतला पाचशेवा गोल करणारा पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईतच. त्याच्या फुटबॉलविश्वावर एक दृष्टिक्षेप-

फुटबॉल म्हटले की तिथे वेग, चपळता, अचूकता आणि बिनधास्तपणा आलाच. चेंडूवर लक्ष केंद्रित करून प्रतिस्पर्धी खेळाडूंपासून खेचून तो आपल्याकडेच कसा ठेवावा आणि लक्ष्याच्या दिशेने त्याला कसा टोलवावा याची कसोटी हा ९० मिनिटांचा खेळ पाहतो. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो या कसोटीवर शंभर टक्के खरा उतरतो आणि म्हणूनच देशाकडून व क्लबकडून सर्वाधिक ५०२ गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच रिअल माद्रिदकडून सर्वाधिक ३२३ गोल करणाऱ्या रॉल याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. स्पोर्टिग सीपी ते मँचेस्टर युनायटेड ते रिअल माद्रिद असा प्रवास करणाऱ्या रोनाल्डोला आपल्या विक्रमाची जाणही नाही. फुटबॉलवर अमाप प्रेम करणाऱ्या रोनाल्डोकडे प्रतिस्पर्धी संघावर एकहाती हुकमत गाजवण्याची अफाट गुणवत्ता आहे. त्याची प्रचीती त्याने वारंवार दिलीही आहे. मैदानाच्या मध्यभागापासून प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवत चेंडू गोलजाळीत टाकण्याचा त्याचा करिष्मा पाहण्यासाठी लाखो चाहते डोळ्यात अंजन घालून सामना पाहतात. त्याच्या पायाजवळ चेंडू गेला की स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू होतो आणि हा जल्लोष गोल झाल्यावर दुप्पट वाढतो.

अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला हा खेळाडू आज हजारो अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये खेळत आहे. तरीही भूतकाळातील आयुष्याची जाण असल्यामुळे त्याला वर्तमानातील परिस्थितीचा अजिबात माज नाही. अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी हा त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी. या दोघांमध्ये सर्वोत्तम कोण अशी चर्चा ही नेहमीचीच, परंतु दोघेही समोरासमोर आले की एकमेकांना अत्यंत आदराची वागणूक देतात. मोठय़ा खेळाडूंचे हेच वैशिष्टय़ म्हणावे लागेल. मात्र, या दोघांची तुलना केल्यास तांत्रिक बाबींमध्ये मेस्सी वरचढ ठरतो, तर आक्रमकता, पदलालित्य यात रोनाल्डोला कुणी मागे टाकणे अवघडच आहे. मेस्सी शांत स्वभावाचा आहे, तर रोनाल्डो मनमौजी. त्याचे पूर्ण नाव ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सँटोस अव्हेइरो असे आहे. सँटो अँटोनिओ या लहानशा शहरात रोनाल्डोचा जन्म झाला. आई स्वयंपाकाची कामे करायची तर वडील माळीकाम.. एक भाऊ आणि दोन बहिणी असे मोठे कुटुंब. हलाखीच्या परिस्थितीमुळे तो तीन भावंडांसह एकाच खोलीमध्ये राहायचा आणि त्यामुळेच त्याला लहानपणापासूनच काटकसर करण्याचे बाळकडू मिळाले होते. लहानपणापासूनच रोनाल्डोला फुटबॉलची आवड होती. मात्र त्याकडे करिअर म्हणून कधी त्याने पाहिलेच नाही. अँडोरिन्हा या हौशी क्लबकडून तो वयाच्या आठव्या वर्षांपासून खेळू लागला. त्याचे वडील जोस हे या क्लबमध्ये किटमॅन म्हणून कामाला होते. लहानपणी रोनाल्डोचा स्वत:च्या रागावर अजिबात ताबा नव्हता. शालेय आयुष्यातच त्याला प्रसिद्धी मिळाली होती, परंतु शिक्षकांच्या दिशेने खुर्ची फेकल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. त्या घटनेमुळे आपल्याला आजही अपराधी वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली होती. शिक्षकासोबत झालेल्या घटनेनंतर आई मारियाने रोनाल्डोला आपल्या परिस्थितीची आणि भविष्याची जाण करून दिली. भविष्यात परिस्थिती सुधारायची असल्यास आपल्याला मोठी झेप घ्यावी लागेल आणि त्यासाठी ध्येय ठरवून त्याचा पाठलाग करावा लागेल, या आईच्या सल्ल्यानंतर रोनाल्डोने फुटबॉलवर लक्ष केंद्रित केले. येथील स्थानिक क्लब नॅशिओनल यांनी त्याला करारबद्ध केले. त्याने क्लबला अनेक जेतेपदे जिंकून दिली आणि त्यामुळे त्याची निवड स्पोर्टिग सीपी क्लबने तीन दिवसीय सराव शिबिरासाठी केली. हा त्याच्या आयुष्याचा टर्निग पॉइंट होता. त्याला स्पोर्टिगने करारबद्ध केले आणि त्याला त्यांच्या अकादमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पहिल्या हंगामातच त्याने १६, १७, १८ वर्षांखालील संघ तसेच बी संघात खेळण्याचा पराक्रम गाजवला. त्याचा हा आलेख आयुष्याच्या प्रवासातही असाच चढा राहिला. क्लबमधील कामगिरीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय संघातही जागा निर्माण केली. १५ वर्षी त्याच्या हृदयाच्या ठोक्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला जवळपास फुटबॉलपासून दूरच राहावे लागणार, असे चित्र दिसत होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच त्याने सरावाला सुरुवात केली. २००२मध्ये त्याला आर्सेनल क्लबच्या सराव मैदानावर निमंत्रित करण्यात आले. तेथे त्याची भेट आर्सेन वेंगर यांच्याशी झाली. रोनाल्डोचा खेळ बघून ते इतके प्रभावित झाले की त्याला आपल्या क्लबमध्ये घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. लिव्हरपुललाही रोनाल्डो हवा होता. परंतु या दोन्ही क्लबना अपयश आले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, असेच काहीसे झाले आणि मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोशी करार केला. स्पोर्टिग विरुद्ध युनायटेड या सामन्यात रोनाल्डोच्या दमदार खेळामुळे स्पोर्टिगने ३-१ अशी बाजी मारली आणि युनायटेडचे प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनी रोनाल्डोला हेरले. जॉर्ज बेस्ट, ब्रायन रॉब्सन, एरिक कँटोना आणि डेव्हिड बेकहॅम हे दिग्गज खेळाडू ज्या क्लबकडून खेळले त्यात आता रोनाल्डोचाही समावेश झाला होता. फग्र्युसन यांनी रोनाल्डोच्या खेळाला आकार दिला. युनायटेडसोबतचा सात वर्षांचा करार मोडून जेव्हा रोनाल्डो रिअल माद्रिदकडे जाण्यास निघाला त्या वेळी फग्र्युसन यांचा उल्लेख करताना तो म्हणाला, ‘‘या खेळातील ते माझे पिता आहेत. माझ्या आयुष्यात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी माझी कारकीर्द घडवली.’’

युनायटेडकडून माद्रिदने रोनाल्डोला आपल्या क्लबमध्ये सहभागी करून घेतले आणि त्यासाठी त्यांनी ८० मिलियन अमेरिकन डॉलर रक्कम मोजली. २००९ मध्ये रोनाल्डोने सर्वात महागडय़ा खेळाडूचा मानही पटकावला. रोनाल्डोचे युनायटेड सोडण्याचे प्रमुख कारण म्हणजे, युनायटेडचा सहकारी वेन रुनी याच्याशी झालेला वाद. २००६ मध्ये फुटबॉल विश्वचषकाच्या लढतीत हे दोघेही त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करत होते. इंग्लंड विरुद्ध पोर्तुगाल अशा या सामन्यात रुनीने पोर्तुगालचा बचावपटू रिकाडरे काव्‍‌र्हालो याच्याशी बाचाबाची केली आणि पंचांनी रुनीला लाल कार्ड दाखवले.

इंग्लिश प्रसारमाध्यमांनी या गोष्टीसाठी रोनाल्डोला जबाबदार धरले. त्याने पंचांकडे अतिशय आक्रमकपणे मागणी केल्यामुळेच रुनीला लाल कार्ड दाखविले, असा दावा प्रसारमाध्यमांनी केला. त्यानंतर इंग्लिश प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोला लक्ष्य केले आणि म्हणून त्याने माद्रिदशी करार केला. प्रसारमाध्यमांनी चालवलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे रोनाल्डोला विश्वचषक स्पध्रेतील सवरेत्कृष्ट युवा खेळाडूच्या पुरस्काराने हुलकावणी दिली होती. मात्र, याने न खचता रोनाल्डोने पुढे अनेक पुरस्कार पटकावले. आजच्या घडीला शंभरहून अधिक पुरस्कार त्याच्या पोतडीत जमा झाले आहेत. युनायटेडसाठी २९२ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना त्याने ११८ गोल केले आणि या प्रवासानंतर सुरू झालेला माद्रिदसोबतचा प्रवास आजही कायम आहे. २००९ मध्ये रोनाल्डोने माद्रिदसोबत खेळण्याचा निर्णय घेतला. एक एक टप्पा ओलांडताना माद्रिदकडून सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान त्याच्या शिरपेचात आहे. असाच एक टप्पा त्याने गत आठवडय़ात ओलांडला. युएफा चॅम्पियन्स लीगच्या गटसाखळी सामन्यात माल्मो क्लबविरुद्ध त्याने गोल करून कारकीर्दीतील ५०० व्या गोलची नोंद केली, तर त्यात आणखी एका गोलची भर टाकून त्याने माद्रिदकडून सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने ३०८ सामन्यांत ३२३ गोल करण्याचा विक्रम केला आहे. तर रॉल यांना ३२३ गोल करण्यासाठी ७४१ सामने खेळावे लागले. या आकडेवारीतूनच रोनाल्डो माद्रिदचा सर्वोत्तम खेळाडू आहे हे स्पष्ट होते. काहींना हे पटत नसले तरी रोनाल्डो त्यांच्याकडूनही एके दिवशी हे वदवून घेईल याची खात्री त्याच्या चाहत्यांना आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com