डोपिंगचा विळखा ही क्रीडा क्षेत्रातली गंभीर बाब आहेच, पण आपल्या खेळाडूंच्या दृष्टीने. त्यापेक्षाही दुर्दैवी गोष्ट म्हणजे बंदी घातलेल्या औषधांबाबत ते अनभिज्ञ असतातच,  शिवाय या विषयाबाबत प्रशिक्षकांनाही फारशी माहिती नसते.

क्रीडा क्षेत्रात व्यावसायिकता आल्यानंतर पैसा व प्रसिद्धी यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे ध्येय साध्य करण्यासाठी खेळाडूंमध्ये विलक्षण अहमहमिका निर्माण झाली. येनकेनप्रकारेण पैसा मिळविण्याची वृत्ती निर्माण होऊ लागली. त्यामधूनच उत्तेजक औषध सेवन करण्याच्या वाईट वृत्तीने क्रीडा क्षेत्रास विळखा घातला गेला आहे.

क्रीडा क्षेत्र हे पूर्वी मनोरंजन व आरोग्यसाधनचे क्षेत्र समजले जात असे. मात्र या क्षेत्रामधील स्पर्धा वाढत गेल्यानंतर हे क्षेत्र चढाओढीचे होऊ लागले. त्यातही क्रीडा क्षेत्राद्वारे यश मिळविल्यानंतर पैसा प्राप्त करता येतो हे खेळाडूंना समजू लागले. प्रसिद्धीमुळे विलक्षण वलय प्राप्त होते व पैसा पायाशी लोळण घालतो हेही खेळाडूंना लक्षात येऊ लागले. या क्षेत्रात व्यावसायिकता निर्माण झाल्यानंतर हे क्षेत्र जीवनातील उत्पन्नाचे साधन झाले. त्यातूनच शॉर्टकटद्वारे प्रसिद्धी व पैसा कसा मिळेल याकडे खेळाडू आकर्षित होऊ लागले. तुल्यबळ खेळाडूंबरोबर स्पर्धा करणे अवघड आहे असे लक्षात आल्यानंतर उत्तेजक औषधांचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर वाढू लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर उत्तेजक सेवन करणाऱ्या खेळाडूंवर काही वर्षांकरिता किंवा तहहयात बंदी घालण्याची उपाययोजनाही सुरू झाली. तरीही उत्तेजकाचा उपयोग कमी झालेला नाही. या प्रकारामुळे क्रीडा क्षेत्रात अयोग्य वृत्तीची स्पर्धा निर्माण झाली आहे व उत्तेजक सेवन करणाऱ्या खेळाडूंमुळे नैपुण्यवान व प्रामाणिक खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर फटका बसू लागला. उत्तेजक औषध सेवन करणे व त्याच्या वैद्यकीय चाचणीत सापडता येणार नाही यावरही उपाययोजना ही औषधे बनविणाऱ्या कंपन्यांकडूनच होऊ लागली. किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर हा एक मोठा व्यवसायच झाला आहे.

झटपट मार्गाने पैसा व प्रसिद्धी मिळवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना अनेक वेळा त्यांचे प्रशिक्षक व संघटक पाठीशी घालू लागले आहेत. अलीकडेच रशियन क्रीडा संघटकांवर जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने दोषी खेळाडूंना पाठीशी घालण्याकरिता मोठय़ा प्रमाणात लाच घेतल्याचा आरोप ठेवला आहे. फ्रान्समध्ये रशियन संघटकांविरुद्ध न्यायालयात कारवाईही सुरू करण्यात आली आहे. अलीकडेच जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने रशियाच्या उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळेची मान्यता काढून घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने यापुढे एक पाऊल जाऊन रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाची संलग्नता काढून घेतली असून त्यांच्या धावपटूंवर तात्पुरत्या कालावधीसाठी बंदीही घातली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निदरेष खेळाडूंना खूप मोठा फटका बसणार आहे. रिओ येथे पुढील वर्षी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार असल्यामुळे या खेळाडूंचे भरपूर नुकसान होणार आहे. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामध्ये रशियन खेळाडूंची हुकमत आहे.

उत्तेजकाबाबत आपल्या देशातील खेळाडू, प्रशिक्षक व संघटक खूपच मागासलेले आहेत. आपल्याकडे असलेली उत्तेजक प्रतिबंधक व्यवस्था अपेक्षेइतकी जागतिक दर्जाची नाही. ताकदीच्या व अधिक चढाओढींच्या क्रीडा प्रकारात जागतिक स्तरावर सहभागी होणाऱ्या सर्वच देशांमधील खेळाडूंपैकी ९० टक्के खेळाडू उत्तेजक घेतात असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. परदेशाच्या तुलनेत आपल्या खेळाडूंबाबत फरक एवढाच आहे की आपल्याकडे त्याबाबत खूपच अज्ञान आहे. केव्हा उत्तेजक घ्यायचे व केव्हा आपण उत्तेजक चाचणीत सापडणार नाही याचे ज्ञान परदेशी खेळाडू व प्रशिक्षकांकडे आहे. काही उत्तेजक औषधे पाण्यामार्फत घेतली जातात तर काही खाण्याच्या पदार्थाद्वारे घेतली जातात. पाण्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या औषधांचा दूरगामी परिणाम राहत नाही. त्यामुळे उत्तेजक चाचणीत सहसा हे खेळाडू सापडत नाहीत. याउलट जे खेळाडू खाद्यपदार्थाद्वारे उत्तेजक घेतात, ते खेळाडू उत्तेजक चाचणीत सापडले जातात. आपल्याकडे त्याबाबत खूपच उदासीनता आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातील एका महिला बॅडमिंटनपटूवर उत्तेजकाबाबत कारवाई झाली होती. तिने सर्दीवरील डीकोल्ड टोटल हे औषध घेतले होते. हे औषध बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत असेल असे कोणालाही स्वप्न पडणार नाही. मात्र हे औषध बंदी घातलेल्या औषधांमध्ये असल्यामुळे या बॅडमिंटनपटूची कारकीर्दच उद्ध्वस्त झाली. भारताचे काही धावपटू खाद्यपदार्थाद्वारे घेतल्या गेलेल्या उत्तेजकामुळे कारवाईचे बळी ठरले. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने बंदी घातलेली औषधे व उत्तेजक पदार्थाची संख्या दोन हजारचे वर आहे. साहजिकच प्रत्येक खेळाडू किंवा त्याचे प्रशिक्षक यांना त्याचा अभ्यास करणे शक्य नसते. परदेशातील खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात करतात, तेव्हा त्यांना सुरुवातीलाच उत्तेजक औषधांबाबत माहिती दिली जाते. दुर्दैवाने आपल्याकडे प्रशिक्षकांची माहिती अपुरी असते. त्यामुळे ते खेळाडूंना योग्य ती माहिती देऊ शकत नाहीत. त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याची गरज आहे.

आपल्या देशात वेटलिफ्टिंग व अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात भाग घेणाऱ्या खेळाडूंवर अनेक वेळा उत्तेजक प्रतिबंधक समितीकडून कारवाई झाली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये एवढे खेळाडू सापडले आहेत की अनेक वेळा भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावरच त्याबाबत कारवाई झालेली आहे. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी काही महिने अगोदर भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावर कारवाईची वेळ आली होती. घरच्या संकुलात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतच भारतीय वेटलिफ्टर्स नाहीत अशी नामुष्की भारतावर येणार होती. ही नामुष्की टाळण्यासाठी भारतीय वेटलिफ्टिंग महासंघास आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे मोठय़ा प्रमाणावर दंड भरावा लागला. तेव्हा कुठे भारतीय खेळाडूंना राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेता आला. अ‍ॅथलेटिक्समध्येही मोठय़ा प्रमाणावर उत्तेजक सेवनाचे प्रमाण दिसून येत आहे. मध्यंतरी आपल्या देशात शालेय व सबज्युनिअर गटाच्या स्पर्धाचे वेळी अनेक खेळाडू उत्तेजक औषध सेवनाबाबत दोषी आढळून आले. ज्या वयात खेळाडूंची कारकीर्द फुलत असते, त्याच वयात उत्तेजक सेवनामुळे कारकीर्द अर्धवट सोडण्याची वेळ येते हे केवढे दुर्दैव आहे. अशा घटना अनेक वेळा होऊनही आपले प्रशिक्षक व संघटक योग्य तो बोध घेत नाहीत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाची अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. या केंद्राजवळच असलेल्या दुकानांमध्ये राजरोसपणे उत्तेजक औषधे विकली जातात असेही निष्पन्न झाले आहे. तसेच प्रशिक्षक व संघटकांचे या दुकानदारांबरोबर व उत्तेजक औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांबरोबर लागेबांधे असतात असेही आढळून आले आहे. जोपर्यंत ही लोभी वृत्ती संपत नाही, तोपर्यंत क्रीडा क्षेत्र स्वच्छ होणे कठीण आहे. उत्तेजक सेवन करण्यासाठी व ते लपविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा लागतो. परदेशी खेळाडूंना त्या दोन्हीकरिता प्रायोजक मिळत असतात. आपल्या देशात खेळाडूंना सर्वसाधारण सुविधांकरिताच प्रायोजक मिळविताना नाकीनऊ येतात. उत्तेजक घेणे हे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. दुर्दैवाने काही प्रशिक्षक आपल्या प्रतिस्पर्धी प्रशिक्षकांबरोबर असलेल्या चढाओढीमुळे खेळाडूंना अशी उत्तेजके घेण्यासाठी प्रवृत्त करतात, वेळप्रसंगी धाक दाखवूनही उत्तेजक घ्यायला लावतात. अशा प्रवृत्तींमुळे खेळाडूंबरोबरच देशाची प्रतिमा डागाळली जात आहे याची पर्वा त्यांना नसते. त्यामुळेच भारताचे क्रीडाक्षेत्र अशा लोकांमुळे डागळले गेले आहे. त्याचे मुळापासूनच उच्चाटन होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या प्रशिक्षकांवर कठोर कारवाई केली पाहिजे; तरच भारतीय क्रीडा क्षेत्रास स्वच्छ प्रतिमा लाभेल.

मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com