जिम्नॅस्टिक्स हा क्रीडा प्रकार आपल्याकडे उपेक्षित समजला जातो. पण, याच खेळात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधींचा मागोवा घेत त्रिपुराची दीपा कर्मकार हिने मेहनत घेतली आणि तिची निवड थेट यंदाच्या ऑलिम्पिकसाठी झाली.

डोळ्याचे पारणे फिटविणारा जिम्नॅस्टिक्स हा क्रीडा प्रकार आठवला की आपल्याला रुमानियाची नादिया कोमेनेसी हीच डोळ्यासमोर येते. मॉन्ट्रियल येथे १९७६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिने दहापैकी दहा गुण मिळवीत इतिहास घडविला. या दिमाखदार खेळात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्रिपुरामधील खेळाडू दीपा कर्मकारला मिळाला आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

जलतरण, अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स आदी क्रीडा प्रकार ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी असलेले हुकमी क्रीडाप्रकार मानले जातात. मात्र दुर्दैवाने आपल्या देशात पदक मिळविण्याची क्षमता असूनही या खेळांना अपेक्षेइतके प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळेच या स्पर्धामध्ये पदकांच्या तालिकेत आपली पाटी कोरीच राहिली आहे. कमालीची जिद्द, जबरी आत्मविश्वास व धाडसी वृत्ती लाभलेली दीपा यंदा रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय खेळाडूंनी ५२ वर्षांपूर्वी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर आजपर्यंत भारतीय खेळाडू या स्पर्धेपासून दूरच राहिले आहेत. दीपाने आजपर्यंत आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा आदी स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. तिची आजपर्यंतची कामगिरी लक्षात घेता ऑलिम्पिक पदक मिळवीत इतिहास घडविण्याची क्षमता तिच्याकडे आहे.

20-lp-karmakarआपल्या देशात जिम्नॅस्टिक्स हा उपेक्षित क्रीडा प्रकार आहे. खरंतर या खेळात करिअर करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. अनेक खेळांसाठी जिम्नॅस्टिक्स हा पायाभूत क्रीडाप्रकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर नृत्य व कलात्मक आविष्कारांचा समावेश असलेले अनेक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये जिम्नॅस्टिक्स व मल्लखांब या खेळांमध्ये चमक दाखविणारे खेळाडूच आपल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. तसेच पारितोषिकांची खैरात मिळवितात. जिम्नॅस्टिक्सची पाश्र्वभूमी असलेले खेळाडू चित्रपट व अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्याचे मार्गदर्शनाचे काम करतात. अनेक मराठी चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शनाचे काम करणाऱ्या तसेच विविध वाहिन्यांवर नृत्य स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम करणाऱ्या फुलवा खामकर या शिवछत्रपती विजेत्या जिम्नॅस्ट आहेत.

आपल्या देशातील त्रिपुरासारख्या पूर्वाचल प्रदेशांमध्ये जागतिक स्तरावर नेत्रदीपक यश मिळविण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र या क्रीडा नैपुण्याचा अपेक्षेइतका शोध घेतला जात नाही आणि समजा नैपुण्यशोध घेतला तर त्यांचा अपेक्षेइतका विकास होत नाही. भारतास ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी महिला बॉक्सर एम.सी.मेरी कोम हीदेखील पूर्वाचल भागातूनच तयार झालेली खेळाडू आहे. सुपरमॉम असे बिरुद लाभलेल्या या खेळाडूने अनेक विश्वविजेतीपदेही मिळविली आहेत. केवळ भारतीय खेळाडूंसाठी नव्हे तर जगातील अनेक नवोदित खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान झाली आहे. तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवीत दीपा हिने जिम्नॅस्टिक्समध्ये जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे.

दीपा हिने वयाच्या सहाव्या वर्षी जिम्नॅस्टिक्स या खेळाच्या कारकीर्दीस सुरुवात केली. नवी दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे विश्वेश्वर नंदी यांच्याकडे दीपाने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. दीपा खूप जाड अंगकाठी असलेली मुलगी होती. त्यामुळे नंदी यांनी तिला अन्य खेळात भाग घेण्याचा किंवा वजन कमी करण्याचा सल्ला दिला. दीपाचे वडील भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक आहेत. दीपाने जिम्नॅस्टिक्समध्येच भाग घ्यावा असा त्यांचा हट्ट होता. दीपानेदेखील जिम्नॅस्टिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय केला होता. साहजिकच तिने नंदी यांचा सल्ला मानला व हळूहळू वजन कमी करण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये तिने कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्या वेळी ती १४ वर्षांची होती. या पदकानंतर दीपा हिने सतत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आजपर्यंत तिने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये ६७ सुवर्णपदकांसह ७७ पदकांची कमाई केली आहे. एखाद्या स्पर्धेतील अपयशाने ती कधीच खचलेली नाही. उलट हे अपयश कशामुळे आले याचा बारकाईने अभ्यास करीत त्यावर मात कशी करायची यालाच ती प्राधान्य देत असते. आगामी ऑलिम्पिकमध्ये तिला व्हॉल्ट या क्रीडा प्रकारात पदकाची संधी आहे. या प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर १५.१०० गुण नोंदविणाऱ्या व उडी मारून अचूकपणे उभे राहणाऱ्या जगातील पाच खेळाडूंमध्ये तिला स्थान आहे. या क्रीडाप्रकारात अचूक उडी मारली नाही तर गुण जातात, पण त्याहीपेक्षा दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अन्य खेळाडूंनी केलेल्या चुकांचे बारकाईने निरीक्षण करीतच दीपा हिने आपल्या कौशल्यात अचूकता आणण्यावर भर दिला आहे.

दीपाच्या नावावर आणखीही सुवर्णपदकांची नोंद झाली असती. मात्र राष्ट्रीय स्तरावर व अनेक राज्यांमध्ये जिम्नॅस्टिक्सच्या दोन संघटना कार्यरत आहेत. अंतर्गत कलहांमध्ये या खेळाची आपल्या देशात पीछेहाट झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धाच झालेली नाही. राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक मतभेदांमुळे  दीपाला जागतिक स्तरावरील दोन स्पर्धावर पाणी सोडावे लागले आहे. अन्यथा तिच्या नावावर आणखी दोनतीन सुवर्णपदकांची नोंद झाली असती. ऑलिम्पिकसाठी अजून बराच कालावधी आहे. या कालावधीत दीपा हिला परदेशात प्रशिक्षणासाठी व परदेशी प्रशिक्षकांमार्फत सरावाची संधी मिळाली तर निश्चितपणे दीपा ही ऑलिम्पिक पदकाचा इतिहास घडवू शकेल.

अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी आदी खेळांकरिता शासनातर्फे परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मुळातच आपल्या देशातील जिम्नॅस्टिक्समधील प्रशिक्षकांच्या ज्ञान व माहितीबाबत काही मर्यादा आहेत. अन्य खेळांमध्ये प्रशिक्षकांकरिता उद्बोधक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यांना परदेशात आधुनिक व अद्ययावत ज्ञान आणि तंत्र अवगत करण्यासाठी पाठविले जाते. जिम्नॅस्टिक्समध्ये मात्र प्रशिक्षकांना अशी संधी फारशी कधी मिळालेली नाही. या खेळाकडे प्रायोजक फारसे लक्ष देत नसल्यामुळे खेळाडू व प्रशिक्षक यांच्या आर्थिक मर्यादा असतात. परदेशात प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा परदेशी प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन मिळविणे हे या खेळाडू व प्रशिक्षकांना शक्य नसते.

अन्य खेळांबाबत नियोजनबद्ध विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जिम्नॅस्टिक्समध्ये अशा सुविधांची कमतरता आहे. विकास कार्यक्रम अपेक्षेइतका राबविण्यात आलेला नाही. भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रयत्न करीत असते. मात्र मुळातच या खेळाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्यांच्याही काही मर्यादा आहेत. अनेक वेळा जिम्नॅस्टिक्ससाठी बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचा अन्य खेळांसाठी किंवा अन्य कार्यक्रमांसाठी उपयोग केला जातो. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत असलेल्या जिम्नॅस्टिक्सच्या संकुलाचा उपयोग खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठीही केला जातो. काही वेळा अशा संकुलांची देखभाल करणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखेच असते. जिम्नॅस्टिक्ससाठी भरपूर क्रीडा नैपुण्य आपल्या देशात आहे. शासन, संघटक, पालक व मार्गदर्शक यांनी एकत्र येऊन या नैपुण्याचा शोध व विकासावर भर दिला तर आपल्या देशात दीपासारख्या अनेक खेळाडू तयार होतील. त्याचप्रमाणे या खेळातील संघटकांनी आपापले मतभेद विसरून खेळाच्या विकासावर भर दिला पाहिजे. खेळाडू असतील तर आपली खुर्ची असेल हे डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंचा विकास यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. संघटकांनी वैयक्तिकमतभेद दूर फेकले गेले तरच खेळाडूंची प्रगती होईल. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला तरच प्रायोजक या खेळाकडे लक्ष देतील.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com