नवा त्रिशतकवीर!

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावल्यामुळे करुण नायर हा क्रिकेटमधला नवा हिरो ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावल्यामुळे करुण नायर हा क्रिकेटमधला नवा हिरो ठरला आहे. त्याची ही खेळी कौतुकास्पद आहेच, पण म्हणून आता त्याच्याकडून सतत अशाच कामगिरीची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. त्यानेही त्याच्याच भल्यासाठी या पराक्रमातून लौकर बाहेर येणं गरजेचं आहे.

कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. एका दिवशी अचानक एक चेहरा तुमच्यासमोर येतो. काही तरी पराक्रम, विक्रम करतो. त्या व्यक्तीमध्ये गुणवत्ता असतेच. त्याने अथक मेहनतही घेतलेली असते. लहानपणापासून त्याच्यावर केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात, मग तो एखादा कलाकार असो किंवा खेळाडू. त्याचेही तसेच. संकटमोचक नावानेच तो ओळखला जातो. संघावर संकट येते तेव्हा निधडय़ा छातीने तो उभा राहतो आणि संघाला यशोशिखर गाठून देतो. भारताचा दुसरा त्रिशतकवीर म्हणून तो जगासमोर आला, पण लहानपणापासूनची त्याची मेहनत यासाठी कारणीभूत आहे. करुण नायर हे त्याचे नाव. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याने त्रिशतक झळकावले आणि तो नायक झाला. भारताचा दुसरा त्रिशतकवीर.

करुण बंगळुरुच्या चिन्मयी शाळेत होता. तिथे सराव करत असताना शशीधर या दुसऱ्या शाळेच्या क्रिकेट प्रशिक्षकांनी त्याला पाहिले. त्याच्या चिन्मयी शाळेचा क्रिकेटचा संघ नव्हता. तर दुसरीकडे करुणची फलंदाजी पाहून त्याची गुणवत्ता वाऱ्यावर सोडावी असे त्यांना वाटले नाही. त्यांनी आपण प्रशिक्षण देत असलेल्या फँ्रक अँथोनी शाळेच्या मुख्याध्यापकांना ही गोष्ट सांगितली. ते एक दिवस त्याचा खेळ पाहायला शशीधरन यांच्याबरोबर आले. करुण त्यावेळी फक्त चौथीत शिकत होता. त्यांनी खेळतानाचे त्याचे सरळ बॅटने मारलेले फटके पाहिले. एवढय़ा लहान वयात खेळ नेमका काय आहे, हे जेव्हा मुलांना माहिती नसते त्या वयात करुण सरळ बॅटने खेळत होता. त्याची फलंदाजी मुख्याध्यापकांना आवडली, त्यांनी शाळेत प्रवेशाची परवानगी दिली. त्यानंतर शशीधरन यांनी करुणच्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यांनीही होकार दिला आणि करुणचे क्रिकेट योग्य मार्गावर आले.

lp10rकरुण पहिल्यापासूनच शांत आणि हुशार होता. त्याला कधी कसा खेळ करायचा हे सांगावे लागले नाही. त्याच्या या वयात मनगटात ताकद नसतानाही मुलं मोठा फटका मारायला जायची, त्यावेळी करुण एक धावा काढून समोरच्याला फलंदाजी देण्याचा विचार करत होता. करुणमध्ये कमालीची शिस्तही होती. त्यावेळी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दोन तासांच्या सरावाला तो हजर असायचा. सरावाला कधीही दांडी मारत नसायचा. शाळेत सराव नसायचा तेव्हा घराजवळच्या क्रिकेट क्लबमध्ये जाऊन तो अन्य खेळाडूंचा खेळ बघत बसायचा. न खेळता खेळाचा अभ्यास करण्याचे तंत्र त्याला त्यावेळीच अवगत होते. त्याच्या फलंदाजीत कमालीचे सातत्यही होते. सातत्याने धावा जमवण्याचे कसबही त्याला माहिती होतेच.

२००७ सालची गोष्ट. हिमालय चषकातल्या उपांत्यपूर्व फेरीत त्याचा संघ अडचणीत होता. त्यावेळी करुणने १८८ धावांची खेळी साकारली होती. त्यावेळीच भविष्यात हा भारतासाठी खेळेल, असे शशीधरन यांना वाटले होते. चेन्नईच्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही करुण आणि शशीधरन यांच्यामध्ये बोलणे झाले. तेव्हा करुण ७१ धावांवर खेळत होता. त्यावेळी शशीधरन यांनी त्याला द्विशतक पूर्ण करायची संधी असल्याचे सांगितले. करुणने त्रिशतक झळकावत त्यांना धक्काच दिला. शिष्य आणि प्रशिक्षक यांच्यातील हा संवाद एका तपापासून अधिक काळ अविरत सुरू आहे. अजूनही करुण आपल्या खेळीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी शशीधरन यांच्याशी संवाद साधतो.

या वर्षीच्या मार्च महिन्यातलीच गोष्ट. इराणी चषकाचा सामना होता. रणजी विजेता मुंबईचा संघ आणि शेष भारतीय संघात हा सामना रंगला. करुण शेष भारत संघात होता. या सामन्यात मुंबईने शेष भारतापुढे ३८० धावांचे आव्हान ठेवले होते. फैझ फजल आणि सुदीप चटर्जी हे दोघे खेळपट्टीवर ठाण मांडून होते खरे, पण धावगती तीनच्या वर जात नव्हती. सुदीप बाद झाला. करुण मैदानात आला आणि शांत चित्ताने धावगती वाढवत नेली. जलदगतीने ९२ धावांची खेळी साकारत त्याने संघाला विजयाचा मार्ग दाखवला. यावेळी सामनावीराचा पुरस्कारही त्याने पटकावला. कारण पहिल्या डावातही त्याने संकटमोचकाची भूमिका बजावली होती. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सहाशे धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारतीय संघाची ५ बाद १३२ अशी अवस्था होती. त्यावेळी करुणने ९४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. त्यामुळे शेष भारतीय संघाच्या विजयाचा तो खऱ्या अर्थाने नायक ठरला होता. यापूर्वी रणजी करंडक स्पर्धेतही त्याने छाप पाडली होती.

खरेतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत करुणला ११ सदस्यीय संघात स्थान मिळणे फारच कठीण वाटत होते. पण काही खेळाडूंची दुखापत त्याच्या पथ्यावर पडली. जर अजिंक्य रहाणे तंदुरुस्त असला असता तर करुण या सामन्यात खेळला नसता आणि या पिढीचा त्रिशतकवीरही पाहायला मिळाला नसता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लोकेश राहुलच्या हुकलेल्या द्विशतकामुळे भारतीयांनी हळहळ व्यक्त केली, त्यामुळे करुणच्या नाबाद ७१ धावा झाकोळल्या गेल्या. पण उगवत्या सूर्याला जसे झाकोळता येत नाही, तसेच करुणच्या बाबतीतही झाले. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी काही चांगली होत नव्हती. या सामन्यात तो झटपट बाद झाला असता तर पुढच्या सामन्यात त्याला डच्चूच मिळणार होता. पण परिस्थितीचा सर्वोत्तम फायदा कसा घेता येऊ शकतो, यामध्ये करुण माहीर निघाला. आपल्या या निर्णायक डावात तो अशी काही फलंदाजी करून गेला की आता यापुढे त्याची संघातील स्थान काही मालिकांसाठी तरी अबाधित राहू शकते.

कधी कधी एका दिवसात संघ जवळपास तीनशे धावांच्या जवळपास पोहोचतात, पण पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी करुणने एकटय़ानेच २३२ धावा फटकावल्या. त्याची ही खेळी अप्रतिम होतीच. पण या खेळीत त्याने आडव्या बॅटने मारलेले फटके काही जणांना खटकले. कसोटी सामन्यांमध्ये रिव्हर्स स्वीपसारखे फटके मारणे या प्रकारामध्ये बसत नाहीत. हे फटके करुणला नक्कीच नवीन नाहीत. पण ते फटके यावेळी खटकणारे होते. सर्वात महत्त्वाची त्याची खटकलेली गोष्ट म्हणजे त्याने २९९ धावांवर असताना मारलेला फटका. लोकेश राहुल १९९ धावांवर खेळत असताना आदिल रशिदने त्याला उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकला होता. ते चेंडू राहुलने तटवण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटच्या कडेला स्पर्श केला आणि क्षेत्ररक्षकाने हवेत अलगद उडालेला सोपा झेल सहजपणे टिपला. करुण २९९ धावांवर खेळत असताना समोर रशिदच गोलंदाजीला होता. त्याने राहुलला जसा चेंडू टाकला तसाच उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकला आणि करुणने फटका मारला. त्याचे खरेच नशीब बलवत्तर. हा चेंडू हवेत उडाला, पण राहुलच्या चेंडूएवढा नाही. करुण झेलबाद होण्याची चिन्हे होती. पण चेंडू जास्त हवेत नसल्यामुळे तो क्षेत्ररक्षकाला टिपता आला नाही आणि चौकारासह करुणने त्रिशतक पूर्ण केले. हे सारे पाहता करुणने आपल्या फलंदाजीमध्ये बदल करण्याची गरज नक्कीच आहे. फलंदाजीतील त्रुटी तो जेवढय़ा लवकर दूर करेल तेवढी त्याची फलंदाजी फुलत जाईल. पण ट्वेन्टी-२० च्या मुशीत वाढलेल्या पिढीतला असूनही करुणने त्रिशतक झळकावण्यापर्यंत संयम दाखवला, हेदेखील समजून घ्यायला हवे.

त्रिशतक झळकावल्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम राहील, असे म्हणता येणार नाही. कारण संघात फार स्पर्धा आहे. करुणच्या त्रिशतकामुळे अजिंक्य रहाणेचे स्थान धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे करुणला फलंदाजीतील सातत्य टिकवता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. करुणने यावेळी त्रिशतक झळकावले म्हणजे त्यापुढेही सतत त्याच्याकडून अशीच अपेक्षा ठेवणे चुकीचे असेल. पण उपयुक्त फलंदाजी करत तो संघाच्या विजयात मोलाची भर नक्कीच टाकू शकतो. करुणची ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक सामना नवीन असतो आणि त्यामध्ये धावांची भूक तुमच्यामध्ये किती, हे महत्त्वाचे ठरत असते. त्यामुळे त्यानेही या त्रिशतकी खेळीतून बाहेर येणे गरजेचे आहे. या खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. पण त्यामध्ये त्याने जास्त रममाण होऊ नये. या कौतुकांमध्ये तो जास्त अडकला तर पुढच्या सामन्यांमध्ये त्याला लक्ष केंद्रित करता येणार नाही. करुणची ही खेळी चिरतरुण अशीच आहे. यापुढेही तो धावांची टांकसाळ उघडेल, अशी आशा व्यक्त करूया. आतापर्यंत फक्त तीनच कसोटी सामने त्याच्या नावावर आहेत. अजून बरीच मजल त्याला मारायची आहे. पण या पुढच्या प्रवासात या त्रिशतकाचे ओझे त्याच्यावर लादता कामा नये.

प्रसाद लाड response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian triple century maker karun nair hero of indian cricket