लेगस्पिन, गुगली आणि बरंच काही…

क्रिकेटच्या रंगमंचावर फिरकीपटूंचे स्थान एखाद्या कॅरेक्टर आर्टस्टिसारखे आहे.

अकिला धनंजय

अमित ओक – response.lokprabha@expressindia.com
वेध

उत्तम लेगब्रेक गोलंदाज होण्यासाठी मेहनत तर हवीच शिवाय हुशारीही हवी. फलंदाजाच्या मानसिकतेचा अभ्यास हवा आणि स्वत:वर पूर्ण विश्वास हवा.

क्रिकेटच्या रंगमंचावर फिरकीपटूंचे स्थान एखाद्या कॅरेक्टर आर्टस्टिसारखे आहे. मुख्य भूमिकेत नसले तरी परेश रावल, नाना पाटेकर, अनुपम खेरप्रमाणे ते क्रिकेटमध्ये प्रसंगानुरूप रंग भरू शकतात. फिरकीपटूंची जात तशी विचारी. पण वळणाऱ्या खेळपट्टीवर ते कधी विषारी होऊन दंश करतील याचा नेम नसतो. याच फिरकीने आपल्या तालावर मुख्य भूमिकेतल्या दादा फलंदाजांना गिरकी घ्यायला लावून शोले चित्रपटाप्रमाणे ठाकूरचा कॅरेक्टर रोल मुख्य कलाकारांना कसा भारी पडू शकतो ते दाखवून दिले आहे. या फिरकीपटूंच्यातसुद्धा दोन प्रजाती आहेत. एक म्हणजे सर्रास आढळणारी ऑफब्रेक जमात. तर दुसरी तुलनेने संख्येने कमी असणारी लेगब्रेक जमात. या लेगब्रेक जमातीत पुन्हा दोन पोटभेद येतात. उजव्या हाताने टाकणारे कर्मठ पद्धतीचे गोलंदाज तर डाव्या हाताने टाकतात ते चायनामन गोलंदाज. या लेखात अशाच लेगब्रेक गोलंदाजीच्या पोतडीत काय काय जादू दडली आहे ते अनुभवू.

लेगब्रेक म्हणजे उजव्या फलंदाजासाठी चेंडूचा टप्पा लेगस्टंपच्या दिशेने पडतो व चेंडू ऑफस्टंपच्या दिशेने वळतो. मनगट व पंज्याची ठेवण चेंडूला किती फिरकी व उंची द्यायची ते ठरवायला महत्त्वाची असते. मधलं बोट चेंडूवर नियंत्रण ठेऊन दिशा देतं. या वैशिष्टय़ामुळे यांना व्रीस्ट स्पीनर्स असेही म्हणतात. ज्याप्रमाणे गायकीत नुसत्या आलापीने भागत नाही. बोलताना, सपाट ताना मग एखादी ठुमरी, नाटय़पद गाऊन मफल रंगवावी लागते त्याप्रमाणेच नुसत्या लेगब्रेकने गोलंदाजी पूर्ण होत नाही. गुगली, टॉपस्पिन, स्लायडर, फ्लिपर अशा विविधतेची जोड असेल तरच तो गोलंदाज परिपूर्ण होतो. फलंदाजाला संगीत खुर्ची खेळायला लावायची असेल तर अशा फिरकीच्या तानांचा अधूनमधून उपयोग करावाच लागतो. गुगलीला राँगलन असेही संबोधतात. वेस्ट इंडिजचे बरेचसे खेळाडू व समालोचक याला गुगल नावाने संबोधतात. राँगलनचा खरा अर्थ वाईट प्रवृत्तीचा माणूस असा आहे. तर क्रिकेटमध्ये याचा अर्थ वाईट पद्धतीचा चेंडू असा न घेता विरुद्ध दिशेने जाणारा चेंडू असा घ्यायचा आहे. बोटांची व मनगटाची ठेवण लेगब्रेकसारखीच ठेवून पंजा उलटा करून चेंडू टाकला की तो होतो गुगली. म्हणजे सर्वप्रकारे हा लेगब्रेकच चेंडू आहे असे भासवून फलंदाजाला गंडवण्याचा प्रकार आहे. या गुगलीचा शोध १०० वर्षांपूर्वी इंग्लिश खेळाडू बर्नाड बॉन्क्वेट याने लावला. त्याच्या स्मरणार्थ या चेंडूला ऑस्ट्रेलियात बॉसी असेही म्हणतात.

बर्नाडने ही गुगलीची कला काही दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना शिकवली. आणि शिष्याने गुरूला मात द्यावी त्याप्रमाणे १९०६ साली आफ्रिका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडलाच ४-१ ने पराभूत करून आफ्रिकेने खळबळ माजवली. आफ्रिकेकडून गुगली टाकणारे तब्बल चार गोलंदाज पहिल्या ओव्हरपासूनच खेळवले गेले त्यापुढे गोऱ्या इंग्रंजांचे चेहरे पांढरे पडले होते.

टॉपस्पिनर टाकण्यासाठी पहिल्या तिन्ही बोटांत सारखे अंतर ठेवून चेंडूवर पकड घ्यायची असते. लेगब्रेककरिता पहिली दोन बोटं जवळ असणं गरजेचं असतं. टॉपस्पिन प्रकारात चेंडू सरळ जातो व अधिक उसळीही घेतो. पाकिस्तानचे अब्दुल कादिर या प्रकारात माहीर होते. फ्लिपर हा प्रकार शेन वॉर्न तसेच अनिल कुंबळे यांच्या मते सगळ्यात अवघड प्रकार आहे. या प्रकारात दगडासारखा कठीण सिझन चेंडू हातात ठेवून टिचकी वाजवून चेंडू सोडायचा असतो. हा प्रकार अत्यंत कठीण आहे. भल्या भल्या लेगब्रेक गोलंदाजांना ही कला शिकण्यासाठी काही वष्रे सराव करावा लागला आहे. खुद्द शेन वॉर्न व अनिल कुंबळे यांनासुद्धा ही कला क्रिकेटमध्ये काही वष्रे घालवल्यावर शिकता आली. स्लायडर या प्रकारात मनगटाची ठेवण लेगब्रेकसारखीच ठेवून चेंडूच्या मागून बोटे रोल करावी लागतात. हा चेंडू विशेष वळत नाही, पण तो नेहमीपेक्षा जास्त वेगाने फुल लेंग्थने फलंदाजाकडे जातो. शेन वॉर्नने या स्लाइडरचा शोध लावला असे म्हणतात. पण ऑस्ट्रेलियाचेच पीटर फिलपॉट व रिची बेनॉ हे १९६० च्या दशकात हा चेंडू ऑर्थोडॉक्स बॅकस्पिनर किंवा स्लायिडग टॉपस्पिनर नावाने टाकत असत. हे सगळे प्रकार प्रत्यक्ष सामन्यात आजमावून बघायचे असतील तर गोलंदाजाने याचा विशेष सराव करायला हवा व त्याच्याकडे आत्मविश्वास हवा. अन्यथा हे बूमरँग ठरू शकते व लेगब्रेक गोलंदाज मदानाबाहेर भिरकावून दिला जाऊ शकतो. नियंत्रित लेगब्रेक गोलंदाज आपल्या गुगली व टॉपस्पिनने उद्गारवाचक चिन्ह तयार करतो. स्लायडर व फ्लिपर यांच्या विरामचिन्हांनी कितीही दादा फलंदाजाला पूर्णविराम देऊ शकतो. अशी लेगब्रेकची महती आहे. १९२५ च्या दरम्यान इंग्लंडकडून १२ कसोटी खेळलेल्या केंट संघाच्या टीच फ्रीमन या अवलियाने तर क्रिकेटच्या रंगमंचावर भन्नाट कामगिरी केली. कंट्री क्रिकेटच्या एका सीझनमध्ये त्याने तब्बल ३०० बळी पटकावले होते. हा विक्रम आजही अबाधित आहे आणि तो मोडला जाणे अशक्य आहे. एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम त्याने तीन वेळा केला होता. ५९२ प्रथम श्रेणी सामन्यात विक्रमी १,५४,३१२ चेंडू टाकून ३७७६ फलंदाजांना माघारी धाडताना तब्बल ३८६ वेळा ५ बळी, तर १४० वेळा १० बळी या अतिमानवाने घेतले होते. हे सगळे पराक्रम त्याने फिरकीस प्रतिकूल अशा इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर केले होते. म्हणजे भारतीय उपखंडात चेंडू हातभर वळणाऱ्या खेळपट्टय़ांवर त्याने काय हाहाकार माजवला असता त्याची कल्पनासुद्धा करवत नाही. १९२५-१९३६ चा काळ ऑसी गोलंदाज क्लॅरी ग्रिमेटनेसुद्धा गाजवला. फ्लिपरचा शोध याच ग्रिमेटने लावला. तर त्याचा जोडीदार बिल ओरॅली हाही उत्तम लेगब्रेक गोलंदाज होता.

गुगलीचे महत्त्व सर डॉन ब्रॅडमन यांनीही अनुभवले होते. १९४८ साली ओव्हलवर आपली अखेरची कसोटी खेळताना एक अभूतपूर्व विक्रम ब्रॅडमन यांना साद घालत होता. कसोटीत १०० धावांच्या सरासरीचे एव्हरेस्ट गाठायला त्यांना फक्त चार धावा हव्या होत्या, पण इंग्लंडच्या एरिक होलीसने; ब्रॅडमन सरासरीचा एव्हरेस्ट चढून झेंडा रोवणार नेमक्या त्याच वेळी एका अप्रतिम गुगलीने त्यांचा त्रिफळा उडवला आणि ब्रॅडमन यांचे स्वप्न भंगले. आयुष्यभर गोलंदाजांना आपला बळी मिळवण्यासाठी झगडायला लावण्याऱ्या या महान फलंदाजाची अखेर मात्र एका गुगलीने केली होती. क्रिकेट जाणकारांच्या मते तसेच वेस्ट इंडिजचे थ्री डब्ल्यूज आणि सर गॅरी सोबर्स यांच्याही मते या कलेत सगळ्यात प्रतिभावान होते ते भारताचे सुभाष गुप्ते. इतर लेगब्रेक गोलंदाज एकाच प्रकारचा गुगली टाकत, पण गुप्तेंकडे यात दोन व्हरायटी होत्या. पहिल्या व्हरायटीत ते जाणीवपूर्वक फलंदाजाला खोटा आत्मविश्वास देण्यासाठी त्याला समजेल असा गुगली टाकत. आणि मध्येच आपला सरप्राइज गुगलीचे गुप्तेस्त्र बाहेर काढत. हा गुगली खांद्याची ठेवण बेमालूमपणे बदलून असा काही टाकत की मी मी म्हणणारे दादा फलंदाज त्याच्यापुढे मामा झाले होते. माइक स्मिथ हा इंग्लंडचा मोठा फलंदाज. त्याला कानपूरच्या खेळपट्टीवर लेगब्रेक- गुगली- टॉपस्पिन अशा चक्रव्यूहात फसवून ज्या पद्धतीने धारातीर्थी पाडले होते त्यावरून गुप्तेंचे गुप्तेस्त्र किती संहारक आहे याची प्रचीती जगाला आली होती. सर गॅरी सोबर्स यांनी तर ‘शेन वॉर्न मे बी लेटेस्ट बट सुभाष वॉज ग्रेटेस्ट’ अशा शब्दांत सुभाष गुप्तेंना नावाजले होते. गॅरी सोबर्स म्हणजे क्रिकेटमधला साक्षात गंधर्व. आणि तोही स्वत: लेगब्रेक चायनामन गोलंदाज. म्हणजे त्याचे शब्द ही आकाशवाणी. यावरून गुप्तेंचे महानपण लक्षात येते. इरापल्ली प्रसन्ना यांनी तर पुढे जाऊन असेही म्हटले आहे की, आजच्या काळात गुप्ते खेळत असते तर ८०० बळी घेणे म्हणजे त्यांच्यासाठी विशेष कठीण नव्हते. आज सुभाष गुप्ते हयात नाहीत. भारतीय क्रिकेट बोर्डाबरोबर एका कटू प्रसंगानंतर त्यांना वयाच्या ३२ व्या वर्षीच आपली कारकीर्द संपवावी लागली. नंतर त्यांनी वेस्ट इंडिजमध्येच स्थायिक होणे पसंत केले. ते फक्त ३६ कसोटी खेळले. १४९ बळी मिळवताना त्यांनी ज्या भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नच बलिये करायला लावले होते ते आजही जुने  क्रिकेटप्रेमी विसरलेले नाहीत. दुर्दैवाने त्यांची चित्रफीत इंटरनेटवर उपलब्ध नाही.

१९५० च्या दशकात ऑस्ट्रेलियन रिची बेनॉ व वेस्ट इंडीजचे सर गॅरी सोबर्स यांनी लेगब्रेक गोलंदाजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. परंतु सुभाष गुप्तेंप्रमाणे त्यांचा गुगली बेमालूम नव्हता. सुभाष गुप्ते नावाचा ‘सूर्य’ अस्त पावल्यावर भारताच्या ताफ्यात ‘चंद्र’शेखर दाखल झाला. आणि या चंद्राने आपल्या गुगलीने अनेक फलंदाजांच्या धावांना ग्रहण लावले. चंद्रग्रहणाचा प्रत्यय इंग्लंडने १९७१- ओव्हल कसोटीत अनुभवला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघायचे नसते. पण दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना माघारी धाडून चंद्राने आपल्याकडे बघायला सगळ्या जगाला भाग पाडले व इंग्रजांना ‘वक्र’तुंड केले. चंद्रशेखर वेगात लेगब्रेक टाकत. गुगलीचा मारा अधिक प्रमाणात असे. उजवा हात पोलिओने वाकडा झालेला असतानाही त्याच हाताने यष्टय़ा वाकडय़ा करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही इतका असर त्यांच्या लेगब्रेकचा होता.

त्यानंतर १९९० चे दशक गाजवले ते वॉर्न – कुंबळे यांनी. शेन वॉर्न सर्वाधिक बळी मिळवणारा लेगब्रेक गोलंदाज ठरला. त्याचेच समकालीन स्टुअर्ट मॅकगिल व ब्रॅड हॉग यांनीही चमकदार कामगिरी केली. शेन वॉर्नने बोटांची ग्रीप वेगळी ठेवून चेंडू हातभर वळवून दाखवला. माईक गॅटिंग व अँड्रय़ू स्ट्रॉस यांच्या त्याने उडवलेल्या दांडय़ा विशेष गाजल्या. अनिल कुंबळेने संयम व चिकाटीच्या जोरावर ६१९ कसोटी बळी टिपत आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले. भारताकडून दोनच कसोटी खेळलेला चेन्नईच्या व्ही. व्ही. कुमारने १२९ प्रथमश्रेणी सामन्यांत तब्बल ५९९ बळी घेतले होते. १९६१ साली दिल्ली कसोटीत पदार्पणातच पाकिस्तानविरुद्ध पहिल्या डावात ५ बळी मिळवूनही निवड समितीने त्यांना पुरेशी संधी दिली नाही. नरेंद्र हिरवाणी हे नाव तर पहिल्याच कसोटीत इतके गाजले की तो अनेक विक्रम पादाक्रांत करणार असे वाटू लागले. १९८८ साली मद्रास कसोटीत दोन्ही डावात मिळून घेतलेले १६ बळी व खुद्द व्हिव रिचर्ड्स याचा गुगलीवर घेतलेला बळी या स्वप्नवत पदार्पणामुळे हिरवाणी गाजू लागला. नंतर मात्र अचानक त्याच्या करिअरने यू टर्न घेतला व अपेक्षित कामगिरी घडली नाही. सध्या समालोचन करणारा लक्ष्मण शिवरामकृष्णननेही प्रदीर्घ नसली तरी बऱ्यापकी चांगली कामगिरी केली.

पाकिस्ताननेही चांगले लेगस्पिनर घडवले. अब्दुल कादिर, इंतिखाब आलम, मुश्ताक अहमद, शाहिद आफ्रिदी, दानिश कनेरिया असे काही चांगले लेगब्रेक गोलंदाज आपापला काळ गाजवून गेले. दक्षिण आफ्रिकेकडून पॉल अ‍ॅडम्स व सध्याचा इम्रान ताहीर प्रकाशात आले. पॉल अ‍ॅडम्स हा डावखुरा ङोर्थोडॉक्स होता. चेंडू सोडताना डोक्याला मुरकी देऊन ते खाली वाकवून तो चेंडू टाकायचा. झिम्बाब्वेकडून पॉल स्ट्राँग चमकला. श्रीलंकेचा सध्याचा मिस्ट्री बोलर अकिला धनंजया लेगब्रेक आणि ऑफब्रेक दोन्ही टाकतो.  पण श्रीलंकेची पूर्वीपासूनच मुख्य मदार ऑफस्पिनवर राहिली आहे. अमित मिश्रा, कुलदीप यादव, युजवेंद्र चाहल, पीयूष चावला हे भारताचे सध्याचे लेगब्रेक गोलंदाज खेळत आहेत. त्यापकी यादव आणि चहल यांनी अलीकडच्या  काळात  एकदिवसीय सामन्यांत उत्तम कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानी रशीद खानसुद्धा अलीकडे प्रकाशात येत आहे.  उत्तम लेगब्रेक गोलंदाज होण्यासाठी मेहनत तर हवीच शिवाय हुशारीही हवी. फलंदाजाच्या मानसिकतेचा अभ्यास हवा आणि स्वत:वर पूर्ण विश्वास हवा. आफ्टरऑल लेग स्पिनर्स कॅन कन्सिड रन्स बट दे आर मॅच विनर्स!!!
सौजन्य – लोकप्रभा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leg spin googly and more cricket