सूर्योदयानंतर लगेच सूर्यास्त..!

कोणत्याही क्रीडाप्रकारात विश्वविजेतेपद मिळवणे हे अनेकांचे ध्येय असते.

कोणत्याही क्रीडाप्रकारात विश्वविजेतेपद मिळवणे हे अनेकांचे ध्येय असते. ते मिळवले की ते टिकवण्यासाठीचा आटापिटा ही पुढची अपरिहार्य गोष्ट. पण फॉम्र्युला-वन शर्यतीत विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर लगेचच निवृत्ती जाहीर करून निको रोसबर्गने वेगळाच पायंडा पाडला आहे.

गोष्ट २००८ सालची .. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या मोसमातील अखेरच्या शर्यतीत जेतेपद पटकावण्यासाठी फेरारीचा फेलिप मासा आणि मॅक्लॅरेनचा लुइस हॅमिल्टन यांच्यात विश्वविजेतेपदासाठीच्या चुरशीत अवघ्या सात गुणांचे अंतर होते. आघाडीवर असलेल्या हॅमिल्टनला या शर्यतीत पाचवे स्थानही पुरेसे होते, तर मासाला जेतेपदाबरोबर हॅमिल्टन अव्वल पाचांत येणार नाही यासाठी प्रार्थनाही करावी लागणार होती. दोन्ही खेळाडू कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदासाठी आतूर होते. मासाने अनपेक्षितपणे ब्राझीलच्या सर्किटवर अधिराज्य गाजवताना विजय मिळवला आणि आपले विश्वविजेतेपद निश्चित अशा आविर्भावातच तो गाडीतून बाहेर आला. मात्र, चिवट खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हॅमिल्टनने अखेरच्या टप्प्यात टिमो ग्लोक याला पिछाडीवर टाकताना पाचवे स्थान निश्चित केले आणि मासाचा आनंद क्षणभंगुर झाला. अवघ्या एका गुणाच्या फरकाने हॅमिल्टनने पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदावर नाव कोरले..

आठ मोसमांनंतर परिस्थिती पूर्णत: हॅमिल्टनविरोधी होती आणि या वेळी त्याच्यासमोर मर्सिडीज संघाचा त्याचाच सहकारी निको रोसबर्ग उभा होता. १२ गुणांनी आघाडीवर असलेल्या रोसबर्गला अबुधाबी येथील शर्यतीत अव्वल तिघांमध्ये स्थान पटकावणे पुरेसे होते. पण, हॅमिल्टनसाठी सलग तिसरे आणि कारकीर्दीतले चौथे विश्वविजेतेपद पटकावण्याची ही सुवर्णसंधी होती. फक्त रोसबर्गने तिसऱ्या स्थानाबाहेर शर्यत पूर्ण करावी, हीच प्रार्थना त्याला करावी लागली. शर्यतीत अग्रस्थानावरून सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने येथे विजय मिळवण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासून वाऱ्याच्या वेगाप्रमाणे गाडी चालवली, तर दुसरीकडे रोसबर्गने कोणताही धोका न पत्करता अगदी संयमाने सेबॅस्टियन वेटल आणि मॅक्स वेस्र्टापेन यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानावर शर्यत पूर्ण केली.  या कामगिरीने हॅमिल्टनचे विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचे स्वप्न भंगले, परंतु रोसबर्गने पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा चषक उंचावला.

जर्मनीचा हा शर्यतपटू तसा फारसा बोलका नाही. बाजूच्याला ऐकायला येईल इतक्या सौम्य आवाजात त्याचे बोलणे असते. आक्रस्ताळेपणा नाही किंवा अहंभाव नाही. फॉम्र्युला-वन शर्यतीचे बाळकडू घरातूनच मिळालेल्या रोसबर्गला उगाचच धोका पत्करणे कधीच पसंत नव्हते. एखाद्या संधीची प्रतीक्षा करणे किंवा ती निर्माण करणे हेच त्याचे ध्येय आणि त्या दृष्टीनेच सतत विचार करून तो काम करतो. शर्यत जिंकण्यासाठी किंवा आवडते स्थान पटकावण्यासाठी नक्की काय करावे याचा घोटीव अभ्यास निकोने केलेला असतो. गाडीच्या इंजिनावर किंवा चाकांवर पराभवाचे खापर फोडून पळवाट त्याने कधीच काढली नाही. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीचा अनेकांना हेवा वाटायचा. त्याची तुलना सात वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या मायकल शुमाकरशीही केली जाते. शर्यतीदरम्यान रोसबर्ग बराच काळ गॅरेजमध्ये वेळ घालवणे पसंत करतो. २०१४ व २०१५च्या मोसमात रोसबर्गला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दोन मोसमांत विश्वविजेतेपदाने दिलेल्या हुलकावणीने खचून न जाता त्याने २०१६च्या हंगामात नव्या जोमाने खेळ केला. जर्मनीचे खेळाडू पराभवानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी ओळखले जातात आणि ते व्यावसायिक असतात. रोसबर्गमध्येही हा घोटीवपणा दिसला. मुख्य शर्यतीत श्वासावरील नियंत्रणावर त्याने विशेष लक्ष दिले. तीन किलो वजनही कमी केले. दररोज तीन-तीन तास त्याचा व्यायाम सुरू असायचा.

गेली दोन वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजवताना हॅमिल्टनने फॉम्र्युला-वन शर्यतीत दबदबा निर्माण केला होता. २०१४ आणि २०१५ या मोसमात हॅमिल्टनने एकहाती विश्वविजेतेपद पटकावले. पण, या दोन्ही मोसमांत त्याला रोसबर्गने कडवी टक्कर दिली. या वेळी रोसबर्गने सुरुवातीच्या चारही शर्यती जिंकून जेतेपदावर दावेदारी सांगितली होती. मात्र, त्यानंतर सलग आठ शर्यतींमध्ये त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्याच्या या चढ-उतारांच्या प्रवासात हॅमिल्टनने संधी साधली. त्यामुळेच अधुधाबी येथील शर्यतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

निकोचे वडील केके रोसबर्ग हे माजी विश्वविजेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत निकोने शर्यतपटू होण्याचा निर्धार केला. जर्मनीच्या ध्वजाखाली निको शर्यतीत सहभागी होत असला तरी कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याने फिनलँडचे प्रतिनिधित्व केले. निकोकडे या दोन्ही देशांचे नागरिकत्व असून त्याचे फ्रेंच, इटालियन, जर्मन, इंग्लिश आणि स्पॅनिश भाषांवर प्रभुत्व आहे. २००५साली एआरटी संघाकडून खेळताना निकोने जीपी टू सिरीजचे जेतेपद पटकावले. त्यानंतर फॉम्र्युला-थ्री युरो सिरीजमध्ये वडिलांच्याच ‘रोसबर्ग’ संघातून पदार्पण केले. एका वर्षांतच त्याने फॉम्र्युला-वनमध्ये विलियम्स संघाकडून सहभाग घेतला. विशेष म्हणजे १९८२ साली केके रोसबर्ग यांनी विलियम्स संघातून खेळताना विश्वविजेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर त्यांनी शर्यतींपासून स्वत:ला लांबच ठेवले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना निकोनेही विश्वविजेतेपदाचा मान पटकावल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत निवृत्तीचा अचानक निर्णय जाहीर केला.

केके यांनी सहा वर्षांच्या निकोला पहिल्यांदा गो-कार्टमध्ये सहभाग घ्यायला लावला. वडील आणि मुलगा या नात्यांपलीकडे केके व निको यांच्यात एक गुरू-शिष्याचेही नाते निर्माण झाले. १५०० हॉर्सपॉवरच्या बलाढय़ मॉस्टरला (त्याची गाडी) चपळतेने हाताळणाऱ्या निकोला पाहून केके आणि त्यांची पत्नी सिना यांना अभिमान वाटायचा. पण, कुठेतरी त्यांच्या मनाला हुरहुर नक्की लागलेली असायची. तरीही त्यांनी निकोला त्यांच्या आवडीच्या खेळापासून कधी दूर केले नाही. म्हणूनच विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर निकोने आई-वडिलांचे आभार मानले.

निको रोसबर्गने निवृत्ती जाहीर केली आणि अमेरिकेतील लेखक व ज्येष्ठ पत्रकार टॉम वुल्फ यांचे एक वाक्य सहजच डोक्यात घोंगावू लागले. वुल्फ नेहमी म्हणायचे, ‘सत्य मान्य करायचे आणि चुकीचे नाकारायचे, हे मानवाला दिलेले असे स्वातंत्र्य आहे की जे त्याच्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही.’  रोसबर्गने वुल्फ यांची कादंबरी वाचली की नाही याबाबत सांगणे कठीण असले तरी त्याने हे विधान प्रत्यक्षात जिवंत केले. पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदाला एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोच रोसबर्गने फॉम्र्युला-वनच्या कारकीर्दीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. ऑटो रेसिंग हा असा खेळ आहे जो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापत असतो. मग तो क्षण शर्यतपटूचा असो, संघ मालकाचा असो किंवा संघ सदस्यांचा असो. हा खेळ सहज आणि चटकन आपल्या आयुष्याचा नाश करतो. जितक्या उंचीवर तुम्ही राहता तितक्या जलद गतीने हे घडत असते. रोसबर्ग गेली २५ वष्रे या खेळाचा एक भाग आहे. विश्वविजेतेपदानंतर समाजमाध्यमांवर त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो म्हणतो, ‘हे वर्ष अत्यंत आव्हानात्मक होते आणि पुन्हा हा अनुभव घेण्याची माझी इच्छा नाही.’

काही वर्षांपूर्वी रोसबर्गने आपल्या हेल्मेटच्या डिझाइनमध्ये बदल केला आणि त्यावर ‘न संपणाऱ्या गाठींच्या’  ग्राफिकचा समावेश होता. हे चिन्ह नॉर्डिक देशांसह असंख्य संस्कृतींमध्ये आढळून येते.  त्याचा अर्थ असा की, ‘आपले अस्तित्व वेळ आणि बदलांशी बांधलेले असते, परंतु ते दैवी आणि अनंताकडे सोपविलेले असते.’ त्यामुळेच या कारकिर्दीतून निवृत्ती घेतल्यानंतर संतुलित जीवनाची सुरुवात होणार असल्याची जाण रोसबर्गला होती आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला. एकीकडे लुइस हॅमिल्टनची मक्तेदारी मोडणारा नवा नायक उदयास आल्याचा आनंद साजरा होत असताना. अपेक्षांचे ओझे घेऊन जगण्यापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेत रोसबर्गने निवृत्तीचा निर्णय घेतला. नव्या नायकाचा सूर्योदय आणि सूर्यास्त इतका झटपट होणे, हे क्रीडाप्रेमींच्या पचनी पडणे कठीण आहे. मात्र, फॉम्र्युला-वन शर्यतीमधील रोसबर्गचा हा सूर्यास्त त्याच्या कौटुंबिक आयुष्यासाठी अविरत राहणारा सूर्योदयच आहे…
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nico rosberg

ताज्या बातम्या