नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरी हजारो साधू, महंत आणि देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नाशिक येथे कुंभमेळ्याचे गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाच्या वतीने ध्वजारोहण १४ जुलै रोजी तर साधुग्राम आखाडा ध्वजारोहण १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २९ ऑगस्ट व १३ सप्टेंबर या दिवशी प्रत्येकी तीन पर्वणींमध्ये शाही स्नान होणार आहे. तिसरी पर्वणी नाशिक येथे १८ सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर २१ व्या शतकातील दुसऱ्या सिंहस्थास सामोरे जात असताना या सर्वाचा वेध घेणे म्हणूनच आवश्यक ठरते.
कुंभमेळ्याचा उगम कसा झाला, हरिव्दार, प्रयाग, उज्जन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चारच ठिकाणी कुंभमेळा का होतो, याविषयी पुराणात संदर्भ आहे. असे मानले जाते की खूप वर्षांपूर्वी देवांनी समुद्र मंथनास सुरुवात केली. देव आणि दानव ही दोन विरुद्ध टोके असली तरी या मंथना वेळी देवांच्या मदतीला दानवही आले. मंथनातून अमृत बाहेर आले. अमृत कोणाला मिळावे, यावरून देव आणि दानव यांच्यात वाद सुरू झाला. संधी साधून इंद्राचा पुत्र जयंत हा अमृतकुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने निघाला. आपणही मंथनासाठी मदत केली असताना अमृतकुंभ आपणास मिळत नसल्याचे पाहून संतप्त झालेले दानव जयंतच्या मागे धावू लागले. अमृतकुंभावरून देव आणि दानव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. युद्ध सुरू असताना कुंभातून चार थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले. ही चार ठिकाणे हरिव्दार, प्रयाग, उज्जन आणि त्र्यंबकेश्वर होय. युद्ध सुरू असताना कुंभास इजा होऊ नये म्हणून सूर्यानेही मदत केली. तर, सूर्यकिरणांच्या तीव्रतेने कुंभाचे नुकसान होऊ नये म्हणून चंद्राने आपले शीतल किरण कुंभावर सोडले. त्याच वेळी दानवांविरुद्धच्या संघर्षांत देवांना गुरूचीही मदत झाली. अखेर या युद्धात बारा वर्षांनंतर देवांचा विजय झाला. कुंभातील अमृताचे थेंब पडलेल्या चार ठिकाणी सम्राट हर्षवर्धनच्या काळात कुंभमेळ्यास सुरुवात झाल्याचे काही जण सांगतात. तर, काहींच्या मते त्यापेक्षा आधीच कुंभमेळ्यास सुरुवात झाली. दुसऱ्या एका कथेनुसार देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू असताना चार ठिकाणी कुंभ ठेवण्यात आला. ती चार ठिकाणे म्हणजेच हरिव्दार, प्रयाग, उज्जन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक होय.
दर बारा वर्षांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यातही कुंभ राशीत गुरू ग्रहाने प्रवेश केला, तेव्हा अमृतकलश हरिव्दार येथे असल्याने तेव्हा हरिव्दारात कुंभमेळ्याचे आयोजन होते. याप्रमाणेच वृषभ राशीत गुरू येतो तेव्हा प्रयाग, सिंह राशीत गुरू, चंद्र येतात तेव्हा त्र्यंबकेश्वर-नाशिक आणि सिंह राशीत गुरू, मेषमध्ये सूर्य व तूळमध्ये चंद्र येतो तेव्हा उज्जन, याप्रमाणे कुंभमेळा भरतो. गुरू प्रत्येक राशीत १२ महिने राहात असल्याने कुंभमेळा १२ ते १३ महिने चारही ठिकाणी असतो.

वाद आणि सिंहस्थ
कुंभमेळ्याचे नेमके ठिकाण नाशिक की त्र्यंबकेश्वर, यावर कित्येक वर्षांपासून सुरू असलेला वाद आजही कायम आहे. आजही काही महंत कुंभमेळ्याचे मुख्य ठिकाण त्र्यंबकेश्वर असल्याचे मानतात. हा वाद १७४६ पासून अधिकच तीव्र होत गेला. नाशिकजवळील कश्यपी संगमावर १७४६ पर्यंत कुंभमेळा भरत असे. (काही संदर्भानुसार ठिकाण रामकुंडच) परंतु, त्या वर्षी सर्वप्रथम शाही मिरवणूक आणि स्नानावरून शैव आणि वैष्णव साधूंमध्ये वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की, त्यांच्यात युद्ध झाले. या युद्धात दोन्ही बाजूचे मिळून सुमारे १२ हजार साधू मारले गेले. तरीही कोणताही निर्णय होत नसल्याने शैव आणि वैष्णव पेशव्यांकडे गेले. पेशव्यांनी १७६० मध्ये वैष्णव हे नाशिक येथे रामकुंडावर तर, शैव साधू त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर स्नान करतील, असा निवाडा दिल्याची माहिती श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाचे विद्यमान अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. तेव्हापासूनचा नियम आजही पाळला जात आहे. तेव्हापासून शैव हे रामकुंडावर तर, वैष्णव कुशावर्तावर स्नानासाठी जात नाहीत. असे असले तरी आजही शाही स्नानावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये शैव साधूंच्या स्नानानंतर वैष्णवांच्या स्नानासाठी काही वेळ राखीव ठेवली जाते.
असे हे वाद आणि सिंहस्थ यांचे पूर्वापार चालत आलेले नाते आहे. १८६१ मध्ये सिंहस्थात सार्वजनिक सभ्यतेच्या मुद्दय़ावरून त्र्यंबकेश्वर येथे दिगंबर (नग्न) अवस्थेत साधूंना मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली होती. नंतर कालांतराने ती मागे घेण्यात आली.
१९५५-५६ च्या कुंभमेळ्याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे सिंग नामक तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुखांनी आखाडय़ांमधील वाद लक्षात घेत शिस्तीसाठी एक जाहीरनामाच काढला होता. त्र्यंबकेश्वर महाराजांची पालखी दर सोमवारी निघत असल्याने पालखी देवळातून कुश पर्वतावर जाताना व येतानाचे आखाडय़ांचे क्रम ठरवून दिले होते.
८ सप्टेंबर १९९१ रोजी महापर्वणीनिमित्त स्नान करण्यासाठी रामानंद संप्रदायाचे रामनरेशाचार्य यांना प्रतिबंध करावा, त्यांना साधुग्राममध्ये प्रवेश करू देऊ नये, असा इशारा बारा महंतांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना दिला होता. परंतु, त्यानंतर काही अटींवर समझोता झाला. याच कुंभमेळ्यात २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे तिसरी पर्वणी होती. परंतु, ही पर्वणी होण्याआधीच २३ सप्टेंबरला होणाऱ्या चौथ्या पर्वणीतील शाही स्नानावरून मतभेद निर्माण झाल्याने सात आखाडय़ांनी तिसऱ्या पर्वणीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या पर्वणीत शाही स्नान झालेच नाही. या कुंभमेळ्यात त्र्यंबक येथे दोन आणि नाशिक येथे तीन, याप्रमाणे एकूण पाच शाही स्नानात सुमारे ५० हजार साधूंनी सहभाग घेतला. तर, ६० लाखांपेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. या कुंभमेळ्याचे वैशिष्टय़े म्हणजे वारकरी संप्रदायही प्रथमच सहभागी झाला होता. शाही मिरवणुकीप्रसंगी भाविकांकडून साधू, महंतांवर फुले, पुष्पमाला यांचा वर्षांव करण्यात येत होता. तर, महंतांकडून नाणी भाविकांवर उधळण्यात येत होती.
२००३-०४ च्या सिंहस्थात त्र्यंबकेश्वर येथील दुसऱ्या शाही स्नानापर्यंत सर्व शैवपंथीय आखाडय़ांचे नेतृत्व करणाऱ्या स्वामी परमानंद यांच्यावर शेवटच्या तिसऱ्या पर्वणीत नऊ आखाडय़ांनी बहिष्कार टाकला. तर, दुसऱ्या पर्वणीत जुना, आवाहन आणि अग्नी या आखाडय़ांमध्ये वाद झाल्याने त्यांनी परस्परांवर बहिष्कार टाकला होता. ३० जुलै रोजी त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणास उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना केंद्र सरकारच्या एका धार्मिक विषयावरील निर्णयावरून साधूंच्या संतापास सामोरे जावे लागले. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनाही त्यास तोंड द्यावे लागले. भुजबळ यांची गाडी अडविण्यात आली. तरीही भुजबळ विरोध डावलून ध्वजारोहणास उपस्थित राहिलेच.
साधू, महंत हे कोणत्या कारणाने नाराज होतील, हे सांगता येणे अवघड. त्यासंदर्भात मागील सिंहस्थात तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्याबाबतीत घडलेला किस्सा सर्वश्रुत आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साधू, महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू होताच थोडय़ा वेळात सर्वासाठी चहा आला. झगडे यांनी सर्वप्रथम कप उचलत चहा पिण्यास सुरुवात केली, आणि उपस्थित साधू, महंत ताडकन उठून चालायला लागले. नेमके काय चुकले, कोणालाच कळेना. नंतर कळले की, आपल्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी चहा घेतल्यामुळे साधू, महंत नाराज झाले होते. अखेर प्रशासनाच्या वतीने त्यांची समजूत घालण्यात आल्यावर बैठक पुन्हा सुरू झाली.

सिंहस्थाची अशीही वैशिष्टय़े
आज जरी रामकुंड परिसराचे बहुतांश कँाक्रिटीकरण करण्यात आलेले असले तरी १९५५ मध्येही तसा प्रस्ताव पुढे आला होता. नाशिकचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. यशवंत शुक्ल यांनी रामकुंड परिसराचे कँाक्रिटीकरण करण्याचे ठरविले होते. परंतु तसे केल्यास नदीपात्रातील खालच्या बाजूने सुरू असलेले पाझर बंद होण्याचा धोका असल्याचे सांगत गंगा-गोदावरी पुरोहित संघाने त्यास विरोध केला होता.
१९९१ च्या आधी कुंभमेळ्या-साठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य करण्यात येत नव्हते. परंतु १९९१ मध्ये प्रथमच शासनाने ३० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सुमारे ५० हेक्टर जागेत ५० हजार साधू राहू शकतील, असे साधुग्राम वसविण्यात आले. त्यासाठी एक कोटीचा खर्च आला. शासकीय दराने साधूंसाठी धान्यासह दूध, तूप, पीठ उपलब्ध करून देण्यात आले. साधुग्राममध्ये पोस्ट कार्यालय, दूरध्वनी, पोलीस चौकी अशी सुविधा देण्यात आली. आरोग्यविषयक सुविधांसाठी ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले. शासनाने कुंभमेळ्यासाठी ३० कोटी दिल्यावरून काहीसा गहजब उडाला होता. या रकमेचा इतर विकास कामांसाठी शासनाला वापर करता येणे शक्य होते, अशीही टीका झाली. परंतु, दुसरी एक बाजू बघता या कुंभमेळ्यातून शासनाला बराच महसूलही प्राप्त झाला. राज्य परिवहन महामंडळ, टपाल विभाग यांना फायदा झाला. जकातीचे उत्पन्नही वाढले. त्यामुळेच ३० कोटींचा व्यवहार फारसा नुकसानकारक ठरला नाही, असेच म्हणावे लागेल. भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी त्यावेळी अत्यंत तोकडे मनुष्यबळ होते. सुमारे दोन हजार पोलीस, एक हजार गृहरक्षक, दीड हजार स्वयंसेवक, अडीचशे जीवरक्षक यांच्यावर सर्व भिस्त होती.
२० व्या शतकात १९०८, १९२०, १९३२, १९४४, १९५६, १९६७, १९७९, १९९१ याप्रमाणे आठ सिंहस्थ कुंभमेळ्यांचे नाशिककरांना साक्षीदार होता आले. १९४८-४९ मधील पर्वणीला अवघे ४०० साधू तर, १३ सप्टेंबर १९७२ रोजी झालेल्या पर्वणीस दोन लाख, ८४ हजार ७६१ भाविक उपस्थित होते. १९७९ मध्ये पहिल्या पर्वणीस ४० हजार साधू आणि सात लाख भाविक उपस्थित होते.
१९९१ च्या सिंहस्थात त्र्यंबकेश्वरला एका धनाढय़ाने रोज दहा हजार जणांना अन्नदान केले होते. तसेच प्रत्येक आखाडय़ाला शाही स्नानाच्या दिवशी एक टँकर दूध देण्याची व्यवस्था केली होती. १८ ऑगस्ट १९९१ या एकाच दिवशी साधुग्रामात पाच क्विंटल तुपाची विक्री झाली होती. शाही मिरवणूक हा एक वेगळाच थाट असतो. साधू, महंत जणू काही आपले ऐश्वर्य या मिरवणुकीव्दारे प्रकट करत असतात. साधूंचे मर्दानी खेळ, साजशृंगार, प्रत्येक आखाडय़ाच्या वेगवेगळ्या घोषणा या मिरवणुकीत पाहावयात मिळतात. ९१ च्या शाही मिरवणुकींपासून आधुनिकतेचा स्पर्श होण्यास सुरुवात झाली. त्या मिरवणुकीत सामील होणाऱ्या महंतांची वाहने ऐतिहासिकतेपासून आधुनिकतेपर्यंतचे अंतर क्षणात मिटविणारी ठरली. २१ ऑगस्ट १९९१ च्या शाही मिरवणुकीत महंतांनी हत्तीसह कॉन्टेसा, अ‍ॅम्बेसेडर, जीप, मॅटेडोर या वाहनांचा उपयोग केला होता. ही श्रीमंती केवळ जमिनीपुरती मर्यादित राहिली नाही. तर, २१ ऑगस्ट १९९१ रोजी गगनगिरी महाराजांनी शाहीस्नानाच्या वेळी हेलिकॉप्टरमधून रामकुंडावर पुष्पवृष्टी केली होती.
२१ व्या शतकातील पहिला कुंभमेळा २००३ मध्ये झाला. ३० जुलै २००३ ते २७ ऑगस्ट २००४ या कालावधीत या कुंभमेळ्यातील पर्वणी झाल्या. त्यावेळी नाशिककरांना प्रतिदिन २२० दशलक्ष लिटर पाणी लागत होते. तर, कुंभमेळ्यासाठी ३५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली. साधुग्रामजवळ २२.३५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला. सिंहस्थाच्या कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ३४ कोटी, ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. या कुंभमेळ्यासाठी ४५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात २१ विविध विभागांचा समावेश होता.

lp17अजूनही त्या घटनेची अनामिक भीती
यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरुवातीपासूनच सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे ते भाविकांच्या सुरक्षेवर. अगदी शाही मिरवणुकीच्या मार्गावरील एकेक मीटरवरील बारीकसारीक धोके दूर करण्यापासून तर भाविकांच्या परतीच्या वाटा सुरक्षित करण्यापर्यंत, सर्व काही वारंवार सुरक्षा यंत्रणा आपल्या नजरेखालून घालत आहे. कित्येक लाख भाविक एकाच ठिकाणी जमणार असतील, तर अशी खबरदारी कुठेही घेतली जाणे साहजिकच आहे. परंतु नाशिकमध्ये त्यास अनामिक भीतीची वेगळी किनार आहे. मागील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची काळीकुट्ट किनार आजही अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकविल्याशिवाय राहात नाही.
बुधवार. २७ ऑगस्ट २००३. नाशिक येथील दुसरी पर्वणी.
सकाळी ११ पर्यंत साधूंचे स्नान झाले होते. सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण होते. कित्येक तासांपासून सुरक्षेची पताका खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. अजून एक पर्वणी पार पडली, असेच त्यांच्या चेहऱ्यावर भाव होते. सकाळपासून अर्धपोटी असणारे अनेक पोलीस कुठे काही खाण्यासाठी मिळते का, त्याचा शोध घेत होते. वातावरणात काहीसा निवांतपणा आला होता.
दुपारी एक वाजेच्या सुमारास काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजा बाजूने रामकुंडात स्नान करण्यासाठी तपोवनासह इतरत्र थांबलेली गर्दी येऊ लागली. या गर्दीला थोपविण्यासाठी बोटावर मोजण्याइतपतच पोलीस होते. तर, काही जणांच्या म्हणण्यानुसार तेथे पोलीसच नव्हते. दुसरीकडे, रामकुंडात स्नान करून देवदर्शन करण्याची प्रथा असल्याने स्नान केल्यानंतर भाविक काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवनात दर्शनासाठी सरदार चौकातून पुढे जाऊ लागले. काळाराम मंदिराचा दक्षिण दरवाजा ते सरदार चौक या अवघ्या ३०० मीटर अंतराच्या चिंचोळ्या रस्त्यात दोन्ही बाजूने २५ ते ३० हजारांची गर्दी एकमेकांना रेटा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली.
अचानक काय होतंय हे कळण्याच्या आत एकावर एक जण कोसळण्यास सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटात रस्त्यावर भाविकांचा जणू काही ढीग साचला. एकच आरडाओरड, आक्रोश सुरू झाला. खाली पडलेले उठण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु कोणाचा हात, कोणाचा पाय, कोणाचे तोंड दाबले गेल्याने प्रयत्न निष्प्रभ ठरत होते. अशा स्थितीत परिसरातील रहिवाशांनी लहान मुलांना तसेच काही महिलांना बाहेर काढण्यात यश मिळविले. पोलिसांकडून मदत सुरू होईपर्यंत श्वास गुदमरून १० ते १२ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. रुग्णवाहिकांमध्ये अत्यवस्थ भाविकांना अधिक संख्येने ठेवण्यात आल्यावर गर्दीमुळे जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यास रुग्णवाहिकांना काहीसा उशीर होत गेला. रुग्णालयात उपचार सुरू होईपर्यंत आणखी काही जणांनी प्राण सोडले. बघता बघता, मृतांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली. त्यात २९ महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण उत्तर भारतातील होते.
ही घटना घडली त्यावेळी दशरथ पाटील हे नाशिकचे महापौर होते. आजही त्यांना ती घटना आठवल्यावर एका सुंदर महोत्सवास गालबोट लागल्याचे दु:ख होते. चेंगराचेंगरीच्या ठिकाणापासून ते केवळ २०० फुटांच्या अंतरावर असलेल्या गोदावरी मंदिराजवळ ते होते. चेंगराचेंगरी झाल्याचे कळताच आपण त्वरित घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्यास सुरुवात केली, असे ते म्हणतात. अनेक भाविकांचे नातेवाईक सहा ते आठ दिवसांनी मृतदेह घेण्यासाठी आले होते. बहुतेकांकडे पैसेही नव्हते. अशा वेळी पाटील यांनी स्वखर्चाने मृतदेह त्यांच्या गावापर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली होती. या घटनेसाठी ते काही अंशी सुरक्षा यंत्रणेलाही जबाबदार धरतात. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांची सिंहस्थात कोणतीही भूमिका दिसली नाही, असा आरोपही ते करतात. पोलिसांजवळ सुरक्षेसाठी पुरेशी साधन सामग्री नव्हती. यावेळी सिंहस्थासाठी रामकुंडासह शहरात भाविकांना सूचना देण्यासाठी सर्वत्र ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत. परंतु, त्यावेळी अवघे दोन ध्वनिवर्धक, तेही रामकुंडाजवळ लावण्यात आले होते, असा गलथानपणाही पाटील यांनी नजरेस आणून दिला.
चेंगराचेंगरीस नेमकी कोणती घटना कारणीभूत झाली, याविषयी आजही निश्चित असे कारण शासकीय यंत्रणेलाही देता आलेले नाही. एका कारणानुसार शाही स्नान करून परत जाणाऱ्या काही महंतांनी भाविकांवर नाणी उधळली. (दशरथ पाटील यांच्या म्हणण्यानुसार ही नाणी महंतांनी नव्हे, तर कुणा राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तीने फेकली होती) ही नाणी घेण्यासाठी भाविकांनी धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली. दुसऱ्या एका कारणानुसार काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळून येणाऱ्या मार्गावर स्थानिक नव्हे, तर बाहेरील सुरक्षारक्षक होते. भाविकांनी त्यांना या रस्त्याने नदीकडे जाऊ शकतो काय, असे विचारले तेव्हा त्या भागात फारशी गर्दी दिसत नसल्याने त्यांनी जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे हा अनर्थ घडला. आणकी एक कारण यासाठी सांगितले जाते जे अधिक विश्वसनीय वाटते, काळाराम मंदिराकडून उतारामुळे भाविकांचा लोंढा जोरात सरदार चौकाकडे येत असताना कोणातरी महिलेचा पाय साडीत अडकला किंवा चप्पल तुटल्यामुळे ती खाली वाकली असता मागून येणाऱ्या गर्दीचा धक्का लागून ती खाली पडली. आणि तिच्यावर एका पाठोपाठ एक असे भाविक पडत गेले. त्यातही वयोवृद्धांचा अधिक समावेश असल्याने त्यांना स्वत:ला सावरणे जमले नाही, आणि नको ते घडले. आनंदाचे रूपांतर क्षणात दु:खात झाले.
या घटनेपासून बोध घेत यावेळी शाही मिरवणुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्यात आला असून भाविकांना रामकुंडावर येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
अविनाश पाटील response.lokprabha@expressindia.com