लाओससारखा चिमुकला पण सुंदर देश पहायचा तर दहा-बारा दिवस तरी हाताशी हवेतच. तरच तिथे गेल्याचा आणि काहीतरी पाहिल्याचा खराखुरा आनंद मिळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिणपूर्व आशियामधील एक चिमुकला देश ‘द लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक’ म्हणजेच लाओस हा इंडोचायनीज खंडाच्या दक्षिण टोकाच्या साधारण मध्यावर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत. लाओस देशाची पूर्व सीमा व्हिएतनामबरोबर आहे, तर उत्तरेस म्यानमार आणि चीन हे देश आहेत. पश्चिमेस थायलंड तर दक्षिण दिशेस कम्बोडिया आहे..
चुनखडीने तयार झालेले लहानखुरे डोंगर, लहानमोठी पठारे आणि मेकाँग नदीच्या गाळाने तयार झालेली सुपीक जमीन हे लाओसचे भौगोलिक स्वरूप आहे. उत्तरेला चीन आणि म्यानमार देशाला लागून असणाऱ्या लुआंग प्रबांग आणि लुआंग नामता या प्रदेशात घनदाट जंगल, डोंगररांगा आणि मेकाँग नदीचे हिरवेगार खोरे आहे. लाओसच्या या घनदाट जंगलामध्ये वाघ, बिबटे आणि जंगली हत्ती आहेत. सगळा लाओस मेकाँग या दक्षिणपूर्व आशियामधील प्रसिद्ध नदीच्या खोऱ्यातच वसलेला आहे.. साहजिकच लाओसचे अर्थकारण, संस्कृती आणि परंपरा तसेच लोकजीवन मेकाँग नदीवर अवलंबून आहे.. अनेकविध टोळ्या आणि जातीजमातीचे लोक या देशात राहतात. त्यामुळेच लाओसची संस्कृतीसुद्धा वैविध्याने नटलेली आहे.
कम्बोडिया पाहून झाल्यावर आम्ही पाकसे या ठिकाणी जाण्यासाठी विमान घेतले.. खरं तर कंबाडियाहून लाओसला बसनेही जाता येते. दक्षिण लाओसमधील चंपासाक या विभागाची पाकसे ही राजधानी. मेकाँग आणि सेडॉन या नद्यांच्या संगमावर वसलेल्या पाकसेमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु लाओसमधील प्रसिद्ध ‘वॅट फाऊ चंपासाक’ हे मंदिर पाकसेपासून तीस कि.मी. अंतरावर आहे आणि हे मंदिर तसेच मेकाँग नदीच्या प्रवाहात असलेली चार हजार बेटं पाहण्यासाठी पाकसेला जावे लागते.
मेकाँग नदीचा तिबेटमध्ये उगम होतो. अख्ख्या तिबेटच्या पठारावर प्रवास करून ही नदी चीनच्या युनान प्रांतातून लाओसमध्ये प्रवेश करते. तद्नंतर काही अंतरासाठी ही नदी चीन आणि लाओस या उभय देशांमधून सीमारेषा बनून वाहाते. पुढच्या प्रवासात मेकाँग ही म्यानमार आणि लाओस या दोन्ही देशांमधून सीमा बनून वाहाते. तद्नंतर थायलंड आणि लाओसची सीमा म्हणून वाहणारी मेकाँग काही काळासाठी लाओसच्या मध्यातून संथपणे वाहते. पुढे ती लाओसच्या दक्षिण टोकाकडून कम्बोडियामध्ये प्रवेश करते. कम्बोडियातला आपला प्रवास आटोपल्यानंतर ती राजधानी हो चि मिन्हजवळ व्हिएतनाममध्ये प्रवेश करते आणि तेथेच समुद्राला मिळते. मेकाँग नदीचे मुख ‘मेकाँग डेल्टा’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. ते पाहणे हा एक आगळावेगळा अनुभवच असतो.
पाकसेनंतर अत्यंत विस्तीर्ण पात्रामधून वाहणाऱ्या मेकाँगचा प्रवाह सपाट भूप्रदेशातून वाहताना इतका विस्तीर्ण होतो की या भागात लहानमोठय़ा आकारातील चार हजार बेटांचा समूह तयार झालेला आहे. ही बेटं आणि या बेटांवर राहणाऱ्या लाओ लोकांची जीवनशैली पाहणं हा खरोखरच अत्यंत रोमांचकारी अनुभव होता. आम्ही पाकसेहून बसने नाकासँगपर्यंत पोहोचलो. तेथून छोय्या बोटीने आम्हाला डॉन डेट या बेटावर उतरविण्यात आले. तिथे एक दिवस राहूनच आम्हाला आजूबाजूचा परिसर पाहता येणार होता. त्या छोटय़ा बेटावर अनेक छोटी छोटी हॉटेल्स होती. जेटीपासून जवळच असलेल्या एका सुरेख हॉटेलमध्ये आम्ही खोली घेतली. डॉनडेट या बेटावर पाश्चात्त्य तरुण मंडळी अक्षरश: झुंडीने राहात होती. लाओ लोकांच्या मोकळ्याढाकळ्या जीवनशैलीमुळे या लोकांनाही हवं तसं वागण्याची मुभा मिळत होती..
आम्ही लाओसमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासूनच लाओवासीयांचे नववर्ष सुरू झालेले होते.. त्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण असल्यामुळे चार-पाच दिवसांची राष्ट्रीय सुट्टी सुरू होती. सर्व कार्यालये, सरकारी कचेऱ्या, महत्त्वाची पर्यटनस्थळे या काळात बंद असतात. लाओसमध्येही आपल्याप्रमाणेच चांद्रवर्षांनुसारच सण साजरे केले जातात. तेथील नववर्षसुद्धा चत्रपालवीने आणि फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीने नटलेल्या वसंत ऋतुच्या आगमनानंतरच साजरे केले जाते. अगदी आपल्या गुढीपाडव्याप्रमाणेच..! आपल्याकडील होळीप्रमाणेच वातावरण होते. एकतर संपूर्ण लाओस बहाव्याच्या पिवळ्याधमक फुलांनी नटलेला होता. वसंत ऋतुचे स्वागत म्हणजेच नववर्षांचे स्वागत असे समीकरण होते. एकमेकांच्या अंगावर पाणी टाकून, एकमेकांना भिजवण्याचा खेळ संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होत होता. त्यासाठी लहानांकडे पिचकाऱ्या होत्याच. पण मोठे लोकही मोठमोठय़ा पिचकाऱ्या घेऊन सर्वाच्या अंगावर पाणी मारताना दिसत होते. गाडय़ांमधून, जीपमधून पाण्याचे ड्रम घेऊन तरुण मंडळी एकमेकांना भिजविण्यासाठी शहरभर फिरताना दिसत होते. सलग तीन दिवस हे पाणी प्रकरण चालूच होते..
डॉनडेट आणि डॉनखोन ही आकाराने बऱ्यापकी मोठी बेटं एकमेकांना ब्रिजने जोडलेली आहेत.. तरुण पाश्चात्त्यांचे आवडते ठिकाण असल्यामुळे ही मंडळीसुद्धा नववर्षांच्या ओल्या खेळात सामील होताना दिसत होती.. आम्हालाही या खेळात भिजवले जायचे.. पण थोडक्या प्रमाणात..!! आम्ही निवडलेले हॉटेल अगदी नावाप्रमाणेच सुंदर होते.. स्वच्छ, सुंदर आणि हिरव्यागार झाडीत लपलेले.. मेकाँगच्या अगदी काठावरच. खरं तर दोन-चार दिवस तिथेच राहून त्या स्वर्गाचा उपभोग घ्यायला हवा होता. पण वेळेअभावी ते शक्य नव्हते याचीच मला खंत वाटत राहिली. नववर्षांच्या धामधुमीत आम्हाला काहीच पाहायला मिळत नव्हते.. सर्वजण सुट्टी एन्जॉय करत होते. आम्हाला मेकाँग नदीवरचा ‘ली फाय’ धबधबा आणि नदीतील इरावद्दी डॉल्फिन पाहायला जायचे होते.. पण कुणीही यायला तयार नव्हते.. मोटारबाइक भाडय़ाने मिळत होत्या.. तो एकच पर्याय हाताशी होता.. मग घेतली भाडय़ाने.. कच्च्या रस्त्याने बाइकवरून जाताना मनात आले, पडलो आणि हातपाय मोडले तर नसती पंचाईत व्हायची.. पण सुदैवाने तसे काहीच झाले नाही. मेकाँगच्या पलतीरावर कम्बोडिया देश दिसत होता. ली फाय धबधबाही छानच होता.. त्या दिवशी हॉटेलवर परतल्यावर नदीच्या काठावर अगदी निवांतपणे घालवलेली संध्याकाळ खरोखरीच अविस्मरणीय होती.. अगदी नदीच्या काठाशी लाकडी सज्जावर जेवणाची टेबलं लावलेली होती. तिथे बसून कॉफीचे घोट घेता घेता मेकाँग नदीवरील सूर्यास्त पाहून मन आणि डोळे निमाले. सूर्याच्या मावळत्या किरणांमुळे केशरी रंगात रंगलेला मेकाँगचा जलाशय अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला होता.. अथांग.. शांत.. आणि तिच्या पाण्यावर जाता जाता केशराचे घट लवंडून निघालेला दिनकरही आपलासा वाटत होता.. अगदी मर्मबंधात जपून ठेवण्यासारखा अनुभव होता तो..! अवघी संध्याकाळ तिथेच बसून राहिले. संधिप्रकाशात गूढरम्य वाटणाऱ्या मेकाँगच्या प्रवाहाकडे आणि त्यातून सुळ्ळकन इकडून तिकडे जाणाऱ्या स्नेक बोटींकडे पाहात.. मेकाँग नदी लाओसवासीयांच्या जीवनाला वेगळाच अर्थ देते, वेगळे परिमाण देते..!
त्या रात्री कधीतरी धो धो पाऊस कोसळत राहिला.. सकाळी अवघा आसमंत चिंब चिंब होऊन गेला होता.. पावसात धूसर दिसणारं मेकाँगचे पात्र अधिकच गूढरम्य वाटत होते. भिजतच नाकासँगला परतलो. बससाठी अवकाश होता.. तेवढय़ा वेळात टॅक्सी करून मेकाँग नदीवरचा, आशियातील सर्वात मोठा ‘खोण फेफँग’ हा धबधबा पाहून आलो. हा धबधबा पाहून मात्र नजरेचे पारणे फिटले.. उंची फारशी नसली तरी मेकाँगचा प्रचंड जलौघ पांढऱ्याशुभ्र रंगात उफाणत कडय़ाकपारीतून कोसळताना पाहणे रोमांचकारी होते.
बस वेळेवर आली आणि परतीचा प्रवासही वेळेवर सुरू झाला. वॅट फाऊ पाहण्यासाठी चंपासाक येथे उतरलो. फेरी बोटीने मेकाँगच्या पलतीरावर पोहोचलो.. ‘वॅट फाऊ’ म्हणजे कम्बोडियातील ‘अंगकोर वॅट’च्या धर्तीवर खमेर राज्यकर्त्यांनी या भागात सातव्या शतकात बांधलेले पुरातन मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी टुकटुक रिक्षा ठरविली. वॅट म्हणजे मंदिर..! वॅट फाऊ येथे असलेल्या मंदिर समूहाला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेला आहे. साधारणपणे, अंगकोर वॅट पद्धतीचे बांधकाम असलेली इथली मंदिरे आता बऱ्यापकी पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. इ.स. सातव्या शतकात ही मंदिरे खमेर या िहदू राजांनी बांधलेली असल्यामुळे मंदिरांच्या स्थापत्य शैलीवर भारतीय शैलीचा प्रभाव असल्याचे ठळकपणे जाणवत राहते. येथील प्रत्येक मंदिराच्या शिल्पशैलीमध्ये फणाधारी नागशिल्पांचा भरपूर प्रमाणात उपयोग झाल्याचे दिसून येते. बहुतेक ठिकाणी नागमूर्ती, त्याही पाचफणी अथवा सातफणी नागांच्या असतात. या नागमूर्तीचे कोरीव काम अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असते. वॅट फाऊचा परिसर अतिशय रमणीय आहे. एका बाजूने उंच पहाड असून त्या पहाडाच्या कुशीत मुख्य मंदिर बांधण्यात आले होते. िहदू राज्यकर्त्यांनी बांधलेली ही मंदिरे नंतर बुद्धप्रतिमांसाठी वापरण्यात येऊ लागली.. आज लाओसमधील सर्व मंदिरांत बुद्धाची पूजा होते. नववर्षांमुळे अनेकजण पारंपरिक वेषभूषेत बुद्ध दर्शनासाठी येत होते. हातात छोटी बकेट असायची.. त्यात सुगंधी जल, फुलं, पानं असायची.. हे पाणी देवासाठी असायचे. इथे बहावाच्या पिवळ्या फुलांना फार महत्त्व असल्याचे जाणवले. बहावाच्या उलटय़ा फुललेल्या डहाळ्या घरात, दारात, गाडय़ांना, बांधलेल्या सर्वत्र दिसत होत्या.. आपल्याकडे झेंडूच्या फुलांना जसे महत्त्व देतात अगदी तसेच वाटले हे सर्व पाहताना.. पडझड झालेल्या येथील मंदिरांची पुनर्बाधणी करण्याच्या कामात आपल्या आíकयॉलॉजी सव्र्हे ऑफ इंडियाची मदत घेतली जाते.
मंदिर पाहून झाल्यानंतर पाकसेला परतण्यासाठी त्याच रिक्षाने निघालो. पाकसे शहर मेकाँग नदीच्या पलतीरावर असले तरी नदीवर बांधण्यात आलेल्या नव्या पुलामुळे आम्ही अगदी सहज पाकसेमध्ये पोहोचलो. त्याच रात्री आम्ही व्हिएनशीन या लाओसच्या राजधानीकडे बसनेच निघालो. व्हिएनशीनसुद्धा मेकाँग नदीच्या काठावर वसलेलं शहर असून स्वच्छ आणि नीटनेटके आहे. नववर्षांचा उत्साह चौथा दिवस असूनही सर्वत्र ओसंडून वाहताना दिसत होता. एकमेकांना भिजवण्याचा उद्योगही तेवढय़ाच जोमाने चालू होता. मात्र व्हिएनशीनमधील सर्व पर्यटनस्थळं बंद होती. म्युझियम, राजवाडा, थॅट लुआंग हा इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील स्तुपासुद्धा..! त्यामुळे व्हिएनशीनमध्ये वॅट सिसाकेत हे बुद्ध मंदिर, मॉनेस्ट्री आणि हुतात्मा स्मारक या काही जागाच पाहता आल्या. व्हिएनशीन शहराच्या मध्यभागी, लेन झँग एॅव्हेन्यूवर १९६० साली बांधण्यात आलेले हुतात्मा स्मारक आहे. पॅरिसमधील ‘आर्क दी ट्रायंफ’च्या धर्तीवर बांधण्यात आलेले हे स्मारक प्रेक्षणीय आहे. या स्मारकाच्या सभोवती अनेक सुंदर इमारती आहेत ज्या प्रामुख्याने सरकारी कार्यालये आहेत.
खरं तर लाओसच्या उत्तर भागातील लुआंग प्रबांग आणि लुआंग नामता या ठिकाणी गेल्याशिवाय लाओस देशाची ट्रीप पूर्ण होऊ शकत नाही. लाओस देश पूर्णपणे पाहायचा तर हातात बारा-तेरा दिवस तरी हवेतच. कारण चिमुकला असला तरी लाओस खूप सुंदर देश आहे..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laos
First published on: 26-09-2014 at 01:03 IST