scorecardresearch

नाटक : प्रेक्षकांना सजग करणारं नाटक

पस्तीसपेक्षाही जास्त पुरस्कार मिळवणारं ‘लेझीम खेळणारी पोरं’ हे नाटक याच नावाच्या कवितासंग्रहातल्या कवितांचा सुरेख वापर करत उभं राहिलं आहे. म्हणूनच हे नाटक हा एक काव्यात्म आणि विचार करायला लावणारा अनुभव आहे.

पस्तीसपेक्षाही जास्त पुरस्कार मिळवणारं ‘लेझीम खेळणारी पोरं’ हे नाटक याच नावाच्या कवितासंग्रहातल्या कवितांचा सुरेख वापर करत उभं राहिलं आहे. म्हणूनच हे नाटक हा एक काव्यात्म आणि विचार करायला लावणारा अनुभव आहे.

सादर करणारे आणि पाहणारे या दोघांनाही नाटकाच्या त्याच त्याच पद्धतीनं व्यक्त होण्याचा मनस्वी कंटाळा येत असावा, त्यातूनच नवनवे प्रयोग जन्माला येत असावेत. म्हणून सत्यदेव दुबेंनी कुसुमाग्रजांच्या, जयदेव हट्टंगडी आणि प्रदीप राणे यांनी नारायण सरुवेच्या, औरंगाबादच्या मुलांनी ‘गांडू बगीचा’ या नावाने नामदेव ढसाळांच्या कवितांवर असे एक ना अनेक नाटय़प्रयोग केलेत. या मोठय़ा नामावलीत झुंझारराव आणि त्यांची टीम थोडीशी नवीन असूनही वेगळा ठसा उमटवते आहे. संजय पाटील यांच्या वास्तववादी आणि मराठी कवितेचं जागतिक भान अधोरेखित करणाऱ्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ या कवितासंग्रहातील ३८ कवितांचा वापर करून या काव्यात्मक नाटय़प्रयोतून दिग्दर्शक अभिजित झुंझारराव एक निखळ आनंद देणारा, पण विचार करायला लावणारा अनुभव देतात. काव्यात्मक नाटय़प्रकार खरंतर सगळ्यात जुना, पण काळाच्या ओघात अशी नाटकं येणं जवळपास बंदच झालं. ते का, असा प्रश्न काही व्यावसायिक नाटय़कर्मीना विचारला असता मायबाप प्रेक्षकांना अशी नाटकं रुचत नाहीत, अशी गुळगुळीत उत्तरं येतात. अशा कारणांना फाटा देत, प्रस्थापित नाटकांच्या साच्यात न गुंतता, दिग्दर्शक आणि कलाकार आपल्यासाठी संपूर्ण काव्यात्मक असलेलं ‘लेझीम खेळणारी पोरं’ हे नाटक घेऊन येतात.
अभिजित झुंझारराव यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ‘नाटकांमध्ये जो तोचतोपणा आलाय त्यामुळे काहीतरी वेगळं करू या या विचाराने २००७ साली आम्ही काही लोक एकत्र आलो आणि लेझीमवर काम सुरू झालं. तेव्हा सुरवात झाली, खूप मेहनत घेतली, पण काही अडचणींमुळे काम बंद पडलं. २०१३ ला मात्र मी काही मुलांसोबत पुन्हा नाटकबांधणी सुरू केली. टीम जरा नवखी असल्याचा मला फायदाच झाला. आम्ही सुरुवातीला एकत्रित काव्यवाचन केलं, मग चर्चा आणि तालमी झाल्या. हळूहळू ‘लेझीम.’ बाळसं धरू लागलं. कलाकारांना हा फॉर्म पटवून दिल्यावर खरं आव्हान होतं ते म्हणजे निवेदक न वापरता एका कवितेतून दुसऱ्या कवितेत जाताना प्रेक्षकाला सहजता वाटेल एवढा दमदार अभिनय करणं. त्यासाठी एक दुसऱ्याशी जवळीक असलेल्या कवितांचे आम्ही सेट केले. नटांच्या बोलण्यावर, हावभावांवर प्रचंड मेहनत घेतली. सुरुवातीचे दोन-तीन प्रयोग आपण करतोय ते नेमकं कसं केलं पाहिजे आणि ते अजून उत्तमपणे कसं सादर करता येईल हे कळण्यातच गेले. अशी टीकाही झाली की, ही मंडळी काही हा फॉर्म पेलवू शकणार नाहीत; पण नटांना त्यांचा वेळ देणं मला गरजेचं वाटलं. आम्ही स्वपरीक्षण करत पुढे जात राहिलो. सगळ्यांनीच निष्ठेनं काम केलं आणि आज पस्तीसपेक्षाही जास्त पुरस्कार घेऊन पुढे वाटचाल करत आहे’.
हसवून करमणूक करत असताना समाजजीवनातील वास्तव आरशाप्रमाणे समोर मांडून लोकांना स्तब्ध करणं वाटतं तितकं सोप्पं नाही. ‘लेझीम खेळणारी पोरं’ या नाटकात मात्र लेखक- दिग्दर्शक- कलाकार या त्रयीने ते बरोबर जुळवून आणलंय. नव्या शक्यता तपासून पाहत असताना नाटकाचं मूल्य जपणं आलंच. पाश्र्वसंगीत, नेपथ्य आणि प्रकाशयोजना या तांत्रिक बाजूंना या फॉर्ममध्ये खूप महत्त्व आहे आणि ते तंत्रज्ञांनी समर्थपणे पेललं आहे. करमणुकीच्या नावाखाली होणारे कर्णकर्कश आवाज आणि हिडीस नाच ‘स्लो मोशन’मध्ये दाखवताना कलाकार-संगीत-प्रकाशयोजना याचं जे मिश्रण घडतं त्याला प्रेक्षक नकळत दाद देतात. कमीत कमी नेपथ्यरचना ठेवून कविता आणि अभिनय यावर संगीत आणि प्रकाशयोजना यांच्या मदतीने चांगला फोकस ठेवला आहे. रंगमंचावर असलेलं पताका लटकत असलेलं, सुकलेलं झाड (minimalistic design) कुठेतरी आयुष्यातली सुख-दु:खांची टांगलेली लक्तरं दाखवतं आणि दिग्दर्शकाच्या मते तीच दु:खं विसरून आयुष्य सुसह्य़ करण्यासाठी असतो तो लेझीमचा नाद!
‘उड्डाणपुलाच्या टाचेखाली ओढा दबून गेला’ यासारख्या ओळींनी सुरू होणारा खेळ, हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे ही जाणीव करून देतो. ‘माझ्या जगण्याच्या प्रक्रियेचा मूळ अजेंडा काय होता?’ या विचार करायला भाग पाडणाऱ्या आणि पुढे पुढे ‘२४ तासांच्या भारनियमनाने तुमच्या पुढच्या सात पिढय़ांचा धृतराष्ट्र होईल’ अशा जहाल ओळींनी हा नाटय़ाविष्कार अजून उंची गाठत जातो आणि प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. ‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे म्हणतात’ हे पालुपद लावणारा तरुण आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत पाऊस असण्याचे आणि नसण्याचे फायदे उठवणारे घटक पाहताना नाटक आपल्याला मनोरंजनाच्या पलीकडे घेऊन जातं. गांधी ते लादेन, गोध्राकांड ते बलात्कार, आणि अगदी राजीव गांधी ते अलीकडची दाभोलकर-पानसरे हत्या यांसारखे लोकल ते ग्लोबल विषय या नाटकात सहजरीत्या हाताळले आहेत. कधी प्रशासकीय भाषा उपहासात्मकपणे वापरून, तर कधी ‘आवरून धर शोक, कवटीला पाड भोक, अंतराळा एवढे’ अशा ओळींतून मनातला प्रक्षोभ व्यक्त केलाय. त्यामुळे हे नाटक आपल्याला अधिक जवळचं वाटतं. नव्या चिंतेचं निमित्त करून रोज जळणाऱ्या सामान्य माणसाची घुसमट विविध उदाहरणांतून बाहेर येत राहते. इथेच लेखक आणि दिग्दर्शक आपल्याला जिंकून घेतात. तरीही ‘बापू सविनय चळवळ आता करू नका, नाहीतर पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले जाल’ अशा सत्यपरिस्थिती कथनाने किंवा ‘सौर ऊर्जेच्या अतिरिक्त वापराने सूर्य आंधळा होऊ शकतो’ असं गमतीदार, पण राजकीय दुटप्पीपणावर कडक भाष्य केल्याने नाटक कुठेच कंटाळवाणं होत नाही. धर्माधता, सामाजिक उत्सवात भावनेचं झालेलं बाजारीकरण, वर्गकलह आणि प्रशासकीय कोडगेपणा यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. कवितेतील काही शब्द सगळ्यांनाच कळतील असे नाहीत; मात्र त्यावर कलाकाराचं सादरीकरण मात करतं. हसवत आणि विचार करायला लावत नाटक सेक्युलॅरिझमवर येऊन संपतं, प्रेक्षकाचा खरा प्रवास मात्र तिथूनच सुरू होतो!
नाटक नेमकं कसं उभं राहिलं आणि स्टेजमागे नेमकं काय होतं हे लिहिता यावं म्हणून ऑफिसमधलं काम आणि वेळेचं गणित जुळवत चक्क रात्री साडेअकरा- बारा वाजता काही कलाकारांना दबकतच फोन केला, तर तेव्हाही झोपेतून उठून ही मंडळी नाटकाबद्दल उत्साहाने भरभरून बोलली. दुर्गेश म्हणतो, ‘पहिले काही शो आपण काय करतोय हे चाचपडण्यातच गेले. पण हळूहळू कळू लागलं की कविता क्लेशकारक पण झपाटून टाकणाऱ्या आहेत. शो करताना या कविता आम्हाला आजही अस्वस्थ करतात. पण लेझीमने आम्हाला निश्चितच एक दृष्टिकोन आणि जगण्याची दिशा दिली . कवितेत अधिकाधिक शिरताना जणू आम्हीच स्वत:ला गवसत गेलो’. नेहा म्हणते, ‘हा सगळा खूप सुंदर अनुभव होता. लेझीमने मला काही महत्त्वाच्या, पण सहजपणे दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या गोष्टींचा विचार करायला शिकवलं, चांगले मित्र दिले. आमची ऑन-स्टेज केमिस्ट्री आम्हाला ऑफ-स्टेज एक बेस्ट टीम बनवून गेली. काम सांभाळून लेझीम करताना ओढाताण होते, पण ऑफिसचे काही लोक, कुटुंब कायम पाठीशी उभं आहे. आवड असली की सवड काढता येते!’ लेझीममध्ये उत्साहाने काम करणारा राहुल छान ऊर्जा असलेला नट आहे हे नाटक पाहत असताना आपल्या लक्षात येतं; पण हा लेख लिहीत असताना कळलं की राहुलच्या दोन्ही किडन्या फेल आहेत आणि तो जवळपास गोळ्या खाऊनच नाटकाला उभा राहतो! आठवडय़ातून दोन वेळा डायलीसीसवर असणारा आणि कधी कधी आजारपणामुळे झोपून राहावं लागणारा राहुल नाटकात अक्षरश: जीव ओतून काम करतोय हे कळल्यावर मी थक्कच झालो.
नाटकात प्रभावीपणे गांधी साकारणारा रोशन म्हणतो, ‘सुरुवातीला आम्हालाही हे नाटक नेमकं कसं होईल अशी शंका होती, पण मूकाभिनय (MIME) हे माझं शक्तिस्थान आहे हे मला या नाटकामुळेच कळलं. गेयता हरवू द्यायची नाही असं ठरवलं आणि कविता नीट समजून घेत वाचाशुद्धीवर भर दिला, मग सगळं जमत गेलं’. ‘हे नाटक माझ्यासाठी टर्निग पॉइंट ठरलं. नाटकाने मला आत्मविश्वास तर दिलाच, पण एक सामाजिक भान दिलं’. नाटकात रुक्साना साकारलेली आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली सोनाली थोडं भावुक होत पुढे म्हणते, ‘आधी माझे बाबा माझं काम पाहून माझ्याशी चर्चा करायचे, आज अजून काय चांगलं करता आलं असतं ते सांगायचे. मात्र त्यांनी अत्रे रंगमंदिरात माझा लेझीमचा पहिला शो पाहिला, पण ते माझ्याशी काहीच बोलले नाही. नंतर मला आईकडून कळलं की बाबा त्या रात्री घरी येऊन रडले. मग त्यांनी मला नाटकाबद्दल, उशिरा येण्याबद्दल कधीच काही म्हटलं नाही, वर ते उशीर होणार असेल तर घ्यायला येतात. पहिल्या कवितावाचनाच्या वेळी सगळं डोक्यावरून गेलं होतं. तेव्हापासून ते इथपर्यंतचा प्रवास मला खूप काही शिकवून गेला’. ‘लेझीम खेळणारी पोरं’ हा कवितासंग्रह लिहिणाऱ्या संजय पाटलांशी बोलताना जाणवलं की तेसुद्धा आपण लिहिलेल्या कवितांचं असंही सादरीकरण होऊ शकतं हे पाहून थक्क आहेत. नाटकाला मिळणारा प्रतिसाद पाहून आजही प्रेक्षकांची संवेदनशीलता जिवंत आहे हे पाहून त्यांना खूप बरं वाटलं हेही त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलं.
एकंदरीत विविध विषय, कवितेत असलेला आशय नाटकात चितारून तिला बेभान लेझीम खेळायला लावण्याचा दिग्दर्शक आणि कलाकारांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. एकदा आपणही त्यांच्यासोबत जाऊन ताल धरायला काहीच हरकत नाही. व्यावसायिक रंगभूमीवर सुरू असलेलं अर्थकारण पचवत सगळी टीम या नाटकाचे प्रयोग कमी खर्चात, गावागावातही करायला जाते. सरकारने २०१४ साली घेतलेल्या निर्णयानुसार प्रायोगिक नाटकांनादेखील अनुदान देण्याची सोय होती; मात्र सरकार बदललं आणि हा विषय अडगळीत पडला. शासकीय अनुदान मिळेल तेव्हा मिळेल, मात्र अशी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आली तर प्रेक्षकांतही सजगता येईल.
मुकेश भावसार

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-04-2015 at 01:07 IST

संबंधित बातम्या