30 September 2020

News Flash

राजकीय : आत्मपरीक्षण कराल?

गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या, तरुणांना आकर्षून घेणाऱ्या मनसेला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नाही. मनसेच्या अपयशाची चिकित्सा करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना

| May 30, 2014 01:28 am

गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या, तरुणांना आकर्षून घेणाऱ्या मनसेला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नाही. मनसेच्या अपयशाची चिकित्सा करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना खुले पत्र!

मा. राज ठाकरे,
सस्नेह जय महाराष्ट्र!!
नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्यात मोदींच्या नेतृत्वाखालील भा.ज.प.ला जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास दाखवणारा आणि त्याची राष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम जाहीर वाच्यता करणारा कोणता बिगर भा.ज.प. नेता असेल तर तो आपण आहात हे सत्य आहे. नरेंद्र मोदीदेखील हे लक्षात ठेवतील.
या निवडणुकीच्या निकालांचे अर्थ-अन्वयार्थ यथावकाश लावले जातील. प्रत्येक पक्षात चिंतन शिबिराला ऊत येईल आणि प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटू लागेल. आपल्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष तेसुद्धा करेल की नाही याची शंका निर्माण झाली आहे आणि समजा झालेच तर आपले पदाधिकारी ते वस्तुनिष्ठपणे करतील का, हादेखील चिंतनाचा विषय आहे म्हणून हा पत्रप्रपंच. (राजकारणी व्यक्तीच्या आजूबाजूला केवळ स्तुतिपाठक भाट असून चालत नाहीत, तर परखड मतप्रदर्शन करणारे टीकाकारदेखील असावे लागतात आणि आपल्याकडे त्यांची वानवा आहे असे वाटते.)
या निवडणुकीत सर्वच प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली; परंतु त्या वाताहतीमागील कारणांचा विचार करताना म.न.से.चा वेगळा विचार करावा लागेल, कारण इतर प्रादेशिक पक्ष हे मोदींच्या विरोधात उभे ठाकले होते व कोणीही त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन दिलेले नव्हते; परंतु त्यांना समर्थन देऊनदेखील म.न.से.ला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे सर्व उमेदवार केवळ मोदी लाटेमुळे विजयी झाले ही जशी वस्तुस्थिती आहे तसेच आपले उमेदवार केवळ मोदी लाटेमुळे पराभूत झाले नाहीत. त्याला इतर अधिक महत्त्वाची कारणे होती हीदेखील वस्तुस्थिती आहे.
आपल्या सर्व उमेदवारांचे जप्त झालेले डिपॉझिट, एकाही मतदारसंघात न मिळालेली आघाडी आणि मतदानाची एकूणच घटलेली टक्केवारी याचे विश्लेषण करता जनतेने दिलेला कौल आपल्या पक्षाने विश्वासार्हता गमावल्याचे द्योतक आहेच आणि जनता आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही खालचा पसंतिक्रम देते याचे निदर्शक आहे. पक्ष म्हणून ही आपल्यासाठी लाजिरवाणी आणि आणीबाणीची परिस्थिती आहे असे म्हणावे लागेल.
पक्षबांधणीत आलेले अपयश, पदाधिकारी-लोकप्रतिनिधी यामधील सुंदोपसुंदी, गटबाजी, कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली निराशा या सर्व गोष्टींमुळे मनसे ‘पक्ष’ म्हणून निवडणूक लढताना दिसला नाही आणि म्हणूनच तो निष्प्रभ ठरला.
आपल्या वक्तृत्वशैलीवर, करिश्म्यावर मनसे टिकून होती. या वेळी आपली कोणतीही सभा गाजली नाही, कारण आपण कोणतेही मुद्दे मांडले नाहीत. उलट खासदाराची कामे काय असतात हे जनतेला शिकवायचा प्रयत्न केलात. आपण शिवाजी महाराजांच्या घोडय़ाच्या उंचीचा तोच तो मुद्दा मांडत राहिलात. आपल्या पहिल्या सभेचे पूर्ण कव्हरेज मीडियाने दिले. नंतरच्या २-३ सभांचे ‘ब्रेक’ घेऊन कव्हरेज दिले, नंतरच्या सभा फक्त खालच्या ‘स्क्रोल’पुरत्या उरल्या. वर्तमानपत्रेदेखील आपल्या सभांना सातव्या-आठव्या पानावर स्थान देऊ लागली. अशा प्रकारे आपल्यासाठी कोणत्याही गोष्टी अनुकूल राहिल्या नाहीत.
आपण आपल्या भूमिकेवरून घूमजाव तर केलेच, पण पत्रकार परिषदेतून, जाहीर सभांतून अनधिकृत बांधकामांना विरोध करताना, अशा अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना मावळमध्ये पाठिंबा जाहीर केलात. ज्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये साधम्र्य नसते त्याला नियती क्षमा करत नाही, असे जगप्रसिद्ध विधान आहे. येथे जनतेने आपल्याला क्षमा केली नाही. या सर्व गोष्टींमुळे आपण विश्वासार्हता गमावली.
विश्वासार्हता गमावण्यासोबतच आपण वेगवेगळी विधाने करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलात. जनता आपल्याकडे बाळासाहेबांचा वारसा म्हणून बघते, पण आपली या निवडणुकीतील वाटचाल मात्र शरद पवारांसारखी राहिली आणि जनता एकूणच अशा प्रकारच्या ‘पवारीय’ राजकारणाला वैतागलेली आहे.
बाळासाहेबांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला मनसेचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, बाळासाहेबांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी आपण अनुपस्थित राहिलात हे मराठी माणसाला खटकले आणि ‘वडे-चिकन सूप’देखील त्याला फारसे रुचले नाही.
अनेक लोक आपणास सोडून गेले, काही सोडून गेले नाहीत, पण त्यांनी पक्षाच्या कामकाजात भाग घेणे सोडले. पहिल्याच निवडणुकीत भुजबळांसारख्या दिग्गजाला घाम फोडणाऱ्या हेमंत गोडसेंनी वेगवेगळे आरोप करून पक्ष सोडला, मराठवाडय़ाची दारे किलकिली करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी पक्ष सोडला. या दोघांनी उठवलेल्या मुद्दय़ांवर भाष्य करण्याची, जनतेसमोर खुलासा करण्याचीदेखील आपल्याला गरज वाटली नाही.
मागील निवडणुकीवेळी इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, राजकीय विश्लेषक असे कोणीही मनसे हा ‘फॅक्टर’ आहे असे मानत नव्हते, पण जनता तसे मानत होती. या वेळी जनता सोडून सगळे मनसे हा ‘फॅक्टर’ आहे असे मानत होते. मनसे आणि इतर पक्षांच्या पराभवामध्ये फरक असेल तर तो इतकाच आहे की इतर पक्षांचे ‘पानिपत’, पण मनसेची मात्र ‘प्लासीची लढाई’ झाली.
९ मार्च २००६ रोजी आपल्या पक्षाची स्थापना झाल्यापासून आजमितीपर्यंतचा विचार करावयाचा झालाच तर आपली पाटी बहुतांश कोरी आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, कारण आपल्या पक्षाने अजूनपर्यंत कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतलेला नाही आणि आपली सर्व आंदोलनेदेखील अल्पजीवी आणि अल्पसंतुष्ट ठरलेली आहेत.
२००८ साली आपण रेल्वे भरतीतील गरकारभाराविरुद्ध आंदोलन छेडले. आपल्याला आणि आपल्या पक्षाला मिळालेली प्रसिद्धी वगळता त्यातून फारसे काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ‘रेल्वेच्या परीक्षा प्रादेशिक भाषेतदेखील घेण्यात येतील’ असे पत्रक काढले आणि आपण त्यावर समाधान मानले. पण आपले आंदोलन त्यासाठी केलेले नव्हते. आपले आंदोलन नोकर भरतीतील लॉिबग, उत्तर भारतीयांना देण्यात येणारे झुकते माप याविरुद्ध होते. या परिस्थितीत अजूनही बदल झालेला नाही.
मराठी पाटय़ांच्या आंदोलनाबाबतदेखील तेच म्हणता येईल. या आंदोलनाने हवा निर्माण केली. अखेर दुकानदारांनी मराठी पाटय़ा लावल्या, पण त्या उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यात अत्यंत छोटय़ा अक्षरात. आपण त्यावरदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
महाराष्ट्रातील टोलच्या मुद्दय़ाला आणि गरकारभाराला वाचा फोडण्याचे कार्य सर्वप्रथम आपल्या पक्षाने केले यात शंका नाही पण ते आपण तडीस नेले नाही. आपण कायम ६५ टोल नाके बंद झाल्याचे सांगत राहिलात वास्तविक त्यातील बरेचसे टोलनाके केवळ कागदावर बंद झालेले होते. आपल्या कार्यकर्त्यांनी उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता दिवस-रात्र एक करून टोलचे ऑडिट केले. हा प्रयत्न निश्चित स्तुत्य होता पण या ऑडिटमधून समोर आलेले निष्कर्ष जाहीर करण्याची जरुरी आपणास वाटली नाही. तसेच ऑडिटमध्ये सहभागी झालेल्या आपल्या काही कार्यकर्त्यांनी त्याची मागणी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली असता तिलासुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. मुख्यमंत्र्यांना तथाकथित फाईल सादर करून आपण शांत राहिलात.
न्यायालयात याचिका दाखल केल्याचे आपण सांगता पण ही याचिका चालवणारे वकील कोण आहेत, त्याची सुनावणी कधी होते, त्यात काय होते याबाबत खुलासा करण्याची गरज आपणास वाटली नाही. आपल्या जाहीर सभांमधून ‘कोर्टात दामिनी सिनेमा सुरू आहे. तारखेवर तारखा पडतात,’ असे आपण सांगितलेत. पण कोल्हापूरच्या टोलबाबत न्यायालयात नियमित सुनावणी होत असताना आणि ते वर्तमानपत्रातून जाहीर होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्या विधानावर विश्वास ठेवण्यास जनतेस अवघड गेले. कोल्हापूरचे टोल आंदोलन निर्नायकी होते तरी ते निर्णायकी झाले. टोल कायमचा रद्द झाला नसला तरी त्यास स्थगिती मिळाली. या न्यायाने १-२ दिवस टोल नाके फोडणारे आणि कार्यकर्त्यांवर केसेस लादणारे आपले आंदोलन काय साध्य करत होते? नजीकच्या टोल आंदोलनात आपल्याला वाशी टोल नाक्यावर जाताना पोलिसांनी अडवले. आपले आमदार पोलिसांशी हुज्जत घालत असताना आणि आपले कार्यकत्रे उन्हात उभे असताना आपण मात्र ए.सी. गाडीत शांतपणे बसून राहिलात. तेथून पोलीस स्टेशनमध्ये आणि तेथून (मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यामुळे) आपण घरी गेलात. आंदोलने अशी चालतात का?
टोल आंदोलनातील धरसोड वृत्तीमुळे आणि विस्कळीतपणामुळे आपली विश्वासार्हता इतकी लयाला गेली की आपणाला सेटिंगचे आरोप टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चच्रेमध्ये पत्रकारांना सहभागी करून घ्यावे लागले. आपल्या नजीकच्या काळातील आंदोलनानंतर तर टोलची रक्कम सरासरी ३० टक्क्यांनी वाढली. आपल्या निवडणुकीच्या सभांमधून आपण त्याचा साधा उल्लेखदेखील केला नाहीत. ‘जनतेने टोल भरू नये आणि कोणी जबरदस्ती केल्यास त्या कंत्राटदारकडे मनसे धुमशान घालेल,’ असे आपण पत्रकार परिषदेत सांगितलेत खरे, पण त्याची यंत्रणा मात्र विकसित केली नाहीत. आपल्या पक्षाच्या अ‍ॅपवर टोल नाक्याच्या नाव आणि बुथसह वाहन क्रमांक देऊन तक्रार दाखल केली तरी त्याची आजतागायत दखल घेतली गेलेली नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर हे आंदोलन अपयशी ठरले असे म्हणावे लागेल, कारण हे आंदोलन आपण जनतेसाठी करत असूनसुद्धा जनतेला ते आपलेसे वाटत नाही.
आपण केलेल्या निरनिराळ्या आंदोलनांत ज्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या त्यांनासुद्धा पक्षाने वाऱ्यावर सोडले. २००८च्या आंदोलनाबाबत न्यायालयात साक्ष देताना आपण त्याची जबाबदारी घेणेदेखील नाकारले. हा एक प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांचा अनादर होता.
आपल्या जाहीर सभा, त्यांमधून व्यक्त होणारे विकासाचे विचार यावर विश्वास ठेवून जनतेने आपल्याला भरभरून मतदान केले. त्याबदल्यात लोकांना निराशेखेरीज काहीही मिळाले नाही. आपले बहुसंख्य लोकप्रतिनिधी अनुभवी नव्हते त्यामुळे त्यांनी अभ्यास करण्याची, अधिक परिश्रम करण्याची गरज होती पण त्यांनी तसे केले नाही. उलट त्या-त्या भागातील स्वपक्षीय किंवा इतरपक्षीय वजनदार नेत्यांच्या वळचणीला जाऊन आपले हितसंबंध राखण्याचे काम त्यांनी केले. फारफार तर स्वस्त दारात वह्य़ा वाटण्याचे किंवा पेव्हरब्लॉक टाकण्याचे काम त्यांनी केले. पुणे, कल्याण-डोंबिवली येथील कामगिरी निराशाजनक आहे तर नाशिकमध्ये केवळ अनागोंदी जे चालू आहे . या सर्व तक्रारींची आपण त्यांची दखल घेतली नाहीत. वास्तविक आपण तेव्हाच सर्व पदाधिकारी-लोकप्रतिनिधींना तंबी देणे आवश्यक होते पण ‘सत्ता पाच वर्षांसाठी दिली आहे,’ असे सांगून आपण त्यांच्या निष्क्रियतेवर पांघरूण घातलेत आणि जनतेची बोळवण केलीत. जनता सुज्ञ आहे. सत्ता पाच वर्षांसाठी दिली आहे हे जनतेला माहीत आहे. लगेच सर्व कामे पूर्ण करण्याची जनतेची अपेक्षा नव्हती. कामे चालू झाली तर ते दिसते. आपल्या पक्षाने कामे सुरू केल्याचेसुद्धा दिसत नाही. नाशिकच्या जनतेला गोदापार्कपेक्षा आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ असणे, रस्ते चांगले असणे, पाणीपुरवठा नियमित असणे इ. गोष्टी महत्त्वाच्या वाटतात हे आपण लक्षातच घेतले नाहीत. नाशिकची सत्ता ही आपली जनतेने केलेली लिटमस टेस्ट होती.
जनतेने आपल्याला मतदान केले ते आपला पक्ष इतर पक्षांच्या तुलनेत वेगळा वाटला म्हणून. पण आपण मात्र आपला पक्ष इतरांसारखाच आहे हे सिद्ध करण्यात कसूर केली नाहीत.
आपल्या पक्षाला आठ वष्रे पूर्ण झाली पण त्याचा मुंबई-पुणे-नाशिकपुढे विस्तार झाला नाही. कोकण-मराठवाडा येथे नावापुरते अस्तित्व आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे कधीही भाष्य करत नाही, आक्रमक होत नाही. मागील वर्षी दुष्काळ पडला तेव्हा आपण दौरे केलेत, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. आपल्या कार्यकर्त्यांनीही मग दोन-चार विहिरींतला गाळ काढला. पुढे सर्व शांत झाले. आपण गारपीटग्रस्त भागाला भेट दिलीत. तेथे शेतकऱ्यांना ‘धीर सोडू नका. बाकीचं मी बघतो,’ असे म्हणालात. त्याचेदेखील पुढे काहीही झाले नाही.
अस्मितेचा प्रश्न असो, भ्रष्टाचाराचा असो, विकासाचा असो, धोरणांचा असो किंवा पक्षबांधणीचा असो सर्वच पातळ्यांवर आपल्याला अपयश आलेले आहे. ‘पक्ष नवीन आहे’, ‘संपूर्ण सत्ता द्या’, ‘पाच वष्रे थांबा’ अशी कारणे ऐकून घ्यायला जनता दुधखुळी नाही आणि आता तर तिच्यासमोर पर्याय उपलब्ध आहे.
सत्ताधारी पक्षांची मुजोरी, धोरण लकवा आणि दिशाहीन विरोधकांमधील निष्क्रियता या चरकात पिळल्या जाणाऱ्या जनतेला आपला आधार वाटत होता. या जनतेने आपल्याकडून फार अपेक्षा ठेवल्या, विश्वास ठेवला. पण आपण मात्र त्या विश्वासाला तडा दिलात. बाकी कुठलीही गोष्ट लवकर सांधू शकते पण विश्वासाला गेलेला तडा लवकर सांधता येत नाही. आचारसंहिता वगैरे धरून आपल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीआधी फार फार तर दोन महिने मिळतील. इतक्या कमी वेळेत हा तडा सांधला जावा अशी अपेक्षा आपण जनतेकडून ठेवलीत तर ती अवास्तव ठरेल.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपल्यासाठी मात्र (अल्पावधीत मिळालेले) यश ही अपयशाची नांदी ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आगामी काळ आपल्या नेतृत्व गुणांच्या कसोटीचा आणि आपल्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने निर्णायकी ठरणारा काळ आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातील इतर नेत्यांमध्ये नसतील असे गुण आहेत हे कोणीही अमान्य करणार नाही. निवडणूक निकालानंतर आपल्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचा योग आला ‘तुम्हाला आलेल्या निराशेमुळे आणि डावलले गेल्यामुळे पक्ष सोडावा असे वाटत नाही का?’ असे विचारल्यावर ते म्हणाले की, ‘राजसाहेब सगळं समजून घेतील. आम्ही नवखे होतो तेव्हा राज साहेबांमुळेच पद-जबाबदारी आणि काम करण्याची संधी मिळाली. आई-वडील चुकले तर लगेच कोणी घर सोडून जात नाही.’
असे अनेक निष्ठावान, नि:स्पृह कार्यकत्रे आपल्याकडे अजूनही आहेत. त्यांच्यात उत्साह पेरण्याची गरज आहे. तेच आपले बळ आहेत.
सेना-भाजपकडून पराभव झाला म्हणून त्यांना रोखण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीधार्जणिे सूडबुद्धीचे राजकारण आपण आगामी निवडणुकीत करणार नाही, अशी अपेक्षा जनता आपल्याकडून बाळगून आहे.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे कार्य सोपे नाही. त्यासाठी अथक, अविरत, सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध परिश्रमांची गरज आहे. असे परिश्रम आपल्या हातून घडावे ही शुभेच्छा.!! हा जो अभूतपूर्व विजय झाला तो भारतीय जनतेचा.!! आणि पराजय झाला तो कोणाचा एकाचा नाही तर लोकशाहीची थट्टा करणाऱ्या सर्वाचा!! इतके समजण्याइतपत राजकीय परिपक्वता आपणात आहे, याचा विश्वास आहे.
कळावे,
आपला..
ता.क. – पक्ष स्थापनेनंतर काही पूर्वग्रहदूषित आणि संकुचित माध्यमांनी ‘द पार्टी इज ओव्हर’ असा मथळा छापून आपली हेटाळणी केली होती. आपण या पराभवाचे विश्लेषण करून योग्य पावले उचलली नाहीत तर हा मथळा आणि त्याखालची बातमी खरी ठरेल आणि ते मराठी माणसाचेच दुर्दैव ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2014 1:28 am

Web Title: letter to raj thackeray
टॅग Mns,Raj Thackeray
Next Stories
1 नवता : आधुनिक सावित्री
2 प्रतिक्रिया : राम, रामाचं देऊळ आणि गीतरामायण
3 टॅरो : टॅरो आणि फलज्योतिषशास्त्र
Just Now!
X