25 February 2021

News Flash

ललित : टाळेबंदी, ‘चन्द्रिका’ आणि मी

६५ वर्षांपूर्वी आपण ‘चंद्रिका’ नावाचं एक हस्तलिखित वार्षिक काढलं होतं. ते मला आत्ता सापडलं.

आम्हा दोघांना वाचनाची आवड होती. भालोद हे खेडेगाव असलं, तरी हायस्कूलमध्ये समृद्ध ग्रंथालय होतं.

डॉ. श. रा. राणे – response.lokprabha@expressindia.com

टाळेबंदीच्या मानसिक अस्वस्थतेच्या काळात एके दिवशी अचानक माझ्या अगदी जवळच्या मित्राचा, सारंगचा फोन आला. तो म्हणाला, ‘६५ वर्षांपूर्वी आपण ‘चंद्रिका’ नावाचं एक हस्तलिखित वार्षिक काढलं होतं. ते मला आत्ता सापडलं. तेव्हाचे आज आपणच दोघंच हयात आहोत. म्हणून तुला फोन केला.’

ते सगळं ऐकून शरीराने सारंग गुजरातमध्ये आणि मी फैजपुरात असलो तरी मनाने अजूनही चोपडे वाडय़ातील त्या कौलारू छपराखाली बसलो आहोत असंच वाटलं. भालोदसारख्या खेडेगावात आम्ही दोघांनी त्या काळी असं काही तरी करणं ही कल्पनाच आमच्यासाठी नवीन होती.

आम्हा दोघांना वाचनाची आवड होती. भालोद हे खेडेगाव असलं, तरी हायस्कूलमध्ये समृद्ध ग्रंथालय होतं. प्रत्येक विद्यार्थ्यांने वर्षभरात ठरावीक पुस्तकं वाचलीच पाहिजेत असा दंडक होता. पुस्तकांच्या प्रारंभी प्रश्न दिलेले असायचे. पुस्तकं वाचल्यावर त्यांची उत्तरं लिहिण्याचं बंधन होतं. मुख्याध्यापक शंकर सीताराम भिसे यांच्या शिस्तीचा तो परिणाम होता.

‘न्यू इंग्लिश स्कूल, भालोद’मध्ये आम्ही दोघं शिकत होतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडेही तेथे शिकत होते. आम्हा दोघांचा जन्म १९३४चा, तर नेमाडे यांचा  १९३८चा. आम्ही १९५३ साली ‘चंद्रिका’ हस्तलिखित काढले होते. नेमाडेंनी १९५४-५५च्या आसपास हस्तलिखित काढलं होतं. त्यात त्यांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची भलीबुरी शब्दचित्रं रेखाटली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांची बोलणी ऐकावी लागली होती. ‘कोसलाकरांची सतरा वर्षे’ या पुस्तकासाठी मी मुलाखती घेतल्या तेव्हा मला हे कळलं. तत्पूर्वी मात्र नेमाडे आणि आमची भेट होऊ शकली नव्हती.

‘चंद्रिके’च्या संदर्भात सारंगचा फोन आला. ८६व्या वर्षी कान दगा देतात आणि स्मृतिभ्रंशही माझा पाठलाग करतो, तरी ‘चंद्रिके’ला मी विसरलो नव्हतो. चोपडे वाडय़ातील ‘चंद्रिका कार्यालय’, त्या कार्यालयात जमणारे मित्र आठवले. सारंगने स्पीडपोस्टने ‘चंद्रिका’ अंक पाठवून दिला. तो हातात पडल्यावर ६५ वर्षांपूर्वी दृष्टीआड झालेलं मूल दिसल्याचा आनंद मला झाला. फोनवर सारंग म्हणाला, ‘हे सगळं आपण ६५ वर्षांपूर्वी भालोदसारख्या खेडेगावात केलं हे आज खरंच वाटत नाही.’

भालोद येथील चोपडे वाडय़ात सारंगचं एक मजली कौलारू घर होतं. उतरत्या छपराने झाकलेल्या वरच्या मजल्यावर बांबूच्या शिडीनं चढावं लागे. सारंगची ती अभ्यासाची जागा होती. आम्ही ‘चंद्रिका’ कार्यालयासाठी ती जागा निश्चित केली. छापील मासिकांसाठी असतं तसं कार्यालय आमच्या हस्तलिखितासाठी असावं असं आम्हाला वाटत होतं.

‘चंद्रिका’ हस्तलिखित वार्षिकाचा पहिला आणि शेवटचा अंक १९५३ साली निघाला. अंकात नऊ चित्रे, चार व्यंगचित्रे, लघुकथा, रुपककथा, कविता, लघुनिबंध, संवाद, विनोद वगैरे साहित्य होतं. त्याला सुधा आर्ट, पी. डी. पाटील, डी. ओ. चौधरी यांचं  साहाय्य लाभलं होतं. सर्वाच्या टीमवर्कचं ते आनंददायी काम होतं. त्या टीममधील आज कुणीच हयात नाही. केरोनाच्या ढगांनी व्यापलेल्या टाळेबंदीच्या काळात ‘चंद्रिके’च्या चांदण्याचे पुनर्दर्शन सारंगमुळे झालं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 7:11 am

Web Title: lockdown chandrika an myself lalit dd70
Next Stories
1 स्वयंपाकामागचे विज्ञान : आरोग्याचा कल्पवृक्ष
2 राशिभविष्य : २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२१
3 भारतीय जवानांना कडकडीत सॅल्यूट…
Just Now!
X