कव्हर स्टोरी
तुम्ही ट्विटर किंवा फेसबुक वापरत नसाल तर तुम्ही या निवडणुकीतल्या सगळ्यात मोठय़ा फार्सिकल आनंदाला मुकणार आहात. नव्या पिढीतले, ताज्या दमाचे लेखक, विडंबनकार या सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपलं सगळं लिखाणाचं, उत्तम विनोदबुद्धीचं कसब पणाला लावून निवडणुकांवर चुरचुरीत भाष्य करत आहेत. हे सगळं इंग्रजीमधून आहे. पारंपरिक माध्यमं जे करायची इच्छा असूनही जे करू शकत नाहीत, त्या विषयांवर, अतिशय अभिनव पद्धतीनं ही तरुण मुलं भाष्य करताहेत. त्यासाठी इंटरनेटचा अत्यंत चांगला वापर ते करताहेत. 

‘फेकिंग न्यूज’ आणि ‘अनरियल टाइम्स’ ही त्याची ठळक उदाहरणं. गेलं वर्षभर त्यांचं राजकीय विडंबन सुरू आहे. एआयबी (All India Bachod)  ही या खेळाडूंमधली नवी एन्ट्री. त्यांची स्टॅण्डअप कॉमेडी लोकांना आवडते आहे. मुंबईमधून काम करणाऱ्या ‘व्हायरल फिव्हर’ या ग्रुपच्या ‘बॉलीवूड आम आदमी पार्टी’ला लाखो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय पंधरवडय़ातून चालणारा ‘जय हिंद’ हा कार्यक्रम आहेच. या शिवाय ‘न्यूज लॉन्ड्री’मधूनही सध्याच्या राजकीय स्थितीवर मार्मिक भाष्य करून सगळ्यांची ‘धुलाई’ केली जाते आहे.
अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून (आयआयएम) शिक्षण घेतलेल्या, एकेकाळी पत्रकार असलेल्या राहुल रोशन यांनी २००८ मध्ये ‘फेकिंग न्यूज’ सुरू केले. अमेरिकी ‘द ओनियन’ची ही भारतीय आवृत्ती. सुरुवातीला लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल याची भीती त्यांना वाटत होती. पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिल्याने रोशन यांचा उत्साह वाढला. फेकिंग न्यूजमधून सभोतालच्या राजकीय स्थितीवर विडंबनात्मक भाष्य केले जाते. सध्याची आर्थिक मंदी, त्यातून सरकारवर असलेली नाराजी या बाबी अशा लिखाणासाठी संदर्भ म्हणून उपयोगी पडतात, असे रोशन यांचे म्हणणे आहे. आता फेकिंग न्यूज ‘नेटवर्क एटीन’च्या फर्स्ट पोस्टकडे आहे. त्यांचा स्वत:चा चमू आहे. असे लिखाण करणाऱ्या उत्साही लेखकांना ते वाव देतात.

‘अनरियल टाइम्स’ची स्थापना आयआयएमच्या सी. एस. कृष्णा आणि कार्तिक लक्ष्मण यांनी केली. बातम्या, फोटो हे माध्यम वापरून त्यांनी राजकीय परिस्थितीवरचे उत्तम विडंबन केले आहे. ‘अरविंद केजरीवाल डुईंग थिंग्ज’ हा त्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. भाजपचे खासदार यशवंत सिन्हा यांच्यासाठी श्ॉडो बजेट करून देण्याच्या कामात ते दोघंही इतके गुंतले की नंतर त्यातून येणाऱ्या मानसिक थकव्यावर मार्ग म्हणून त्यांनी गंमतजंमत करायचा प्रयत्न केला. दैनंदिन कामातून कंटाळा म्हणून त्यांनी विडंबन सुरू केले. त्यातून २०११मध्ये ‘मनमोहन सिंघम’ ही विडंबनात्मक चित्रफीत आली. नेटिझन्समध्ये ती तुफान गाजली. ‘अनरियल टाइम्स’ला फेसबुकवर सव्वा दोन लाख लाइक्स मिळाले आहेत आणि त्याला छप्पन्न हजार ट्विटर फॉलोअर्स आहेत. तमिळनाडूमध्येही तमीळ भाषेत त्याची एक स्थानिक आवृत्ती निघाली आहे. फक्त तिच्यातील मजकूर स्थानिक राजकारणाचं विडंबन करतो इतकंच. शिवाय पेंग्विनने अनरियल टाइम्सला या सगळ्या विडंबन साहित्याचे पुस्तक करण्यासाठीचीही ऑफर दिली आहे. हे सगळे विडंबनात्मक राजकीय भाष्य करणारे कार्यक्रम कुणी व्यावसायिक पत्रकार नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे तरूण निर्माण करत आहेत. या विडंबन-कार्यक्रम उद्योगातली बहुसंख्य मुलं जेमतेम विशीतली आहेत. रोशन यांच्यासारखे काहीजण तिशीतले आहेत. अधिकाधिक तरुणांनी सभोतालच्या स्थितीचे आकलन करून त्यावर भाष्य केले पाहिजे, असे रोशन यांच्यासारख्यांना वाटते.
हे सगळं घडलं आहे ते अर्थातच इंटरनेटमुळे. इंटरनेट नसतं तर असं काही घडूच शकलं नसतं. इंटरनेटवर उपलब्ध असलेली भरपूर जागा आणि लिखाणाचे स्वातंत्र्य यामुळे काहीतरी चांगले निर्माण होत आहे असे चेन्नईतील क्रिश अशोक यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मी जेव्हा ब्लॉग लिहायचो तेव्हा तेव्हा ते माझे माझ्यापुरते स्वांतसुखाय केलेले चिंतन असायचे. विनोदी लिखाण करताना फोटोशॉप, म्युझिक यांचा वापर करून मी राजकारण्यांची खिल्ली उडवायचा प्रयत्न करायचो. पण आता इतरजण इंटरनेटचा वापर करून ज्या पद्धतीचं विडंबनात्मक निर्मिती करत आहेत, ते बघून मलाही प्रेरणा मिळते आहे, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत निर्मिती करत असलो तरी त्याचा होणारा परिणाम हे सगळ्यांचं मिळून एकत्रित यश आहे, असं ते सांगतात.
जयपूरचा अभियांत्रिकी शिक्षण घेणारा २१ वर्षीय तुषार शर्मा सांगतो, इंटरनेट नसतं तर मीसुद्धा ‘मुलींना कुठे जोक्स कळतात?’ या टाइपचं लिखाण करत बसलो असतो. पण सामाजिक प्रश्नांमुळे अस्वस्थ झालेला तुषार ‘खाप पंचायत’ नावाचं ट्विटर हँडल चालवतो. ते आपल्याला हसवतं आणि हसवता हसवता नकळत चिमटेही काढतं. उदाहरणादाखल त्याचे ‘खाप पंचायत’चे काही ट्विट्स बघा. दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोबद्दल तो लिहितो, ‘ऑटो एक्स्पो फॉर अस इज जस्ट डॉवरी फॅशन वीक’ (गाडय़ांचं प्रदर्शन आणि नंतर या गाडय़ांना लग्नांमध्ये हुंडा म्हणून होत असलेली मागणी), ‘अ व्हिलेज गर्ल स्पोक फॉर विमेन्स राइट्स बाय डिसरप्टिंग खाप मिटींग. मॅन, शी वॉज ऑन फायर. द नेक्स्ट डे’ खाप पंचायतीत बोलण्याचं धाडस करणाऱ्या मुलींचं काय होतं यावरची ही जळजळीत कॉमेंट. किंवा हा ट्विट बघा.. ‘हाऊ मेनी इंटर कास्ट कपल्स डझ इट टेक टू चेंज अ लाईट बल्ब? ट्रीक क्वेश्चन. डेड पीपल कान्ट चेंज लाईट बल्ब्ज’ .. आंतरजातीय लग्न करणाऱ्यांच्या वाटय़ाला काय येतं यावर जळजळीत भाष्य करणारे हे ट्विट.

इंटरनेटवरून अशा कार्यक्रमांमधून केला जाणारा विनोद टीव्हीवर वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून जपून जपून केल्या जाणाऱ्या विनोदांच्या कितीतरी पुढे गेलेला आहे.

विडंबनात्मक लिखाणात काही वेळा अतिशयोक्ती असते. त्या त्या राजकीय नेत्यांची, त्याच्या बोलण्याच्या लकबीची खिल्ली उडवलेली असते. मनीष तिवारींची अतिशयोक्ती करणारी भाषा, केजरीवाल यांचे मी पुराण, राहुल गांधी यांचे अनाकलनीय वागणे, आझम खान यांच्या हरवलेल्या म्हशी, नरेंद्र मोदी यांची गवरेक्ती या गोष्टी या विडंबनकर्त्यांना भरपूर खाद्य पुरवत असतात.
इंटरनेटच्या माध्यमातून या पद्धतीने विडंबन, उपहास, विनोद यांचा आधार घेत सामान्य लोकांना आपले राजकारणी कसे आहेत, त्यांचा चेहरा कोणता आणि मुखवटा कोणता यावर तिरकस भाष्य करायचं यातून नेमकं काय साध्य होतं? या सगळ्याचा लोकांवर काय परिणाम होतो? आपल्याला पडणारा हा प्रश्न अभ्यासकांनाही पडला आणि त्यांनी याच विषयावर एक जनमत चाचणी घेतली. अर्थात हा संदर्भ आपल्याकडचा नाही, तो आहे अमेरिकेतला. पीईडब्ल्यू इंटरनेट आणि अमेरिकन लाइफ प्रोजेक्ट यांनी संयुक्तरीत्या केलेल्या अभ्यासातून आलेला निष्कर्ष असा की, अमेरिकेतील तरुणांना राजकारणाबद्दल जी माहिती हवी होती, ती त्यांनी पारंपरिक वृत्तमाध्यमांमधून मिळवली नाही, तर लेट नाइट कॉमेडी शोजमधून मिळवली. राजकारणाबद्दलची आपली जाणीव विकसित करण्यासाठी विडंबन, उपहास यांच्या माध्यमातून केलेलं भाष्य तरुणांना अधिक आकर्षक वाटतं. त्यांचं त्याच्या माध्यमातून नागरी शिक्षण होतं. आपल्याकडे असलेली राजकीय माहिती इतरांना विडंबन, उपहास यांच्या साहाय्याने कशी सांगायची, तिच्याकडे व्यंगात्मक दृष्टिकोनातून कसं बघायचं याचीही जाणीव होते.

आपल्या देशात विनोद, व्यंग, उपहास यांच्या माध्यमातून राजकीय जाणीव जागृती करण्याच्या पातळीवर आपण अजून विकसित देशांइतका टप्पा गाठला नसला तरी आपल्याकडची परिस्थितीही सुधारते, बदलते आहे. तरीही इंटरनेटवर चाललेले राजकीय विडंबन हा पोरखेळ आहे अशी अजूनही भारतातील प्रमुख माध्यमांची धारणा असल्याचे ‘व्हायरल फिव्हर’चे विश्वपती सरकार यांचे मत आहे. त्यांचा असाच एक विडंबनात्मक कार्यक्रम एकेकाळी एमटीव्हीने नाकारला होता. पण आता त्यांच्या कार्यक्रमाला एमटीव्हीला एकेकाळी होते त्यापेक्षाही जास्त प्रेक्षक आहेत.
‘बॉलीवूड आम आदमी पार्टी’ कार्यक्रमात सरकार यांचा मित्र जितेंद्र कुमार याने अरविंद केजरीवाल यांची हुबेहूब भूमिका साकारली होती. खरगपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या जितेंद्र कुमारच्या वडिलांना सुरुवातीला आपला मुलगा हे काय करतो आहे, असे वाटत होते. मात्र त्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून आता त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे, असं सरकार सांगतात.
इंटरनेटवरून अशा कार्यक्रमांमधून केला जाणारा विनोद टीव्हीवर वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून जपून जपून केल्या जाणाऱ्या विनोदांच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. कारण मुळात इंटरनेटचं हे जगच टीव्हीपेक्षा कितीतरी वेगळं आहे. टीव्ही वाहिन्यांवर खऱ्याखुऱ्या वक्तव्यांचा आधार घेऊन राजकीय विनोदनिर्मिती करता येणार नाही, केली जाणार नाही, हे तर स्पष्टच आहे. एआयबी (All India Bachod) या कार्यक्रमाचं लेखन करतात, तेच सायरस ब्रोचाच्या ‘द वीक दॅट वॉजन्ट’ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमाचंदेखील लेखन करतात. पण ते इथे जे करू शकतात, ते तिथे करू शकत नाहीत. त्या मर्यादा त्यांना सांभाळाव्याच लागतात.
अभिनंदन सेकरी हे जुनेजाणते विडंबनकार म्हणून ओळखले जातात. एनडीटीव्हीच्या ‘द ग्रेट इंडियन तमाशा’ आणि एनडीटीव्ही हिंदीच्या ‘गुस्ताखी माफ’ या विडंबनात्मक कार्यक्रमांचे ते निर्माते आहेत, एवढी त्यांची ओळख सांगितली तरी पुरेशी आहे. आता ते न्यूज लॉन्ड्री ही बेवसाइट चालवतात. ते म्हणतात, आपण आपला हुद्दा, वर्ग, जात, आपली प्रतिमा या सगळ्यामध्ये इतके अडकलेले असतो की आपण त्याच्यावरचं कोणतंही आक्रमण सहनच करू शकत नाही. पण विनोद हे असं माध्यम आहे, जे आपल्याला एका पातळीवर आणून ठेवतं. अन्यथा लहान लहान गोष्टींमुळे मोठे संघर्ष झाले असते.
पण ज्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही, अशा या कार्यक्रमांमधूनही संवेदनशीलतेच्या माध्यमातून असमानतेचंच दर्शन घडत नाही का, त्यात खरोखर सगळ्यांना सामावून घेतलं जातं का, सर्वाना सन्मानाने वागवलं जातं का, शेवटी कितीही विनोद, उपहास, विडंबन म्हटलं तरी विनोदसुद्धा कशाहीइतकेच जातीयवादी, लैंगिक, वर्गवादी असू शकतातच की. सेकरी या मताशी सहमत होत नाहीत. चमार रॅपसारख्या म्युझिक व्हिडीओंकडे ते आपलं लक्ष वेधून घेतात. पंजाबी संगीतावर ज्यांचं वर्चस्व आहे, अशा जाट लोकांची दलित शीख कशी जिरवतात, असं या व्हिडीओजमध्ये दाखवण्यात आलं आहे. असे व्हिडीओज येणं आता शक्य आहे, कारण युटय़ूबवर तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक नियंत्रण ठेवू शकत नाही. पारंपरिक माध्यमांमधून चांभार या शब्दानेच मोठा संघर्ष झाला असता किंवा वृत्तवाहिन्यांवर त्या शब्दाच्या जागी तुम्हाला बीप बीप ऐकू आलं असतं. म्हणूनच ते म्हणतात, की आपण अधिक खिलाडूवृत्तीने वागायला पाहिजे. एखाद्या विनोदाला विनोदानेच उत्तर देता आले पाहीजे.
अभिनंदन झा हे आपल्या देशातल्या इंटरनेटवरून चालणाऱ्या उपहासात्मक, विडंबनात्मक लिखाणातले अध्र्वयू मानले जातात. नव्वदच्या दशकात सोनी टीव्हीवरून दाखवल्या जाणाऱ्या ‘मूव्हर्स अॅण्ड शेकर्स’ या शेखर सुमन अँकर असणाऱ्या लोकप्रिय हिंग्लिश कार्यक्रमाच्या टीमचा ते भाग होते. तेव्हापासून दोन दशकं ते या क्षेत्रात काम करत आहेत. टीव्हीच्या क्षेत्रात वेगवेगळ्या माणसांच्या बरोबर काम करताना त्यांना खूप तडजोडी कराव्या लागल्या. पण आता यापुढे ते सगळं पुरे, आता आपलं आपणच काहीतरी करायचं असं त्यांनी आणि त्यांच्या कार्यक्रमाचा अँकर सुमित राघवन यांनी ठरवलं. त्यांनी टीव्ही वाहिन्यांच्या क्षेत्रापासून बाजूला जाऊन चक्क जयहिंद या इंटरनेट शोची निर्मिती केली. आम्ही खरं तर हे धाडसच करत होतो, पण ते आम्हाला करून बघायचंच होतं, झा सांगतात. पण ‘जय हिंद’चा इंटरनेट शो बघितला तर त्यांचं हे धाडस वेडं नव्हतं, तर त्यात खरोखरच सृजनशीलता आहे, हे लक्षात येतं. आता पंधरा लेखकांची टीम हाताशी धरून ते ‘जय हिंदू’चा पंधरवडय़ाला एक शो अशी निर्मिती करतात. ती इंटरनेटसाठीची आहे, पण विशेष म्हणजे टीव्हीनेही ती स्वीकारली आहे.
झा सांगतात, त्यांनी त्यांच्यासाठी आखून घेतलेला पहिला नियम होता, तो म्हणजे या शोमधून जे काही मांडलं जाईल ते एखाद्या कंटाळवाण्या संपादकीयासारखं असता कामा नये, तसंच ते एखाद्या पानाच्या ठेल्यावरही मिळू शकेल इतकं स्वस्तही असू नये. तर लोक नेत्यांविषयी जे बोलतात, ते तसंच्या तसं आलं पाहिजे. लोकांच्या नेत्यांबद्दलच्या शिव्या आणि नेत्यांचं एकाच साच्यातलं भाषणं असं याचं स्वरुप न राहता, ते एखाद्या विषयावरचं चटपटीत, चुरचुरीत भाष्य असलं पाहिजे.
‘जय हिंद’मध्ये हा सगळा मोकळेपणा आहे. उदाहरणच द्यायचं तर त्यात ‘सविता भाभी के सेक्सी सोल्यूशन्स’ नावाचं सेगमेंट आहे. त्यात राजकारणी, बॉलीवूडमधले सितारे, तात्कालिक घटनांवरून केलेले विनोद असं बरंच काय काय असतं. झा सांगतात, साठ वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं मी ऐकत होतो. ते ऐकताना मला अचानक काहीतरी सुचलं.. ते होतं, ‘ए मेरे वेतन के लोगों..’ ते म्हणताना माझ्या डोळ्यांसमोर अर्थातच आले मुकेश अंबानी. मग ‘जय हिंद’साठी लगेचच तो तुकडा लिहिला गेला आणि अंबानी क्रिकेटर्सच्या दिशेने पैसा फेकताहेत, गर्दीला पांगवताहेत, राजकारणी-पत्रकार त्यांच्या भजनी लागलेले आहेत, असं दाखवणारं शूटिंग केलं गेलं. त्याच काळात अरविंद केजरीवालांनी अंबानींवर टीका केली होती. तो संदर्भदेखील घेतला गेला.
अनेक विडंबनकार जॉन स्टुअर्ट, अॅन्डी बोरोविट्झ आणि अशा आणखी काहीजणांकडून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं सांगतात. पण त्यांचं राजकीय विडंबन एखाद्या डेली शोमध्ये सादर व्हावं या तोडीचं असतंच असं नाही. जॉन स्टुअर्ट त्याच्या शोमधून एखादं विधान करतो, एखादा विनोद करतो किंवा एखादी गोष्ट करायला नकार देतो तेव्हा त्यात त्याची स्वत:ची एक ताकद असते. ती तुम्हाला मान्य करावी लागते. आपल्याकडे मात्र तशा ताकदीचं कुणी दिसत नाही. आपल्याकडच्या विनोदात मिमिक्री असते किंवा एक प्रकारचं लुम्पेन एलिमेंट असतं. त्याबद्दल राजकीय व्यंगचित्रकार उन्नी म्हणतात, ‘‘तुम्हाला अर्णव गोस्वामी किंवा अरविंद केजरीवाल यांची हुबेहूब नक्कल करणारे सापडतील. पण ते सर्वोत्तम नक्कल या पातळीपुरतंच असेल. त्यातून तुम्हाला राजकारणावरचं उत्तम भाष्य मिळणार नाही.’’ तर क्रिश अशोक म्हणतात, ‘‘इंटरनेटवरचा विनोदाचा हा सगळा प्रकार आत्ता नव्याने सुरू झाला आहे. त्याला विकसित व्हायला आपण वेळ दिला पाहिजे.’’
मुंबईच्या एआयबी (All India Bachod) चे गुरसिमरन खंबा म्हणतात, ‘‘बलात्कारावरचा (इट्स ऑल युवर फॉल्ट) त्यांचा व्हिडीओ किंवा काँग्रेस आणि भाजप समर्थकांवरचा ‘घीसापीटा’ हा राजकीय पोकळी दाखवणारा व्हिडीओ घ्या, ऑल इंडिया बॅकहूड हे तुलनेत सॉफिस्टिकेटेड आहे. त्यांच्या यो यो केजरी सिंगच्या धरना डान्सला चांगलेच हिट्स मिळाले.’’
राजकीय विडंबनाचा हा इंटरनेटवरचा आविष्कार पक्षपाती आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना नाही असं म्हणत तुम्हाला पळवाट काढता येत असली तरी व्यापक अर्थाने त्याचं उत्तर हो असंच नाही. तुम्ही जर मध्यमवर्गीय असाल तर या कार्यक्रमांमधून जे व्यक्त होतं, त्यातून तुमचे राजकारणाबद्दलचे आडाखे बरोबरच आहेत, असं तुम्हाला वाटेल. तुमचे पूर्वग्रह कुरवाळण्याचंच काम हे कार्यक्रम करतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे साहजिकच निवडणूक हाच अनेकांच्या आवडीचा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे ज्यावर भाष्य करता येईल असे अनेक विषय समोर दिसत आहेत.
‘फेकिंग न्यूज’ आणि ‘अनरियल टाइम्स’ या दोन्हींच्या बाबतीत ते उजव्या विचारांचे सहानुभूतीदार असल्याचा आरोप होतो. अर्थात ते दोघेही ही गोष्ट नाकारतात. अनरियल टाइम्सने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विडंबनात्मक लिखाण केले आहे. तसेच ‘राहुल गांधी कसे मठ्ठ आहेत, अशा आशयाचं लिखाण या वेबसाइट्सनी गेल्या वर्षभरात इतक्या वेळा प्रकाशित केलं आहे की त्या प्रकाशनाच्या खर्चात मी व्हॉट्स अप खरेदी केलं असतं.’ ‘खाप पंचायत’चे शर्मा सांगतात. ते असंही सांगतात की आजच्या तरुणांनी गेली दहा वर्षे काँग्रेसप्रणीत सरकारच बघितलं आहे आणि त्या सरकारने त्यांचा खूप भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे हे तरुण काँग्रेसविरोधी आहेत, हे खरं असलं तरी त्याचा अर्थ ते उजव्या विचारसरणीचे आहेत, असं मात्र म्हणता येत नाही. त्याचबरोबर टिपिकल हिंदुत्ववादी विचारसरणी मांडणाऱ्या, विखारी पद्धतीची मांडणी करणाऱ्या साइट्सही आहे. त्यांच्या विनोदांना काय म्हणायचं?’

हे तरुण काँग्रेसविरोधी आहेत, हे खरं असलं तरी त्याचा अर्थ ते उजव्या विचारसरणीचे आहेत, असं मात्र म्हणता येत नाही.

आपण ‘नरेंद्र मोदी का पंतप्रधान होऊ शकत नाहीत’ असं लिखाण केलं तेव्हा वेगवेगळ्या पातळ्यांवरून प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या अनेकांना तर आमचं म्हणणं कळलंच नाही, असं कृष्णा आणि लक्ष्मण दोघंही सांगतात. हिंदू जनजागृती समितीने फेकिंग न्यूजला विरोध करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर टीका केली, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असं रोशन सांगतात.
अशा प्रकारचा विरोध काही व्यक्ती किंवा एखाद्या ग्रुपकडून होतो, पण तो अधिकृतपणे एखाद्या पक्षाकडून किंवा संघटनेकडून तरी झालेला नाही. झा सांगतात, एकीकडे आपला देश असहिष्णू बनत चालला आहे, अशी वदंता आहे. आम्ही आजवर विनोदाच्या माध्यमातून इतक्या जणांवर वेगवेगळ्या प्रकारे टीका केली आहे. पण आम्हाला कधीही अशा असहिष्णूतेचा अनुभव आलेला नाही. आपल्या देशात खऱ्या अर्थाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. लोकच अनेक वेळा र्निबध लादून घेतात, असं त्यांचं मत आहे. कुणी सांगावं, अशा प्रकारची विनोदनिर्मिती ही आपल्यासाठी हे आपणच घालून घेतलेले र्निबध झुगारून देण्यासाठीची पहिली पायरी असेल.
अनुवाद : हृषीकेश देशपांडे
(‘एक्स्प्रेस आय’मधून)