‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक फक्त राजकीय स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचाही किती बारकाईने विचार करत होते याविषयी, १ ऑगस्ट या टिळक पुण्यतिथीनिमित्त-

हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा चालू असतानाच, हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीविषयी नेतेमंडळी व अर्थतज्ज्ञ विचार करत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी सखोल विचार करणाऱ्यांत दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, रोमेशचंद्र दत्त आघाडीवर होते. तर्खडकर, जोशी आदी प्रभृतींनीही देशाच्या आर्थिक दुरवस्थेविषयी विचार व्यक्त केले होते. दादाभाई आणि तर्खडकर यांनी ब्रिटिश राज्यकर्ते भारताचे आर्थिक शोषण करत असून भारताच्या वार्षिक उत्पन्नातील मोठा हिस्सा ब्रिटनकडे वळवला जातो हे सप्रमाण सिद्ध केले. नौरोजी म्हणत ब्रिटनची आर्थिक समृद्धी व हिंदुस्थानची दुरवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारताच्या मागासलेपणामुळे ब्रिटिश उद्योजकांना आपसूकच एक मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीला हिंदुस्थानच्याच पैशाचे पाठबळ लाभले. या संबंधीची दादाभाईंची ‘ड्रेन थिअरी’ (Drain Theory) ही हिंदुस्थानच्या दैन्यावस्थेविषयी विचार करणाऱ्यांस मार्गदर्शक ठरली, भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था साचलेल्या डबक्यासारखी आहे असे न्या. रानडे म्हणत. ब्रिटिशांची आर्थिक नीती भारतात निरुपयोगी असून इथे औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगती होण्यासाठी उदारमतवादी आश्वासक धोरणाची गरज आहे असे त्यांचे मत होते. ना. गोखलेंनी अर्थसंकल्पावर वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून सरकारच्या उधळपट्टीवर हल्ला चढवला व भारतीय जनता करांच्या ओझ्याखाली वाकली आहे असे ठासून सांगितले.
परंतु हे सर्व थोर विचारवंत नेते मवाळ होते. सरकारच्या चांगुलपणावर त्यांचा भरवसा होता. सनदशीर लढय़ावर त्यांचा विश्वास होता. अशा परिस्थितीत हिंदुस्थानला आक्रमक खंबीर नेतृत्वाची गरज होती अन् ती लोकमान्य टिळकांच्या रूपाने पुरी झाली. आपल्या जहाल नेतृत्वाने त्यांनी भारतीयांना आकर्षित केले. संपूर्ण स्वराज्याची मागणी करत असतानाच त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे वाभाडे काढले. त्यांचे केसरीमधील लेख, त्यांची कॉँग्रेसच्या व्यासपीठावरील भाषणे व इतर लेखन हे टिळक उत्तम अर्थतज्ज्ञ असल्याचे सूचित करतात. हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी पाश्चात्त्य आर्थिक धोरण उपयोगी नसून या देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक विचारसरणींतूनच त्यासाठी उपाय शोधला पाहिजे या विचारांवरच त्यांची आर्थिक, राजकीय नीती उभारलेली होती. लोकमान्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या अर्थविषयक विचारांची ही एक झलक.
हिंदुस्थानच्या दारिद्रय़ाची कारणे
अर्थव्यवस्थेविषयी विचार करताना आपल्या दारिद्रय़ाची कारणे कोणती हे आपणास समजले तरच त्यावर योग्य उपाय करता येतील. या मूलभूत समस्येबद्दल विचार करताना टिळक लिहितात, ‘देशाची विपन्नावस्था होण्यास मुख्य तीन कारणे असतात – १) देशातले लोक सुस्त, निरुद्योगी व अज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडून मुळीच किंवा व्हावी तितकी संपत्ती उप्तन्न होत नाही २) कदाचित ते उत्पन्न करत असतील, पण ते दुसरेच कोणीतरी काढून नेत असेल. ३) ते जितके उत्पन्न करतात तिच्यापेक्षा व्यय करणारे अधिक निपजत असतील. आमच्या भाग्यशाली भरतखंडांत तिन्ही कारणे पूर्ण वास करत आहेत. आम्हाकडून व्हावे तितके उत्पन्न होत नाही, झालेल्याचा बराच भाग बाहेर जातो आणि प्रतिवर्षी उत्पन्न करणाऱ्यांच्या संख्येपक्षा ती मटकावणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.’ (भारताच्या लोकसंख्या वाढीच्या गंभीर प्राश्नाकडे लक्ष वेधणारे टिळक हे पहिले पुढारी असावेत. दुर्दैवाने आज शे-सव्वाशे वर्षांनंतरही लोकसंख्येच्या या समस्येमुळे देशाची प्रगती अपेक्षित वेगाने होत नाही.)
दारिद्रय़ दूर करण्याचे उपाय
१) मूलद्रव्ये पुष्कळ उत्पन्न केली पाहिजेत. मूलद्रव्यांची उत्पत्ती अधिक होण्यास खाणींचा शोध व शेतकी सुधारणा हे उपाय केले पाहिजेत. म्हणजेच नैसर्गिक संपत्तीचा शोध घेऊन तिचा उपयोग करणे (भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली असूनसुद्धा आजही आपण देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा संपूर्ण शोध घेऊ शकलेलो नाही). २) या साधनसामग्रीचा उपयोग करण्यासाठी लागणारे ज्ञान, कौशल्य, यांत्रिक कलेतील निष्णातता (कुशल इंजिनीयर्स, तंत्रज्ञ) प्राप्त करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना युरोप, अमेरिका, जपान येथे पाठवावे. ३) यासाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज करण्यासाठी संस्थानिकांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अल्प दराने पैसे देऊन नंतर तो विद्यार्थी कमावता झाल्यानंतर त्याने हप्त्याने कर्जाची परतफेड करावी. (सध्या लोकप्रिय असलेल्या एज्युकेशन लोनची संकल्पना)
४) मजुरी व कच्चा माल या आपणास अनुकूल असलेल्या घटकांचा योग्य उपयोग.
औद्योगिक पारतंत्र्य
परकीय राज्य हे आपल्या देशाच्या सर्व समस्यांचे मूळ होते. राजकीय, धार्मिक व सामाजिक पारतंत्र्याबद्दल समाजामध्ये खल होत आहे. परंतु या पारतंत्र्याचा अविभाज्य भाग असलेल्या औद्योगिक पारतंत्र्याबद्दल मात्र पाहिजे तितकी चर्चा होत नाही, याबद्दल टिळकांनी खंत व्यक्त केली होती. औद्योगिक पारतंत्र्याबद्दल जनता पुरेशी जागरूक नसल्यामुळे आपल्या देशाची आर्थिक अवनती वेगाने होत आहे याकडे टिळकांनी लक्ष वेधले होते. युरोपातही औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी सर्व कामे हातानेच केली जात. परंतु तेथे झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अगदी थोडय़ा अवधीत मालाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन होऊ लागले. युरोपातील या क्रांतीचा लाभ अपाल्याला उठवता आला नाही. आपल्या या अपयशाची कारणमीमांसा टिळकांनी येणेप्रामाणे केली
१) आपला देश अतिविस्तीर्ण व अतिसुपीक २) सर्वसाधारण भारतीयांची निवृत्ती मार्गाकडील प्रवृत्ती ३) शेकडो वर्षांची परकीय सत्ता
४) या देशाचे हवापाणी
५) सर्वसामान्य लोक ठेविले अनंत तैसेची रहावे अशा अल्पसंतुष्ट वृत्तीचे आहेत. (म्हणूनच टिळकांनी गीतारहस्यद्वारे भारतीयांना कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला).
आपल्या आजारी अर्थव्यवस्थेचे निदान करताना लोकमान्य म्हणतात युरोपात मोठय़ा प्रमाणावर मालाची निर्मिती होत आहे. यंत्रांच्या या राक्षसी सामार्थ्यांमुळे आपला हस्तव्यवसास हतबल झाला आहे. तशांतच आपल्याकडील भांडवलाची कमतरता, तंत्रज्ञांची वानवा यामुळे आपण उद्योगधंद्यांत प्रगती करून शकत नाही. आपल्याकडे उद्योगधंदे नसल्याकारणाने नफारूपी भांडवल जमा होत नाही, तसेच उद्योगधंदे नसल्यामुळे तंत्रशिक्षणाकडे लोकांचे दुर्लक्ष होत आहे. याउलट ही दोन्हीही साधने नसल्याने उद्योगधंद्यांत वाढ होत नाही. अशा तऱ्हेने आपली अर्थव्यवस्था एका दुष्टचक्रांत (viscious circle) सापडली आहे. परंतु हताश न होता या समस्येवर मात केली पाहिजे. टिळकांनी यावर सुचवलेली उपाययोजना ही एखाद्या कसलेल्या अर्थतज्ज्ञाला साजेशी आहे. टिळकांचे उपाय : १) छोटय़ा उद्योगांना प्रोत्साहन देणे,
२) परदेशांतून व्याजाने पैसे घेणे,
३) औद्योगिक शिक्षणाची कास धरणे, ४) आवश्यकता असेल तेथे परदेशी तंत्रज्ञांस नोकरीस ठेवणे.
टिळक म्हणत भांडवल उभारणीचे काम श्रमसंयोगाने किंवा सहकारी तत्त्वावर (को-ऑपरेशन आणि को आपरेटिव्ह सोसायटय़ा) होऊ शकते. वैयक्तिक स्तरावर उद्योग सुरू करणाऱ्यास त्या व्यवसायासंबंधी मन:पूर्वक प्रेम पाहिजे तसेच ती व्यक्ती शिक्षणामुळे सुसंस्कृत असून प्रामाणिक पाहिजे हे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. (आजच्या कर्जपुरवठा करणाऱ्या आधुनिक संस्थाही नेमक्या याच गोष्टींचा म्हणजे कर्जदाराच्या चारित्र्य, सामथ्र्य आणि क्षमता यांचा अग्रक्रमाने विचार करतात हे येथे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे).
ब्रिटिशांची आर्थिक नीती
व्यापाराच्या मिषाने हिंदुस्थानात आलेल्या ब्रिटिशांनी येथील अनागोंदीचा पुरेपूर फायदा उठवत संपूर्ण हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेतला. तत्कालीन आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त असे शिस्तबद्ध सैन्य व व्यापारी धूर्तता यांच्या जोरावर त्यांनी आपले राज्य स्थिर केले. येथे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करून त्यांनी आपल्या सैन्याच्या व मालाच्या सुलभ वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली. पोस्ट खाते व तारायंत्रे यांच्या साह्याने जलद संपर्क सोय केली. इंग्रजांनी केलेल्या विविध सुधारणांमुळे आणि निर्माण झालेल्या राजकीय स्थैर्यामुळे अनेक लोक इंग्रजांचे गुणगान करू लागले. परंतु इंग्रज राज्यकर्ते अत्यंत कावेबाजपणे आपल्या देशाची पद्धतशीर लूट करत आहेत हे टिळकांनी वेळोवेळी दाखवून दिले. उदा. स्वत:च्या देशातील कापड धंद्याला ऊर्जितावस्था यावी यासाठी त्यांनी या देशात तयार होणाऱ्या जाड कापडावर शेकडा साडेतीन टक्के कर बसवला. तर इंग्लंडमधून आयात केल्या जाणाऱ्या तलम कपडय़ांवरील कर पाच टक्क्यांवरून साडेतीन टक्क्यांवर आणला. परिणामस्वरूप ब्रिटिश माल वापरणाऱ्या श्रीमंत लोकांचा फायदा झाला तर जाडेभरडे सुती कपडे वापरणाऱ्या गरीब जनतेचा तोटा झाला. यावर टीका करताना टिळक म्हणतात, ‘‘गरीब लोकांस कमी कर व श्रीमंतांस अधिक कर या अर्थशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे ब्रिटिशांची ही कर आकारणीची पद्धत चुकीची आहे. हा कर सर्वस्वी अन्यायकारक असून आमच्या तळपायाची आग मस्तकांत गेली आहे,’’ असे त्यांनी राजकर्त्यांना ठणकावले.
ब्रिटिशांच्या एकूणच आर्थिक धोरणावर टिळकांचे बारकाईने लक्ष असे. त्यामुळे ब्रिटिश सरकार हुंडणावळीच्या दरांत (एक्स्चेंज रेट) चलाखी करून आपल्या मातृभूमीचा फायदा करत आहे हे त्यांच्यासारख्या सजग अर्थतज्ज्ञाच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. रुपयाच्या अवमूल्यनामुळे युरोपियन नोकरदारांचे युरोपला पैसा पाठवताना नुकसान होत होते. ही नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी त्यांनी मागितलेली पगारवाढ (एक्स्चेंज कॉम्पेनसेशन अलाउन्स) च्या स्वरूपात मंजूर करण्यात आली. नोकरदारांना दिला जाणारा हा अतिरिक्त पैसा जनतेकडूनच वसूल करण्यात येत होता. सरकारच्या या निर्णयावर टिळकांनी सडकून टीका केली होती.
राज्यकर्त्यांच्या अगदी छोटय़ा आर्थिक निर्णयाचेही टिळक विश्लेषण करत. त्यामुळेच मुंबई इलाख्याच्या अबकारी खात्याने मोहफुलाच्या विक्रीवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा टिळकांनी त्याला जोरदार विरोध केला. मोहफुलांचा उपयोग मद्य निर्मितीसाठी केला जातो व चोरटय़ा दारू धंद्यास प्रोत्साहन मिळून सरकारचा अबकारी कर बुडतो असा सरकारचा दावा होता. परंतु मोहफुलांचा फार मोठा हिस्सा आदिवासी लोक अन्नसारखा वापरतात त्यामुळे सरकारचे मत पूर्वग्रहदूषित आहे असे प्रतिपादन टिळकांनी केले. अनधिकृत दारू गाळणाऱ्यांना सध्या जी शिक्षा आहे तीच योग्य असून सरसकट मोहफुलांच्या विक्रीवर बंदी आणणे अन्यायकारक आहे, असे टिळकांचे मत होते. सुदैवाने हा कायदा पुढे अस्तित्वात आला नाही. हिंदुस्थानात पडलेल्या दुष्काळाविषयीही टिळकांनी चिंतन केले होते. टिळक लिहितात, दुष्काळ आता खास पडला आहे हे सांगावयास नकोच. गुरे कडब्याच्या किमतीने विकू लागली आणि कडबा सोन्याच्या भावाने जात आहे. कित्येक लोक खेडेगावांतून शहराकडे धाव घेत आहेत. सरकारने ‘फेमिलिअर रीलिफ कोड’ तयार केले आहे ही समाधानाची बाब आहे.’’ टिळक ठिकठिकाणच्या पुढाऱ्यांना आवाहन करतात की त्यांनी आता स्वस्थ बसून चालणार नाही. गरीब शेतकऱ्यांस संकटसमयी काय करावे हे सुचत नाही. त्यास पुढाऱ्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे. जेथे जेथे दुष्काळ पडला आहे तेथल्या लोकांनी कलेक्टर साहेबांकडे अर्ज करून १) आमच्या जमिनीवरील सारा यंदा सोडा
२) आमच्या गावच्या आसपास कामे काढून आम्हास मजुरी द्या
३) तगाईच्या रूपाने शेतकीच्या कामाकरिता कर्जाऊ पैसे द्या अशी मागणी केली पाहिजे.
ब्रिटिश सरकारच्या अर्थसंकल्पांचीही टिळकांनी चीरफाड केलेली आहे. सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करताना हिंदुस्थानची दैना या लेखात टिळक लिहितात, या देशाच्या जमाखर्चाची तोंडे मिळेनाशी झाली आहेत. कराखाली रयत मेटाकुटीस आली आहे. व खर्चाचे पाऊल तर रोजच पुढे पडत आहे. हिंदुस्थान सरकारने दाखवलेली शिल्लक ही दिशाभूल करणारी असून हिंदुस्थानचा जमाखर्च पाहिला तर त्यात तूटच आलेली आहे (डेफिशिएट बजेट). टिळक प्रश्न करतात हिंदुस्थानची स्थिती चांगली असेल तर सरकारला कर्ज का काढावे लागते? हिंदुस्थान सरकारने रेल्वेत व कालव्यांत पुष्कळ रक्कम घातलेली आहे, परंतु वेळप्रसंग आल्यास सदर रक्कम उभी राहील की नाही याची वानवाच आहे. हिंदुस्थान सरकारने ठरवले की ही झालेली कामे विकून त्यात घातलेली रक्कम उभी करून कर्ज फेडावे तर ही कामे कोण खरेदी करणार? टिळकांनी येथे मांडलेली निर्गुतवणुकीकरण आणि खासगीकरणाची कल्पना भारत सरकार आज प्रत्यक्ष कृतीत आणत आहे. टिळक हे काळाच्या पुढे विचार करणारे अर्थतज्ज्ञ होते हेच खरे!
शेतकरी व कामगार
देश आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी भांडवली पद्धतीची कारखानदारी शिघ्र गतीने पसरली पाहिजे, व्यापारांत वृद्धी झाली पाहिजे व येथील शेती शास्त्रीय पद्धतीने झाली पाहिजे असे टिळकांचे मत होते. परंतु भांडवलशाहीचे समर्थन करताना त्यांनी कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले नव्हते. आपल्या देशातील गिरण्या कारखान्यांना परदेशाशी स्पर्धा करावयाची असल्यामुळे भांडवलदार व कामगार असा लढा होणे त्यांना इष्ट वाटत नव्हते. टिळक म्हणत मी कामगार संघटना उभारणार त्या सोशल वेल्फेअरच्या पायावर जेणेकरून कामगारांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शारीरिक स्थिती सुधारेल. गिरण्या, कारखाने उभारताना कामगारांकडूनही भांडवल घ्यावे असा अभिनव विचार त्यांनी मांडला होता. शेतकऱ्यांबद्दल टिळकांना फार कळकळ होती. टिळक म्हणत देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता. शेतकरी हा देशाचा कणा आहे, राष्ट्राचा आत्मा आहे असे सांगणारे लोकमान्य पहिले पुढारी. या काबाडकष्ट करणाऱ्यांची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशाची परिस्थिती सुधारली असे म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांचे महत्त्व ओळखूनच त्यांनी सरकारच्या शेतसारा वाढवण्याच्या धोरणावर हल्ला चढवला. सरकार ठरावीक काळानंतर जमिनीची पाहणी करून सारा वाढवते आहे, ही पद्धत फारच कडक व अन्यायकारक आहे. काही ठिकाणी सरकारने अनन्वित सारा चढवल्याची उदारहणे आहेत व फेरतपासणींत सारा दोनशे पटीहून अधिक वाढतो तेव्हा शेतकऱ्यांनी तक्रार करू नये हे सर्वस्वी अन्यायकारक आहे असे त्यांनी कठोरपणे सरकारला बजावले. शेतीचे उत्पन्न वाढण्यासाठी केवळ पूर्वापार पद्धतीने शेती न करता तीत सुधारणा केली पाहिजे. काही लोकांनी शेतीत सुधारणा करण्यासाठी प्रयोग करून इतरांच्या फायद्यासाठी तो लोकांपुढे ठेवला पाहिजे.
टिळक हे केवळ पुस्तकी अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर ते कृतिशील अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळेच हिंदुस्थानची आर्थिक उन्नती होण्यासाठी व ब्रिटिशांची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार असे दोन कार्यक्रम लोकांना दिले. तसेच आपल्या देशाला ऊर्जितावस्था येण्यासाठी स्वकीयांनीच पुढाकार घेऊन उद्योगधंदे चालू केले पाहिजेत. हे काम एकटय़ादुकटय़ाचे नसल्याने पाश्चात्त्यांच्या धर्तीवर प्रत्येक कामासाठी सभा स्थापिल्या पाहिजेत. (कंपन्या, बॅँका, पतपेढय़ा यांना टिळक सभा म्हणत). यासाठी सुशिक्षितांनी पुढाकार घ्यावा यासाठी ते आग्रही होते. परदेशी मालावरील बहिष्कार हे आर्थिक शस्त्र असले तरी ते ब्रिटिश सत्तेला हादरवणारे अस्त्र ठरले. स्वदेशीचा पुरस्कार हा बहिष्काराच्या चळवळीला पूरक असाच होता. स्वदेशीचा पुरस्कार करताना टिळक म्हणतात, ‘‘अर्थशास्त्राची व राजनीतीची खरी तत्त्वे जर तुम्हास माहीत असतील किंबहुना अन्याय सहन न झाल्यामुळे तुमच्या जिवाची खरोखरच जर तळमळ होत असेल व तुमच्या अंत:करणास चटका लागून राहिला असेल तर इतउत्तर कोणतीही सबब न सांगता देशी कापड वापरण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे वर्तन करण्यास लागा,’’ सर्व देशासाठी आपण काही केले पाहिजे नव्हे ती आपली नैतिक जबाबदारीच आहे हा विचारच भारताला नवा होता. अखिल देशाच्या उत्कर्षांचे चिंतन फारसे कोणी करत नसल्यामुळे औद्योगिक पारतंत्र्य, परदेशी जाणारा पैसा, सरकारने केलेली लूट या गोष्टी फारशा गांभीर्याने घेतल्या जात नव्हत्या. टिळकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून लोकांना अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सक्रिय केले यातच त्यांचे द्रष्टेपण आहे.
विवेक आचार्य

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
Raghuram Rajan on PM narendra modi
‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका