05 April 2020

News Flash

उत्सव : आनंदु वो माये..

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवांनी या विश्वाची निर्मिती केली होती, असं मानलं जातं

(संग्रहित छायाचित्र)

राधिका कुंटे

परवा सहज एसएमएस स्क्रोल करत होते. (व्हॉटस्अ‍ॅपच्या जमान्याआधी असंही काही तरी होतं) एक जुना मेसेज होता, ‘निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी.. नवे नवे वर्ष घेऊन आले गुळसाखरेची गोडी..’ नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. मग दिनदर्शिकेकडं लक्ष गेलं. २५ तारीख लाल रंगात रंगून गुढीपाडवा ही अक्षरं लेऊन मिरवत होती. रोजच्या व्यस्त जीवनशैलीत आणि सध्याच्या करोनाग्रस्त भयशंकित वातावरणात हा साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त लक्षात राहिला नाही, हे खरं. मग थोडंसं पुस्तकांत डोकावलं. काही कात्रणं चाळली आणि हो, गूगल सर्चही केलं..

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवांनी या विश्वाची निर्मिती केली होती, असं मानलं जातं. १४ वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा पराभव करून राम अयोध्येत परतले ते याच दिवशी. त्या वेळी आनंदित झालेल्या अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतार्थ गुढय़ा उभारल्या होत्या. तेव्हापासून गुढी उभारायची पद्धत सुरू झाली असं मानलं जातं. शालिवाहन शकाचा आरंभ या दिवशी होतो, त्यामागं शालिवाहन नावाच्या कुंभारानं मातीचं सन्य घडवून, त्यात प्राण फुंकले आणि त्याच्या मदती नंशकांचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. तर हा दिवस आंध्र प्रदेशात उगादी, तमिळनाडूत विषू या संबोधनानं साजरा केला जातो.

साहित्याचा संदर्भ द्यायचा झाला तर ‘तुकाराम गाथे’तील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात म्हणतात की, ‘‘पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां। देउनि चपळां हातीं गुढी।’’ तर विष्णुदास नामा यांच्या अभंगात ‘‘आनंदुवोमाये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ॥ मोतिया तांदुळ कांडिती बाळा। गाती वेळोवेळा रामचंद्र ॥ अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन। धन्य आजि दिन सोनियाचा॥ कनक दंड चवरयाढळताती रामा । विष्णुदास नामा गुढीयेसी’’ असा उल्लेख आढळतो. बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यरचनेत ‘‘गुढीपाडव्याचा सन. आतां उभारा रे गुढी. नव्या वरसाचं देनं. सोडा मनांतली आढी. गेलसालीं गेली आढी. आतां पाडवा पाडवा. तुम्ही येरांयेरांवरी. लोभ वाढवा वाढवा’’ हा उल्लेख येतो. ‘लोकगीता’त ‘‘गुढीचे गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी। कुळाची कीर्ती जावी दाही दिशा। गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी। खण घाली जरतारी गोपूबाळ।’’ असे काही संदर्भ येतात.

गुढी उभारण्याआधी दरवाजासमोर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर कलश ठेवावा. गुढीला हार, साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी बांधावी. गुढीला गंध, फूल, अक्षता वाहून तिची पूजा करावी. नेवैद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर कडुनिंबाची पानं घेऊन ती जिरं, मिरं, हिंग, ओवा, साखर इत्यादींसोबत वाटावी आणि ते मिश्रण प्रसाद म्हणून खावं. कडुनिंब आरोग्यदृष्टय़ा विविध गोष्टींत उपयुक्त असल्यानं तो खावा, असं यातून सुचित करायचं असावं. गुढी उभारल्यावर पंचागातील वर्षफल वाचणं म्हणजे येणारं वर्ष कसं असेल, पीक-पाणी कसं असेल आदी गोष्टी समजून घेतल्या जात. सूर्यास्ताच्या वेळी गुढीची पूजा करून ती उतरवण्याची प्रथा आहे. एका दृष्टीनं पाहिलं तर गुढी अनेक गोष्टींचं द्योतक आहे. गुढीसाठी बहुसंख्य ठिकाणी बांबू किंवा कळकाची काठी वापरली जाते. ही काठी वापरण्याची परंपरा एकापरीनं वृक्षवेलींचं अस्तित्व अधोरेखित करते. गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. म्हणजे जणू आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी, असा संदेश गुढी देते. बांबू, कडुनिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची प्रतीकं आहेत. गुढी उभारल्यानंतर एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या जातात.

शुभेच्छा.. खरं तर त्या वाचूनच गुढीपाडव्याची चाहूल लागली होती. पूर्वी त्या प्रत्यक्ष भेटून दिल्या जात. त्यानंतर मग एकेक करत ई-मेल, एसएमएस आणि सध्या समाजमाध्यांवर शुभेच्छा द्यायचा प्रघात रूढ झाला आहे. त्यातही गेल्या काही वर्षांत गुढीपाडवा मोठय़ा प्रमाणात अनेकांनी एकत्र येऊन साजरा करायचा, नवीन वर्षांच्या स्वागतयात्रा, शोभायात्रा काढायच्या ही पद्धत सुरू झालेली आहे. नटूनथटून, झोकदार फेटे बांधून, महारांगोळ्या काढून, बाईकवर स्वार होऊन आणि देखावे सादर करून अनेकजण सामील होतात. यानिमित्तानं अनेकांच्या व्यवसायाला थोडी चालना मिळते. काही उत्साही मंडळी या यात्रा फेसबुक लाइव्ह करतात. कुणी स्टेट्स अपडेट करत राहतात. तर कुणाच्या अकाऊंटवर घरी परतेपर्यंत ढीगभर छायाचित्रं झळकलेली दिसतात. पाडव्याच्या साजरीकरणात विविध संस्था, मान्यवर सामील होत असल्यानं एका परीनं ती नानाविविध कल्पना, योजना, विचारांची देवाणघेवाण होऊन नवसंकल्पनांची अमूर्त गुढी ठरते. शोभायात्रांमध्ये ‘कचऱ्याचं सुयोग्य नियोजन’, ‘प्लॅस्टिकबंदी’, ‘पर्यावरणस्नेह’ आदी अनेक विषयांसंबंधी संदेश लिहिलेले-सादर केलेले दिसतात. यंदा मात्र या साऱ्या उत्सवी आणि उत्साही वातावरणावर करोनाचं मळभ दाटलेलं दिसत आहे. त्यामुळे नेहमीसारखा माहोल यंदा असेल अशी चिन्हं कमी दिसत आहेत.

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून घर, सोनं, वाहन किंवा मोठय़ा वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे खरा. त्याची साक्ष वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांतून आलेल्या जाहिराती देत आहेत. पण भोवताली घडणाऱ्या घटना, मंदीची मरगळ यामुळं खरेदीचा उत्साह आणि क्रयशक्ती कितपत राहील, याविषयी प्रश्न आहेत. मन उदास होऊन जातं.. पण मग खिडकीपाशी उभं राहिल्यावर दिसतो आकाशाचा इवलासा तुकडा. समोरच्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या. पिंपळाला फुटलेली पालवी आणि तितक्यात कुहूऽ.. कुहूऽ.. हे स्वर कानी पडतात. मनाला अलगद आशेचा धुमारा फुटतो. माणुसकी आणि सकारात्मकतेवरचा विश्वास अधिकच दृढ होतो. मगाच्या एसएमएसखालच्या मेसेजमध्ये जणू या सगळ्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं.. ‘‘चत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट. नवा आरंभ, नवा विश्वास. नववर्षांची हीच तर खरी सुरुवात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.’’

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:26 am

Web Title: lokprabha article on gudi padwa abn 97
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २० ते २६ मार्च २०२०
2 आडवाटेवरचा महाराष्ट्र : पळशी.. एक सुंदर गाव!
3 खेळ : मैदानावरचे तारे
Just Now!
X