05 April 2020

News Flash

निमित्त : वसंतातील आसमंत

शिशिर ऋतूत थंडीने गारठलेला आसमंत कोकीळ पक्ष्याच्या कुहू कुहू आवाजाने जणू उत्साहात उठून बसतो

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. विनया जंगले

शिशिर ऋतूत थंडीने गारठलेला आसमंत कोकीळ पक्ष्याच्या कुहू कुहू आवाजाने जणू उत्साहात उठून बसतो. होळीचे होम पेटतात ना पेटतात तोच चहूकडे या आवाजातच वसंताच्या आगमनाची वर्दी पोहचवली जाते. या वर्दीपाठोपाठच एखाद्या राजाप्रमाणेच वसंत ऋतू अवतरतो. पळस आणि पांगाऱ्याची झाडं आपल्या डोईत केशरी फुलं माळून वसंताच्या स्वागताला नटूनथटून तयार असतात. वसंताच्या आगमनाची कुणकुण लागताच शेवरीचं एरवी रुक्ष वाटणारं काटेरी झाड घंटेसारखी लाल फुलं अंगाखांद्यावर घाईघाईत माळून घेतं. त्याला वसंताच्या मार्गात आपल्या काटेरी हातांनी त्याच लाल फुलांचे सडे टाकायचे असतात ना!  कौशीचं उंच झाड केशरी फुलांचे घोस घेऊन निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर केशरी रंगाची उधळण करत असतं. जिच्याकडे रंगीत फुलं नाहीत अशी उक्षीची वेलही या उत्सवात मागे राहात नाही. पानांच्या रंगाच्या हिरव्या फुलांचे घोसच्या घोस माळून ती वसंताचं लक्ष वेधून घेण्याचा आटकोट प्रयत्न करत असते. लाल, केशरी, हिरव्या रंगांच्या बरोबरीने एक छोटंसं झुडुप आपल्या चमकदार निळ्या रंगाचे तुरे वसंताला देण्यासाठी सजलेलं असतं. ते म्हणजे ‘अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीतील अंजनीचं झुडुप. या कवितेच्या ओळीत ज्या तीन झाडांचा उल्लेख आहे. ती तीनही झाडं वसंत ऋतूतच फुलांनी बहरलेली असतात. निळ्या रंगाच्या अंजनीच्या बरोबरीने वसंतात ताम्हणीचे निळे तुरे वाऱ्यावर डोलायला सुरुवात होते. चिपळूण-खेड महामार्गाच्या कडेला एक कांचनाचं झाड आहे. ते दरवर्षी या ऋतूत जांभळ्या फुलांनी बहरून येतं. झाडावर नजर जावी त्या त्या ठिकाणी जांभळा रंग दृष्टीस पडतो. कांचनाच्या एकमेकांपासून दूर असलेल्या पाच जांभळ्या पाकळ्या एखाद्या भरतनाटय़म करणाऱ्या नर्तकीने फैलावलेल्या हातासारख्या दिसतात. पाकळ्यांच्या मध्यभागी असलेले तुऱ्यासारखे पुंकेसर वसंताची वर्दी जणू दूरवर पोहोचवत असतात. याच्या पानांचा आकार आपटय़ाच्या पानांसारखाच हृदयाकृती. गोविंदाग्रजांच्या कवितेतील तिसरं करवंदाचं झाड. ते चांदण्याच्या आकाराची पांढरीशुभ्र फुलं माळून आपल्या गंधाचं देणं आसमंताला देत असतं. कोकणातील एखाद्या पठारावर वसंतात पोहोचलं की भन्नाट वारा आणि त्याच्या जोडीला फुललेली अंजन आणि करवंदाची झाडं जागोजागी दृष्टीस पडतात. एकदा तर मला वसंतात लालभडक फुलांनी भरलेला काटेरी निवडुंग दिसला. इतर ऋतूंत मी कदाचित या निवडुंगाच्या वाटेलाही गेले नसते, परंतु वसंतात हा निवडुंग लाल चिमुकल्या फुलांनी बहरून आलेला दिसत होता. कॅमेऱ्याच्या झूम लेन्समधून बघताना निवडुंगाच्या छोटेखानी फुलांचं सौंदर्य अगदी डोळ्यात भरलं आणि मला इंदिरा संतांची एक कविता पटकन आठवली..

निवडुंगाच्या लाल फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी, जरा शिरावे पदर खोचूनी करवंदाच्या जाळीमधुनी

एका वसंतात मी दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात गेले होते. विद्यापीठाच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला तर वेगळाच सुगंध जाणवला. समोर नजर गेली तर हारीने उभी असलेली सुरंगीची झाडं. सुरंगीचं फूल म्हणजे धुंद करणाऱ्या सुगंधाचा निसर्गाने बहाल केलेला कोशच जणू. सुरंगीची पानं चकचकीत तांबूस हिरव्या रंगाची असतात. त्या दिवशी विद्यापीठातील संध्याकाळच्या सोनेरी उन्हात ती सगळी झाडं चकाकून उठली होती. सुरंगीच्या पानांचा आकार आंब्याच्या पानांसारखाच आणि फुलं मात्र फांदी फांदीला लगटून आलेली असतात. सुरंगीची फुलं म्हणजे फांदीला अगदी लगटून आलेल्या चिमुकल्या पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या आणि मध्यभागी हळदीची चिमूट सोडल्यासारखे गडद पिवळ्या रंगाचे असंख्य पुंकेसर. फुलांच्या बाजूलाच गोल लालसर रंगाच्या मण्यासारख्या असंख्य कळ्या फुलण्याच्या जणू प्रतीक्षेत उभ्या असतात. त्या संध्याकाळी मी सुरंगीचा सुगंध तनमनात अगदी भरून घेतला. सुरंगीच्या सान्निध्यात घालवलेली अशी एखादी संध्याकाळ मनातला वसंत कायम फुलवत राहते. वसंतात चाफा फुलायला सुरुवात होते. उंचच उंच सोनचाफ्याच्या झाडावर आलेलं एखादं पिवळंधमक फूल पानाच्या घुंगटाआड लपून राहायचा प्रयत्न करत असतं. पानांच्या हिरव्या पदराखाली लपायचा प्रयत्न करणाऱ्या पिवळ्याधमक सोनचाफ्याच्या फुलाकडे बघताना एखाद्या नुकत्याच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या लाजाळू बालिकेची आठवण येते. परंतु त्या उलट पांढऱ्या चाफ्याच्या निष्पर्ण झाडावर आलेले फुलांचे आणि कळ्यांचे तुरे बघून एखाद्या संसारापासून अलिप्त झालेल्या योग्याची आठवण येते. म्हणूनच कदाचित याला देवचाफा असं म्हटलं जात असावं. याचा मुलायम स्पर्श, पाकळ्यांचा पांढराशुभ्र रंग आणि मध्यभागी हळदीची चिमूट सोडल्यासारखा पिवळा रंग बघताना मन मात्र कोकणातील गावात असलेल्या मंदिराशेजारचं देवचाफ्याचं झाड आठवत राहतं. काही झाडांना रंग-गंधांनी भरलेल्या फुलांचं देणं नसतं. ती झाडं वसंतात कोवळ्या लालसर पालवीचा दिमाख मिरवत असतात. आमच्या रोजच्या रस्त्यावर पिंपळाचं एक छोटेखानी, तरुण  झाड आहे. बिचारं शिशिरात संपूर्ण निष्पर्ण होऊन गेलं होतं. जाळीदार झालेल्या सुकलेल्या पानांचा सडा झाडाखाली पडला होता. अगदी बघवत नव्हतं त्याच्याकडे.  एक दिवस वसंताची चाहूल काय लागली आणि दुसऱ्याच दिवशी ते झाड लाल कोवळ्या तांबूस पालवीने भरून गेलं. पांढरं खोड आणि त्यावर फांदी फांदीगणिक आलेली तांबूस पालवी सकाळच्या कोवळ्या उन्हात अक्षरश: झळाळून उठली होती. कुठूनसा एक चमकदार काळ्या रंगाचा, लालबुंद डोळ्यांचा कोकीळ आला. त्या झाडावर बसून वसंताचं गाणं गाऊ लागला. थोडय़ा वेळात गायचा थांबला आणि त्या झाडावर लगडलेली फळं खाऊ लागला. माझ्या मागच्या बाजूला मला खूप किलबिलाट ऐकू येऊ लागला. मान वळवून पाहिलं तर पळसाचं लालबुंद फुलांनी बहरलेलं झाड. आणि त्या फुलांवर मधुपान करणारे असंख्य पक्षी. पक्ष्यांची रसवंतीच ती! एका लालबुंद फुलावर चमकदार जांभळ्या रंगाचा सूर्यपक्षी बसला होता. तो आपली बाकदार चोच फुलात बुडवून मोठय़ा ऐटीत रसपान करत होता. बाजूला नेहमीप्रमाणे कलकलाट करणाऱ्या साळुंख्यांकडे मध्ये मध्ये नापसंतीचा दृष्टिक्षेप टाकत होता. पालवीचा दिमाख मिरवणाऱ्या पिंपळाच्या झाडाच्या बरोबरीने कुसुमाचं झाडही लालबुंद पानांचं वैभव वसंतात मिरवत राहतं.

वसंत हा बऱ्याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळेच तर या काळात बऱ्याचदा नरांनी माद्यांना साद घातलेली  ऐकू येते. कोकीळ कंठातून वसंत येत असला तरी त्याला आणखीही बरेच पक्षी साथ देत असतात. वसंतातील एखाद्या दुपारी तांब्याच्या भांडय़ांवर ठोकल्यासारखा आवाज येत राहतो. तो हिरव्या रंगाच्या तांबट पक्ष्याचा असतो. एकदा आरेच्या जंगलातून फिरताना कक कक असा लावून धरल्यासारखा आवाज येत होता. पुढे आल्यावर आंब्याच्या झाडावर बसलेला मातकट रंगाचा भारद्वाज दिसला. कावळ्यांचं आणि कोकिळेचं भांडण सरत्या वसंतात पाहायला मिळतं. कावळ्याच्या घरटय़ात अंडी घालण्यासाठी धडपडणारी कोकिळा आणि रागावून तिच्यावर धावून जाणारा कावळा आणि कावळी पाहायला मिळतात. एरवी सुमधुर गाणं गाणाऱ्या कोकीळ पक्ष्याचा आवाज कावळ्याबरोबरच्या भांडणात कर्कश्श होऊन जातो. कोकिळेच्या मनातही कावळ्यांबद्दल किती राग असतो हेही एका वसंतात पाहायला मिळालं. पिंपळाच्या झाडावर करडय़ा रंगाच्या बऱ्याच कोकिळा बसल्या होत्या. कुठूनसे दोन कावळे आले. त्यांनाही त्याच झाडावर बसायचं होतं. पण या सगळ्या कोकिळा एवढय़ा भांडकुदळ होत्या की त्या गरीब बिचाऱ्या कावळ्यांना पिंपळाच्या फांदीला साधं टेकूही देत नव्हत्या. कावळे एखाद्या फांदीवर बसायची खोटी की सगळ्या कलकलाट करून त्यांच्या अंगावर धावून जात होत्या आणि  हेच कावळे बिचारे कोकिळेची अंडी आपल्या घरटय़ात उबवून त्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना खायला प्यायला घालून मोठे करत असतात.

रंगाचा साज लेवून, गंधाची उधळण करत, प्रियतमेला साद घालणाऱ्या पक्ष्यांच्या स्वरातून अवतरणारा वसंत जीवनात एक नवी उमेद देऊन जातो. गोठवणाऱ्या शिशिरानंतरही जीवनात नेहमीच नवनिर्माणाची कोवळी पालवी फुटते याचा विश्वास देतो आणि पुढे येणाऱ्या तापदायक ग्रीष्मालाही सोसायच्या बळाचे दान ओंजळीत घालून निघून जातो.

(सर्व छायाचित्रे – डॉ. विनया जंगले)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:28 am

Web Title: lokprabha article on spring season abn 97
Next Stories
1 कालगणना
2 उत्सव : आनंदु वो माये..
3 राशिभविष्य : दि. २० ते २६ मार्च २०२०
Just Now!
X