मस्त रानावनातून फिरावे, रंगीबेरंगी पक्ष्यांचे निरीक्षण करावे, त्यांची किलबिल ऐकावी, प्राण्यांना जवळ घेऊन त्यांच्या मऊशार अंगावरून हळूच हात फिरवावा, त्यांना प्रेमाने कुरवाळावे असे मला नेहमीच वाटायचे; पण मुंबईच्या धावपळीच्या जीवनात आणि संसाराच्या रामरगाडय़ात ते कधीच जमले नाही.
नाही म्हणायला लहानपणी आमच्या घरी एक मांजर पाळलेली होती. ती अगदी हळू आवाजात ओरडायची म्हणून आम्ही तिला मंजुळा म्हणत असू. काही हवे असले की, अगदी हळूच म्यॉव करत पायाला अंग घासत भोवती फिरायची. तिच्याशी आणि तिच्या पिल्लांशी खेळण्यात, त्यांना मांडीवर घेऊन लाडावण्यात, प्रेमाने अंथरुणात घेऊन कुशीत झोपवण्यात बालपण सरले. तेव्हा असेही वाटायचे की, मोठे झाल्यावर आपण एक मोठ्ठे घर घेऊ, त्यात सगळय़ांची गाय, हरीण, ससा, बकरी मिळतील तेवढय़ा प्राण्यांची पिल्ले सांभाळू; पण नंतर आम्ही मुंबईला आलो. ‘दुधाची तहान ताकावर भागवावी’ अशी एक म्हण आहे, ती म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. माझा पक्ष्यांबद्दलचा छंद मी घरातल्या घरात पुरविण्याचा प्रयत्न करते.
47लहान असताना मला पोळय़ा करण्याचा खूप कंटाळा यायचा; पण पोळय़ा करण्यावाचून सुटका नसायची. एक दिवस असेच ओटय़ावर बसून (पूर्वी उभे ओटे नव्हते) पोळय़ा करत होते. घरातल्या खिडकीवर बसून दोन-तीन चिमण्या ओरडत होत्या. बघू या खातात का म्हणून कणकेचे एक-दोन छोटे-छोटे गोळे करून टाकले आणि पोळय़ा करता करताच एकीकडे कणिक खाण्यासाठी येतात का इकडे लक्ष ठेवले. थोडय़ाच वेळात इकडेतिकडे बघत भीत भीत खाली आल्या आणि पटकन् कणकेचा गोळा चोचीत पकडून भुर्रकन उडून खिडकीवर जाऊन खात बसल्या. मला मग रोज त्यांना कणिक टाकायचा नादच लागला. चिमण्याही हळूहळू एवढय़ा धीट झाल्या की, परातीतली पोळी मी पोळय़ा करत असतानाही पळवू लागल्या, चिवचिव करून मागू लागल्या. या नवीन छंदामुळे मला पोळय़ांचे काम आवडू लागले. माझे नावडते काम आवडते झाले. मी आपणहून मागून ते काम करू लागले. माझ्यातल्या या बदलाचे आईलाही मोठे नवल वाटले. असेच जेव्हा संधी मिळेल तेव्हा माझी हौस भागवून घेत होते.
लग्न झाल्यावर मी डोंेबिवलीत आले. तेव्हाची डोंबिवली म्हणजे एक सुंदर, स्वच्छ खेडेगाव वाटायचे. आमच्या घराजवळच्या नवरे वखारीतला मोर गच्चीवर येऊन बसायचा, ओरडायचा. तो बघायचा छंद जडला. मग एकदा केव्हा तरी अशाच मैना अंगणात आल्या म्हणून त्यांना काही तरी खायला घातले तर पटकन् दोन पायांवर उडय़ा मारत आल्या आणि गट्टम केले. मी पुन्हा घातले, पुन्हा गट्टम केले. माझा मग नवीन उद्योग सुरू झाला, मैनांना खाऊ घालण्याचा. खायला मिळते म्हटल्यावर त्याही रोज येऊ लागल्या आणि मी नसले तर ग्रिलपाशी येऊन चोच वर करून ओरडू लागल्या. मलाही त्यांचे विशिष्ट प्रकारचे ओरडणे ओळखीचे झाले. मी घरात काम करीत असले तरी त्यांचा आवाज ऐकून- अगं बाई, मैना आल्या वाटतं, असं म्हणून त्यांना खायला घालू लागले. कालांतराने त्या यायच्या बंद झाल्या आणि नोकरी-संसारात मीपण त्यांना विसरून गेले. आता मुलं संसारी झाल्यावर आणि मी सेवानिवृत्त झाल्यावर माझी हौस पुन्हा उफाळून आली.
घरात राहूनच हा छंद मी मस्तपैकी जोपासते. माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर ग्रिलमध्ये मी दोन फळय़ा ठेवल्या आहेत आणि त्यावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवून खायलाही घालते. सुरुवातीला पोळय़ांचे तुकडे, तांदूळ टाकले की, फक्त चिमण्याच यायच्या. काय ते त्यांचे नखरे! एकदा इकडे मान करून बघणार, एकदा तिकडे मान करून बघणार. चोच हळूच ग्रिलवर घासणार आणि मग सावध राहात इकडेतिकडे बघत खाणार. चिमण्यांचा हा उद्योग दिवसभर चालू असतो. मला तर कधी-कधी नवल वाटते की, एवढेसे यांचे पोट भरत कसे नाही? कधी नुकत्याच उडू लागलेल्या पिल्लांना घेऊन येतात. त्यांचे ते इवल्या इवल्या चोचीत चोच घालून भरवणे मोठे विलोभनीय असते. कधी तापलेल्या उन्हाळय़ात पाणी पिता पिता पाण्याच्या भांडय़ात उतरून चोचीने अंगावर पाणी उडवून घेऊन आंघोळ करायचा कार्यक्रम तर बघत राहावा असाच असतो.
आपण मुलांनाच ओरडतो, की सारखं चटकमटक खायला लागते; पण पक्ष्यांनासुद्धा असे चविष्ट खायला आवडते आणि असे काही वेगळे खायला घातले, की दुसऱ्यांना खाऊ देत नाहीत. दुसऱ्या चिमण्यांच्या अंगावर धावून जातात. फरसाण, ढोकळय़ाचा चुरा, खिचडी, थालीपीठ हे पदार्थ आवडीने खातात. कधी-कधी आश्चर्य वाटते की, एवढय़ा आतल्या बाजूला काही तरी वेगळे खायला घातले आहे हे त्यांना कसे समजते! असे काही घातले की, निरनिराळे पक्षी येतात.
एक  दिवस गंमतच झाली. मी खाऱ्या बिस्किटांचा चुरा फळीवर टाकला होता. मी विसरून गेले. काम करता करता नेहमीच्या सवयीने खिडकीत डोकावयाला गेले, तर काय, बुलबुलांचे एक कुटुंब बिस्किटांच्या चुऱ्यावर ताव मारण्यात दंग होते. आईबाबांची नवीन पदार्थ पिल्लाला भरवण्यासाठी चढाओढ लागली होती. अरे व्वा! आज बुलबुल आले वाटतं? घरातल्या सगळय़ांना हाका मारून मारून ते दृश्य बघायला बोलावले. आता मात्र बुलबुलही नियमित येतात; पण काही स्पेशल असेल तरच बरं का! आता मी माझ्या जेवणाची जागाही बदलली आहे. या खिडकीजवळ स्टुलावर बसून एफएम गोल्डवरची गाणी ऐकत या पक्ष्यांची गंमत बघत माझे जेवण होते. खरे तर हे सारे बघूनच माझे पोट भरते.  
आता पूर्वीसारखी एक मैनांची जोडीही येऊ लागली आहे. खाण्यासाठी ओरडायची त्यांची पद्धत, जोडीदाराला बोलवायची पद्धत, मांजरासारखा शत्रू जवळ आहे हे जोडीदाराला सांगायची पद्धत, हे सारे माझ्या ओळखीचे झाले आहे. माझ्या नातवालाही याची आवड निर्माण झाली आहे. तोही कधी खायला घातलेले दिसले नाही, तर स्वत:हून घालतो. नाही तर विचारतो, आजी, तू आज पक्ष्यांना काही घातले नाहीस का? कधी त्यांना खाताना बघून विचारतो, मी त्यांच्या अंगावर हात फिरवू? अगदी हळू फिरवीन, त्रास नाही देणार. मग त्याला समजावे लागते, अरे! ही गंमत सारी दुरूनच बघायची असते. ते पक्षी खूप भित्रे असतात. आपल्या आणि त्यांच्यामध्ये जाळी आहे म्हणून ते येतात तरी.
कावळय़ांची दुसरीच तऱ्हा. कावळा कसला तरी सुकलेला तुकडा घेऊन येतो आणि पाण्यात बुडवितो. कधी तो तुकडा पाण्यात पडतो आणि भांडय़ातले सगळे पाणी खराब होते. म्हणून मी पाण्याचे भांडे जरा त्याला चोच बुडवता येणार नाही असे ग्रिलपासून आतल्या बाजूस ठेवते, तर पठ्ठय़ा डोके आत घालून-घालून चोचीने भांडे ओढून घेतो आणि आपला कार्यभाग साधतो. हे पाहिले की, लहानपणी ऐकलेल्या तहानलेल्या चतुर कावळय़ाच्या गोष्टीची आठवण येते.
आमच्यासमोरच पाण्याची टाकी आहे. कधी कधी ती वाहते. उन्हाळय़ात निरनिराळे पक्षी पाणी पिण्यासाठी, पाण्यात डुंबण्यासाठी येतात. मध्यंतरी असेच काही चिमण्यांपेक्षा थोडे मोठे काळय़ा रंगाचे पक्षी मोरासारखा छोटासा पिसारा फुलवून आंघोळीची मजा लुटत होते, पाण्यात खेळत होते. त्यांच्या अंगावर खालच्या बाजूस एकच पांढरी रेघ होती. मध्यंतरी चिमण्यांपेक्षाही छोटे लांब टोकदार चोचीचे थोडे हिरवटसर रंगाचे पक्षी येत होते. असे हे गोजिरवाणे पक्षी रखरखीत उन्हाळय़ात माझ्यावर आनंदाची बरसात करतात आणि माझी हौस भागवतात.     
वेदना!
हे मी तुला का सांगतोय हे मला माहीत नाही, बहुतेक तू माझ्या मुलाच्या वयाचा असावा म्हणून असावं. माझ्या निवृत्तीला आता सात-आठ वर्षे झाली. चौकोनी कुटुंब, एक मुलगा अन एक मुलगी. मी नोकरी सांभाळली, तर यांच्या मम्मीने संसार अन् यांच्याकडे लक्ष दिलं. मुलांना कुठे कमी पडू दिलं नाही. मुलीचं लग्न होऊन १० वर्षे झाली, तर मुलगा सध्या अमेरिकेला असतो. मुलगी वरचेवर घरी येते, पण नोकरी, मुले अन संसार हे सर्व करता करता तिची धावपळ होते, अन् आता तर  निघायची घाई करते. तिचा दोष काय, कुठे कुठे लक्ष देईल ती.
मुलांनी शिकावं, मोठं व्हावं असं मनोमन वाटत होतं. त्यात मुलगा हुशार म्हणून उच्चशिक्षण दिलं अन् शिक्षण करून जो तो अमेरिकेला गेला तो अजून तिथेच रमलाय. पूर्वी म्हणायचा की तीन-चार र्वष राहून मग परत येतो. मग लग्न करावं म्हणून पुन्हा विचार बदलला. नंतर सुनेनं अमेरिका अनुभवावी म्हणून पुढे परतणं लांबलं अन आता मुलगी झाल्यावर तिला इथलं वातावरण कसं झेपेल अशी चिंता त्याला लागली आहे. एकुलता एक मुलगा आमचा. रोज फोन करतो, बोलणं होतं, पण डोळ्यासमोर नाही याची खंत वाटते. एवढय़ा मोठय़ा घरात आम्ही दोघं, घर खायला उठतं. का कुणास ठाऊक, एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे, या घरात. याची मम्मी वरचेवर आजारी असते. रात्री अपरात्री उठते अन याच्या आठवणीनं ढसाढसा रडते. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण आईचं मन तिचं, मला इतका शोक होतो तर त्या बिचारीचा काय दोष?
महिन्याला इथे बँकेत डॉलर जमा होतात, पण मुलाच्या स्पर्शाच्या उबेपुढे त्या डॉलर्सची ऊब काय कामाची. कधी गरज पडली तर शेजारच्या मुलाला बोलवायला लागतं, कुणी नाही म्हणत नाही मदतीला, पण एकुलता एक मुलगा परदेशी ऐश्वर्यात असताना कुणाला मदतीला बोलवायला कसं तरीच वाटतं. अजून किती र्वष आम्ही जगणार माहीत नाही, मनात विचार येतो, उरलेल्या आयुष्यात मुलासोबत अन् नातीसोबत भरलेल्या घरात राहायला मिळेल की नाही. हिनं तर आता वेगळंच खूळ घेतलंय डोक्यात, म्हणे उद्या-परवा माझं काय झालं तर तोंड पाहायला तरी हा पोहचेल का? कधी कधी शांतपणे विचार केला तर वाटतं थोडा कमी शिकला असता तर जवळ राहिला असता. कमी चैन केली असती, पण घर फुललं असतं. हिचं प्रेशर, माझा डायबेटीस अन् ही औषधे, का कुणास ठाऊक हा जवळ असता तर वाटय़ाला आली नसती.
तुमच्यासारखी तरुण मंडळी समोर येतात तेव्हा तो डोळ्यासमोर उभा राहतो. कसं समजावू त्याला हा जन्म एकदाच आहे. हे पप्पा-मम्मी एकदाच येणार आहेत वाटय़ाला. एकदा गेले की पुन्हा नाही येणार परत. मग कितीही डॉलर्स मोजले तरी न आम्ही परतणार, न उडून गेलेले क्षण. आयुष्य म्हणजे पैसा, प्रमोशन, चैनीचं जीवन असं थोडंच असतं. जिथे नात्याचा ओलावा नाही, आपलं माणूस जवळ नसल्यानं डोळ्यात पाणी नाही, अशा जिण्याला काय आयुष्य म्हणायचं? मी हताश झालोय, पण आशावादी आहे, तो येईल कायमचा परत आमच्याकडे. पुन्हा घर भरेल, बहरेल. त्याची आई शांतपणे झोपेल. त्याने यायलाच पाहिजे आता, त्याची आई अन मी कायमचे झोपी जाण्याअगोदर.
सचिन मेंडिस

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप