News Flash

विज्ञानवर्षांरंभ!

उघडा दरवाजा आणि घरात मिट्ट काळोख! अक्षयला काहीच कळेना.. तितक्यात टेबलावर हात टेकवून, डोकं घट्ट पकडलेला सिद्धान्त त्याला दिसला. अक्षय म्हणाला, ‘

| January 2, 2015 02:30 am

उघडा दरवाजा आणि घरात मिट्ट काळोख! अक्षयला काहीच कळेना.. तितक्यात टेबलावर हात टेकवून, डोकं घट्ट पकडलेला सिद्धान्त त्याला दिसला. अक्षय म्हणाला, ‘अरे, बाहेर थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचा माहोल आहे, दिव्यांचा झगमगाट आहे आणि तू असा अंधारात? का रे.. काही प्रॉब्लेम? काय झालं?’
चिडलेला सिद्धान्त म्हणाला, ‘अरे काय चाललंय पाहिलंस का? विमानं गायब होतायत.. दहशतवादी शेकडो लहान मुलांचा क्रूर बळी घेतायत.. देशातली बेरोजगारी वाढत्येय.. पूर्वी देशाबाहेरून येऊन दहशतवादी स्फोट घडवत. आता आपलीच भारतीय मंडळी सीरियामधल्या उठावात दिसताहेत.. नक्षलवाद्यांनीही डोकं वर काढलंय.. सगळीकडे निगेटिव्हिटी आहे..  गेलं वर्ष वाईट घटनांचं होतं. २०१५ मध्येही मला काही चांगलं होईलसं दिसत नाही!’  
‘हात्तीच्या एवढंच ना?’, अक्षय म्हणाला, ‘अरे, जगाकडे पाहण्याचा तुझा चष्मा बदल म्हणजे चांगलं दिसेल.. तुझ्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, म्हणून तुला वाईट गोष्टी दिसताहेत. मला  गेल्या वर्षांतल्या चांगल्याच गोष्टी आठवतायत.’
‘काही घडलंय का चांगलं गेल्या वर्षांत?’ –
‘ऑफकोर्स, घडलंय की! कित्ती तरी चांगलं घडलंय’- इति अक्षय.. ‘२०१४ पासून भारतीय भाषांमध्ये डोमेन नेम्स सुरू झालीयत. आता डॉटकॉम बरोबरच डॉट भारतही उपलब्ध असणार..’
‘त्याने काय फरक पडतो? आपल्या आयुष्यात किंवा देशात फरक पडला असे काहीतरी सांग.’ – सिद्धान्त.
‘आहे की. एका मुस्लीम महिलेने मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळण्यासाठी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना दत्तकाधिकार सर्व धर्मातील भारतीय महिलांना प्रदान करण्याचा क्रांतिकारी निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला. धर्मनिरपेक्ष किंवा सर्वाना समान कायदा लागू करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल होते. २०१४ हे पोलिओमुक्त देशाचे सलग दुसरे वर्ष होते. जनता आणि सरकारी इच्छाशक्ती एकत्र आली तर काय होते ते आपण सिद्ध केले.’
चेहरा खाली करूनच संवाद साधणाऱ्या सिद्धान्तने हे ऐकल्यानंतर मात्र मान वर केली.. अक्षय बोलत असतानाच मघापासून दरवाजातून संवाद ऐकत गप्प असलेल्या जान्हवीनेही तोंड उघडले.. ती म्हणाली, ‘माझ्या दृष्टीने तर गेले वर्षही विज्ञानाचे होते. पुढचे वर्षही विज्ञानाचेच असणार आणि ज्या युगात आपण जगतोय तेही विज्ञानयुगच आहे! २००० साली गर्भाशयाचे प्रत्यारोपण केलेल्या महिलेला २०१४ साली मूल झाले ते सुदृढ बालक होते. ते बालक म्हणजे समस्त महिलांना विज्ञानाने दिलेले वरदानच होते! ..पण विज्ञानाचे सेलिब्रेशन फारच कमी लोक करतात.. कारण महत्त्व कुठे कळते आपल्याला?’
अक्षय म्हणाला.. ‘आणि महत्त्वाचे म्हणजे रोसेटा यान धूमकेतूच्या शेपटावर उतरले! हा मानवाने घडवलेला चमत्कार होता!’
‘त्याने काय होणार?’ – सिद्धान्त
‘अरे त्याने तू आणि मी कुठून आलो या भूतलावर ते कळणार.. पृथ्वीवर पाण्याचा अंश आला तो धूमकेतूच्या धडकेतून. त्या धडकेच्या वेळेस त्याच्या शेपटावर असलेले पाण्याचे िबदू इथे पडले आणि त्यातूनच जीवनिर्मिती झाली या ‘सिद्धान्ता’वर आता शिक्कामोर्तब होणार. त्याचा शोध घेण्यासाठीच तर ते यान धूमकेतूच्या शेपटावर उतरवले! जान्हवीने जे वरदान सांगितले तेही विज्ञानामुळेच प्राप्त झाले आहे. माझा शुभ-अशुभ यावर विश्वास नाही, कारण मी पूर्णपणे विज्ञानवादी आहे. पण तुला चांगला संकेत हवाच असेल तर ३ ते ७ जानेवारी भारतीय सायन्स काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत होते आहे आणि दरवर्षी ते वर्षांच्या सुरुवातीलाच होते. तिथे जायचे, विज्ञानाची कास धरायची की, शुभाशुभाचे प्रश्नही पडत नाहीत आणि विज्ञानामुळे आयुष्य सुकर होते. सो, नव्या वर्षांत विज्ञानवादी हो! सकारात्मकता आपोआप येईल कारण त्यात संपूर्ण मानवजातीचे कल्याण दडलेले आहे!’
तेवढय़ात जान्हवीने घरातले दिवे लावले आणि सर्वजण एकत्र म्हणाले, ‘हॅपी न्यू इअर!’
सिद्धान्त म्हणाला.. ‘चला करूया, विज्ञानवर्षांरंभ!’
01vinayak-signature2

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:30 am

Web Title: lokprabha editorial about what happened in 2014 what is going to happen in 2015
Next Stories
1 वामनपाऊल!
2 गेम थिअरी!
3 समृद्ध मुंबईसाठी..!
Just Now!
X